चला, तुमचं आपलं काहीतरीच

सागर आजही एकदम अस्वस्थ झाला होता. खरंतर तो अस्वस्थ असणं म्हणजे आता या घराला नवीन नव्हते. देशमुख साहेबांनी डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर पावसकरांनी नेहमीच्याच गोळ्या द्या म्हणून सांगितले. खरंतर त्या गोळ्यांनी तो दिवस दिवस झोपून रहायचा. पण तो अस्वस्थ झाला की व्हायलंट व्हायचा. घराबाहेर पडायचा प्रयत्न करायचा. कित्येकदा त्याच्या आईवडिलांनी त्याला त्याच्या खोलीला बाहेरून कडी लावून कोंडून ठेवला होता.

चला, तुमचं आपलं काहितरीच वेडा नाहीये काय तो. त्याला फक्त भास होतात इतकंच. काही आठवड्यांपूर्वी तो आणि काही मित्र कोकणात सहलीला म्हणून गेले होते ते ही भर पावसाळ्यात.

दोन दिवस आरामात गेले. तिसर्‍या दिवशी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. तसं फार काही मोठं नसलं तरी एक वादळ आलं. सागर आणि त्याचे मित्र समुद्रावर गेले होते. जोराची हवा सुटली तशी पांगापांग झाली आणि सगळेजण रुमकडे धावले. थोडावेळ गेला आणि सागर आपल्यासोबत नाही हे त्याच्या मित्रांना जाणवले. दोन एक तासांनी वार्याचा जोर जरा ओसरल्यावर काही लोकल माणसांच्या मदतीने ते समुद्रावर गेले. सागर किनार्‍यावर पडला होता. त्याला रुमवर आणला असता तो तापाने फणफणलेला आहे हे सगळ्यांना जाणवले.

मित्रांनी त्याला तिथल्या दवाखान्यात दाखवून तात्पुरती औषधे घेतली आणि सकाळी पुण्याचा रस्ता धरला. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे सागर घरी झोपूनच असायचा. ताप, डोकेदुखी अशा लक्षणांनी सुरु झालेल्या आजाराने सगळ्या टेस्ट केल्या तरी हातात ठोस असे काही लागले नव्हते. चांगला सहा फूट उंच असणारा, नियमीत  जीम करणारा मजबूत शरीरयष्टीच्या सागरची तब्येत काही आठवड्यात अगदी तोळामासा झाली होती.

तसं त्याला बाकी काही झालं नाहीये काय. त्याने त्यादिवशी वादळात तीला बुडताना पाहिलं होतं. तीला वाचवायला म्हणून तो धावला देखील होता. पण प्रचंड वारा आणि पाऊस याने काहीच दिसत नव्हते. तो पाण्यात आत जायचा प्रयत्न करे पण जोरदार लाटांनी बाहेर फेकला जात होता. प्रत्येक वेळी ती त्याच्या पासून तेवढ्याच अंतरावर दिसे. नंतर तो कधी बेशुद्ध पडला ते त्याला आठवतच नाही.

किनार्‍यावरुन त्याला रुमवर आणल्यावर त्याची तापातली बडबड ऐकून तिथला एक वयस्कर नोकर परसू म्हणाला देखील होता

परसू – अरं माझ्या कर्मा… म्हंजी तीनं धरलं म्हणायचं का ह्यालाही?

धीरज – तीनं म्हणजे कोणी?

परसू – अरं बाबा… तुमच्या सारखीच काही मुलं अन मुली आली होती काही वर्षांपूर्वी. आपल्याच इथे राहिली होती. तेव्हा पण एक वादळ आलं होतं. त्यातलीच एकजण त्या वादळात गायब झाली होती. तीचं काहीच सापडलं नाही. ना कपडे, ना बॉडी ना अजून काही. तेव्हा पासून अमावस्या, पौर्णिमा आणि वादळादिवशी किनावरुन ती कोणालातरी घेऊन जाते.

तेवढ्यात घर मालक नाईक आले अन त्यांनी परसूला हाकलला.

नाईक – का मुलांना घाबरवतो रे. गम्मत काही वेळ ठीक. आता ही वेळ आहे का गम्मत करायची? जा बाकीची कामं कर जा.

परसू म्हणत होता ते खरं की खोटं माहिती नाही. पण तुम्हाला हे खरं वाटत? अहो पण नाईकांनी सांगितले होते की तो गम्मत करत होता म्हणून. काय म्हणता? नाईकांनी त्यांच्या होम स्टे चे नाव खराब होऊ नये म्हणुन, त्यांचा बिझनेस खराब होऊ नये म्हणुन असे सांगितले असेल तर? चला तुमचं आपलं काहीतरीच. तुम्हाला काहीही वाटतं? अन इथे पुण्यात कुठे समुद्र आहे?

पण आज पुन्हा वादळ आलंय. काय की बुवा पण सागर आज पुन्हा व्हायलंट झाला आहे हे मात्र खरं. तीला वाचवायला जायला हवे म्हणत आहे.

काय म्हणता? नाव काय होतं तीचं? अहो कसलं नाव नी काय? परसूने गम्मत केली होती सांगितले ना मघाशीच. म्हणे परसूने तीचं नाव “निसर्गा” होतं म्हणून सांगितले होते? आणि आज आलेल्या वादळाचं नावही “निसर्गा”च आहे?

चला, तुमचं आपलं काहीतरीच, म्हणे आज सागर गॅलरीतून तीला वाचवायला म्हणून धावला आणि १२ व्या मजल्यावरून खाली पडून जागेवरच गेला? अहो तो तिथे असेलच कसा? कारण सागर, मी आणि निसर्गा इथे समुद्रात मस्त खेळतो आहे.

Image by Pete Linforth from Pixabay

Abhijit Inamdar

Abhijit Inamdar

लेखक परिचय : नाव- अभिजित अशोक इनामदार. सातारा जिल्ह्यातील म्हासुर्णे माझे बालपण हे (वयाची पहिली १४ - १५ वर्षे) हे खेडेगावामध्ये गेले. मी इंजिनिअरिंग केले असून एमबीए इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये केले आहे. नोकरीनिमित्त बऱ्याच ठिकाणी फिरून झाल्यानंतर सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे. लहानपणापासूनच मला कला क्षेत्राबद्दल जिव्हाळा आहे. काही नाट्यप्रयोग तर काही म्युझिकल शोज चे अँकरिंग केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपणही काहीतरी लिहू शकतो याची मनाला आस लागून राहिली होती अन म्हणूनच मग फेसबुक वर २०१२ पासून लिखाण सुरु केले. माझे क्षेत्र जरी यांत्रिकी असले तरी लिखाणामुळे नवी उर्जा मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!