वर्किंग मदर…
अखेर तो दिवस आलाच…
माझ्या अडीच महिन्यांच्या गिरिजा नामक परीला मला घरी ठेऊन नोकरीवर जावंच लागलं…
इलाजच नव्हता…
तिला सांभाळायला सासूबाई आहेतच..सासरे आहेत…
‘हे’ वेळ मिळेल तसं सहकार्य करतात…
कॉलेजला जॉईन व्हायच्या अगोदर चार दिवस मनातल्या मनात रडू येई…
आधल्या दिवशी तर बांध फुटावा तसं कोसळलच…
कशीबशी रात्र गेली आणि दुसऱ्या दिवशी मी उठले…
सहाची गाडी…
आमची परी चार वाजताच उठली…
जणू मला ‘टाटा’ करायलाच…
तासभर माझ्याकडेच…
मी गेल्यानंतर चार पाच तासांचा विरह होता ना आमचा…
तो तिने भरून काढला…
इन ऍडव्हान्स…
जड हातांनी मी तिला पाळण्यात ठेवली आणि मी माझं आवरायला घेतलं…
हिचे डोळे खणखणीत उघडे…
हात हलवणं आणि पायांची सायकल अखंड चालू…
पावणे सहा झाले आणि तो क्षण आलाच…
तिला टाटा-बाय काहीही करायचं नाही असं सासऱ्यांनी अगोदरच बजावलेलं…
तरीही मन तयार होत नव्हतं…
पायात घातलेली चप्पल परत काढली आणि तिला बघायला बेडरूममध्ये गेलेच…
तिने तिचे ते बोलके डोळे गरकन् माझ्याकडे फिरवले…
मला तिच्या डोळ्यात डोळे घालून बघायची हिम्मतच होत नव्हती…
मन आणि पाय दोन्ही प्रचंड जड झालेलं…
जणू मन दुखत होतं…
तिला बघितलं, तिला डोळ्यांत साठवलं…
आणि बेडरूममधून तडक बाहेर पडले…
सासूबाईंचे डोळे पण पाणावलेले…
त्यांना त्यांच्या नोकरीचा तो पहिला दिवस आठवला…
त्या त्यांच्या मुलाला त्यांच्या सासूबाईंकडे ठेऊन गेल्या होत्या तो दिवस…
भरल्या डोळ्यांनी त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला…
तो हात मला खूप काही सांगून गेला…
तू जा बिनधास्त, काळजी नको करू, मी आहे अशा अनेक गोष्टी…
मी घरातून बाहेर पडले…
कारण माहेरवाशिणीसारखं घुटमळण्यात काही अर्थ नव्हता…
मला अखंड प्रवासात माझी परी दिसत होती…
अगदी ती झाल्यादिवसापासून ते आजपर्यंत…
तिचं ते फर्स्ट क्राय सुद्धा…
कॉलेजला गेले आणि सगळ्यांचा एकच प्रश्न…
मॅडम, बाळ कसंय?
प्रत्येकाला उत्तर देताना प्रत्येक वेळी माझा ऊर नव्याने भरून येत होता…
कशीबशी लेक्चर्स आटोपली आणि घरचा रस्ता गाठला…
पंधरा किलोमीटरचा रस्ता पंधराशे किलोमीटरचा वाटत होता…
गाडीवाल्याला सांगावंसं वाटत होतं…ने सुसाट…
मला माझ्या परीला कधी एकदा बघते असं झालंय…
घर आलं…
मी चप्पल काढली आणि बेडरूमचा दरवाजा हळूच उघडला…
माझी परी पाळण्यात शांत झोपली होती..
आपली आई आपल्याजवळ एवढे तास नव्हती हे तिच्या गावीही नव्हतं…
हलकेच तिच्या डोक्यावरून मी हात फिरवला…
तिने माझा जणू स्पर्श ओळखला…
किलकिल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघितलं…
आणि क्षणार्धात हसली…
शब्दांत सांगता न येणारं समाधान मला मिळालं…
परत एकदा डोळे पाणावले…
पटकन तिला उचललं आणि मिठीत घेतली………………………
Image by Sonam Prajapati from Pixabay
- देवदूत…डॉक्टर आणि ड्रायव्हर - September 18, 2021
- रक्षाबंधन… - August 23, 2021
- एक ओळख..अशीही… - August 20, 2021