काव्यांजली- २

“वेगळं म्हणजे? प्लिज डोन्ट टेल मी इथे भूत, आत्मा वगैरे आहे. तुला माहिती आहे माझा या गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये.”

“विश्वास तर माझाही नाहीये, पण हा अनुभव विचित्र आहे, हे देखील तितकंच खरं आहे.”

“बरं, रात्र खूप झाली आहे. आता झोपुया. उद्या ठरवू काय करायचं ते. ओके?” असं म्हणून त्याने खोलीतला दिवा मालावला. 

मध्यरात्री कनिकाला जाग आली आणि तिच्या लक्षात आलं पिहूचा दुधाचा थर्मास खालीच राहिला आहे. ती उठून तो आणण्यासाठी किचनमध्ये गेली.  थर्मास घेऊन वर जाताना तिला बाहेरून हसण्या-खिदळण्याचा आवाज आला. तिने खिडकीतून बाहेर डोकावून बघितलं. तिचं लक्ष व्हरांड्यातल्या झोपाळ्यावर गेलं. झोपाळा हलत होता. असं वाटत होतं कोणीतरी झोपाळ्यावर बसलं आहे. कनिका मनातून प्रचंड घाबरली पण तरीही तिने हिम्मत करून दार उघडलं. बाहेर मिट्ट अंधार होता. रातकिड्यांचा किर्रर्रर्र आवाज वातावरणातली भीती वाढवत होता. मान वळवून तिने झोपाळ्याकडे बघितलं तर तिला त्या खोलीत दिसलेली बाहुली तिथे हसत खिदळत झोपाळ्यावर बसून झोका घेताना दिसली. कनिका प्रचंड घाबरली. तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. ती तिथेच उभी राहिली. हळूहळू बाहुलीने जोरजोरात झोका घ्यायला सुरुवात केली. झोपाळा पुढे आल्यावर बाहुली विद्रुप दिसत असे आणि मागे जाताना तिचं रूप बदलून ती सुंदर दिसू लागे. हाच प्रकार कितीतरी वेळ चालू होता. एक क्षण ती विद्रुप बाहुली कनिकाच्या अगदी जवळ आली आणि कनिका जवळपास किंचाळलीच!

कनिकाला जाग आली. तिचं डोकं प्रचंड जड झालं होतं. राहून राहून तिला रात्रीचा प्रसंग आठवत होता. जे घडलं ते स्वप्न होतं की सत्य हेच तिला कळत नव्हतं. तिने आजूबाजूला बघितलं. तिला खोलीत कोणीच दिसलं नाही. पिहू…. पिहू कुठे गेली… मनात आलेल्या या विचारासरशी तिने अंगावरचे पांघरून बाजूला फेकले आणि पिहूला हाका मारत धावत खाली आली. तिचा आरडाओरडा ऐकून राघव धावत आतमध्ये आला.  

“माझी पिहू कुठे आहे?” कनिकाने राघवला विचारलं.

“पिहू कमलाजवळ आहे. ती तिला अंगणात भात भरवतेय.”

“भात भरवतेय? तिने घड्याळात बघितलं, तर घड्याळात बारा वाजले होते. ती धावत दरवाज्याजवळ गेली. बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाश होता. अंगणातल्या लॉनवर बाबागाडी मध्ये बसून पिहू मजेत जेवत होती. पिहूला सुखरूप बघून तिला समाधान वाटलं.

“ताई, तुमची तब्बेत कशी आहे आता?  राघवने आपुलकीने विचारलं.

“माझी तब्बेत? मला काय झालंय?” 

“ताई, पहाटे मी उठलो तेव्हा तुम्ही इथे दारातच शुद्ध हरपून पडल्या होतात. मी साहेबांना हाक मारली. आम्ही तुम्हाला उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण तुम्ही शुद्धीवर आल्या नाहीत. मग साहेबांनी तुम्हाला उचलून वरच्या खोलीत नेलं. आत्ताच डॉक्टर येऊन गेले.”

हे ऐकून कनिकाला धक्का बसला. तिने सागरकडे बघितलं. सागरने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, “कनिका तू विश्रांती घे, तुला आत्ता विश्रांतीची नितांत गरज आहे.”

“पण सागर….

“हे बघ, जे बोलायचं ते आपण वरती रूममध्ये जाऊन बोलूया. पिहूला कमला बघेल. चल..”

खोलीमध्ये गेल्यावर कनिकाने सागरला रात्री घडलेला  सगळा प्रसंग सांगितला आणि म्हणाली, “सागर, मला माहिती आहे तू माझ्यावर विश्वास नाही ठेवणार पण मी जे सांगते ते सगळं खरं आहे. मला कोणताही भास नव्हता झाला. मी मगाशी उठले तेव्हा मलाही कळत नव्हतं, काल जे घडलं ते स्वप्न होतं की सत्य, पण राघवने जे सांगितलं ते ऐकून माझी खात्री पटली ते स्वप्न नाही सत्य होतं. प्लिज सागर, प्लिज विश्वास ठेव माझ्यावर.”

“कसा विश्वास ठेवू कनू ? आणि हे सगळं तुलाच का दिसतंय? बाकी आम्ही सगळे इथे निवांत आहोत. पिहू बघ किती मजेत हसत जेवत होती. तू एकटीच अशी आहेस जिला इथे विचित्र भास होतात.”

“भास नव्हता तो सागर, मी तुला कसं समजावू तेच कळत नाहीये मला.” 

“हे बघ कनिका मला काहीही समजवायची गरज नाही. तुला इथे राहायचं नसेल, तर तू मुंबईला जाऊ शकतेस. पण हा प्रोजेक्ट माझ्या करिअरसाठी खूप महत्वाचा आहे. त्यामुळे तो सोडून मी कुठेही जाणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे.”

“सागर, मी कधी म्हटलं मला इथे राहायचं नाही. उलट मी खूप उत्साही होते इथे, पण काल त्या खोलीत, ती बाहुली….

“कोण बाहुली?  कुठली बाहुली? त्या खोलीत कुठलीही बाहुली नाहीये. मी स्वतः त्या खोलीत जाऊन आत्ता सगळं बघून आलो. ती एक अडगळीची खोली आहे. तिथे जुनं फर्निचर आणि इतर सामान सोडून बाकी काहीही नाहीये.”   

“हो, त्याच अडगळीच्या खोलीत मला ती बाहुली दिसली होती आधी सुंदर आणि मग विद्रुप अगदी भयानक… “

तिची अवस्था बघून सागरला वाईट वाटलं. त्याने तिला जवळ घेतलं आणि थोपटून म्हणाला, “कनू, कदाचित तुला अशा जुन्या आणि मोठ्या वाड्यात राहायची सवय नसल्यामुळे म्हण किंवा तू बघितलेल्या कुठल्यातरी ऑन स्क्रीन किंवा प्रत्यक्षातल्या घटनेला तू स्वतःशी रिलेट करत असल्यामुळे हे घडत असेल. ट्रस्ट मी, अशी कुठलीही बाहुली त्या खोलीतच काय तर या घरातही नाहीये. हे बघ मी आता जेवून निघतो. मला साईटवर जायला हवं. तू काळजी घे आणि मनातून त्या बाहुलीचा विचार काढून टाक.”

कनिका सागरला तिचं म्हणणं पटवू शकत नव्हती.  एकदा नाही तर दोनवेळा तिने घेतलेला अनुभव भास कसा असू शकतो, हेच तिला कळत नव्हतं. सागर निघून गेल्यावर कितीतरी वेळ ती बेडरूममध्ये तशीच पडून होती. जेवणावर तर तिची इच्छाच नव्हती. कमलाने पिहूला झोपवून तिच्याजवळ आणून ठेवलं. संध्याकाळी पिहू उठल्यावर देखील कमलानेच तिचं सगळं केलं. 

मुंबईत ती रोज संध्याकाळी आवरून पिहूला घेऊन चक्कर मारायला जात असे. इथे आल्यावरही तिने पिहूची संध्याकाळची चक्कर कधी चुकवली नव्हती. पण आज तिचं लक्षच लागत नव्हतं.

“ताई, कसं वाटतंय तुम्हाला? मी पिहूला घेऊन बाहेर चक्कर मारून येऊ का? तुम्ही आराम करा.”  कमला म्हणाली.

“हो ठीक आहे, पण लवकर ये जास्त उशीर नको करुस.”

“हो ताई, राघव येतीलच एवढ्यात. ते गावात भाजी आणायला गेले आहेत.” असं म्हणून कमला पिहूला घेऊन निघून गेली. 

क्रमश:

Image by Pete Linforth from Pixabay 

Manasi Joshi
Latest posts by Manasi Joshi (see all)

Manasi Joshi

कायद्याची पदवी. सात वर्ष लीगल फिल्डमध्ये काम केल्यावर नंतर स्वखुशीने स्वीकारलेला 'हाऊस वाईफ'चा जॉब. आवड म्हणून सुरू केलेलं लिखाण आता प्रोफेशनमध्ये बदललं आहे. सध्या अर्थसाक्षर.कॉम या वेबसाईटसाठी एडिटर आणि कंटेंट मॅनेजमेंटचं काम करते. - मानसी जोशी

One thought on “काव्यांजली- २

  • January 30, 2021 at 3:54 pm
    Permalink

    Very interesting 👍🏻

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!