काव्यांजली- ३
राघव येईलच एवढ्यात म्हणजे, तो आत्ता घरी नाहीये, म्हणजे घरात मी एकटीच आहे, मनातल्या या विचाराने कनिका घाबरली. ती कमलाला थांबविण्यासाठी धावत गेटपर्यंत गेली, पण तोपर्यंत कमला निघून गेली होती. कनिकाला आता प्रचंड भीती वाटू लागली होती. हा झोपळा, हा व्हरांडा इतकंच नव्हे तर हे घरच तिला भयाण वाटू लागलं होतं. कशीबशी ती आतमध्ये गेली. जिन्यावरून वर जाणार, तेवढ्यात तिला तिथल्या सोफ्यावर ती बाहुली बसलेली दिसली. कनिका घाबरली असली तरीही यावेळी ती सावध होती. तिला दिसणारी बाहुली हा भास नसून वास्तव आहे हे तिला सिद्ध करायचं होतं. तिने हातातल्या मोबाईलने त्या बाहुलीचे पटापट फोटो काढले. तेवढ्यात दार वाजलं. राघव भाजी घेऊन आला होता. तिला हायसं वाटलं. तिने सोफ्याकडे बघितलं तर तिथे बाहुली नव्हती. पण आता तिच्याजवळ मोबाईलमध्ये फोटोग्राफ्स होते.
“ताई, भाजी आणली आहे. साहेबांचा फोन आला होता, ते दुपारी गडबडीत फाईल घरी विसरले आहेत ती त्यांना साईटवर देऊन येतो.” एवढं बोलून राघव निघून गेला. पण कनिकाचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. ती स्वतःच्याच विचारात होती. राघवच्या गाडीचा आवाज ऐकून तिने दचकून बाहेर बघितलं, तर राघव फाटकातून बाहेर जाताना दिसला. “निदान कमला येईपर्यंत तरी त्याला थांबवायला हवं होतं. आता पुन्हा मी घरात एकटी..”, या विचारासारशी कनिकाने घाबरतच सोफ्याकडे बघितलं, बाहुली तिथे बसलेली होती पण आता ती विद्रुप दिसत होती. कनिका किंचाळली आणि धावतच बेडरूममध्ये गेली. आता तिला खूप रडू येत होतं. अगदी एकटं पडल्यासारखं वाटत होतं. आयुष्यात एवढी हतबल ती कधीच झाली नव्हती. थोड्या वेळाने ती शांत झाली. तिच्या एक लक्षात आलं, बेडरूममध्ये ती सुरक्षित होती. इथे तिला ती बाहुली अजिबात दिसत नव्हती. तिने मोबाईल हातात घेतला. तिने मोबाईलमध्ये त्या बाहुलीचे फोटो काढले होते.तेच तिला बघायचे होते. तिने पटकन मोबाईलची गॅलरी उघडली. पण त्या फोटोंमध्ये ती बाहुली सोडून सगळं दिसत होतं. कनिकाला धक्का बसला. आता तिलाही असं वाटू लागलं की हे सगळे भास आहेत. पण काही केल्या तिचं मन हे मान्य करायला तयार होत नव्हतं. या प्रकरणाचा छडा लावायचा तर, या गावातल्या लोकांकडे चौकशी करायला हवी. हा बंगला कोणाचा आहे, इथे आधी कोण राहत होतं, ती बाहुली मलाच का दिसते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली, तर त्या बाहुलीच्या रहस्याचा उलगडा होऊ शकेल.
दुसऱ्या दिवशी ती स्टेशनरी आणायच्या बहाण्याने घराबाहेर पडली. आजूबाजूचे बरेचसे बंगले बंद होते. तर उरलेल्या बंगल्यात राहणाऱ्या माणसांना या बंगल्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. गावात फिरून तिने आडून आडून बंगल्याविषयी माहिती काढायचा प्रयत्न केला, पण कोणालाच त्या बंगल्याबद्दल फारशी माहिती नव्हती. फक्त एवढंच कळलं की त्या बंगल्यात गेली 25 वर्ष कोणीच राहत नव्हतं.
दुपारी पिहूला झोपवून कनिकाने या बंगल्याची माहिती इंटरनेटवरून शोधण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या पदरी निराशाच पडली. आता एकच शक्यता होती ती म्हणजे सागरचा कंपनी. बंगल्याचा मालक कोण, हे कंपनी मधून कळू शकतं आणि मालकाकडून त्या बाहुलीची माहितीही मिळेल. पण हे सर्व करताना विचारपूर्वक, सागरला कसलाही संशय येऊ न देता करावं लागणार होतं.
कनिका शक्यतो खोलीतून बाहेर पडत नसे. कारण तिच्या मते या खोलीत बाहुली दिसत नव्हती. त्यामुळे या खोलीत ती सुरक्षित होती. सागरही प्रोजेक्टच्या कामात व्यस्त झाला होता, त्यामुळे त्याच्याशी फारसं बोलणं होत नसे. त्याच्या दृष्टीने तिला दिसणारी बाहुली हा तिचा भास होता आणि जोपर्यंत त्याच्यासमोर पुरावा नाही तोपर्यंत तो त्याच्या मतावर ठाम राहणार याचीही कनिकाला खात्री होती.
दुसऱ्या दिवशी रविवार होता. सागरला सुट्टी असल्यामुळे तो घरातच होता. त्याचा मूड बघून कनिकाने त्याच्यासमोर विषय काढला.
“सागर, मी या बंगल्यातले इंटेरिअर पाहून काही स्केचेस काढली होती. माझ्या एका क्लाएंटला ती प्रचंड आवडली आहेत. त्याची बहीण अशा जुन्या वास्तूंवर रिसर्च करते, त्यावर ब्लॉग लिहिते, तर तिला हा वाडा बघायची इच्छा आहे.”
“हा वाडा काही ऐतिहासिक नाहीये रिसर्च करायला, पण तिला यायचं असेल तर मग येऊ दे की, त्यात मला काय विचारतेस?”
“नाही, हे नाही. त्याचं काय आहे ना, हा बंगला आपला नाही. त्यामुळे या बंगल्याबद्दल लिहिताना तिला मूळ मालकाची परवानगी घ्यायची आहे. तुझ्या ऑफिसमधून या बंगल्याच्या मालकाचं नाव आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळतील का?”
“बघतो, विचारतो उद्या फोन करून.”
सागरच्या होकारामुळे कनिकाला जरा बरं वाटलं. आज पहिल्यांदा तिचं तपासकार्य किंचित का होईना पण पुढे सरकलं होतं. कनिकाच्या विचित्र वागण्यामुळे सागर तिच्यावर नाराज होता पण तिचं आजचं बोलणं ऐकून त्यालाही ती नॉर्मलला येतेय असं वाटू लागलं.
दुसऱ्या दिवशी सागरने ऑफीसमध्ये चौकशी करून बंगल्याच्या मालकाची सर्व माहिती कनिकाला मेसेज करून कळवली. कनिकाने त्वरित जागेच्या मालकांना फोन लावला. पण खोलीमध्ये फोनला रेंज कमी असल्यामुळे ती हॉलमध्ये आली. पण या जागेचा मालक कधीच या गावात आलेला नव्हता. त्याच्या वडिलांनी हा बंगला साधारण 15 वर्षांपूर्वी विकत घेतला होता. पण ते देखील तिथे कधीच राहिले नव्हते. त्यांनी या बंगल्याची साफसफाई करण्याचं काम एका कुटुंबावर सोपवलं होतं. अलीकडे 5 वर्षांपूर्वीच ते कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाल्यावर या बंगल्याची जबाबदारी रिअल इस्टेट एजंटकडे देण्यात आली. तो महिन्यातून एकदा या बंगल्याची साफसफाई करून घ्यायचा, पण इतके वर्षात या बंगल्यात कधी कोणीच राहिलेलं नव्हतं. जागेच्या कागदपत्रांवरून आधीच्या मालकांची माहिती देण्याची विनंती करून कनिकाने फोन ठेवला.
या फोनमधून तिला अपेक्षित कुठलीच महिती मिळाली नाही. ती हताश होऊन सोफ्यावर बसली. ती विचारात इतकी गढून गेली होती की तिला कसलेच भान नव्हते. विचारांच्या तंद्रीत असताना तिचा फोन वाजला. फोन बंगल्याच्या मालकाचा होता. त्यांना बंगल्याची कागदपत्र मिळाली होती आणि त्यांची माहितीही तिला मेसेज केली होती. कनिकाने मनोमन त्यांचे आभार मानून फोन ठेवला. ती तिथून उठणार तेवढ्यात तिला बाजूला बसलेली बाहुली दिसली, कनिका किंचाळून तिथून उठली. तिचा आवाज ऐकून कमला किचनमधून धावत आली. तिच्या कडेवर पिहू होती पण अचानक पिहूच्या जागेवर तिला बाहुली दिसली तर, कमलाच्या दुसऱ्या कडेवर तिला विद्रुप बाहुली दिसली हे सगळं दृश्य बघून तिची शुद्ध हरपली.
क्रमश:
Image by Pete Linforth from Pixabay
- माझी होशील का? - October 1, 2021
- काव्यांजली- शेवटचा भाग - February 12, 2021
- काव्यांजली- ४ - February 2, 2021