सिनेमा सिनेमा
आठवणीतील सिनेमांच्या काही आठवणी…
१९९४ साली ‘हम आपके है कौन’ सिनेमा आला तेव्हा मी इयत्ता पहिलीत होते. माझ्या आईने आणि मामीने ठरवलं की आपण सिनेमागृहामध्ये सिनेमा बघायला जायचं. आई , मामी आणि मी आम्ही तिघी जायचं ठरलं. तेव्हा माझा मामेभाऊ तीन वर्षांचा होता. त्याला न्यायचं नाही असं ठरल्यावर मला आनंद झाला. मी त्याला उलटा ठेंगा दाखवला. तो लहान असल्यामुळे त्याला ते तितकंसं समजलं नाही. माझा आनंद मीच साजरा केला. त्याला आम्ही सांगितलं की आम्ही डॉक्टरांकडे जातोय. तू येऊ नकोस, तुला ते ‘टूच’ करतील. आम्ही निघालो, सिनेमागृहामध्ये पोचलो, सिनेमा चालू झाल्यावर जी माझी ब्रह्मानंदी टाळी लागली ती डायरेक्ट रेणुका शहाणे जेव्हा जिन्यावरून खाली पडते तेव्हा मी उठले.
मी एकदा शाळेतून घरी आले. आई टी. व्ही. बघत होती. बाबा पेपर वाचण्यात गुंग होते. मी उंबरठ्यात पाय ठेवला आणि किंचाळले, ‘मेला’. बाबांनी मायक्रोसेकंदामध्ये पेपर बाजूला केला आणि म्हणाले, कोण गं , कोण मेलं? तेव्हा मी आणि आई अगोदर खूप हसलो आणि मग त्यांना सांगितलं, की टी. व्ही वर सिनेमा लागलाय, ‘मेला’
१९९८ साली मी चवथीमध्ये होते तेव्हा मी, माझ्या मैत्रिणी, माझी आई आणि माझ्या मैत्रिणींच्या आया असे सगळे आम्ही ‘सरकारनामा’ सिनेमाला गेलो होतो. तेव्हा माझ्याच एका मैत्रिणीची आई क्लास घ्यायची. आम्ही सगळ्या त्यांच्याकडेच क्लासला जायचो. आणि क्लासच्या मॅडम पण आमच्याबरोबर सिनेमाला आल्या होत्या म्हणजे आज क्लास नसणारच असं आम्ही मैत्रिणींनी गृहीतच धरलं होतं. तेव्हा आम्ही दुपारी बाराच्या शो ला गेलो होतो. तिन वाजता सिनेमा संपला आणि आम्ही आईस्क्रीम खात खात घरी गेलो. माझी आई मला म्हणाली, हात पाय धू आणि क्लासची बॅग भर, क्लासला जायचंय. त्या सिनेमाचा हँगओव्हर एका सेकंदात उतरला आणि मनोमन त्या क्लासच्या मॅडमचा राग आला. एवढं छान सिनेमाहून आलो आणि काय क्लासला जायचं, एक दिवस सुट्टी दिली असती तर काय बिघडलं असतं! मी सगळं आवरून निघाले, पायात चप्पल घालताना आईने सांगितलं, अगं मस्करी केली, सुट्टीच आहे क्लासला. तेव्हा जो काय आनंद झाला ना त्याला कसलीच तोड नाही.
माझ्या आईने तिच्या आठवणीतील सिनेमाची सांगितलेली आठवण.
माझ्या आई-बाबांचं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा ते दोघे एकदा ‘वतन के रखवाले’ सिनेमा बघायला गेले होते. इंटरवल झाला आणि बाबा आईला ‘चल, आता डायरेक्ट घरीच जायचं ना’ असं म्हणाले, तेव्हा आई त्यांना म्हणाली, ‘पिच्चर अभी बाकी है’
तेव्हा त्यांना इंटरवल हा प्रकारच माहिती नव्हता.
Image by gagnonm1993 from Pixabay
- देवदूत…डॉक्टर आणि ड्रायव्हर - September 18, 2021
- रक्षाबंधन… - August 23, 2021
- एक ओळख..अशीही… - August 20, 2021