सिनेमा सिनेमा- सोबत

जे जे हवे ते जीवनी ते सर्व आहे लाभले, तरीही उरे काही उणे, तू पूर्तता होशील का?

चांदण्यांनी फुलून आलेल्या रात्रीला आता उतरती कळा लागेल थोड्याच वेळात. सूर्य उगवला की कुठल्या तारका नी कुठला चंद्र. दिवस सुरु झाला की जगरहाटी आलीच पाठोपाठ. मग ते सकाळचे सुरुवातीचे कोवळेपण संपले की जून दिवस पसरेल आणि त्याहूनही चरचरणारे ऊन व्यापेल सगळीकडे. अगदी उघड्या डोळ्यांना दिसायला लागेपर्यंत. हे सगळे चक्र जरी माहित असले तरी मनाला समजावता येत नाहीये. कदाचित तुझी ओढ इतकी तीव्र आहे की त्या प्रेमाची सोबत पुरणार आहे एक तापलेला दिवस पार करण्यासाठी हाच विचार आहे माझ्या मनात या क्षणी. पण त्यासाठी का होईना तू यायला हवी आहेस. आत्ता. तू येशील ना? तुला ठाऊक नाही तुझ्यासाठी माझ्या मनात किती अतोनात प्रेम आहे ते. तुला हेही कदाचित माहित नाही की कितीतरी शब्द गोळा करून मी तुझ्यासाठी कविता लिहायचा, त्यांचे इटुकले पिटुकले इमले बांधायचा किती प्रयत्न केला ते. ते कोसळतील गं. तू येशील या एका आशेवर ते उभे आहेत. तू येशील ना? एकदाच ये आणि मग जाऊच नकोस.

इथे गाण्याची तार जुळते ती मेहदी हसनच्या गझलशी. जैसे तुम्हे आते है ना आने के बहाने ऐसे ही किसी रोज ना जाने के लिये आ. जातकुळी एकच या जीवघेण्या वाट पाहण्याच्या वेदनेची. किती कारणे न येण्याची, येऊ न शकण्याची. किती समजावणे स्वतःला ती येईल म्हणून आणि किती ते वाट पाहणे. इतके उत्कट प्रेम खरंच कुणी करते का कुणावर असा प्रश्न विचारायला लावणारे हे गाणे. खरंच कुणी करतही असले असे प्रेम तर त्याला धक्का लागू नये कुठल्याही व्यवहारी मनाचा, जगाचा, भावनेचा असे वाटायला लावणारे हे गाणे.

सखी मंद झाल्या तारका हे म्हणूनच माझे खूप लाडके गाणे आहे. कुणी म्हणतं हे गाणे निद्रेला उद्देशून आहे, कुणाच्या मते मृत्यूला उद्देशून आहे. असेलही. कुठल्या कवितेचा, गाण्याचा कुणी कसा अर्थ लावावा हे प्रत्येकाच्या अनुभव घेण्यावर अवलंबून आहे. मला मात्र हे गाणे प्रेम कविता या अर्थीच आवडते. पिठोरी चांदणे असावे, तिने येईन असे सांगितलेले असावे. तिची वाट पाहतांना पहाट आकाशाच्या कोपऱ्यात येऊन उभी ठाकावी, आशा आणि निराशा यांच्या खेळात थकलेल्या मनाने निर्वाणीचा इशारा द्यावा की मृत्यूही बोलावल्यावाचून येऊ शकतो. तो आला तर मी त्यालाही थांबायला सांगेन एक क्षण पण तू येशील का?

इतके प्रेम करू नये कुणी कुणावर खरंच असे वाटायला लावणारे हे गाणे आहे हे नक्की.

आपल्यावर सुधीर फडके आणि सुधीर मोघे या दोन सुधीरांचे अनंत उपकार आहेत. हे गाणे म्हणजे आपल्याला दिलेला एक लखलखता दागिना आहे. अनेक गाणी या दोघांनी एकत्र केली असतील. गदिमा आणि फडके ही तर दैवी माणसे. आम्हाला शाळेत असताना एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे ही कविता मला वाटते अवांतर वाचनात होती. नीटसे आठवत नाही. पण ती शिकवणाऱ्या आमच्या कमालीच्या सोज्वळ कानडे बाईंचा आवाज अजूनही कानात आहे. त्यांनीच मग वर्गात हे गाणे ग दि माडगूळकरांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी गायलेले आहे, नक्की ऐका असेही सांगितले. लगोलग घरी येऊन कॅसेट्स शोधल्या. एका कॅसेटवर मिळालेही. या गाण्याचा तिहेरी ठसा माझ्या मनावर आहे. त्याचे शब्द, हे गाणे शिकवणाऱ्या कानडे बाईंचा सौम्य सूर आणि सुधीर फडके यांचा धीरगंभीर आवाज.

आता माझ्या मनात या आवाजाची आणि गंभीर गाण्यांची पक्की सांगड बसली. ती सगळी कॅसेट मी उलटी पालटी करून अनेक वेळा ऐकली असेल. त्यातलेच दुसरे गाणे म्हणजे या तरुतळी विसरले गीत. अतिशय उदास असे हे गाणे त्यांच्या गंभीर आवाजात ऐकताना अजूनच उदास वाटे. बऱ्याचदा मी ते फॉरवर्ड करून टाकत असे. योगायोगाने त्यांच्या आवाजातली मी लगोलग बरीच गाणी जी ऐकली ती जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी, काहीशी गंभीर अशीच होती. घरात गंभीर प्रकृतीचे आजोबा असतात. ते फारसे हसत नाहीत. त्यांना विनोदाचे वावडे असते असे नाही पण मूळ प्रकृती गंभीर असल्याकारणे कुणी विनोद केलाच तर त्यांचा कल हा झोपाळ्यावर सुपारी कातरताना हळूच चष्म्याच्या वरून बघत एखादे स्मितहास्य करणे इतपतच असतो. फडक्यांची गाणी ऐकताना मला तरी सुरुवातीला असेच वाटायचे. एके दिवशी मदालसा तरूवरी रेलूनी वाट बघे सखी अधीर लोचनी, पानजाळी सळसळे यातली सळसळ ऐकू आली त्यांच्या आवाजातून आणि मी थबकले. वळे ती व्यथित हृदय कवळीत मधला ठेहराव जाणवला आणि टचकन डोळ्यात पाणी आले. किती वेळा ऐकले असेल मी नंतर हे गाणे याची गणतीच नाही पण बरोबर या ओळीला चरचरतेच काळजात.

पुढे मग बाबांनी मला समोर बसवून गीत रामायण ऐकवले. या आवाजाला इंद्रधनुष्यासारखे किती रंग आहेत ते तेव्हा उमजले. माणसाच्या स्वभावाच्या इतक्या वेगवेगळ्या छटा लिहिणारे आणि त्या गाण्यात बांधून तशाच्या तशा समोर ठेवणारे हे दोघेही महानच. मी त्यांची वेगवेगळी गाणी शोधायला सुरुवात केली. हा प्रवास मात्र खूप समृद्ध करणारा होता. संगीतकार आणि गायक म्हणून फडक्यांचे काम किती मोठे आहे हे त्यांच्याहून तीन पिढ्या लहान असलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीने सांगायला जाऊच नये. ती माझी योग्यताही नाही. पण त्यांचे काम ऐकून बघून जो आ वासलेला आहे माझा तो वासलेलाच आहे अजूनही.

एखाद्या आवाजाशी आपले नाते काय असते हे आपल्यालाही ठाऊक नसते. ते जडण्याची प्रक्रिया अव्याहत सुरूच असते. नाही वेचली कवडी दमडी नाही मोजिला दाम असे म्हणणारा त्यांचा हळुवार आवाज आणि पाठोपाठ येणारी आशा भोसल्यांची विकत घेतला श्याम ही लडिवाळ ओळ हे फार वेगळे रसायन आहे. उगा लाजण्याचा किती हा बहाणा म्हणताना आवाजात डोकावलेले हलके स्मित आणि पडद्यावर ही ओळ गाणारा अरुण सरनाईक हे फार जहाल कॉम्बिनेशन आहे. मी जर माझी आवडती मराठी रोमँटिक गाणी अशी यादी केली तर जवळपास पहिली सात ते आठ गाणी तरी नक्की सुधीर फडके आणि सुधीर फडके आणि आशा भोसले अशी निघतील. मग ते राजहंस सांगतो प्रीतीच्या तुझ्या कथा असेल, जरी आंधळी मी तुला पाहते असेल, सखी मंद झाल्या तारका असेल किंवा चंद्र आहे साक्षीला असेल.

असे काय नाते असावे या आवाजाशी माझे याचा शोध घ्यायचा मी खूप प्रयत्न केला आहे आतापर्यंत. वास्तविक फडके माझे बाबा आणि आजोबा यांच्या मधल्या कुठल्या तरी वर्षांमधले असावेत. माझे आईबाबाच काय पण आज साठी सत्तरीत असलेली सगळीच माणसे त्यांची गाणी ऐकतच लहानाची मोठी झाली असतील. फडक्यांसारख्या आवाजाला वर्षांचे परिमाण लावायचे नाही असे म्हणाले तरी उगाच एक काळाचा तुकडा मोजून पहायचा मोह आवरत नाही. आजही इतक्या वर्षांनी तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने ऐकताना मनात आकाश कवेत घेण्याचा आत्मविश्वास जागतोच. गाणे हे संगीतकाराचे असते, लिहिणाऱ्याचे तर ते असतेच, कधी पडद्यावरच्या कलाकाराचेही असते पण त्याहूनही ते गाणाऱ्याचे असते. शब्द समजून घेऊन, त्यांचा भाव पोचवणे, तेही सुरांचे ओझे वाटू न देता हे साधणे ही फारच तारेवरची कसरत झाली. ती कसरत वाटू न देणे ही अभ्यासपूर्ण सहजता साधली पाहिजे हे अशी तपःश्चर्या. हे सगळे लीलया पेलत फडक्यांचे गाणे येते. कधी त्यांचे गाणे हे लहान मुलाच्या पायात घातलेल्या छुमछुम पैंजणांसारखे असते तर कधी तत्कार करणाऱ्या घुंगरांसारखे येते. त्याचा बाज ते सोडत नाही पण तुमचा ठाव घ्यायलाही विसरत नाही. म्हणूनच निजरूप दाखवा हो मधली आर्तता ऐकताना वाटते माउली उभी असणार त्यांच्यासमोर गाताना. कानडा राजा पंढरीचा तर फडके आणि वसंतराव देशपांडे दोघांचे गाणे. वसंतराव देशपांड्यांच्या आवाज आक्रमक आणि फडक्यांचा त्यामानाने काहीसा सौम्य. पण गाण्यात कुठेही दोघे एकमेकांशी स्पर्धा करत नाहीत. तसा सूरच लागत नाही त्यांचा. दोघांचेही आवाज परस्परपूरक आणि स्वतःचे ठाम अस्तित्व सांभाळून दुसऱ्याचा आब राखून गाणारे. पुरंदराचा हा परमात्मा म्हणताना सर्वत्र पांडुरंग दिसत असावा अशी तल्लीनता. फार मोठे देणे असतात ही माणसे आपल्यासाठी.

एखादे गाणे ऐकताना या गाण्याची निर्मिती करताना काय झाले असेल, कसे सुचले असेल अशी माहिती जमवायला मला फार आवडायचे. नंतर लक्षात आले की ती माहिती नसली तरी काही बिघडत नाहीये. कारण त्या गाण्याचे संदर्भ प्रत्येकाचे वेगळे असूच शकतील. एकच गाणे प्रत्येकाने वेगवेगळ्या भूमिकेतून, वेगवेगळ्या क्षणी असे ऐकले असेलच. माझे त्या गाण्याबद्दलचे मत हे माझे संदर्भ घेऊन येते. त्या गाण्याला माझी व्यक्तिगत ओळख त्यामुळे मिळते. प्रत्येक वेळी ते गाणे ऐकताना ती ओळख जागी होते. आपण ते क्षण परत अनुभवतो. मग ते आनंदाचे असतील किंवा नसतील. त्या छोट्याश्या काळाच्या तुकड्याचे आपण तेव्हढ्यापुरते मालक असतो. गाणे हे माध्यमही होते आणि पूर्तीही. अशी कितीतरी गाणी असतात, आहेत. मग एखादेच गाणे, एखादाच आवाज नाते का सांधतो आपल्याशी?

मला तरी कुठे उत्तर माहित होते या प्रश्नाचे? माझ्यापुरता शोध मी थांबवलाच होता याचा.

रात्री झोपायला जायच्या आधी शांत, आवडती गाणी ऐकायची सवय होती कधी काळी. त्यात फडक्यांची गाणी आवर्जून असायची. अंगावर मऊ दुलई घेऊन पहुडल्यासारखे वाटायचे त्यांचा आवाज ऐकताना. अलगद थोपटून निजवणे आईला तरी जमते किंवा मग फडक्यांना तरी. घरातले दिवे शांत झालेले असावेत, रात्रीचा काळोख आणि शांतता गडद व्हावी आणि देवापाशी तेवत राहिलेल्या दिव्याच्या उजेडाचा आधार व्हावा असे वाटायचे त्यांचा आवाज ऐकताना. सगळ्या भावभावनांची गाणी ऐकली असतील मी त्यांच्या आवाजात. आक्रमक ऐकली आहेत, राग, लोभ, हताशा, प्रेम, दुःख अगदी सगळी. पण त्यांचा आवाज ऐकल्यावर मन काही क्षणात शांत होते हे त्यांच्या आवाजाचे खूप मोठे सामर्थ्य आहे. ते या सगळ्या मर्त्य भावनांच्या पल्याड आहे. ती केवळ जोजवून झोपी जायला लावणारी शांतता नाही. त्या शांततेची अनुभूती वेगळी. शुद्ध सात्विक स्वर हा एक भाग झाला. पण त्या सत्त्वाचे तेजही आपल्या मनाला उजळवणारे. दिपवणारे नाही. ये हृदयीचे ते हृदयी पोचवणारे. कधी कधी वाटते फडक्यांना शब्दांची गरज नाही खरेतर. त्यांच्या शुद्ध स्वरांनीच त्यांना काय म्हणायचे आहे ते नीटच सांगितले असते. पण त्यांना शब्दही झळझळीत मिळाले हे आपल्या ललाटीचे मोठे भाग्य. ते नाकारण्याचा करंटेपणा का करावा?

या आवाजाशी नाते काय यापेक्षाही या आवाजाची सोबत घडली आहे ते म्हणूनच फार महत्त्वाचे आहे आणि ती सोबतही मोलाची आहे. आजही तरीही उणे काहीतरी तू पूर्तता होशील का ही ओळ ऐकली की मनातून खरंच असे कुणी प्रेम करणारे असेलही या जगात यावर ठाम विश्वास बसतो. क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास यातली पहाट मनात उमलते. बऱ्याच दिवसांनी रात्री त्यांची गाणी ऐकली. विकत घेतला श्याम मधला हरखलेला आनंद ऐकला आणि वाटले किती सहज आहे आयुष्य खरंच. उठून खिडकीतून बाहेर बघितले. चांदणे दिसत नसले तरी मधुरात्र मंथर देखणी होती.

शांत मनात कुठलेही तरंग नाहीत अशीही एक अवस्था असते. त्या तळ्याच्या काठावर बसून ऐकायचा आवाज म्हणजे सुधीर फडके. पुरेशी होते सोबत ती. स्वतःलाच.

©प्राजक्ता काणेगावकर

Image by gagnonm1993 from Pixabay

Prajakta Kanegaonkar

Prajakta Kanegaonkar

मॅनेजमेंटची प्रोफेसर म्हणून नोकरी. खाद्यपदार्थांचा स्वतःचा व्यवसाय. आजूबाजूला घडणाऱ्या अनेक लहान मोठ्या घटनांकडे चौकस कुतूहलाने बघणारी, लिखाणातून व्यक्त होणारी नजर. इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांवर प्रभुत्व पण अभिव्यक्ती मराठीवरच्या प्रेमामुळे मराठीतूनच. सर्व प्रकारचे लिखाण करायला आवडते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!