जिगसॉ जिंदगी पत्र क्रमांक 7
प्रिय आई,
एकाची समस्या ही दुसऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर असू शकली असती असं तू कधी पाहिलं ऐकलं आहेस का? खरंतर हा प्रश्न सुद्धा थोडा विचित्र आहे…नाही का? पण हा प्रश्न विचारण्याला दोन कारणं मात्र घडली आहेत. ‘सांगू का?’ असं मी तुला विचारणार नाहीच. डायरेक्ट सांगणारच आहे.
त्याचं झालं असं की फार फार दिवसांनी, नव्हे वर्षांनी विभा नावाची माझी शाळकरी मैत्रीण भेटली. कॉलेजमध्ये असताना शिक्षण पूर्ण होण्याआधीच पळून जाऊन आंतरजातीय विवाह करणारी विभा कितीतरी वर्षांनी अचानक भेटल्यामुळे आठवणींचा तळ अगदी ढवळून निघाला. दिवसातले सात ते आठ तास आम्हा दहा बारा मैत्रिणींचा गृप सोबत सोबत असायचा, पण कधी शंका सुद्धा आली नाही की आपल्यासोबत हसत खेळत राहणारी, हुशार आणि समंजस असलेली विभा अशी पळून जाऊन लग्न करेल ! पण ज्याची शंका सुद्धा आली नाही ते त्याकाळी, साधारण अठरा वर्षांआधी घडलं आणि त्याचा परिणाम म्हणून त्या ग्रुपमधील इतर सर्व मुलींच्या घरच्यांनी त्यांच्यावर कडक निर्बंध लावले. आपल्या घरात तू नसल्याने आधीच माझ्या बाबतीत खूप निर्बंध होते. त्यामुळे फार वेगळे अन्यायकारक घडल्यासारखे मला वाटले, जाणवले नव्हते. बरं ते असो… पण एका कार्यक्रमाच्या गर्दीत अगदी पाचदहा मिनिटांच्या उभ्या उभ्या घडलेल्या भेटीत सुद्धा विभा भरभरून माझ्याशी बोलली. वडील आणि भाऊ ह्यांनी तोडलेले संबंध, आईने वडिलांच्या चोरून एखादेवेळी तिला भेटणं, बहिणीच्या सासरच्यांनी विभाच्या आंतरजातीय विवाहामुळे तिला त्रास देणं आणि त्यातून बहिणीचा हिच्याशी अबोला असणं, भरीस भर सासरच्यांनी विभाशी वाईट वागणं, तिला ‘तू आमच्या जातीची नाहीस’ हे बारीकसारीक गोष्टींमधून जाणवून देणं असं सगळं सगळं विभा बोलली. अजूनही खूप काही बोलली असती पण बोलू शकली नाही. हात सोडून निघताना मात्र इतकं म्हणाली की ‘आयुष्यभर लग्न न करता राहिले असते तर परवडलं असतं गं…’
आणि त्याच दिवशी संध्याकाळी आपल्या घराजवळ राहणारी राणीताई भेटली. माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी असलेली राणीताई अजूनही अविवाहित आहे. दिसायला सर्वसाधारण असलेल्या राणीताईसाठी ज्यावेळी स्थळं येऊ लागली त्यावेळी कधी हुंड्यावरून तर कधी दिसण्यावरून, कधी ह्यांच्याकडून तर कधी त्यांच्याकडून प्रत्येक ठिकाणी गोष्ट बिनसत गेली. हळूहळू लग्नाचं वय निघून गेलं. तसतशी ठिकाणंही बीजवराची येऊ लागली. असं करता करता तिचं लग्नच झालं नाही. दोनेक वर्षात पन्नाशीला टेकणारी राणीताई आतापर्यंत अविवाहित आहे. मग असंच बोलता बोलता राणीताईने तिच्या घरातल्या कितीतरी गोष्टी सांगितल्या. वहिनी आणि भावासोबत राहताना, त्यांचा संसार बघताना आपलाही असाच संसार असायला हवा होता हे तिला पदोपदी जाणवत रहातं. तरुण शरीराला स्पर्शाचीही भूक लागतेच ना आई !… तू म्हणशील की मी फार मोकळी बोलतेय पण राणीताईची घुसमट मला कळते आई. तिची घुसमट मलाही अस्वस्थ करते. आणि म्हणून मला तुझ्याजवळ यावं लागलं. बोलताना राणीताई सतत रडत होती. म्हणाली- ‘कॉलेजमध्ये असताना कुणाचा हात पकडून पळून गेले असते ना तर परवडलं असतं. पण हे असं माहेरच्यांच्या आश्रयाला राहणं नको.’ कदाचित घरात तिच्या कारणाने खटके उडत असतील. त्याचाही तिला त्रास होत असेलच.
एकाच दिवशी सकाळी भेटलेली विभा आणि संध्याकाळी भेटलेली राणीताई… दोन व्यक्ती… दोन अत्यंत वेगळे अनुभव.. दोन अत्यंत भिन्न समस्या ! आणि गंमत अशी की एकीची समस्या ही दुसरीसाठी उपाय ठरू शकली असती. पण तसं घडलं मात्र नाही. आयुष्य हे असं चकवतं आई… त्याच्या तुकड्यांचे खाचे कधी कधी तंतोतंत फिट्ट बसतात तर कधी कधी चुकीच्या जागी जाऊन बसतात… आणि मग जिंदगीचं हे पझल सुटता सुटत नाही. असो… आपल्याला पडणाऱ्या प्रत्येकच प्रश्नाला उत्तर असलंच पाहिजे हा हट्ट करण्याची चूक आपण करू नये…मग कुठे जीव जरा शांतपणे जगू शकतो. नाही का? हा असा शहाणपणा अंगात बाणवला असला तरी प्रश्न घेऊन तुझ्यापर्यंत येणं काही मी सोडणार नाहीय आई. मला उत्तर मिळो न मिळो…त्यानिमित्ताने तुझ्याशी बोलायला मिळतं हेही खूप आहे. आई…
तुझीच,
छबी
ता. क. – प्रत्येकाला आपापल्या आयुष्याचे तुकडे आणि त्याच्या खाचाखोचा नीट वेळेत कळाव्यात आणि एक पूर्ण चित्र निर्माण करता यावं यातही केवढं समाधान आहे !… हा नवीनच शोध मला विभा आणि राणीताईच्या त्या दिवशीच्या भेटीतून लागला.
Image by Free-Photos from Pixabay
Latest posts by Vinaya Pimpale_w (see all)
- जिगसॉ जिंदगी पत्र क्रमांक 8 - May 20, 2021
- फुलपाखरू - April 13, 2021
- पोटॅटो पिनव्हील - March 27, 2021
क्या बात…
धन्यवाद 🙂
मस्तं