सुटका
गेले दोन दिवस हॉस्पिटलमध्ये जाते आहे. इथे अगदी उपचार म्हणून सुद्धा रुग्णाला, आजारी माणसाला भेटायला वगैरे जायला मला फारसं आवडत नाही. सलाईन,नळ्या, रक्त, विव्हळणं, आजारपणं, खेद, विषाद, दुःख, निराशा पहायला कोणाला आवडतं म्हणा?! माझ्यासारखे अनेकजण असणार. पण नवरा म्हणतो ते पटतं. अशी वेळ आलीच तर अवश्य जावं. आजारी माणसाला बरं वाटतं हा एक भाग झाला, पण आपलं तस बरं चाललंय, देवाने फक्त धडधाकट ठेऊन किती मोठी कृपा आपल्यावर केली आहे हे तिथे गेल्यावर, आजूबाजूला पाहिल्यावर पटतं.
हॉस्पिटलमध्ये एक आजी आहेत. नव्वदी पार केलेल्या, शरीराने, म्हणाल तर जर्जर झालेल्या, म्हणाल तर वडिलोपार्जित धडधाकट तब्येत मिळालेल्या, गात्र थकलेली, चेहरा उदास दिसतो. फार हलता, बोलता, उठता, चालता येत नाही. प्रयत्नपूर्वक सगळं करावं लागतं. उठताना, जेवताना शक्यतो कोणाचीही मदत घेत नाहीत. शक्यतो सगळं एकटीने करायचा प्रयत्न करतात. अनेक वर्षांची सवय असणार. शरीराने थकल्या असल्या तरी मन अजून स्वावलंबी असणार. आजींच्या डोळ्यातली चमक सांगते, एकेकाळी त्या नक्कीच ताठ असणार आणि स्वतःच गाजवलं असणार. आता वयोमानानुसार परावलंबन स्वीकारलं असणार.
साठी ओलांडलेला त्यांचा मुलगा सोबत असतो. तसा धडधाकट दिसतो. बाकी कोणीच त्यांना भेटायला येत नाही. जरासा अनिच्छेनेच तो सगळं करत असतो. औषधं घेतली नाही म्हणून ओरडणार, खाताना सांडलं की ओरडणार, तिने स्वतःहून हलायचा प्रयत्न केला की मदत न करता अंगावर वस्कन ओरडणार. त्यांच्या बोलण्यातून समजलं आजी वृद्धाश्रमात राहतात. नाण्याला दोन बाजू असतात, मनुष्य स्वभावाचे अनेक पैलू असतात, सहनशक्तीच्या मर्यादा असतात हे आपल्याला कितीही वाचून, अनुभवून माहीत असलं तरी म्हाताऱ्या माणसाची हेळसांड पाहवत नाही. जगात काही बघायला लागलं तरी चालतं पण एकमेकांना नको असलेले, एकमेकांच्या जीवावर उठलेले मायलेक बघवत नाहीत.
आजी शून्यात बघत राहतात. मुलगा चिडचिड करत राहतो. त्याच्या प्रत्येक हालचालीतून, वागण्याबोलण्यातून, तो “सुटका” कधी होणार याचीच वाट पाहतो आहे हे जाणवतं. काल खाताखाता आजींच्या हातून काहीतरी सांडलं. मुलाला कारण हवंच होतं. त्याने जो तोंडाचा पट्टा सुरू केला तो पुढचा अर्धा तास आजूबाजूला ऐकू जात होता. “तुझ्यामुळे त्रास होतो. तुला समजत नाही का? अजून किती करायचं मी? मी ही थकत चाललोय आता!” याबरोबर अनेक गोष्टी बोलल्या जातात. आपण बघे असतो तरी डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहत नाही. म्हातारी माणसं आणि लहान मूल यात कसा फरक करावा? दोघांनाही मदत लागते,समजून घ्यावं लागतं, त्यांच्या कलेने घ्यावं लागतं. पण जो करतो त्याला त्याची व्याप्ती माहीत असते. बाहेरच्या माणसाला आतली घुसमट समजत नाही. जर संपूर्ण विश्वात, सगळ्यात उदात्त, पवित्र समजलं जाणारं मायलेकाचं नातंच इतकं फोल, तकलादू आणि द्वेषाने लडबडलेलं असेल तर जगात नक्की शाश्वत तरी काय आहे?
मला खरंतर काय घेणंदेणं असतं त्यांच्याशी? जगात अनेक दुःख असतात पण ती सगळीच्या सगळी डोळ्याआड कशी करणार? कुठेतरी काहीतरी मनावर हलकासा चरा उमटवून जातंच. मी निघताना आजींकडे एकवार पाहते आणि देवाकडे त्यांच्या “सुटकेची” प्रार्थना करते. एखाद्याच्या मरणासाठी प्रार्थना करण्याची माझी ही पहिलीच वेळ. हृदयात कुठेतरी तुटतं. पण मरण असं मागून मिळत असतं तर माणसाला अजून काय हवं होतं? आजींच्या मुलाच्या तोंडाचा पट्टा सुरू राहतो. तो कुठल्या जुन्या गोष्टी काढून आजींना बोल लावत बसतो. आजी भकास नजरेने त्याच्या हलणाऱ्या तोंडाकडे पाहत राहतात. मी निघते. एव्हाना तिथल्या सिस्टरला माझ्या मनाची घालमेल समजलेली असते. जाता जाता ती हळूच मला सांगते, आजींना ठार ऐकू येत नाही. नुसतंच बघत बसतात.”
“चला, डोंगराएवढ्या दुःखात निदान अज्ञानातलं तरी सुख आहे त्यांच्या नशिबात” असं स्वतःशीच म्हणत मी हॉस्पिटलच्या बाहेर पडते.
Image by Sabine van Erp from Pixabay
Latest posts by Gauri Brahme (see all)
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
Touching 👍👍👍
Thanks
दु:खाची धार कमी करण्या साठी, देवाचा उपाय
आई ग्गं