प्रवास कथा- आठवणीत अडकलेले रस्ते,  भाग पहिला

‘आली लहर अन केला कहर’ अशा टुर प्लॅन करण्याची सवय बऱ्याचदा महागात पडुनही, या वेळीही लास्ट मोमेंट फ्लाइट बुकिंग केली. त्यामुळे मुंबई वरून चंदिगडला जाण्यासाठी निघाल्यावर, उगाचच व्हाया हैद्राबाद जावं लागलं अन तिथल्या एअरपोर्ट वर तास- दोन तास टाइमपास करण्याची वेळ आली.

हैद्राबाद म्हटलं की पॅराडाइझ बिर्याणी हे गणित पक्कं असलेल्या आम्हा खादाडांना, वेळेच्या बंधनामुळं एअरपोर्टच्या बाहेर जाता येत नसलं तरी, पॅराडाइझने एअरपोर्ट वर त्याच्या फॅन्ससाठी काउंटर सेट केलं होतं. पण सोळा जणांच्या या ट्रेकिंग ग्रुप मध्ये, किनौर कैलाशच्या ट्रेकला, नाही तर दर्शनाला चाललोय ही भावना, मेजॉरिटी लोकांमध्ये असल्यामुळे, नॉन  व्हेज टाळले. फ्लाईटला बराच वेळ असल्यामुळं,  वेटिंग एरिया सोडून , आम्ही अस्ताव्यस्त फिरत राहिलो.
दरम्यान, पोपट आणि निलेशने आणलेली थालिपीठं हादडुन झाली होती. त्यामुळं, पोटात बरीच भर होती. तरीही उरलेल्या वेळेत, एअरपोर्ट वरच्या सौंदर्य स्थळांचं फक्त विंडो शॉपिंग किती करणार, असा विचार करत एक कॉफी हाऊस कम बार मध्ये मी अन मनीष घुसलो. जिथून फ्लाईट्स दिसत होत्या. इतक्या सकाळीही, त्या बारमध्ये, कॉफी पिणारे आम्ही दोघेच होतो. बिलाचे आकडे पाहून आयुष्यभरासाठी कॉफी सोडण्याची इच्छा न व्हावी, म्हणून आकडा न पाहता फक्त कार्ड पुढं केलं. तरीही अशा महागड्या ठिकाणी, छान कथाबीज सुचतं अशी माझी अंधश्रद्धा आहे, आणि ती मी डोळे झाकुन सांभाळतो, अन पुन्हा पुन्हा जातो.
पण फ्लाइट मध्ये बसताना काहीतरी वेगळं जाणवलं. सगळा ग्रुप आम्हा दोघांकडे विचित्र नजरेने बघत होता. प्रत्येकाच्या नजरेत एक वेगळाच भाव होता. नंतर समजलं, कि कॉफी कम बार मध्ये जाण्याचा तो निषेध होता. खरंतर, हिमालयन ट्रेकिंगची जी नियमावली दिली होती, त्यानुसार, ट्रेकच्या किमान महिनाभर आधी, कुठलंही हॉट ड्रिंक घेण्यास मनाई होती. १८००० फुट उंचीवर जिथे ऑक्सिजनची कमतरता भासते, तिथे आणखी वर चढाई करताना, ह्रद्य आणि फुफ्फूस यांचं सिंक्रोनाइज वर्क आउट हवं असेल तर हे पथ्य आवश्यक आहे, असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. आम्हा दोघांविषयीचा हा गैरसमज मनिषने कॉफीचं बिल दाखवल्यावरच दुर झाला. आणि संधीचा फायदा घेत, मनिषने डायलॉगबाजी केलीच,
“आता तोंड वाकडं करताय, पण १८००० फुटांवरच्या थंडीत तुम्हीच हा नियम धाब्यावर बसवाल.”
त्या सरशी मात्र, हशा पिकला.
………………………………………………………………………………………………………………..
चंदीगड ही खवैय्यांची अन कार शौकिनांची सिटी, हे एअरपोर्ट वरच जाणवतं. लुधियानामधल्या सगळ्या इन्नोव्हेटिव कार वर्कशॉप्सना नवनवीन कल्पना लढवायला उद्युक्त करण्याचं काम हे चंदिगडवालेच करु जाणे. पण  चंदीगडमध्ये रमण्या इतका सध्या तरी वेळ  नव्हता. ट्रेक करताना,   गाईड कम पिठठू , रात्रीच्या मुक्कामाच्या वेळी  लागणारे  तंबू ही  सगळी    तयारी पुढं जाऊन करावी लागणार होती.
चंदीगड अन पंचकुला सोडलं. अन मॅटेडोर घाटाला लागली. अगदी सुरुवातीला, जिथून किनौरी सफरचंदाच्या बागा सुरू होतात, तिथूनच कॅमेऱ्यातली मेमरी कार्ड्स जाम करायला सुरुवात झाली. पण प्रचंड उतार, त्याला लटकलेले ढग, अन उतारावरची सफरचंदाची बागायत हे रिपीट टेलिकास्ट होऊ लागलं तसं बाहेर पाहणाऱ्यांचं लक्ष आत वळू लागलं. पोपटने आपल्या मोबाईल मधली आगरी कोळी गीतं गाडीच्या स्पीकरला जोडली अन धमाल सुरू झाली. आता काही जण मधल्या स्पेस मध्ये येऊन नाचू लागले. अक्षरशः दंगा सुरु झाला. दोन्हीही मॅटेडोर मध्ये, तीच परिस्थिती होती. गाणी सुरू होईपर्यंत पंजाबी ड्रायव्हरचा मराठी माणूस खूप शांत असल्याचा समज होता. त्याला अगदी, ” सुया घे पोत घे ” च्या मार्केटिंगपासून ते “मंदामाई शिकलेली नव्हती ना” हा जागतिक इश्यू सुद्धा ऐकवण्यात आला. आता जे खिडक्या धरून बसले होते, त्यांची मधल्या स्पेस मध्ये येण्याची धडपड सूरु झाली. कारण घाटात सतत हलणाऱ्या गाडीत, फक्त बाहेर पहात बसल्यामुळे त्यांना मळमळायला लागलं होतं. नाचणारे मळमळ विसरून गेले होते.वाटेत घेतलेले पेर हे मळीमळीवर एकमेव औषध होतं.

मजल दरमजल करत , त्या पंजाबी ड्रायव्हरने संध्याकाळ होता होता शिमल्यात पोहोचवलं. आमचं बुकिंग शिमल्याच्या एका टोकावर असलेल्या, ग्रॅन्ड हॉटेल मध्ये होतं. नावासारखं प्रचंड असलेलं हे हॉटेल सध्या सीपीडब्ल्युडी च्या ताब्यात असलं तरी त्याची निर्मिती १८२९ मध्ये लॉर्ड बेंटीकने केली होती. त्यावर असलेली ब्रिटिश वास्तुशास्त्राची छाप जागोजागी दिसत होती. खास शिसम आणी सागवानात केलेली फर्निचर्स, वॉल पॅनेल्स, फ्लोअर….. एखाद्या क्लासिकल इंग्लिश चित्रपटाचा सेट असल्यासारखं ते हॉटेल बनवताना शिमला बॅंकेने केलेल्या अर्थ सहायाची नोंद असलेला बोर्ड बरीच माहिती सांगत होता. २००० साली झालेल्या रिपेअर वर्क नंतर हॉटेलला नवीन झळाळी मिळाली होती. पण त्या ब्रिटिश कालीन हॉटेल कडे जाणारा रस्ता जेमतेम घोडेस्वार जाण्याइतका होता. त्या काळच्या बग्ग्या तरी कशा जात असतील हा प्रश्नच होता. आणी जात असतील त्यावेळी, समोरुन काही वाहन येईल अशी सुतराम शक्यता नव्हती. पण आमच्या मॅटेडोरच्या ड्रायव्हरने खालीच गाड्या थांबवत, हात वर केले. मोठ्मोठ्या बॅग्ज घेउन प्रवासाला निघालेल्यांना विचार करुनच घाम फुटला. सरळ ४५ अंशातली चढाई,….. साधारण दिडेक किलोमीटर जड बॅगा आवरत चढणं वाटतं तितकं सोपं काम नव्हतं. अर्थात, ज्यांच्या बॅगा प्रच्ंड होत्या,त्यांच्या मदतीला तिथले लोकल लोक पैसे देउन आले. पण शिमल्याच्या त्या हायस्ट पॉइंटवर पुढच्या ट्रेकची झलक पहायला मिळाली, हे नक्की.
………………………………………………………………………………………………………………..
शिमल्याच्या पुढचा प्रवास प्रचंड वळणावळणाचा अन थरारक घाटांचा होता. आणी बहुतेकांसाठी प्रवासातल्या उलट्यांचा प्रवास होता. मी आधीच पेरांची बेगमी करून ठेवली होती. काही जणांच्या उलट्यांसाठी, बर्याचदा प्रवास थांबवावा लागला. आणी मला तिसरी चौथी मध्ये असताना, लाल परीतुन, पुण्यातुन गावी जाताना, दिवे घाटात येणाऱ्या उलट्यांची आठवण झाली अन स्वता:शीच हसलो…… आणि कुठल्यातरी हिरव्यागार घाटाच्या कड्यावर, थांबल्याचा फायदा घेत, फोटोग्राफी करु लागलो. कॅननच्या लॅन्डस्केप फोटोग्राफीची नजाकत पाहुन, तो घेतल्याचं समाधान त्या दिवशी मला झालं.

नारकंद पासुन साइंजच्या बस स्टॉप पर्यंतचा प्रवास अत्यंत वळणावळणाचा अन सतलजच्या खोर्यात उतरत जाणारा होता. अवघ्या ३० किमीच्या प्रवासाला वळणं घेत, ब्रेक मारत जवळजवळ तासभर लागला. साइंजच्या बस स्टॉप पासुन दोन रस्ते फुटतात. एक कुल्लु मनालीकडे जातो. दुसरा रामपुरमार्गे कल्पाकडे जातो. इथंपासुन पोवारी पर्यंत सतलज कधी डावीकडे तर कधी उजवीकडे सोबत करत राह्ते.
सतलज, ……. प्रचंड वेगाने वाहणारी, गढूळ प्रवाहाची नदी हे पहिलं तिचं इम्प्रेशन.

तिच्या मालकीच्या खोऱ्यात आता काही दिवस मुक्काम होता. त्यामुळं तिच्या सोबतीनं, तिचं बोट धरून, चालताना, जिथं जिथं थांबलो, तिथं तिथं मनसोक्त फोटो काढले. दोन्ही बाजूला प्रचंड मोठे कडे , पर्वतराजी, अन मधून ते सगळं कापत, ती खोल खोल धावत होती. एरव्ही बहुतेक वेळा, हिमाच्छादित राहणारा हा प्रदेश, कधीतरी एप्रिल मे पासून, मोकळा श्वास घेऊ लागतो. अन वरच्या भागातले बर्फ वितळत , वाहणाऱ्या नद्या जुलै ऑगस्ट पर्यंत प्रचंड वेगाने वाहू लागतात.

करछम जवळ, बास्पा नदी, सतलज ला मिळते. तिथेही बास्पा पॉवर प्रोजेक्ट उभा केलाय, …… जिंदाल पॉवरने. नदीच्या पाण्याच्या वेगाचा वापर करून, हा पॉवर प्रोजेक्ट चालतो. नदीला लागून असलेल्या हिमालयातल्या टेकडीमध्ये, प्रवाह आत वळवून, डोंगराच्या पोटात, मोठमोठी जनरेटर्स लावली आहेत. 300 mw फक्त धावत्या पाण्यावर, निर्माण होत होते. हिमालयन नद्यांच्या ताकदीचा अंदाज यावरून येऊ शकतो.

आता बराचसा प्रवास , एका बाजूला, सतलज अन दुसऱ्या बाजूला, अभेद्य हिमालय असा असला तरी, जास्त वळणावळणाचा नव्हता. त्यामुळे उलटीच्या भीतीने, फळं सोडून काहीही न खाल्लेले बहुतेकजण आता भुकेजले होते. अगदी वाटेत लागलेल्या, रामपूरमध्येही कुणी जेवलं नव्हतं. राली गावाजवळ, हायवे ढाबा दिसला अन सगळ्यांनी गाडी थांबवण्यासाठी एकच गोंधळ केला. ऑर्डर पक्की झाल्यावरच जेवण बनवणार, अशी पध्द्त असल्यामुळे, जेवण बनेपर्यंत, पत्त्यांचे डाव, फोटोग्राफी, अन गप्पा टप्पा रंगात आल्या. इतक्यात ग्रुपलीडरला पोवारीहुन फोन आला. किनौर कैलाश चढण्यास, मनाई केली होती. वरून येणाऱ्या ग्लेशियरसोबतच्या प्रवाहात, कुणीतरी वाहून गेल्याची बातमी होती.

आता ट्रेक होणार की नाही, ही चर्चा सुरू झाली. सर्वांचेच चेहरे गंभीर झाले. पण पिली दालवरचा तडका, पराठ्यांचा खमंग वास, अन तूप फोडणीतल्या भाजीचा दरवळ या सगळ्यांमध्ये, पुढे उभ्या ठाकलेल्या समस्यांचा सर्वाना काही काळ विसर पडला. बाहेर पडू लागलेल्या अचानक पावसात, आत बसून गरमागरम पदार्थ खाण्यात काही वेगळाच आनंद होता. ©बीआरपवार

Image by Michael Gaida from Pixabay 

B_R Pawar
Latest posts by B_R Pawar (see all)

B_R Pawar

बी आर पवार , भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये नोकरी. शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याखेरीज कथा, कविता, चित्रकलेत रमतो. जीवनानुभव शब्दात चितारायला आवडतो.

5 thoughts on “प्रवास कथा- आठवणीत अडकलेले रस्ते,  भाग पहिला

  • February 10, 2021 at 1:02 pm
    Permalink

    खूपच छान..पुढे वाचायला आवडेल

    Reply
    • February 10, 2021 at 2:34 pm
      Permalink

      भारी आहे हे

      Reply
  • February 11, 2021 at 12:28 am
    Permalink

    Very good BR

    Reply
  • February 11, 2021 at 4:29 pm
    Permalink

    Mastach vatatey vachun. Ajun vachayla nakki avdel

    Reply

Leave a Reply to ashuutpat@gmail.com Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!