काव्यांजली- शेवटचा भाग
बाहुलीला बोलतं करायची तात्यासाहेबांची युक्ती सफल झाली होती. पण कनिकाला वाचवायचं तर, सगळी माहिती मिळवणं आवश्यक होतं. म्हणून त्यांनी पुढचा प्रश्न विचारला “काव्यांजली? कोण तुम्ही दोघी?
“मी काव्या आणि ही माझी जुळी बहीण अंजली. आम्ही खूप खुश होतो या घरात. मी, अंजली, माझे आई-बाबा सगळेजण मजेत राहत होतो इथे. आमच्या जन्मानंतर बाबांना त्यांच्या व्यवसायात खूप मोठा फायदा झाला आणि त्यांनी हा बंगला बांधला आणि बंगल्याला नावही आमचंच दिलं. रोज रात्री जेवण झाल्यावर आम्ही बाहेरच्या झोपाळ्यावर दिवसभराच्या गप्पा टप्पा करत बसायचो. आमच्या दहाव्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या दिवशी बाबांनी एक सुंदर आणि मोठी बाहुली आमच्यासाठी खास बनवून घेतली होती. त्याच दिवशी आमची आत्या घटस्फोट घेऊन आमच्याकडे रहायला आली. आमचं सुख तिला बघवत नव्हतं. ती सतत आई बाबांशी भांडायची. अंजली म्हणायची एक सुंदर परीसारखी बाहुली आणि एक हडळ दोघीही आपल्याकडे एकाच दिवशी राहायला आल्या.” बाहुलीच्या रूपातली काव्या आता मोकळेपणाने बोलत होती.
“पण ती इथे रहायला आली आणि सगळं संपलं.”
कनिकाच्या या अनपेक्षित बोलण्याने तात्यासाहेबांना धक्का बसला. कनिका आता पूर्णपणे अंजलीच्या आयुष्यात गेली होती. पण तरीही जे घडलं त्याची संपूर्ण माहिती मिळाल्याशिवाय ते कनिकासाठी फार काही करू शकत नव्हते. म्हणून त्यांनी कनिकाला विचारलं, “संपलं म्हणजे नक्की काय झालं?”
“तिला या घरात आश्रित म्हणून नाही, तर घराची मालकीण म्हणून राहायची इच्छा होती, म्हणून तिने बाबांना अर्ध घर तिच्या नावावर करायला सांगितलं. पण बाबांनी या गोष्टीला ठाम नकार दिला आणि सांगितलं, हे घर माझ्या मुलींचं काव्या आणि अंजलीचं आहे. यानंतर मात्र तिला प्रचंड राग आला. ती आमचा दुस्वास करू लागली. आमच्या हसत्या खेळत्या घरातलं वातावरण एकदमच दूषित झालं. त्यांनंतर तिने तिच्या मित्राच्या मदतीने घरी खोटा दरोडा घडवून आणला आणि आई-बाबांना ठार मारलं. घरातलं सोनं-नाणं, पैसा सारं काही लंपास केलं. पण एवढं करूनही तिला या बंगल्याचा मालकी हक्क मिळणार नव्हता. कारण ती फक्त आमची पालक बनून राहणार होती. १८ वर्षांनंतर हा बंगला आमच्या नावावर होणार होता. पण एक दिवस आत्या आणि तिचा मित्र खोट्या दरोड्याबद्दल आणि आई-बाबांच्या खुनाबद्दल बोलत असताना मी सगळं ऐकलं त्याचबरोबर ते आम्हालाही मारून टाकायचा प्लॅन आखत होते. हे ऐकल्यावर मी धावत आमच्या या खोलीत आले. हो ही आमची खोली होती. काव्या तेव्हा खोलीत नव्हती. पण आत्याला बहुदा मी त्यांचं बोलणं ऐकलं हे कळलं होतं. मी काव्याला काही सांगायच्या आधीच तिने मला गच्चीवर नेऊन खाली ढकललं. मी मेले नाही आणि आजूबाजूची लोकं जमा झाल्यामुळे आत्याने मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. आणि सगळ्यांना मी खेळताना पडले असं खोटं सांगितलं. हॉस्पिटलमध्ये मी चारच दिवसांत मरण पावले.” स्वतःच्याच मृत्यूची घटना कनिका अगदी निवांतपणे सांगत होती.
“पण, आता तू कनिका आहेस अंजली नाहीस. त्यामुळे ते सगळं विसरून तुला पीहूसाठी इथेच राहायला हवं कनिका.” तात्यासाहेब
“नाही, अंजली आता माझ्याबरोबरच येणार इतकी वर्षे वाट बघितली तिची आता तिला मी घेऊन जाणार.” बाहुली.
“तू का वाट बघत होतीस पण ?” तात्यासाहेब
“तो मे महिना होता. मला आत्येनं सांगितलं की अंजली हॉस्पिटलमधून लवकरच परत येईल. पण कित्येक दिवस झाले तरी ती परत आलीच नाही. आत्येने तिच्या मित्रासोबत लग्न केलं. त्यांनंतर मात्र ती माझ्याकडे बघतही नसे. मी याच खोलीत रहात असे. आई, बाबा अंजलीची आठवण काढून बाहुलीला जवळ घेऊन रडत बसे. मला जेवणही धड मिळत नव्हतं. तिने शाळेतून माझं नाव काढून टाकलं होतं. बाहेर सगळ्यांना सांगितलं की काव्याला तिचा मामा घेऊन गेला आणि मला या खोलीत बंद करून ठेवलं. त्या दिवशी आत्येकडे गावातले काही लोक आले होते. मी दारावर जोरजोरात हात मारत होते. आत्येने त्यांना काही बाही सांगून वेळ मारून नेली पण ते निघून गेल्यावर आत्येने मला खूप मारलं आणि इथल्या कपाटात बंद करून ठेवलं. बाहुलीही माझ्याजवळच होती. काही दिवसांनी या खोलीला आग लावून मला मारून टाकलं. मी आणि आमची बाहुली संपूर्णपणे जळलो होतो, मी जीवंत होते, पण उपचाराअभावी मला मरण आलं. त्या शेवटच्या दिवसांत खूप तडफडले मी. अंजलीची वाट बघतच शेवटचा श्वास घेतला. पण त्यांनंतर इथे आत्येलाही राहू दिलं नाही. माझ्या बाहुलीला जवळ घेऊन अंजलीची वाट बघत बसले. आता मला इतक्या वर्षांनी अंजली भेटली आहे. मी तिला घेऊन जाणार आता आम्हाला कोणीच वेगळं करू शकत नाही…”
बाहुलीच्या रूपातली काव्या बोलत असताना तात्यासाहेबांनी सागरला डोळ्यांनी खुणावलं. सागरने पटकन कनिका जवळ जाऊन तिच्या कपाळावर अंगारा लावला.
“सागर काहीही करून पिहूचा आवाज कनिकाच्या कानावर पडणं आवश्यक आहे.” तात्यासाहेब
“कमलाकडे मोबाईल नाहीये. राघवचा नंबर बरेचदा लागत नाही, आजही लागत नाहीये” सागर.
“मोबाईलमध्ये पिहूचा व्हिडीओ असेल, तर तो लाव आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आता कनिकाला फक्त पिहूचा आवाज वाचवू शकतो.”
“हो आहेत, मी व्हिडीओ शोधतो”, सागर.
बाहुलीचं बोलून झालं होतं. तिने कनिकाचा हात हातात घेतला. कनिका तिच्यासोबत जायला निघणार तेवढ्यात सागरने मोबाईलवर पिहूचा व्हिडीओ प्ले केला. पिहूची ‘आई’ ही हाक ऐकून कनिका भानावर आली. तिने बाहुलीकडे बघितलं. दुसऱ्या बाजूला तिच्यासमोर सागर आणि तात्यासाहेब उभे होते. ती धावत सागरजवळ गेली आणि म्हणाली सागर ती बाहुली….सागरने तिला जवळ घेतलं.
“हे बघ काव्या, अंजली आता कनिका आहे. कनिकाचा अंजलीच्या आयुष्याशी काहीच संबंध नाही. तू आता मुक्त हो. त्या जन्मात अंजली आयुष्य न जगताच निघून गेली, पण या जन्मात तिला सुंदर आयुष्य मिळालं आहे ते तिच्यापासून हिरावून घेऊ नकोस. मी हात जोडून विनंती करतो की एका आईला तिच्या बाळापासून दूर नेऊ नकोस. आता कनिकावर पहिला अधिकार पिहूचा आहे. तुला तिचा सहवास हवा असेल, तर तिच्या पोटी जन्म घे. पण तिला नेऊ नकोस.”
तात्यासाहेबांचं बोलणं ऐकून बाहुलीच्या रूपातल्या काव्याने कनिकाकडे बघितलं. ती सागरच्या मिठीत निवांत विसावली होती. तिला अंजलीच्या आयुष्याशी काहीही देणंघेणं नव्हतं, हे पाहून काही क्षणातच ती अदृश्य झाली.
सागरने तात्यासाहेबांचे आभार मानले आणि कनिकाची माफी मागितली. काव्यांजलीची कहाणी समाप्त झाली की नव्याने सुरू होणार, याचा निर्णय आता येणारा काळच घेईल.
Image by Pete Linforth from Pixabay
- माझी होशील का? - October 1, 2021
- काव्यांजली- शेवटचा भाग - February 12, 2021
- काव्यांजली- ४ - February 2, 2021