गुंतता हृदय हे…प्रतिबिंब
संध्याकाळचे सहा वाजले , आणि दत्तू ने रोजच्या सारखा सगळीकडे ‘मॉप’ फिरवायला सुरुवात केली . त्याचे हे काम म्हणजे ऑफिस बंद होण्याचा गजरच होता . काही जणं तर तत्क्षणी काम बंद करत .
निशा ने आपला रिपोर्ट पुर्ण केला , त्याला काही अटॅचमेंट जोडल्या आणि सरांना मेल केल्या . टेबलावरील फाईल्स वर कपाटात बसवून निघतांनाच पाठीमागून आवाज आला ,
” मॅडम तुम्ही हडपसरला रहाता का ? ” एक तिशीतला तरुण पाठीमागून विचारात होता .
तिने एकदम वळून बघितले .
” सॉरी , मी …अजित . असा अचानक बोललो , सॉरी . “
” इट्स ओके . कोणत्या डिव्हिजन ला जॉईन केलंय ? “
” डिझाईन .”
” ओह ! …..हो , मी हडपसरला राहाते . ..मी निशा ” तिने हस्तांदोलन करत ओळख सांगितली .
” आज पहिलाच दिवस आहे , म्हणून.. ..जरा …माझ्याकडे गाडी नाहीये …मला नगर रोड वर जायचंय .”
” काही हरकत नाही , मी सोडेन जातांना . “
” ह्या कंपनी आधी कुठे होता ? ” तिने गाडी सुरू करत विचारले .
” रुद्र इन्फोटेक ! “
तिचा हात क्षणभर थांबला . लगेच स्वतःला सावरून तिने गाडीला वेग दिला .
” अजित , अहो जाहो राहुदेत . लेट्स बी फ्री….तू डिझाईन ला आहेस म्हणजे …त्या आधी ..”
” MCA नंतर स्पेशल डिझायनिंग चा डिप्लोमा केला होता . “
” मला पण बऱ्याचदा काम पडतं , प्रोजेक्ट रिपोर्ट्स बनवायचे असतात . त्यात काही डिझाइन्स लागतात.”
तिने आपल्या कामाचं स्वरूप , तिचा अनुभव ह्याबद्दल सांगितलं . तो ही बराच खुलून बोलत होता . घरापर्यंत चं अंतर कसं पटकन कापल्या गेलं आज .
आणि रोज ट्रॅफिक मुळे वैताग पण जाणवला नाही निशा ला .
तिला छान मोकळा वाटला अजित . दिसायलाही खूप साधा आणि सालस .
असेच दोन तीन दिवस तिने त्याला ड्रॉप केले . आपल्यासारखीच अजितलाही पेंटिंग ची आवड आहे ह्याचे खूप आश्चर्य वाटले तिला . कारण ती चित्रात रमणारी …त्यात हरवून जाणारी होती .
” निशा , आज मी काहीतरी आणलंय
दाखवायला . ” त्याने त्याचे जलचित्र आणले होते .
” अविश्वसनीय !!! तू तर पट्टीचा कलाकार निघालास रे !! सुंदर !!! “
” काढतो काहीतरी , मनाला भावेल असे विषय निवडतो …… मला जिवंत
व्यक्तिचित्र नाही जमत . …..
बरंच काय बोलत होता अजित . निशाचे मात्र लक्षच नव्हते .
” निशा , निशा !! पुन्हा हरवलीस ? काय समाधी लावून बसलीयेस ! “
प्रिया तिला हलवत म्हणाली .
” तो अजित किती उत्साहात तुला पेंटिंग्ज दाखवत होता , …तूझा मात्र …
एकच जप ….आकाश !! आकाश!! “
“…..प्रिया , ….लाईव्ह मॉडेल !! किती छान जमायचं आकाश ला !! …. माझं पण केलं होतं पोर्ट्रेट . …..आकाश ……
आकाश म्हणजे चैतन्य !! ….आकाश म्हणजे प्रेमाची व्याख्या !!…….आकाश
म्हणजे … “
” वास्तव स्वीकार निशा !!
झालं लग्न त्याचं ! ये बाहेर त्यातून. पुढे जा आयुष्यात ! ” प्रिया ओरडली .
” मरतांना वडिलांनी मुलाजवळ शेवटची इच्छा अशी मागावी का ग ? आपल्याच मुलाचा श्वास मागावा ? आम्ही किती स्वप्नं पाहिली होती ग प्रिया ! …किती अगतिक झाला होता आकाश वडिलांना शब्द देतांना . “
प्रियाने तिला फक्त प्रेमाने थोपटले .
******** ” हॅलो अजित ! मला मदत हविये तुझी . हे सगळे डिझाइन्स मला कटीया मध्ये करायचेत . उद्याच सकाळी प्रेझेंट करायचेत , सरांनी पण मला अगदी वेळेवर … “
तिचा आवेग आवरता घेत तो मधेच म्हणाला ,
” ठीक आहे , ठीक आहे , टेन्शन घेऊ नकोस , मी करून देतो . “
त्याच्याकडे सगळं सोपवून ती आपल्या कामात लागली . आज प्रचंड काम होते .
सकाळी ती लवकर ऑफिस मध्ये आली ……बापरे !! ते डिझाइन्स ? ….ती धावत अजित च्या सेक्शन ला गेली . …तो अजूनही तिथेच होता !!! तिचे डिझाइन्स करत !!
तिच्या डोळ्यात पाणीच आले .
” आय डोन्ट बिलिव्ह धिस !! अजित , तू कालपासून इथेच ? अरे ..मी ..काय बोलू ? …”
” हे घे . झालंच . सगळं तय्यार . ” तो हसत म्हणाला , आणि खुर्चीतच त्याने हात पाय ताणून शरीर थोडे मोकळे केले .
” माफ कर अजित , मी …”
” असू दे ग , आज सुट्टी घेईन मी . चल मी जातो घरी , तू जा प्रेझेन्टेशन ला . ऑल द बेस्ट ! ” तो पुढे काहीच न बोलता निघून गेला .
प्रेझेंटशन झकासच झाले . सर जाम खुश झाले होते तिच्या कामावर .
इतक्या ऐनवेळी सांगितलेले काम इतके परफेक्ट ? तिची वाहवा झाली .
” अजित , कसे आभार मानू तुझे ? तू म्हटल्याप्रमाणे मी सांगितलेच नाही की हे काम तू केलंस , मी नाही . “
” आभार तर मानूच नकोस . पण …फक्त एक कर . एक दिवस माझा डबा आण , घरचे जेवण तरी मिळेल . “
ती एकटक त्याच्याकडे बघत होतीस .
” तस्साच आहेस तू .” नकळत ती बोलून गेली .
” कसा ? काही म्हटलं का तू ? “
” अं ?? नाही . ………तु इथे एकटाच रहातोस ? “
” फक्त आई होती , तीही गेली मागच्या वर्षी . “
” ओह ! ठीक आहे , मग उद्याचा तुझा डबा मी आणते . “
………आपण एकदा आकाश साठी ओल्या नारळाच्या करंज्या नेल्या होत्या ….” ऊ ss !! मस्तं !! एक नंबर !!”
हाताने ‘सुंदर ‘ अशी खूण करत म्हणाला होता आकाश . त्याला असं आनंदी बघणं हाच एक मोठा आनंद होता माझ्या साठी ………झालं लग्न त्याचं ..
लग्नाला मी नाहीच गेले …कशी जाणार …आणि त्याने देखील कुठे बोलावले होते ..
आज तिने डब्यात आईच्या हातचे खास भरले वांगे , तिने बनवलेली वाटली डाळ ,
बाटलीत पन्हे आणि थोडा मसालेभात
आणला होता .
अजित ने डाळ खाल्ली आणि
” ऊ ss !! मस्तं !! ” म्हणून तशीच खूण केली . …तश्शीच !! आकाश सारखीच ! त्या योगायोगाचे तिला आश्चर्य वाटले .
त्यानंतर ते दोघे नेहमीच भेटायला लागले . अजित चे इतके सौम्य , शालीन वागणे तीला मोहात पाडत होते . त्याचे काळजी घेणे , आवडीनिवडी , प्रतिक्रिया देण्याची पद्धत , सगळं आकाश सारखंच !!
जणू तोच आला पुन्हा तिच्या आयुष्यात . किंवा त्याचे प्रतिबिंब . आपले आयुष्य पुन्हा सुंदर होऊ शकते , ह्या विचारानेच उर्मी आली तिच्यात .
******* आकाशाचे लग्न ठरल्यानंतर निशा पूर्ण उध्वस्त झाली होती . तिने घरी आई वडिलांना सांगितले होते त्याच्याबद्दल . त्यांना आवडला होता आकाश . तो होताच तसा .
…. त्या दिवशी …शेवटचे भेटायला आला होता …नुसता हात हातात धरून बसला होता , डोळे भरून बघत . ..म्हणाला ….तुझ्यासाठी
असाच जोडीदार शोधीन मी ….हो , मीच ! …….असा की तुला माझी आठवणच नाही आली पाहिजे . ….
(©अपर्णा देशपांडे)
हा विचार आला , तशी ती ताडकन उठली . वेगळ्याच आवेगाने अजितच्या
क्यूबिकल मध्ये गेली .
” अजित , तुझ्या आधीच्या कंपनीत कुणी तुझा जवळच मित्र आहे ? “
” नाही ग , जवळचं म्हणावं असा तर कुणीच नाही . शाळेतले मित्र आहेत एक दोन , पण त्या कंपनीतले नाहीत . .का ग ? “
” तुला इथे ह्या कंपनीत येण्यासाठी कुणी मदत केली होती का ? “
” हो s , माझ्या बॉसनी . उलट त्यांनी ‘ याला हीच पुण्याची ब्रँचच द्या ‘
अशी सूचना पण केली होती इथल्या कुणा साहेबांना . मला म्हणाले होते , तुला तिथे खूप छान मित्र भेटतील , अगदी आयुष्यभरासाठी . “
” आणि तुझ्या त्या सरांचे नाव आकाश
आहे न ? “
” अरे ! तुला कसे माहीत ? ” त्याने आश्चर्याने विचारले .
उत्तरादाखल
ती मनापासून गालातल्या गालात हसली .
© अपर्णा देशपांडे
Latest posts by Aparna Deshpande (see all)
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
Excellent!!
Amazing !
धन्यवाद मॅडम
धन्यवाद
अतिशय कोमल
सुरेख कथा
Awsomm 👌
Thank you
छान
सुरेख