गुंतता हृदय हे….काळजातलं प्रेम
आज खूप दिवसांनी भेटायला आला होता तो..
डिस्टन्स रिलेशनशिप होती त्यांची..
तो आला आणि स्थिरावला… पण अजूनही त्यांच्यातल्या शांततेचा बर्फ काही वितळेना..
नुसतंच एकमेकांना पाहत होते ते.. मग ह्याच शांततेला सुरेल स्वरांनी छेदावं म्हणून तिने प्ले लिस्ट वर… समईच्या शुभ्र कळ्या लावलं..
वातावरण अधिकच धुंद झालं.. आता त्यानंतर च्या शांततेचं गाणं नकळत दोघांच्या मनावर रुंजी घालू लागलं.. सहवासाचे चार बोल, स्पर्शाची लकेर अन त्या मीलनकाव्यातून उमटलेले आलाप अन ताना…
त्यांना वेगळ्याच विश्वात घेऊन गेले… मेलबर्न ची ती संध्याकाळ आणि आज ही घरातली सांजवेळ.. दोन्ही ही भिन्न होत्या तरीही सुखद..
काही क्षण त्या मीलनसंध्येत रमल्यावर ती उठली.. केसांचा अंबाडा वळत त्याला म्हणाली… मग राजे.. आज काय मूड आहे? काय बनवू?..
खरंतर काहीच नको..
आँ.. अरे भूक नाही लागली? नऊ वाजायला आलेत.. तिने विचारलं
काहीतरी साधा बेत.. कर ना.. तो अजूनही निवांत मूड मधे होता
पण तरी सांग की? तुला काय खायचा मूड आहे? तिने मुद्दाम त्याला कोपरानं ढोसलं..
बर.. थांब.. मीच बनवतो.. वेगळी डिश.. मला मदत एकच हवीये.. तो झटकन उठत स्वैपाक घराकडे वळला.
बोल काय करू? ती ही त्याच्या मागे स्वैपाक घरात आली
तू ssssअशीsss जवळी रहा… त्यानं गुणगुणत तिला सांगितलं.
हो का.. बरं.. म्हणत मिश्किल हसत ती ओट्यापाशी येऊन उभी राहिली..
त्यानं सफाईदार पणे कांदा, मिरच्या कोथिंबीर चिरली आणि बेसनाचं दह्यातलं पिठलं केल..
बाजूला सुटा भात.. आणि जोडीला पापड मिरच्या तळल्या
तिनं मधे मधे लुडबुड करायचा प्रयत्न करून पाहिला पण त्याच्या पुढे तिचं काही चाललं नाही..
मग पाटपाणी करत अंगतपंगत झाली..
आणि मागचं आवरून ती दोघ टेरेस वर आली… हातात वेलचीच्या कॉफीचे मग,
चंद्राच्या दुधाळ प्रकाशात एकमेकांच्या सहवासात रमून गेली.. तिनं गाss ना म्हणून प्रेमळ आग्रह केला… होताच मुळी सुरेल गळा… त्यानं “चंद्र आहे साक्षीला ” म्हणताच ती गोड लाजली..
काही क्षणातच तिचे ही सूर मिसळले आणि उत्तररात्री ची कैफ चढू लागली ..
पुन्हा एकदा त्यांनी स्पर्शावेग अनुभवले आणि तृप्त मनाने निजले
पहाटे जाग आली तशी ती आवरायला उठली.. नेमकी अडचण आली.. तिचा तर मूडच गेला..
ती जवळ नाही असं पाहून तो ही उठला …. त्याच्याही लक्षात आल…
उठून मग किचनमधे गेला.. मस्त आल्याचा चहा केला.. गरम पाण्याची पिशवी तयार केली आणि ती येताच तिच्या हातात शेकायला दिली.. मग माने मागे 2 उश्या दिल्या.. आणि ऐटीत चहा चा कप पुढे केला… आणि पाय चेपायला लागला..
तिला इतकं भरून आल.. नं सांगताच त्याला नैमित्तिक कळावं अन त्यानं इतक्या सहज ते स्वीकारावं..
हा सुखद धक्का होता..
प्रेम म्हणजे देहोत्सव किंवा नुसतं मनानं एकरूप झालोय असं नसतच मुळी प्रेम तर सहवासात एकमेकांना साथ देत एकरूप होण असतं ..
तिचं त्याच्यासाठी नी त्याचं तिच्यासाठी कायम बरोबर असणं.. हेच प्रेम…
काळजीतलं प्रेम काळजात रुतलं ♥️
©मनस्वी
Image by efes from Pixabay
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
Chhan
Kiti nashibwan asel na ti…
खुपचं छान…