प्रवास कथा- आठवणीत अडकलेले रस्ते- भाग तिसरा
पोवारी मुक्काम मिलिटरीच्या जवानांसोबत मिलिटरीच्याच तंबुत होता. शेजारी वाहणारी सतलज, समोर किनौर कैलाशच्या पहाडीचा खालुन दिसु शकणारा एक टप्पा. तिथपासुन मुख्य शिखर साधारण किती उंच आहे या गोष्टीचा अंदाज खालुन येत नसला तरी, काल्पामधुन कॅमेरे झुम करुन आम्ही तो घेतला होता. अर्थात, चढणीचा भाग तीन दिवसात अन चौथ्या दिवशी उतरुन खाली येण्याचाच मुळ प्लॅन होता. पण आता चंदीगड वरुन परतीच्या फ्लाइट्चा विचार करता, पुर्ण प्रोग्रॅम तीन दिवसात उरकावा लागेल अशी चर्चा सुरु झाली अन सर्वांचेच चेहरे पाह्ण्यासारखे झाले. तरीही जिथंपर्यंत चढाई करता येईल तिथंपर्यंत जायचंच असा विचार बहुतेकांनी केला होता. रात्रीच्या जेवणाची सोय मिलीटरीच्या बांधवांनी केली होती. त्यांच्याच महाकाय टेंटमध्ये दाटीवाटीने झोपल्यावर, थंडी वाजण्याची शक्यता खूप कमी होती.
पहाटे ज्यांना शक्य होते त्यांनी, मिलिटरी कॅम्पमध्ये, नाश्ता केला. काहींनी डबे भरून घेतले. मी ड्राय फ्रुटवर भागवायचं ठरवलं होतं. साधारणपणे पावणेसहा वाजता चाल सुरू झाली. सूर्योदय होत होता. पण आमच्या अन त्याच्या मध्ये हिमालय ठाकला होता.
सुरुवातीची चढण, अगदी साधी, रुंद पायवाटेची, एखादा कुठलाही सामान्य डोंगर वाटावा अशी, छोट्या मोठ्या झाडीतून जाणारी होती. बराच भाग काँक्रीट पाथवे केला होता. महाराष्ट्रातल्या अन इथल्या डोंगरांमधला फरक मुख्यतः त्यांच्या ठिसुळपणाचा होता. खडक अग्निजन्य नव्हते, त्यामुळं बहुतांश ठिसूळ होते. स्फटिकानी भरलेले होते. वाटेत विडीकाडी विकणाऱ्यांच्या टपऱ्या लागत होत्या. अंगातली उष्णता चांगलीच वाढत चालली होती. जिथून सुरुवात केली, ते पोवारी साधारणपणे समुद्रसपाटीपासून ६००० फुटावर होतं. आपलं महाबळेश्वर साधारण समुद्रसपाटीपासून १३०० फुटावर आहे. यावरून तापमानाची कल्पना येऊ शकते. तरीही पहिल्या दोन किमीच्या चढाईतच बहुतेकांची जॅकेट्स कमरेला गुंडाळली गेली होती.
एक टप्पा पार केल्यावर, एक चेक पोस्ट लागली. तिथं प्रत्येकाला आपापली नावे अन वय लिहायचं होतं. ग्लेशियर किंवा कुठल्याही कारणाने, जलप्रवाहात वाहून गेल्यावर, तुमचं शरीर पायथ्याच्या सतलजच्या प्रवाहापर्यंत अत्यंत वेगाने पोहोचणार होतं. अर्थात ते सापडणं कठीणच. वर गेलेल्यांच्या नावातून खाली उतरलेल्यांची नावे वजा केली की , उरलेले एकतर वर अडकलेत किंवा वाहुन गेलेत ही मनुष्य गणनेची पद्धत होती. त्यासाठी ते पोलिसांचं रजिस्टर होतं. हे सगळं ऐकून बरेच विचार मनात आले. त्यात, दोन दिवसांपूर्वी वाहून गेलेली महिला अन तिचा मुलगा, दोघेही पुणेकर असल्याचं कळलं अन काळजात चर्र झालं.
तिथं असलेल्या झोपडीवजा कॅन्टीनमध्ये, बहुतेकांनी मॅगी चोपली. आमचा ग्रुप सोडुन इतर बरेच ग्रुप होते. आणी परमिशन उशिरा मिळाल्यामुळे गर्दी जास्त झाली होती. इतक्या सगळ्यांच्या खाण्याचा हिशोब करणं अन त्यांना खाउ घालणं हे दो हाती तलवार घेउन लढण्यापेक्षा कमी नव्हतं. तरीही न वैतागता, न थकता, ती मॅगीमाउली अन पराठेबाबा कुठेही कमी पडत नव्हते.
तिथुन एखादं किलोमीटरवर तो जलप्रवाह होता, जिथुन काही भावीक वाहुन गेले होते. तो भाग जसजसा जवळ येत होता, तसतसा “जय भोले” चा घोष वाढत गेला. वर वर पाहता तो प्रवाह अगदीच लहान वाटत होता. इथून कुणी वाहून जाण्याची शक्यता वाटत नव्हती. प्रवाह पार करण्याचे दगड वाहून गेल्यामुळे, एक मोठं झाड आडवं करून सर्वजण तो नाला पार करत होते.
त्यानंतरची चढाई थोडी उभट होत चालली होती. उंच वृक्षांची संख्या आणखी वाढली होती. त्यांच्या आधाराने त्या पर्वतराजी स्वतःचे ठिसूळ खडक अन माती सांभाळून ठेवत होते. दमवणूक चांगलीच जाणवत असली तरी आम्ही उभ्या उभ्याच आराम करून पुढे पावलं टाकत होतो. अभय खातूला मध्येच काहीतरी सुचलं. हिमालयाला मराठी गाणी ऐकवू असं काहीतरी बडबडू लागला. पण नेटवर्क कधीच गायब झालं होतं. सोबत बरेच भाविक असले तरीही, आपण सोबतीनं चाललं पाहिजे या गोष्टीची जाणीव झाली.
मी माझा मोबाईल काढला. डेटा बंद केला. गणेश पार्कच्या मुक्कामी जनरेटरची व्यवस्था आहे असं ऐकलं होतं.
सगळेच थकत चाललेत असं वाटत होतं. काही महाकाय वृक्षांच्या पायथ्याशी अख्खा ग्रुप थकून आराम करतोय अशी दृश्य पाहून आणखी थकायला होत होतं. माझ्या मोबाईलमध्ये किशोरलताचं संपूर्ण फोल्डर होतं. पण का कुणास ठाऊक त्या थकलेल्या, अन हरत चाललेल्या क्षणी, शिवकल्याण राजाचं फोल्डर ओपन झालं.
“सरणार कधी रण प्रभो तरी…..” ची आर्त हाक तिथल्या वृक्षराजींमधून घुमली. आम्ही मान खाली घालून चालतच होतो. लोक वळून वळून पहात होते. गाणं मराठी असलं तरी, लता मंगेशकरांचा आवाज अखंड हिंदुस्थान ओळखत होता. त्याचीच ती खूण होती.
“वेडात मराठे वीर ” च्या गाण्याने मात्र अगदी वातावरण भारावून
टाकलं. नकळत काहीजण सोबत चालू लागले. थकून भागून ‘आता नाही होणार’ या पातळीवर आलेले बरेचजण उठून सोबत चालू लागले. आम्हाला थोडं नवल वाटलं. आमच्या सोबत चालणारे पिठठू सुद्धा गाणं ऐकत चालत होते. मी थोडा थांबलो. आजूबाजूला पाहिलं. सोबत काही माझ्यापेक्षा बऱ्याच सिनिअर स्त्रिया चालत होत्या. गाणं संपल्यावर मी मोबाईल बंद केला.
तशा धापलणाऱ्या दोघीजणी म्हणाल्या, ” चालू ठेवा हो गाणी. तेवढंच बळ येतंय अंगात.” चक्क मराठी !. त्या नागपूरच्या होत्या. बाकी सर्वजणी पुण्याच्या. गाण्यांमुळं त्यांना कळलं, हे सर्वजण मराठी आहेत. स्टेट बँकेत ब्रँच मॅनेजर म्हणून नोकरी करणाऱ्या त्या मैत्रिणी, पर्वतीवर ट्रेकिंगची प्रॅक्टिस करून आल्या होत्या. नागपूर तर जवळजवळ मैदानीच. मग या सर्व जणी, एखादा विकली ऑफ गाठून, पुण्यात येत. सिंहगड चढत,…… आणि दही थालपीठ खाऊन माघारी जायच्या. अशी इत्यंभूत माहिती मिळाली . गाण्यांमुळं मला हळूहळू, आसपास चालणार्यापैकी बरेच लोक मराठी आहेत ही जाणीव झाली. एकतर मराठी माणसांकडे रिकामा वेळ बराच असावा, किंवा असे वेडेपण करण्याची हौस असावी. आता हळूहळू चालणारे काहीजण मराठी गाणी गात चालत होते.
मागे एकदा, गुलमर्ग हुन टोंगमार्गला आलो तेव्हा, एक कश्मीर एम्पोरीयम दिसले होते. आम्ही आत गेलो. आई सोबत होती. आता या लोकांना काय कळतंय मराठी ? अशा अविर्भावात आई बोलून गेली, ” कसल्या रे या शाली ?….. शंभर रुपयांच्या तरी वाटतात का ?” त्या सरशी दुकानदार हसला, म्हणाला, ” शंभर नही मौसी, एक रुपया कमी नाही.”
त्याला मराठी समजतंय हे पाहिल्यावर आम्ही आश्चर्य व्यक्त केलं. तो म्हणाला, ” मराठी लोगही तो डेरिंग करके यहां आते है. उनसे थोडा कम बंगाली.” तो राज ठाकरेंचा फॅन होता. भरभरून बोलत होता.
मराठी लोकांमुळे कश्मिरी माणसाचं पोट भरतंय हे समाधान तो नकळत देऊन गेला. अगदी हीच अवस्था इथंही होती. बरेच जण मराठीत आपापसात बोलू लागले होते. “जय भोले “ही गर्जना आता, “हर हर महादेव ” मध्ये परावर्तित झाली होती.
हळूहळू अंतर वाढत गेलं. पिठठू सोबत एकट्याने चालत बराच पुढं आलो. आता उंच झाडे दिसेनाशी झाली होती. खुरट्या झुडुपांची संख्या वाढली होती. दूर असलेल्या एका झोपडीतून धूर निघत होता. रस्ता तिकडेच जात होता. तोच आपला पहिला मुक्काम असावा, असं काहीतरी विचार करत निघालो. पण तिथं पोचल्यावर समजलं, तेही चहापान कॅन्टीनच होतं. अन पहिला मुक्काम अजून बराच पुढं म्हणजे अडीच किमीच्या आसपास होता. हे समजल्यावर मात्र, पाय अगदीच गळाठले. इतकं चढून आल्यावर, त्या उभ्या चढणीला अडीच किमी म्हणजे अगदीच दमछाक. तिथं टेकलो थोडावेळ. एक चहा घेतला. काहीजण सिगारेट फुंकत होते. त्यांचं सिगारेट फुंकणं जरा वेगळं वाटत होतं. त्या सिगारेटीही वेगळ्या होत्या. आम्ही लगोलग तिथून उठलो अन पुढं चालायला सुरुवात केली.
आता हिमशिखरे आमच्या समांतर पातळीवर आली होती. आम्ही जिथे उभे होतो, तिथून खालच्या पातळीवरही बर्फाच्छादित रांगा दिसत होत्या. हा किनौर कैलासचा पहाड सोडून सर्व आसपासच्या शिखरांवर अन खालीही बर्फ दिसत होते. इथे मात्र खुरट्या झुडपांची रेलचेल होती. क्वचित एखादे मोठे झाड वाटेत लागत होते. गणेश पार्क नजरेच्या टप्प्यात आले तोपर्यंत, सूर्य पश्चिमेकडे झुकला होता. हिमशिखरांवर सोनेरी रंगाची उधळण सुरू झाली होती. त्या क्षणी जर कुणी हिमालयाचा एरियल व्ह्यू घेते तर, सोन्याची शिखरे, एवढी एकच उपमा त्याने दिली असती.
आता आम्ही १२३०३ फुटांवर उभे होतो. आमच्या आधी पोहोचलेले पिट्ठु मस्त मिट्क्या मारीत चहा पित आमची अवस्था पहात होते. ही मुलं खरंतर १६-१७ वर्षांची पोटार्थी मुलं होती. त्यातले काहीजण नेहमी या यात्रेत पैसे कमावण्या साठी येणारी तर काहीजण या वर्षीच आले होते. कितीही ओझं पाठीवर घेउन चढण चढण्याची ताकद त्यांच्या कण्यात होतीच, पण तुम्हाला चालत ठेवण्याची किमया देखील त्यांच्या वाणीत होती.
सप्टेम्बर होता. रात्रीचं तापमान ४ ते ५ अंश सेल्सिअस जाणार होतं. थकल्यामुळं शुज काढले तरीही आराम वाटत नव्हता. गुड्घ्यातुन पाय काढुन ठेवण्याची सोय असती तर बरं झालं असतं असं वाटत होतं. रात्री पुन्हा पिली दाल अन भात खाउन सगळे झोपण्याच्या तयारीला लागले. रात्री पुन्हा ग्लासभर दुध प्यायला मिळणार होतं. पण प्रत्येक तंबुतला एखादं दुसराच जागा होता. बाकी सर्वजण गाढ झोपेच्या अधीन झाले होते. कुणाचा पाय कुणाच्या अंगावर, अन कुणाचा हात कुणाच्या डोक्यावर अशा दाटीवाटीनं सर्वजण झोपले होते. थंडीला जराही जागा नव्हती. दुसर्या दिवशी पहाटे पाच ते साडेपाच दरम्यान, निघावं लागणार होतं.
हिमालयाच्या कुशीत, चारी बाजुंनी, बर्फाच्छादीत शिखरांच्या पंजाच्या मधोमध गाढ झोपलेले ते देह पाहुन, महादेवही गालातल्या गालात हसले असतील. तशीही ती जागा महादेवांना प्रिय असणार. त्या गणेश पार्कच्या जागेवरच, त्यांची अन पार्वती मातेची पहिली भेट झाली, अशी अख्यायिका प्रसिद्ध आहे. त्यांच्या त्या अत्यंत आवडीच्या अन वैयक्तिक जागेवर, लेकरानी केलेला कब्जा पाहुन, त्यांना नक्की मनातुन गुद्गुल्या झाल्या असतील.(क्रमशः)
- बीआरपवार
Image by Michael Gaida from Pixabay
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
Nice!!