जपानी नजरेतून आपण
कसे आहोत आपण? काय विचार करतो दुसरा आपल्याबद्दल? आपले गुण दिसतात का त्याला हे जाणून घेण्याची किती उत्सुकता असते मानवी मनाला. त्यासोबतच आपले अवगुण पण कळले असतील की काय अशी शंका आणि हुरहूर सुद्धा असतेच. मग आपण काय करतो? कळेल ना कळेल असे प्रश्न विचारतो. ओळख असेल चांगली तर थेट विचारतो. कधी चाचरत. कधी बेधडक. पण आपण प्रश्न विचारतो. मी जपानी दुभाषी म्हणून काम करते. त्यामुळे सहाजिकच जपानी माणसांशी खूप उठबस होते. कामाच्या निमित्ताने. कधी लंच, डिनर पार्ट्यांमध्ये. माणसं भेटतात आणि मग मनात रेंगाळणारे प्रश्न आपसूक ओठांवर येतात. आमची मिटिंग संपली की मी हमखास असा प्रश्न टाकतेचं समोर. मग कधी साधी सरळ. कधी उडवाउडवीची. कधी आडवळणाने सांगून जाणारं काही. कधी सूचित करणारं काही, मिळतं जातं. सापडतं जातं. जसं किनाऱ्यावरून चालतांना किती सहज एखादा निवळ शंख लागतो हाती. किती सुंदर. आणि मग तो शंख आपण उचलून घेतो. कानाशी लावतो. कधी वाजवून पाहतो. किंवा दुसऱ्याला देतो.
आता थोडं जपानी माणसांबद्दल. ती आपल्यासारखी मुळीच नाहीत. खूपशी मितभाषी. कामाच्या ठिकाणी कामाचे सोडून फारसं दुसरं काहीही न बोलणारी. बऱ्यापैकी एकसारखा विचार करणारी. लाघवी. हसणारी आणि कार्यमग्न असणारी. मग अशा माणसांना आपण कसे बरं असू दिसतं. किती बोलतो आपण. आणि ते ही सतत. इथं एकासारखा दुसरा नाही. आणि कोणाचा पायपोस कुणात नाही अशी आपली गत. हे असं आपलं आपल्याबद्दलचं मत. मग त्या शिस्तीच्या, वक्तशीर माणसांना कसे ना दिसतं असू आपण? भोंगळ, ढिसाळ काम करणारे? वेळेवर न येणारे? का अजून काही? बरोबर आहे. असेच दिसतोही आपण त्यांना. आपला आपल्याबद्दलचा अदमास थोडाच चुकतो कधी. पण केवळ असेच दिसतो आपण त्यांना असं सुद्धा मुळीच नाही.
माझे एक सहकारी होते. सुझुकीमध्ये मोठ्या पोस्टवर. भरपूर वर्ष भारतात राहात होते. थोडं कामचलाऊ हिंदी येतं असे त्यांना. हुशार माणूस. नाव त्याचं हातादा. हातादा सान. मी एकदा त्यांना विचारलं, “हातादा सान, कसे आहोत हो आम्ही”? कसे वाटतो तुम्हांला? थोडंसं हसले. आधी डोळ्यातून. मग सोनेरी फ्रेमच्या चष्म्यातून. आणि मग छोट्या अरुंद जिवणीतून. अत्यंत रुबाबदार माणूस. म्हणाले मला, “अग आहात तसेच दिसता?” मग मी गप्पचं बसले. बरेचदा रिऍक्ट नाहीतर रिस्पॉन्ड करायचं असतं. आणि जपानी माणसाशी बोलतांना बोलायचं कमी असतं. का? तर असं केल्याने दोन ओळींच्या मध्ये किंवा समासात ते जे काही लिहिलेलं असतं ते सापडतं. जपानी माणूस कधीही थेट बोलतं नाही. त्याची सवय आहे. तसेच बोलायची पद्धत सुद्धा. मग गप्प राहिल्याने दोन गोष्टी होतात. हे बिटवीन द लाईन्स वाचायची, टिपायची संधी आणि अवकाश मिळतो. आणि आपण विश्वासार्ह आहोत हे त्यांना पटत. आणि एकदा त्यांच्या मनाची खात्री पटली की ते बोलघेवड्या पोपटासारखे बोलू लागतात. मग हातादा सान कसे असतील अपवाद. बोललेच ते. आणि ते सुद्धा अगदी भरभरून.
मला म्हणाले, “अग तुमच्या ह्या देशात किती ही असमानता. एकीकडे इतकी श्रीमंती. दुसरीकडे एकवेळचे जेवण मिळायची भ्रांती. किती स्तर आहेत तुमच्यात. विषमता खूप आणि. पण इथला माणूस हुशार आहे. चलाख आहे. आपलं काम साधून घेण्यात प्रचंड माहीर आहे. गरीबी खूप काही शिकवून जाते माणसाला. हेच खरंय. असं म्हणाले आणि हसले. त्या हसण्यात काय नव्हतं? उत्तर माझ्या प्रश्नाचं. थोडं बोचरं. थोडं विमनस्क. थोडं उपहास करणारं. आणि थोडी स्तुती करणारं हसू होतं ते. तर असे आहोत आपण. म्हणजे आपण अगदी असेच असू असं नाहीये. एका उच्चपदस्थ जपानी माणसाला आपण असे दिसलो. हरकत नाही. पण हा तर आपला open spot आहे. त्यात नवीन ते काय. माहिती असलेली उत्तरं अजिबात रंजक नसतात. आणि माणसाला रंजकतेचा किती सोस. मग मी माणूस बदलला. म्हटलं ह्यावेळी एखाद्या बाईला विचारून बघूया. कधी उत्तरानं समाधान मिळालं नाही की आपण एकतर प्रश्न बदलतो किंवा माणूस. मी दुसरा पर्याय निवडला.
सायुरी सान. एक गोड स्वभावाची, हसरी जपानी बाई. ती माझ्याकडे हिंदी शिकतं असे. मुंबईत राहायला. मराठी माणसाशी लग्न करून इथे संसार ठरलेला. तिची सासू माझ्या ओळखीची. मग ही झाली. शिकवता, शिकवता मैत्री झाली. मग तिला विचारलं मी जाऊन तिच्या ऑफिसात, “बाई ग. कसे ग आहोत आम्ही? कसे दिसतो तुला?” कहाणीच जणू. बायका बायकांशी बोलतातच दिलखुलास. मनमोकळं. मनापासून आणि मनमुराद. ती पण आधी हसली. म्हणाली मला, ‘ बस तर आधी. चहा, कॉफी घे. मग बोलू निवांत”. किती ते अगत्य. किती आपलेपणा. एक भाषा काय येते मला तिची. ती बाई माझी होऊन गेली. मग छान दळदार स्ट्रॉंग कॉफीचे गरम घुटके घेतं. सायुरी बोलू लागली. निरंतर आणि निभ्रांत. “किती ग तुम्ही बोलता. ऐकता कमी आणि बोलता फार. असं का ग करता? अग मेंदूमध्ये आणि तोंडामध्ये अंतर असतं ना ग आपल्या. सगळ्यांच्याच असतं. पण मेंदू आणि तोंड शेजारी असल्यासारखं बोलता ग तुम्ही. थोडं वेचून. थोडं गाळून. थोडं नको असलेलं काढून. थोडं थांबून का नाही बोलतं कधी” मी थांबवलं नाही तिला. नाहीतर तिचा ओघ असता आटला. पण मनात आलं की ही काय सांगतेय नक्की एखादी पाककृती की स्वभाव भारतीय माणसांचा. मग म्हणाली, ‘ असं आलं मनात की गेलं दुकानात का करता तुम्ही. इतका बोलभांडपणा’. मैत्रीण जुनी पण तरी आपल्या मुलांना बोलली की कसं वाईट वाटतं. तसं काहीसं झालं. कॉफीचा पुढचा घोट एकदम कडूच लागला मग. ते तिला कळलं अर्थात. मैत्रिणीचं मैत्रिणीला नाही कळणार तर कोणाला. म्हणाली मला खोटं बोलावं लागतं नाही कधी अशीही काही नाती असतात. आणि मग पुढंच सगळं एकदम सोप्पचं होऊन गेलं. नागमोडी वळणं संपून गाडी निघते भरधाव तसं काहीसं. मग बराच विचार केला ह्यावर. एकातून दुसरा. थोडं आजूबाजूला परत बघितलं. आपल्याच डोळ्यातून पण तिच्या नजरेनं. परकीय भाषा येण्याचा हा अजून एक फायदा. किती झटकन करू शकता तुम्ही असे परकाया प्रवेश. आणि मग ती बरोबर बोलतेय हे पटलं.
आणि मग हे प्रश्न विचारणं सुरूचं ठेवलं. मजा येऊ लागली मला. आपणचं आपल्याकडे तिसऱ्याच्या नजरेतून बघणं. किती विलक्षण. किती वेगळं. आणि किती देऊन जाणारं काही. आमच्या सुझुकीच्या टीम मध्ये एक इंजिनिअर होता. हाडाचा बरं का. जपानी असून फार प्रश्न पडतं त्याला. आणि परत सगळे जगण्यातले. पुस्तकाच्या बाहेरचे. मला म्हणाला, ‘ अग इथं कसं मी दिलखुलास विचारू शकतो काही. तिथं ते जमतं नाही.” अशावेळी नुसतं स्मित करायचं असतं. आणि पापणीची उघडझाप करून, कळतंय मला असं सांगायचं असतं. आपल्या इथं नाही तिथं जपानात. आपल्याकडे आपण लगेच आपली मत बित मांडून मोकळे होतो. अरे, असं चूक नाही काही त्यात. आपण कुठं आहोत जपानी. पण होतं काय नां… मिश्र भाषिक लोकांमध्ये काम करताना दोन्हीही भाषा येणाऱ्या व्यक्तीचा catalyst होऊन जातो. मग त्या अनुषंगाने आपण विचार करू लागतो. एकाच वेळी. दोन चष्म्यांतून बघितल्यासारखा. आणि मग गोष्टी वेगळ्या भासतात. दिसतात. कारण मुळात त्या वेगळ्या असतात. तर तो मला म्हणाला, ‘तुम्ही भारतीय एक नंबरचे जुगाडू आहात”. जुगाड. भारताने जगाला शुन्यानंतर दिलेली सर्वात मोठी देणगी असावी जणू. इतका तो आपण करतो. म्हणजे ऑक्सिजन कसा, घेतोच आपण आपल्याच नकळत तसा हा जुगाड. मला म्हणाला, ‘माझ्या रूममधल्या टी. व्ही.नव्हता चालतं तर अटेंडंट आला आणि दोन मिनिटांत केलं त्याने काही. मी विचारलं हाताने खुणा करून तर हसत म्हणाला, सर ये है जुगाड. ही माणसं जपानी. पाठपुरावा करणारी. त्यानं तो शब्द मग आंतरजालावर शोधला. शोधलं की सापडतचं. नियम जगाचा. मग आभासी दुनियेतलं काही वास्तवात पण आहे हे हुडकतं राहिला, सुगा सान. आणि लागलाच सुगावा त्याला. हा खरा जपानी बाणा. अथक प्रयत्न. माग घेतं राहणं. गाडून घेणं आणि येईल त्याची नीट नोंद करून ठेवणं हा मला सापडलेला जपानी.
किती गंमत आहे बघा. संस्कृती, आचार विचार, राहणीमान, खानपान सगळं वेगळं. पण एक भाषा आली की सगळं आपलं होऊन जात. मुलगी कशी एका घरी जन्मते आणि बाई होऊन दुसरीकडे नांदते. तसंच काहीसं. तर असे आहोत आपण. त्यांना दिसलेलं काही. आपले blind, hidden, unknown spots. ह्यात बदल करायचा का नाही हे शेवटी ज्याचं त्यानं ठरवायचं. बदलू म्हटलं तर बरंच काही येतंच बदलता. पण कधी कधी शक्य नसतं. कधी कधी बदलायचं नसतं. आपलं आपण ठरवायचं असत. अशा वेळी मी तरी फक्त एकच करते. मला प्रचंड आवडणाऱ्या कवितांकडे वळते. ह्यावर पण तर मर्ढेकर म्हणूनच गेलेत ना शेवटी, संदर्भ जरी वेगळा असला. ते म्हणतात त्याप्रमाणे मग बघावे आपणचं आपल्याला. कसं? तर “आम्हांस आम्ही पुन्हा पाहावे, काढुनी चष्मा डोळ्यांवरचा!”….
Image by Sasin Tipchai from Pixabay
- सुशीच्या पल्याड….. - August 6, 2021
- स्पर्शाचं देणं - July 14, 2021
- तुकड्या तुकड्याने जगतांना…. - June 8, 2021
Japan baddal ajun Kahi Mahiti pan liha. Ha Lekh khup chhan
Th8s is good. 👍😊
Please write more about your experiences with the language and Japanese people.
Gd 1
Japan most Intresting country & ppl in Asia!