गुंतता हृदय हे…हम तुम
काय रे अवनीश, म्हणजे यावर्षी रविवारी व्हॅलेंटाईन डे असुनही तू माझ्यासोबत नसणार?
किहीशी खट्टू होऊनच पुर्वा म्हणाली.
अवनीश – अगं काय करणार काम आहे…
अवनीश आणि पुर्वा एक हॅप्पी कपल. खरंतर कॉलेजमधेच दोघांची मैत्री. पुर्वा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला तर अवनीश मेकॅनिकल इंजिनिअरिंगला. पण रोजची नजरानजर आणि मग अॅन्युल डे फंक्शनच्या निमित्ताने झालेली ओळख कधी प्रेमात रुपांतरीत झाली ते दोघांनाही कळले नाही. लास्ट इयरला तर व्हॅलेंटाईन डे ला अवनीशने सर्वांसमोर कॉलेज कॅन्टीन मधे तीला लग्नाची मागणी घातली. पुर्वाने सुद्धा होकार दिला.
कॉलेजची शेवटची सेमिस्टर बघता बघता संपु लागली. प्रोजेक्ट, व्हायवा, फायनल एक्झाम होता होताच कॅम्पस मधे दोघांचेही चांगल्या कंपनीमधे सिलेक्शन झाले. अवनीश पहिल्यापासूनच हुशार असल्याने पटापट तो प्रमोशन मिळवत गेला. पुर्वा देखील आता प्रोजेक्ट लीडर म्हणून कार्यरत आहे.
कॉलेजनंतर जवळपास 4 वर्षे झाली आणि आपापल्या जॉबमधे सेटल झाल्यावर त्यांनी दोन वर्षांपूर्वी लग्न केले आहे.
पुर्वा कॉलेजच्या दिवसांत हरवलेली असतानाच अवनीशने तिला पाठीमागून घट्ट मिठी मारली. बेसावध पुर्वा थोडी दचकली पण अवनीशच्या बळकट बाहूंमधे ती सुखावली. अवनीशने तीच्या उजव्या बाजूने आपली हनुवटी तीच्या खांद्यावर टेकवली. त्याचे उष्ण श्वास तीच्या मानेवर आणि चेहर्यावर येत होते. हे असे केले की तीच्या अंगावर काटा येत असे. मानेवरती त्याने हलकेच टेकलेल्या त्याच्या ओठांमुळे तीच्या अंगावरचा काटा अजूनच फुलला.
पुर्वाने आपली सुटका करण्याचा प्रयत्न केला पण अवनीश च्या बाहुंचं कडं सोडवणं शक्य नव्हते. अवनीशने तीला आपल्याकडे वळवले. तो आपले ओठ तिच्या ओठांवर टेकणार तोच तीने तीचा हात ओठांवर ठेवला.
पुर्वा – बच्चमजी जर तुला माझ्यासाठी वेळ नाही तर मग काहीच मिळणार नाही.
असे म्हणुन हसु लागली. याच क्षणी अवनीशच्या हाताची मिठी ढिली झालेली पाहून तीने त्याला धक्का दीला अन ती दूर पळाली. अवनीश – अरे असे काय करतेस?
पुर्वा – मग काय? तुझी टीम आणि तुझे काम हाच तुझा व्हॅलेंटाईन.
अवनीश – अगं तुला माहित तर आहेच ना, माझी टीम बेस्ट परफॉर्मींग टीम आहे.
पुर्वा – हो ना पण मग तू त्यांना हवी तशी सूट देतो.
अवनीश – अगं हवी तशी नाही. पण ते पण जेव्हा डेडलाईन्स असतात तेव्हा ते दिवसरात्र काम करतात. त्याच जीवावर मी टीम मॅनेजर आहे.
पुर्वा – हो ना म्हणून मग त्यांना वीकेंडला जोडून सुट्टी मिळते अन क्लायंट मीटींगला तू जातो.
नाक उडवून पुर्वा म्हणाली अन ती कीचनमधे गेली.
ती कीचनमधे गेल्यावर तो आवरायला लागला. आता यावेळी पुर्वा काही ऐकणार नाही याची त्याला खात्री पटली. पण त्याचा प्लॅन मात्र काही तरी वेगळाच होता.
अवनीशने पुर्वाला सांगितले होते की त्याला एका क्लायंट मिटिंगसाठी त्याला बेंगलोरला जावे लागणार होते. मीटिंग नेमकी चार पाच दिवस असणार होती अन व्हॅलेंटाईन वीक त्यातच जाणार होता आणि म्हणूनच पुर्वा नाराज होती.
अवनीशला अजूनही आठवत होते. कॉलेजमध्ये असताना आणि त्यानंतर सुद्धा काही वर्षे तो प्रत्येक व्हॅलेंटाईन डे स्पेशल करायचा. मग कॉलेजच्या शेवटच्या वर्षी अरेंज केलेली पिकनिक असो की जॉब सुरु झाल्यावर पहिल्या वर्षी त्याने अरेंज केलेला कॅंडल लाईट डिनर. तो तिच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत होता. अगदी लग्न झाल्यावर देखील पहिल्या एकदोन वर्षांत सुद्धा व्हॅलेंटाईन डे मेमरिबल होते. पण नंतर जसजसे कामाचे व्याप वाढले, जबाबदार्या वाढल्या तसतसा वेळ मिळेनासा झाला.
पॅनडेमीक मधे जवळपास वर्षभर गेल्यावर मात्र कधी मोकळा श्वास घेतो असे प्रत्येकालाच वाटत होते. त्यामुळे पुर्वाचे म्हणणे अवास्तव नव्हते. पण अवनीशने त्याच्या मिटिंगचा प्लॅन सांगितल्यामुळे तीचा मुडच गेला.
बघता बघता व्हॅलेंटाईन वीक सुरु झाला. रोझ डे ला आलेला बुके, हग डे ला मिळालेली ऊबदार मिठी, चॉकलेट डे ची सिल्क कॅडबरी सुद्धा पुर्वाला सुखावून गेली नव्हती.
संध्याकाळी अवनीश जरा नेहमीपेक्षा लवकरच घरी आला. आज रात्री उशीराच्या फ्लाईटने तो बंगलोरला जाणार होता. त्यामुळे पुर्वाचा मूड नव्हता. उद्या व्हॅलेंटाईन डे आणि ह्याला आज रात्रीच जायचे आहे याचाच तीला राग होता.
अवनीशने फ्रेश होऊन बॅग भरायला घेतली. पुर्वा रागात फक्त बघत ऊभी होती. अवनीश काहीच प्रतिक्रिया देत नाही म्हणून मग ती पाय आपटत हॉलमधे गेली आणि टीव्ही अॉन केला.
अवनीशने दोन्ही बॅग्ज भरल्या. त्याचे अन तीचे दोघांचे लगेज भरुन बाहेर आला. अन पुर्वाला म्हणाला
अवनीश – चला आवरा निघायला हवे.
पुर्वाने काहीच रिस्पॉन्स दिला नाही. मग तो पुन्हा म्हणाला मग त्यावर ती म्हणाली
पुर्वा – जा ना तूच जाणार आहेस ना. झाले ना तुझे आवरुन. मी काय तुला एअरपोर्टला ड्रॉप करायला येऊ का?
अवनीश – मी म्हणतो काय हरकत आहे ना? चल ना मला ड्रॉप करायला?
पुर्वा – हे बघ मी आता गम्मत करण्याच्या मूड मधे अजिबात नाही.
अवनीश – मी देखील नाही. त्यापेक्षा तू उठ आणि तयार हो.
पुर्वा – अरे मला नाही यायचंय तूला ड्रॉप करायला.
अवनीश – ड्रॉप करायला नाही पण सोबत तर येशील?
पुर्वा – म्हणजे…
अवनीश – हाऊ अबाऊट सेकंड हनीमून अॅट युवर फेवरिट प्लेस?
पुर्वा – अवनीश इनफ… मला अजिबातच इंटरेस्ट नाही गंमत करण्यात.
अवनीश – हे बघ मी पण गंमत करत नाही.
तो आता गेला आणि एक पाऊच घेऊन आला त्यामधे काही प्रिंट्स आणि दोघांचेही पासपोर्टस् होते. ते त्याने तिच्या हातात ठेवले. तीने नजरेनेच हे काय आहे असे विचारले. त्याने हातानेच ऊघडून बघ असे सांगितले.
आत मधे दोघांचेही पासपोर्टस् आणि फ्लाईट टिकीटस् होती. तीने पाहिले तर दोघांचे बालीची टिकीटस्. पुर्वा फक्त रडायची बाकी होती. डोळ्यात आसवं जमली.
अवनीश – अहं रडायचं नाही…
पुर्वा – यू…
तीला पुढचा शब्दही बोलू न देता अवनीशने तीला मिठीत घेतले अन हलकेच एक कीस तिच्या ओठांवर केला. पुर्वा आता गदगदत होती.
थोडी शांत झाल्यावर ती म्हणाली – अरे पण मला का नाही सांगितले? अन बॅग कधी भरणार?
अवनीश – सरप्राईज सांगून देतात का? अन तुझी बॅग पण भरलेली आहे. फक्त अजूनही काही बाकी आहे का ते चेक कर. दोन तासांनी निघायचे आहे.
पुर्वा चेक करायला लागली. जवळपास सगळ्या गोष्टी अवनीशने भरल्या होत्या. किरकोळ गोष्टी राहिलेल्या तीने भरल्या. फ्रेश झाली. अन चला निघू म्हणाली.
आज कितीतरी वेळा दिवसांनी तिच्या चेहर्यावर हसू पाहून अवनीश मनोमन सुखावला. टॅक्सी मधे बसल्यावर पुर्वाने अवनीशचा डावा हात घट्ट धरला आणि त्याच्या खांद्यावर डोके टेकले. बर्यापैकी कमी झालेल्या ट्रॅफिकमुळे तीने खीडकीची काच खाली केली. मध्यरात्र ऊलटून गेल्याने थंड हवेची झुळुक आत येऊ लागली. वार्याने तिच्या बटा अवनीशच्या चेहर्यावर येऊ लागल्या. हवा अचानक गुलाबी झाल्यासारखी वाटू लागली. हवेतला गारवाही हवाहवासा वाटत होता. एफएम वर कुमार सानु गात होता
“सांसों को सांसों में ढलने दो जरा
धीमी सी धड़कन को बढ़ने दो ज़रा
लम्हों की गुज़ारिश है यह पास आ जाए
हम हम तुम… तुम हम तुम”
– अभिजीत इनामदार
- पाऊस - July 30, 2021
- बडी ताकत के साथ… बहोत बडी जिम्मेदारी भी आती है - May 11, 2021
- आठवणींच्या_पटलावर - April 20, 2021
Mast 👌👌
धन्यवाद
👌👌
धन्यवाद