प्रवास कथा -सहलीसाठी स्थळ नाही सोबत महत्वाची

माझं ना स्वतःचे असे एक मत आहे की , आपण ट्रीपला जातो ते ठिकाण महत्वाचे नसते तर सोबत महत्वाची असते. आपली माणसे सोबत असली तर कुठलेही ठिकाण आनंदच देते. त्यात अजून एक गमत आहे बरं का ! म्हणजे हा अनुभव तर प्रत्येकालाच असावा की, कुठलीही ,किंवा कितीही दिवसाची सहल असो, आपण एक महिना, सहा महिने अगदी वर्षभर सहलीचे  प्लान करत असतो आणि हळूहळू सहल प्रत्यक्ष घडेपर्यंत एकेक जण काही ना काही कारणाने गळत जातो. आणि खरी सहल अगदीच क्वचितच घडते, अर्थात हे प्लानिंग करयाला सुद्धा मजा येते हा भाग निराळा.

तर असेंच जास्त कुठलाही प्लान किंवा जास्त काही ठरवा ठरवी न करता माझी खास  मैत्रीण चैत्राली आणि तिचा नवरा चिंतामणी  रोह्याला आमच्या घरी गेल्या शनिवारी आले. चिंतामणीला फोटोग्राफीचा छंद आहे. निसर्ग, पक्षी, प्राणी ह्यांचे तो  खूप सुंदर फोटो काढतो आणि महत्वाची बाब म्हणजे त्याला सर्व पक्षांची, प्राण्यांची नावे आणि त्यांची इतर माहिती सुद्धा खूप आहे. तर ह्यासाठीच ते दोघे आमच्या रोह्या जवळील फणसाड अभयारण्य येथे जायचेच असे ठरवून आले.

रविवारी सकाळीच आम्ही जवळजवळ साडेसहाला म्हणजे उजाडले सुद्धा नव्हते अश्यावेळी त्यांच्या गाडीने फणसाड कडे आगेकूच केली. हे अभयारण्य मुरुडच्या रस्यावर साधारण रोह्यापासून एक दीड तासावर डाव्या साईडला एक वळण लागते तिथे आहे.  थंडीचे दिवस होते, पण सहन करण्याइतपत थंडी होती तरीही सोबत श्रग, स्टोल, वगैरे घालूनच आम्ही बाहेर पडलो. सकाळची प्रसन्न वेळ आणि त्यात कोकणातील सुरेख आणि आल्हाददायक वातावरण, आम्ही फार खुश होतो.

सकाळची वेळ असल्यामुळे अभयारण्याच्या वाटेवरच चिंतामणीला अनेक ठिकाणी झाडांवर वेगवेगळे पक्षी दिसले आणि ते त्याने त्याच्या कॅमेरात टिपलेच.

आम्ही दोघींनी सुद्धा तो जिथे थांबत होता तिथे तिथे गाडीतून उतरून आमची फोटो काढायची हौस त्याच्या कॅमेरात आणि आमच्या मोबाईल मध्ये सेल्फी काढून आणि माझ्या नवरा चेतन ह्याला मोबाईल मध्ये सुद्धा काढायला सांगून पूर्ण करून घेतली.

सकाळी आम्ही चौघेही फक्त चहा बिस्कीट खाऊन निघालो असल्यामुळे आता फोटोग्राफी झाल्यावर आम्हाला सपाटून भूक लागली होती. वाटेत सगळी लहान लहान गावेच असल्यामुळे आम्हाला स्वच्छ, टापटीप असलेले हॉटेल मिळणं मुश्कील नाही अशक्यच होते. पण आम्ही चौघेही कुठलेही नखरे नसणारी, असेल  त्यात समाधानी वगैरे वगैरे प्रकारची माणसे असल्या कारणाने चणेरा ह्या गावाजवळ एक लहानच चहाची टपरी दिसल्यावर गाडी थांबवली. आणि देव आमच्यावर भलताच खुश होता की काय आज, तिथे गरम गरम बटाटे वडे एका मोठया कढईत तळले जात असल्याचे दृश्य दिसले . आदल्या दिवशी मी ही खरंतर वडा पाव हाच मेनू केला होता, पण समोर असे गरमगरम वडे आणि तळलेली हिरवी मिरची  दिसल्यावर कोणाला राहवेल, नाही का ? आधी आम्ही दोन दोन वडा पाव,  मिरची ह्यावर ताव मारला आणि त्यानंतर गरमागरम चहाचा आस्वाद घेतला. असं म्हणतात आणि मला स्वतःला अनुभव पण आहे की कोणत्याही हॉटेल पेक्षा चहा आणि वडा हा टपरी आणि गाडीवरचाच टेस्टी असतो.

पोट आणि आत्मा तृप्त झाल्यावर आम्ही पुढच्या प्रवासाला सज्ज झालो. परत मध्ये मध्ये वाटेत थांबत मला आणि चेतनला नावेही माहित नसलेल्या पक्षांचे चिंतामणीने त्याच्या कॅमेरात फोटो काढले. चैत्रालीला मात्र त्याच्या सोबत राहून  बरीचशी नावे माहित होती. थोड्यावेळाने रस्त्याच्या डाव्या बाजूला “फणसाड अभयारण्य” अशी पाटी दिसली आणि आम्ही त्या रस्त्यावर वळलो. हा रस्ता वळणा वळणाचा होता , कारण आता अरण्य म्हंटल्यावर आत जायला वळणे असणारच. हा ही भाग घनदाट झाडांनी वेढलेला होता. खूप मस्त गारवा जाणवत होता. थोडे उनही होते, पण ते ही सुखद वाटत होते. आम्ही सकाळपासून गाडीचा ac बंद करूनच आलो होतो, कारण बाहेरच्या स्वच्छ आणि थंडगार हवेचा आम्हाला आस्वाद घ्यायचा होता.

जवळजवळ पंधरा वीस मिनिटांचा तो वळणा वळणाचा रस्ता पार केल्यावर फणसाड अभयारण्याची खरी सरकारी हद्द सुरु झाली.तिथे गाड्या पार्किंग करण्यासाठी सोय होती , तिथे आम्ही गाडी पार्क करून, तिथली आमची आणि चिंतामणीच्या मोठ्या कॅमेराची प्रवेश फी भरून अभयारण्याचा आनंद घ्यायला सुरुवात केली. सोबत तिथलाच एक गाईडही घेतला जेणेकरून रस्ता चुकायला नको.

जंगलाचा मुख्य रस्ता आणि मध्येच एखादी पायवाट असे जसे आवडेल, जसे काही नजरेत भरेल असा निसर्ग नजरेत आणि कॅमेरात कैद करत  गाईड सोबत गप्पा मारत आम्ही चौघेही तो लाल मातीचा रस्ता तुडवत चाललो होतो.  पक्षी तसे फारसे दिसत नव्हते, पण निसर्ग कमाल सुंदर होता तिथला. अगदी आकाशला टेकली आहेत असा भास निर्माण करणारे हे भले मोठे वृक्ष ते अगदी नुकताच जन्म घेतलेली , पालवी फुटलेली हिरवेगार पाने अशी रंगांची उधळण करणारा भोवतालचा निसर्ग पाहून आम्ही संमोहित झालो होतो. मध्येच मोठमोठाली वारुळे दिसत होती , ती बहुदा नागोबाची असावीत असा आमचा अंदाज होता. त्यामुळे पायाखाली नीट बघतच आम्ही चाललो  होतो.

थोडे चालल्यावर, म्हणजे साधारण अर्धा एक तासानंतर मचाणा सारखे एक उंच ठिकाण दिसले. भक्कम सिमेंट कॉन्क्रिटचे बांधलेले आणि दहा बारा आणि ते हि अगदी निमुळत्या पायऱ्या असलेले ते मचाण मस्त होते होते. चेतन त्यावर भरभर पायऱ्या चढून गेला सुद्धा. “सगळे अभयारण्य एका दृष्टीत दिसत आहे” असं म्हणत तो आम्हालाही ‘वर या’ असे म्हणाला. पण पायऱ्या जरा जपूनच चढाव्या लागणार होत्या, मी अगदी वरपर्यंत गेले आणि ‘नको बाबा’ असे म्हणत परत घाबरूनच आल्या पावली खाली उतरले.

आम्हाला तिथूनच एक ग्रुप बैलगाडीतून जाताना दिसला. बैलगाडी तर फार सुदंर होती आणि त्याला जुंपलेले ते बैल सुद्धा पांढरे शुभ्र आणि उंच धिप्पाड अगदी रुबाबदार दिसत होते. आम्ही दोघींनी मग बैलगाडीच्या सफरीची नवऱ्यांकडे फर्माईश केली. पण अशी मधूनच आम्हाला बैलगाडी कशी मिळणार? कारण जिथे अरण्य सुरु होते तिथेच प्रवेश घेताना बुकिंग करायचे होते, मग काय..आमच्या सोबत असलेला गाईड बिचारा परत ते अंतर मागे चालत जाऊन आमच्यासाठी ती बैलगाडी घेऊन आला.

राजा आणि भीरु अशी नावे असलेले ते बैल मोठी शिंग आणि ती ही  झोकदार असलेले होते. आम्ही चौघे त्या बैलगाडीत बसलो आणि बैलगाडीच्या मालकाने गाडी हाकली. रस्ता जंगलातला त्यामुळे ओबडधोबड असल्याकारणाने थोडे धक्के बसत असले तरी हा अनुभव फारच रोमांचकारी होता. तिथली झाडे वाटेल तशी अवाढव्य वाढली असल्या कारणाने फांद्या डोक्याला लागत होत्या म्हणून आम्हाला मध्ये मध्ये खाली वाकून घ्यावे लागत होते, पण  आम्ही त्या प्रवासाचा आस्वाद घेत होतो. गप्पा मारत मारत आम्ही काही वेळाने एका पाणवठ्याच्या जागी पोहचलो जिथपर्यंतच बैलगाडी  जाणार होती.

आम्ही खाली उतरलो आणि गाईडसोबत फारच दाट झाडी असलेल्या पायवाटेने तो रस्ता वाटेतील झाडे बाजूला करत करत पार करत होतो . इथे जरा जास्तच दाट झाडी असल्यामुळे थोडे किडे सुद्धा अंगाला चावत होते. दहा एक मिनिटांनी ती पाणवठ्याची सुंदर जागा आली. छोटेसे तळे नाही म्हणता येणार पण दगड लावून एके ठिकाणी पाणी साचवलेले भासत होते. आम्ही अवती भवती बघत गप्पा मारत असताना आम्हाला त्या गाईडने शांत रहा असे हळूच हाताने खुण करून सांगितले. त्या पाण्याच्या एका बाजूला त्याला साप दिसला होता, पण आम्हाला बघून आत जाऊन लपून बसला. त्याचे केवळ डोकेच बाहेर दिसत होते. पण खूप वेळ झाला तो काही बाहेर आला नाही.

जिथून ते पाणी येत होते त्या ठिकाणी आम्ही गेलो. मोठ मोठाले दगड आणि त्यातून वाहत असलेले ते स्फटिकासारखे स्वच्छ पाणी. तिथेच एका दगडावर बसून त्या शांत आणि सुदंर जागेचा अनुभव आम्ही आमच्या आत मुरवत होतो. शहरातील कलकल, कामाचा शिण, सगळं सगळं विसरून डोळे मिटून सगळं अनुभत होतो. किती वेळ बसलो कळलं नाही पण गाईडनेच हाका  मारल्या. “चला ताई अजून पुढेही बघायचे आहे ना ?, का फिरायचे इथूनच परत”. थोडे एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत, फोटो काढत त्या नितांत सुदंर जागेवरून आम्ही शेवटी उठलो. बैलगाडी सोबत पण फोटो सेशन झाल्यावर, बैलगाडीत बसून परतीचा प्रवास सुरु झाला. चैत्राली आणि चेतन ह्यांना त्याच दिवशी मुंबईत परतायचे असल्या कारणाने आम्ही तिथे जास्त फिरलो नाही, पण जे काही सोबत घेऊन जात होतो ते मात्र १०० % सुंदर होतं. झालेल्या पैशापेक्षा ५० रुपये जास्त देऊन त्या गाईड, गाडीवाला आणि त्या रुबाबदार राजा आणि भीरुचा आम्ही निरोप घेतला. फोटो मध्ये आठवणी सोबत होत्याच सगळ्या, पण डोळे आणि मन सुद्धा तृप्त झाले होते हा निसर्ग पाहून.

वाटेतच एका गार्डन रेस्टॉरंट मध्ये पोटभर जेवलो आणि गप्पा मारत, ‘परत एकदा नक्की येऊया इथे’ असे एकमेकांना बजावत रोह्याकडे आगेकूच केले.

मानसी चापेकर

Image by Michael Gaida from Pixabay   

Chapekar Manasi

Chapekar Manasi

कविता ,लेख ,ललित आणि कथा लिखाण,नवीन पदार्थ तयार करणे आणि खिलवणे म्हणजेच एकंदर स्वयंपाकाची आवड , अभिवाचन, आणि गाण्याची आवड आहे ,आणि हे उत्तम जमते . ओंजळीतील शब्दफुले ह्या स्वलिखित आणि स्वरचित कवितांच्या कार्यक्रमाचे 40 कार्यक्रम संपन्न अनेक कवी संमेलनात आमंत्रण आणि कथेला बक्षिसे प्रभात वृत्तपत्रात दर शुक्रवारी अस्मिता ह्या सदरात लेख प्रकाशित .तसेच अनेक वृत्तपत्र आणि मासिकांत लेख ,कथा ,कविता प्रसिद्ध निसर्गाचे फोटो काढण्याची आवड ,कारण फोटो ग्राफरची नजर लाभली आहे.

One thought on “प्रवास कथा -सहलीसाठी स्थळ नाही सोबत महत्वाची

  • May 1, 2021 at 5:46 pm
    Permalink

    छान प्रवास वर्णन

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!