गुंतता हृदय हे…कोडं प्रेमाचं- भाग ४
अगदी सफाईने त्याने हवेली समोर गाडी पार्क केली .
काही तरुण मुले त्याला भेटायला आले होते …अरे s s हे तर …
त्याने धावत जाऊन हात पसरून सगळ्यांना कवेत घेतलं .
” कालू , टप्प्या , तू …मुकुल्या ..अरे किती मोठा दिसतोय ”
” बस क्या !! तू पण तर लगेच कार बिर हा s s !!”
सगळ्या ना खूप गप्पा मारायच्या होत्या . आजी नि सगळ्यांना भरपूर खायला घातलं .
” गौरी नाही आली रे ? ”
” ती ,बडबडी ? तिला तर ठाण्याला जायचं होतं बाबा कुठल्या तरी कॉलेज ची चौकशी करायला .काल म्हणत होती .” …कालू
” पण तिला माहितेय न ,मी येतोय म्हणून !”
सगळ्यांनी माना हलवल्या .
” भेटू रे संध्याकाळी ” म्हणून गेले सगळे .
” आजी , तू का ग येत नाहीस मुंबईला ?”
” मग तुमचं आजोळ सुटेल न रे !” आजी प्रसन्न हसली .
” आजी , ही गौरी आजकाल बोलतच नाही नीट फोन वर .”
” अरे , आधीची गौरी म्हणजे अल्लड ,अवखळ पाणी होतं . आता मोठी झाली ती . झरा अवखळ असतो , डोहाला मात्र खोली असते . आली होती गोकुळाष्टमी ला . काय सुंदर हार करून आणला होता , तुझ्या आवडीच्या मोगऱ्याचा . विचारत होती तुझ्याबद्दल .”
हर्ष लगेच उठला .
” आजी , मी जाऊन येतो .”
पुन्हा आजी प्रसन्न हसली .
गौरी च्या अश्या वागण्याचं त्याला कोडं पडलं होतं . रश्मी , इरा ह्या सुध्धा मोठ्याच आहेत की …मग ..
तो सरळ गौरी च्या घरी गेला .
” अरे , हर्ष बाबा ? गौरी ची आई म्हणाली . तुम्ही मोठ्ठ्या कॉलेजात गेलात म्हणे ! आता खूप मोठे
क्याम्प्युटर विजीनीअर होणार म्हणे !”
” कोण म्हणालं ?”
” आपली गौरा बाय !! ज्याला त्याला तुमचं गुण सांगत असतीय .”
” आहे कुठे ती ?”
” आत्ता तर हितच होती .गेली असल देवळात . चिंगी बरोबर .”
आता मात्र हर्ष रागावला ..
रस्त्यात पुन्हा कालु ,मुकुल भेटले ..गप्पा झाल्या , पण हर्ष चे लक्ष नव्हते ..
तो तरातरा चालत मंदिरात गेला .
पायरीवरच गौरी आणि चिंगी बसल्या होत्या .
त्याला पाहून दोघी हळूच उतरून उभ्या राहिल्या . गौरी हलकी चिंगीच्या मागे लपली .
” अरे चिंगी , किती उंच झाली ग ! ”
” तू पण तर मोठा झालास की .अभिनंदन !! खूप छान वाटलं आम्हाला .”
” ही काय मागे लपतेय ? ए गौरी ! ”
ती हळूच समोर आली .
” हर्ष , हा प्रसाद . ” चिंगी म्हणाली.
” ए बडबडे , तुला काय झालं न बोलायला ग ? मी किती लांबून आलोय तुमच्या साठी ”
चिंगी म्हणाली , ” अरे बाबा , तो प्रसाद खा आधी . तुझ्या रिझल्ट च्या दिवशी न खाता पिता इथे देवा समोर येऊन बसली होती ही .”
” हिला कशी माहीत तारीख ? ”
” अरे वा ! तूच शिकवलं होतंस न , इंटरनेट वापरायचं ? आता तर बापूच्या मोबाईल मध्येच कळतं की त्यात काय मोठं !!” …आत्ता बोलल्या गौराबाई , समोर येऊन .
काय स्मार्ट दिसत होती गौरी !!
आता दोन वेण्या नव्हत्या .
साधा , नीटनेटका पंजाबी ड्रेस ..मोठ्ठे डोळे , एक वेणी …
” अरे गौरी , तू किती वेगळी दिसतेस !! ,
मला तर ती फ्रॉक मधलीच गौरी आठवते नेहमी .”
गौरी नि चिंगी ला ओढलं ,आणि चलायची खूण केली .
” गौरी , ए गौरी आग …तू …”
गौरी पळाली पायऱ्या उतरून खाली .
चिंगी वापस फिरली …
हर्ष तिथेच विचार करत उभा होता .
” B .C. S करायची इच्छा आहे तिची .
तिच्या आईची पण तयारी आहे , पण एक लग्नाचं स्थळ सांगून आलंय . मुलगा मुंबईला ऑफिसात बाबू आहे .”
तो काही बोलायच्या आत चिंगी निघून गेली .
हर्ष तिथेच स्तब्ध उभा….त्याला कळेना अशी अचानक एक विचित्र पोकळी का वाटतेय ..
सगळ्या रस्त्याने तो सुन्न होता .
तेच गाव , तीच माणसं , तशीच शेतं पण काहीतरी सुटल्या सारखं .
चालत चालत तो तलावाच्या काठावर आला . तिथे मोठा दगड होता , चिंचेच्या झाडाखाली .
त्यावर बसला . ..शांत …
मागून चाहूल लागली .
त्याने शांत पणे वळून पाहिले ..गौरी आली होती ..ओढणीत मोगऱ्याची फुलं घेऊन … शेजारच्या दगडावर बसली .
” गौरी ,”
” हं ”
” इथे ह्याच तलावात किती खेळलो होतो न आपण ”
” हं ”
” माझ्या रिझल्ट च्या दिवशी तू उपाशी देवळात का बसलीस ?”
” असं म्हणतात की उपाशीपोटी
सीध्येश्वरा जवळ काही मागितलं , तर ते मिळतंच .”
” तू काय मागितलंस ”
” तुला न हर्ष , आधीही काही माहीत नव्हतं अन आताही नाही .”
” मला आय . आय .टी . मिळावं हेच न?”
” …..”
” गौरी , तुला BCS करायचंय न ?”
” हो . ठाण्यात माझे मामा असतात . ते म्हणाले , पण …”
” पण काय लग्न करायचंय ? ”
गौरी ने विचित्र नजरेने त्याच्या कडे बघितलं …तिचे डोळे पाण्याने भरले होते …तिने ओढणीतले सगळे फुलं तिथेच टाकले ,आणि शांत पणे उठली .
” माझ्या साठी फुलं आणले ,मला दिले पण नाहीस ?”
तिने फक्त वळून पाहिले .काही क्षण त्याला निरखून बघितलं ….डोळे भरून पहिल्या सारखं ….आणि चालायला लागली ..
” ए गौरी , थांब !! ए गौरी !! ” त्याने तिची वाट अडवली .
” मी वेड्या सारखा तुला फोन करत असतो , तू नीट बोलत नाहीस . आता मुद्दाम आलोय तर अशी का वागतेस ? माझ्यासाठी फुलं आणतेस आणि न देताच जातेस .. why you are behaving like this ?”
” because I dont have answaer to your questions !!” सफाईदार इंग्लिश बोलून ती निघून गेली .
काहीश्या निराश अवस्थेत तो घरी जायला निघाला. समोरून एक रिक्षा येत होती . त्याच्या जवळ येऊन थांबली .
आतून नीटनेटकी एक मुलगी उतरली..गळ्यात मंगळसूत्र होतं.. मागून एक रांगडा तरुण उतरला .
काही क्षणात त्याने ओळखलं …..”सावित्री ?”
” हर्ष !!! किती वर्षांनी रे !!”
” हे माझे ..” तिने नवऱ्या कडे बघितलं.
” hallo !” …हर्ष
” तू हर्ष न? सावू सांगत असते नेहेमी .” तो म्हणाला.
” गौरी भेटली न? तू मागे दोन वर्षांपूर्वी येणार म्हणून कळाले तर तासंतास तुझी वाट बघत बसायची इथे ..ह्या सुपारीच्या झाडा खाली ..तू आलाच नाहीस . बरं झालं , आता तरी आलास ते . मस्त दिसतोयस हॅन्डसम .
येशील घरी ,चल ..” रिक्षा निघाली.
हर्ष आजीचे पाय चेपत होता .
” हर्षु , तुला तर खूप मैत्रिणी असतील रे !”
” हो आहेत ना ! रश्मी तर तुला माहीत आहे , अजून खूप आहेत ..इरा , सुझान , शिवानी .. का ग ?”
” त्या जर तुझ्याशी काही दिवस बोलल्या नाहीत तर तू रडकुंडीला येतोस ?”
” काहीही हं आजी ! What नोंसेन्स !”
” हो नं ? मग गौरी तुझ्याशी मोकळं बोलली नाही तर एवढा जीव का हरवला तुझा ?”
“….????.….आजी , मी आलोच! ” काहीतरी अचानक गवसल्या सारखं झालं आणि लांब लांब उड्या मारतच तो बाहेर पडला … त्याच सुपारीच्या झाडाजवळ …झाडामागे गौरी उभी होती .
” माझे मोगऱ्याचे फुलं तिथेच टाकून आलीस न ?” हे विचारतांना त्याची नजर खोल तिच्या डोळ्यात होती .
” मी आणलेत पुन्हा ” तिने हातातले फुलं दाखवले …नजर खालीच होती…
” तुला Bcs साठी ठाण्याला जायची काय गरज आहे ?”
तिने चमकून वर बघितले ..तिच्यावर नजर रोखून तो म्हणाला,
” मुंबई ला करू शकतेस ना ! ”
तिने प्रश्नार्थक चेहेरा केला . तो तिच्या जवळ सरकला..
” तुला न काहीच समजत नाही गौरी .”
” मग तू समजावून सांग ना !” तिचे डोळे भरून वहात होते.
त्याने तिचे दोन्ही हात फुलांसकट हातात घेतले , आणि आवेगाने ती त्याला बिलगली ..…..त्याने आपल्या बळकट बाहुत तिला सामावून घेतले ….
त्याला छळणारे कोडे सुटले होते….( समाप्त )
© अपर्णा देशपांडे
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
मस्तं मस्तं
धन्यवाद
किती सुरेख , निर्मळ
Thank you
खूप छान