गुंतता हृदय हे…कोडं प्रेमाचं- भाग ३

हर्ष घरी पोहोचला . एक महिन्या पूर्वीचा हर्ष विरघळून गेला होता  आणि वापस आलेला हर्ष समृद्ध झाला होता .

हा बदल रोहिणीने लगेच ओळखला . हर्ष नि तिला गौरी चं ग्रीटिंग दाखवले .

” तिने बनवलं ?”

” हं ”

” कुठे , कॅफेत जाऊन ? का तुझ्या लॅपटॉप वर ?…नाही , पण प्रिंटिंग तर ..”

” सगळंच कॅफेत केलं तिने ”

” ग्रेट !!!”

………तो गप्प होता.

…..”अरे !!हर्षा !! ओ माय बेबी !!” तिने कोमेजलेल्या हर्ष ला प्रेमाने कवटाळले .

” हर्षु , हे आयुष्य असंच आहे बघ . कशात तरी भयंकर जीव गुंतवतं ,आणि मग त्यापासून एकदम दूर फेकून देतं ..

तुम्ही तडफडत रहाता ,आणि ते आपली मजा बघतं . तुझं मन दुसरी कडे गुंतव बेटा …अरे हा s s

थायलंड समर कॅम्प ला जायचंय न? चलो s तैयारी करेंगे !!!”

हर्षु ला सोनपुर च्या मित्रांना फोन करायचा होता . आजी कडे आणि दत्तू काकांकडे सेलफोन होता .त्या विचारांनी त्याला एकदम ऊर्जा मिळाली .

मग काय फोन च्या वेळा ठरवून टाकल्या होत्या .त्या वेळेला सगळा कंपू दत्तू  काकांकडे जमे .हर्षु इकडून रोहिणीच्या फोन वरून कॉल कारे ,आणि तिकडून एक एक जण …भन्नाट डायलॉग बाजी व्हायची .

” ए  हर्ष , तू विमानाने जाशील न ,तुझ्या कॅम्प ला , वरून हात हलव हा , आम्ही बाय करू “….टप्प्या सगळ्यात लहान होता न ,

” अबे येड्या ते विमान खूप उंचावरून जाते ना , हो ना रे हर्षु ?” कालू

” हर्ष , कॉम्पुटर वर नवीन जे जे शिकता येईल ते शिकून घे , मला शिकव हा , पुढच्या सुट्टीत .”…गौरी .

काळ कुणा साठी कधी थांबलाय , हर्ष थायलंड ला जाऊन आला .त्याने भरपूर खरेदी केली होती . मुंबई च्या मित्रांना गिफ्ट्स दिल्या आणि एक मोठ्ठ पार्सल सोनपुर ला आजी च्या पत्त्यावर पाठवले . प्रत्येकाच्या नावाने  गिफ्ट्स होत्या त्यात .

***** पुढचे चार वर्षे खूप धावपळीत गेले . H .S .C बोर्ड , I .I .T एंटरन्स , सगळं करतांना सोनपुर ला जाणे होऊच शकले नाही . त्याने जीवतोड मेहनत केली होती . अभ्यासाच्या टेबलासमोर भिंतीला गौरी चे ग्रीटिंग्ज होते , प्रेरणास्थान !!!

आता जास्त फोन कॉल्स होत नव्हते .कधी मुलं कुठे कामावर ,तर कधी काही कारण असायचे .

एक मात्र खूपच छान झाले होते .. तेथील आमदाराच्या पुढाकाराने गावात मोठे कॉलेज सुरू झाले होते . आजीने भरपूर मोठी देणगी दिली होती कॉलेज ला ,  आणि हर्ष च्या बाबांनी दहा कॉम्प्युटर्स .

गौरी पण अकरावी होऊन बारावीत जाणार होती .आताशा ती फोन वर जास्त बोलनाशी झाली होती .

हर्ष ला तिला खूप काही काही सांगायचं असे , पण ती यायचीच नाही फोन वर . आता तर तिच्या बापूकडे पण फोन होता खरं तर .

एक दिवस त्याने तिच्या बापूला फोन केला . गौरी फोन घायला तयारच नव्हती .त्याला खूप आश्चर्य वाटले .इतकी बडबड करणारी ही पोरगी ,हिला काय झालं ?

” काका , गौरीला फोन द्या नां .”

” आग , बोल की हर्षुबाबा बोलतायत तिकडून ” ..बापू

” हॅलो ,….”

” गौरी , ..काय झालं तुला ? आजकाल बोलतच नाहीस .”

” सावू चं लग्न ठरलं हर्ष !! ” ..तिचा आवाज कातर झाला होता .

” गौरी , तू मात्र इतक्यात लग्नाला तयार होऊ नकोस बरं का !! तुला शिकायचंय ना ! ” ..” गौरी ? …बोल नं …”

” बाबू , ती आत निघून गेली . ते सावित्री चं लगीन ठरलंय न ,तर वाईट वाटतंय तिला ”

” काका , तुम्ही प्लिज तिला शिकू द्या . ती हुशार आहे , नक्की मोठी ऑफिसर होईल बघा .”

” तुमचं बरं हाय बाबू , तुमची दुनिया येगळी हाय , पण मी बघतु , तिच्या मर्जी बगैर न्हाई करायचं . शिकू देईन तिला .ठेवतो हा .”

हर्ष धपकन खाली बसला . त्याला खूप हताश वाटलं ..

हर्ष  s , हर्ष s ओरडतच रश्मी आली .

“आज   I .I .T advance  चा रिझल्ट आहे , आपण दोघं मिळून बघू .”

” अरे ! खरच की ”

” तुझी ऍडमिशन फिक्स आहे बाबा , म्हणून तू बिनधास्त आहेस ,माझंच काही खरं नाही ” ..रश्मी .

रोहिणी मुद्दाम लवकर घरी आली .

सगळे कॉम्प्युटर पाशी जमले …..

…..हर्ष….सीट नंबर …कोड ….

17 वा !! हर्ष देशात 17 वा आला होता !!! रोहिणी नि आनंदाने उडीच मारली आणि हर्ष ला प्रेमाने जवळ घेतलं .रश्मीने पण त्याला आनंदाने मिठी मारली .

रश्मी पण क्लिअर झाली होती. तिला पण चांगला रँक मिळाला होता .

हर्ष नि ताबडतोब गौरी ला फोन लावला . तिच्या बापुनी उचलला .

” काका , गौरी कुठाय ? ”

” अरे काय माहीत ,ती सकाळ धरनं तिथे सोमेश्वर मंदिरातच बसलीये .काही खाल्लं पण नाही .”

” काका , तिला सांगा , मी  I . I .T   पास झालो .  मी रात्री फोन करतो पुन्हा .”

” काय पास झाला बाबू ?”

” I I T !!  काका ,  मोठ्ठी परीक्षा पास झालो ”

रश्मी , तुला पण congratulations !!!

तिने त्याला पेढा भरवला .

पुढचे दिवस सगळे फॉर्म्स भरणे , इंटरव्ह्यू , धावपळ ह्यात गेले . त्याला

I I T पवई मिळालं , तेही काँप्युटर सायन्स . दोनदा त्याने सोनपुर चा प्लॅन केला होता . दोन्ही वेळेस कॅन्सल करावा लागला . तो तरसत होता जायला .कालू  आय टी आय झाला होता . टप्प्या बारावी कॉमर्स ला होता . चिंगी नि  डी .एड .केलं होतं .

आय आय टी फर्स्ट ईयर ची परीक्षा झाली , आणि मनात पक्कं ठरवून हर्ष नि गाडी काढली .

आता कुठलेही कारण न काढता त्याला सगळ्यांना भेटायचं होतं .

सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा देत तो गाडी चालवत होता .

मुद्दाम त्याने किशोर कुमारचे च गाणे लावले ..त्याला तो काळ पुन्हा जगायचा होता .

आतातर बाबा पण भारतात वापस आले होते . तेही आल्याबरोबर सोनपुरला जाऊन आजीला भेटून आले होते .आजी आता खूपच थकली होती  , पण मुंबईला यायला बिलकुल तयार नव्हती .

हर्ष त्या सगळ्या ठिकाणी थांबला ,जिथे मागच्या वेळेस थांबला होता .

त्याने फोन करून आधीच कळवले होते , की तो सोनपुरला येतोय .

गावात आत गाडी वळवल्यापासून तो डोळे भरून सगळं बघत होता . ती नारळाची झाडं , सुपारीच्या बागा , ती  कौलारू सुबक घरं ,  तो तलाव …काय काय नजरेत साठवू असे झाले होते त्याला .

अचानक तो थांबला ..तेच सुपारीचे झाड .

ज्यावर गौरी चढली होती ..त्याला त्या आठवणीने हसू आले .

क्रमश:

Image by efes from Pixabay 

Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!