गुंतता हृदय हे…ये इश्क़ नहीं आसाँ (भाग 2)
भाग 2
काही वेळात त्याच नंबर वरून निनादला भेटण्याच ठिकाण व वेळ याचा मेसेज आला.निनाद दिवसा स्वप्नं पाहू लागला. परंतु जाण्याआधी त्याने जवळच्या काही मित्र मैत्रिणींना फोन करून आजच्या दिवशी मुद्दाम कोणी मला prank तर करत नाही ना याची खात्री केली. सगळ्यांकडून नकार आल्यावर निनादची उत्सुकता अजून शिगेला पोहचली. ‘कौन है ये मिठी आवाज वाली’ म्हणत तो तयारीला लागला. एका तासानंतर भेटायचं ठरलं होतं. घड्याळात बघून तो आधी FM लावून अंघोळीला पळाला.
“किसीं रोज तुमसे मुलाकात होगी, मेरी जान उस दिन मेरे साथ होगी”
परदेस चित्रपटातील हे गाणं ऐकून निनाद अजूनच खुश झाला. खरंच आजच्या दिवशी आपल्याला आपली valentine मिळणार यावर त्याचा शिक्कामोर्तब झाला. मस्त त्याचा आवडता white shirt आणि denim ची blue jeans घालून तो आरशात स्वतःला निरखु लागला. बरं झालं कालच दाढी केली नाहीतर work from home मुळे गबाळ राहण्याची सवयच लागून गेली होती. ऑफिसमध्ये कोणीतरी आपल्याकडेही बघावं म्हणून टापटीप जाता तरी यायचं पण जाऊदे आज ‘मिठी आवाजवाली’ मुळे बोरिंग आयुष्यात काहीतरी वेगळं घडतंय हेच खूप आहे. मनात अशा संमिश्र विचारांचा गोतावळा घेऊन perfume फवारून निनाद घराबाहेर पडला.
जातानाही FM वर
“प्यार का पहला पहला सावन तेरे नाम तेरे नाम,
मेरे प्यार के सोला सावन तेरे नाम तेरे नाम”
हे फरेब मधील गाणं लागलं होतं. चित्रपटाच नाव सोडलं तर गाणं खूपच रोमँटिक आणि तसा माहौल निर्माण करणारं होतं. आज valentine day असल्यामुळे प्रेमाचा वर्षाव करणारी गाणी लागली होती आणि त्यात निनाद चिंब न्हाऊन निघत होता. खरंच यानंतरचे सगळेच सावन मिठी आवाजवाली के नाम असं तो हसत म्हणाला. काहीतरी घेऊन जावं भेटायला पण नक्की काय या विचारात त्याने चॉकलेट्स घेतले आणि ठरल्या वेळेआधी दहा मिनिटे कॅफेमध्ये पोहचला. तू ठरलेल्या टेबल वर येऊन बस मग मी येतेच असं तिने सांगितलंच होत त्यानुसार तो टेबलवर जाऊन बसला. नजर चौफेर कॅफेमध्ये फिरवली. किती सुंदर ललना आज लाल रंगाचे वनपीस,ड्रेस,कोणी साडी परिधान करून आपापल्या valentine सोबत बसल्या होत्या. यातल्या नक्की किती जोड्या उद्या सोबत असतीलच…किंवा पुढच्या वर्षी याच दिवशी याच सेम जोड्या बघायला मिळतील का..याचा विचार निनाद मनात करत होता. यांचं माहीत नाही पण आपण कोणाच्या प्रेमात पडलो किंवा आपल्यावर कोणी खरं प्रेम करत असेल तर आयुष्यभरासाठी तिलाच valentine करायचं हे तर आपलं फिक्स आहे.
या विचारात असतानाच त्याची मेसेज टोन वाजते. मिठी आवाजवालीचाच मेसेज असतो, “तू बसलायस तो टेबल अगोदरच बुक reserved आहे. तिथून डावीकडे चार नंबरच्या टेबलवर मी बसली आहे,तू तिथेच ये”. अरे आधी तर तिने हाच टेबल सांगितला होता..आणि ती आली आहे तर इकडे का नाही आली.. मेसेज केला की तू ये..जाऊदे जाऊया आपणच तिकडे. तशीही बिचारीने खूप वाट पाहिलीये असं म्हणत निनाद डावीकडे चालू लागला.जसजस टेबल जवळ येत होता तसतसं त्याच्या मनातली धडधड,हृदयाची स्पंदने वाढत होती. टेबलवर पाठमोरी लाल रंगाचा ड्रेस घालून, केस मोकळे सोडून एक मुलगी बसली होती. पाठमोरी तर चांगली दिसते..समोर जाऊन भेटूया अस बोलून..चेहऱ्यावरची उत्सुकता लपवत निनादने मुलीच्या समोर जाऊन hi म्हणत हात पुढे केला.
निनादची hi म्हणताच ती मुलगीही उठून उभी राहिली आणि निनादचे चेहऱ्यावरचे भावभाव झरझर बदलत गेले. उत्सुकतेने नटलेला त्याचा चेहरा पांढरा फिक्कट पडला.
क्रमशः
- सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग ५ - June 3, 2021
- सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग 4 - June 1, 2021
- सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग 3 - May 25, 2021
Pingback: गुंतता हृदय हे…ये इश्क़ नहीं आसाँ (भाग 1) – LekhakOnline – Excellent Marathi Articles
Pingback: गुंतता हृदय हे…ये इश्क़ नहीं आसाँ (भाग 3) – LekhakOnline – Excellent Marathi Articles