गुंतता हृदय हे…प्रेमांकुर.

     ” चल बाय अम्मु येते गं मी” म्हणत नेहा घराबाहेर पडली.
    ” हो हो सावकाश गं बाळा.” आतून अम्मु म्हणजे नेहाची आजीने म्हटले.
  नेहा ही सुनील आणि आभाची मुलगी.सुनील आणि आभा हे दोघे गावी राहायचे म्हणजे त्यांची शेती होती .आणि नेहा आपल्या शिक्षणासाठी शहरात रहात होती .ती लहानपणापासून च तिच्या आजीजवळच असायची.सुनील आणि आभा यांची शेती जास्त होती.शेतमजूरांबरोबर हे दोघे पती-पत्नी मिळून दिवसभर शेतात काम करायचे.आणि नेहा दिवसभर तिच्या आजीजवळ रहायची.ती आजीला अम्मु म्हणायची.
     तिचे शालेय शिक्षण गावातच झाले होते आणि आता पुढील शिक्षणासाठी तिला बाहेर शहरात जाऊन राहायचे होते.पण ती एकटी नाही जाणार अम्मु बरोबरच जाणार म्हणून हट्ट करु लागली.त्यामुळे  तिच्या बरोबर तिची आजी ही शहरात आली आणि तिथे एक छोटे घर भाड्याने घेतले.नेहा कॉलेज ला जायची पण जाणे आधी आजीची घरकामात मदत करुन द्यायची.जसे पाणी भरणे,भाजी घेऊन येणे,दुध आणून देणे.आणि मग ती कॉलेज ला जायची.
    आज तिची परीक्षा होती.त्यासाठी तिने रात्र भर जागून अभ्यास केला होता.आणि सकाळी लवकरच काॅलेजमध्ये जाऊन लायब्ररी मध्ये अभ्यास करणार होती.
 म्हणूनच ती गडबडीने काॅलेजला पळाली.
      बस स्थानकावर गेल्या गेल्या तिला आज कधी नव्हे ते बस लवकर मिळाली.” बरं झाले आज बस लवकर मिळाली.म्हणजे जरा जास्तच वेळ रिविजन करता येईल मला ” असे मनात म्हणत बसली.
   तिचा स्टाॅप आला.ती गडबडीत बसमधुन उतरली आणि पळतच काॅलेजमध्ये निघाली.आणि एकदमच एका युवकाला धडकली .आणि तिच्या हातातील पुस्तके खाली पडली.” ओह आय एम व्हेरी सॉरी” म्हणत तो युवक तिची पुस्तके उचलून देण्यासाठी खाली वाकला आणि नेहा पण त्याच वेळी खाली वाकून पुस्तके उचलणार तोच पुन्हा त्यांच्या डोक्याची टक्कर झाली.आणि एकदम नेहाने केसांचा बांधलेला नॉट निघाला आणि तिचे केस एकदम तिच्या चेहऱ्यावर रुळू लागले .तिचे हे सौंदर्य खुलून दिसत होते.आणि तो तरुण तिला एकसारखा पहातच राहिला.
    तिची देखील नजर एकदम त्या तरुणांकडे गेली. आणि त्याचा रुबाबदार सुंदर चेहरा आणि त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा निरागसपणा हे रुप त्याचे कोणालाही आकर्षित करण्यासारखेच होते.
    ‌हे दोघेही एकमेकांना एकसारखे पाहतच राहिले.नकळतच नेहाने आपली नजर खाली करून आपल्या गालामध्ये मंद हास्य केले.आणि तो तरुण ही त्या हास्यात आपल्या हास्याचा समावेश केला आणि त्यांच्या मधील मौनाला ” हाय ,मी तुषार ..” म्हणत तोडले.
 ************************
    दोघेही आपापले परीचय देऊन लायब्ररी मध्ये जाऊन अभ्यास करत बसले.दोघे एकमेकांच्या समोर बसले होते डोळ्यासमोर पुस्तके तर होती पण मनाची एकाग्रता कोठेतरी तुटत होती.न कळत का होईना त्यांचे हृदय कोठेतरी गुंतले असे भासू लागले होते.
    दुपारी पेपर झाला.हे दोघेही आपापल्या क्लास मधुन बाहेर पडले.आणि दोघेही एकमेकांना शोधु लागले‌. ‘ हाय तुषार ,कसा होता तुझा पेपर? ” नेहाने विचारले.
  “इझी होता.तुझा?
   ” हो माझा पण.मी तर इतकी घाबरले होते कि काय येतील प्रश्न कोण जाणे.सकाळी अम्मु बरोबर देवासमोर बसून प्रार्थना केली होती आणि साखर पण ठेवली होती.”
    दोघेही बोलत बोलत बाहेर आले.” चल मी सोडू तुला ‌बाईक आहे माझी ” तुषार म्हणाला.
 ” अरे नको नको .जाते मी .बसचा पास आहे माझा.”
  ” ओ के.चल बाय‌ उद्या भेटू.  “
     तुषार आपल्या बाईक वरून निघाला आणि नेहा तिथेच उभी राहून त्याची पाठमोरी आकृती कडे पाहू लागली.
      तुषार आपल्या बाईक वरून निघाला आणि नेहा तिथेच उभी राहून त्याची पाठमोरी आकृती कडे पाहू लागली.तो जिथं पर्यंत दिसत होता तिथं पर्यंत पहात होती.आणि जेव्हा तो दिसेनासा झाला तेव्हा ती भानावर आली आणि म्हणाली” वेडी रे मी” आणि हसतच आपल्या डोक्यावर थाप दिली.
       ” अम्मू आले गं.खुप भूक लागली आहे यार.” नेहा म्हणाली.
     ” हो हो.जा आधी हातपाय धुवून घे.आणि ये .आज सगळा तुझ्या आवडीचा स्वयंपाक केला आहे.”
      नेहा जेवायला बसली. तिने पोळी खाण्यासाठी ताटात हात लावले तोच ताटामध्ये तिला तुषारचा हसरा चेहरा दिसला.पाण्याच्या ग्लास मध्ये देखील तुषारचा चेहरा दिसू लागला.ती जिथे जिथे पाहत होती तिथे तिथे त्याला तुषारचा चेहरा दिसू लागला होता.
       नंतर ती अभ्यास करण्यासाठी आपल्या खोलीत गेली.तिने पुस्तक घेतले तर त्या पुस्तकास तिला तुषारचा गंध दरवळत आहे असे भासले.आणि ती त्या पुस्तकास हळूवार स्पर्श करु लागली.तिचे लक्ष विचलित होत होते.तिला तुषारचा अभास होत होता.
************************
      तुषार आपल्या घरी गेला.त्यालाही नेहा वारंवार आठवू लागली.तिचा तो केस चेहऱ्यावर रुळणारा चेहरा दिसू लागला होता.
       दुसऱ्या दिवशी हे दोघे कॉलेज मध्ये लवकरच गेले.आणि दोघेही लगबगीने लायब्ररी मध्ये गेले.आणि एकदमच दोघे एकमेकांच्या समोर आले.” हाय..
     ” हाय…
अगदी हळू आवाजात दोघांनी एकमेकांना पाहून हाय हैलो केले.
      आणि दोघांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच आनंदाचे भाव उमटले.
    दोघेही थोडा वेळ लायब्ररी मध्ये बसले.नंतर दोघांचा पेपर होता म्हणून आपापल्या क्लास रुम मध्ये गेले.
          पेपर झाल्यानंतर गडबडीने हे दोघे आपापल्या क्लास मधुन बाहेर आले.दोघांच्याही नजरा एकमेकांना शोधत होत्या.
       ” हाय…नेहा…
     दोघे नजरेतून बोलू लागले.
 ************************
       दोघांमध्ये छान मैत्री झाली.दोघे रोज नित्यनेमाने कॉलेज मध्ये भेटत होते.फोनवर संभाषण होऊ लागले.
      ” तुषार आज घरी येशील.अम्मु ने पुरण पोळी बनविली आहे.तिच्या हातच्या पोळ्या म्हणजे आहाहा.” नेहा म्हणाली.
     ” मी तसे गोड कमीच खातो.पण तुझ्या अम्मु ने बनविले आहे तर नक्कीच येईन.”
     संध्याकाळी तुषार नेहाच्या घरी आला.अम्मुला पाहून वाकून अम्मुच्या पायाला हात लावून नमस्कार केला.अम्मु पण त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली ” सुखी रहा बाळा”
      आता अम्मुची पण तुषार बरोबर मैत्री चांगलीच जमली.त्या दिवशी गावात जत्रा आहे आणि नेहाला अम्मुला घेऊन आठ दिवसांची सुट्टी काॅलेजमध्ये सांगून ये.असा फोन सुनील ने म्हणजेच नेहाच्या वडिलांनी केला.
       नेहा जत्रा आहे म्हणून खूप खुश झाली.आणि अम्मु देखील गावी जायचे म्हणून आनंदली.
         आज दुपारी निघायचे.म्हणून नेहाने आज काॅलेजला जाणे टाळलेच.आणि तसा तुषारला मेसेज केला कि आज आम्ही गावी जात आहोत.जत्रा आहे .आठ दिवसांनी येणार.
       आठ दिवस….. तुषार हे वाचून नाराज झाला.
   आठ दिवस कसा राहणार मी हा विचार त्याला सतावू लागला.
************************
       नेहा बस मध्ये चढली आणि खिडकीची सीट वर बसली .बस सुरू झाली.आणि जशी खिडकीतून हवा येऊ लागली तशी तिचे कुरळे केस चेहऱ्यावर रुळू लागले.तिने हळूवार अलगद आपले केस चेहऱ्यावरुन कानामागे सारले तसे तिला तिच्या कानामध्ये ” नको न नेहा.असु दे असेच त्यांना तुझ्या गोड चेहऱ्यावर ” असा तुषारचा आवाज आला.आणि तिने दचकून मागे वळून पाहिले तर तिथे कोणी दुसरेच होते.
     ती गावी पोहोचे पर्यंत तिला तुषारचा आभास एकसारखा छळत होता.
     तुषार देखील आज काॅलेजला गेला नाही.घरात उदास होऊन बसला.
************************
      गावी पोहोचल्यानंतर अम्मु आपल्या गावातील लोकांना खुशाली विचारायला गेली.आई बाबा पण नेहा आली म्हणून आनंदले होते.नेहाच्या मैत्रीणी पण तिला भेटायला आल्या.
    ‌सभोवताली इतके लोक होते पण या मध्ये नेहा स्वतः ला एकटीच आहे असे समजत ह़ोती.तिचे लक्ष कोणाच्याही बोलण्यात नव्हते.तिला फक्त आणि फक्त तुषार ची आठवण येत होती.
      तिला हे का होतं आहे.इतक्या आपल्या लोकांमध्ये स्वतः ला एकटे एकटे का वाटत आहे. का मनामध्ये एक प्रकारची विरहाची भावना दाटून येत आहे?????
     हे एक न अनेक प्रश्नांनांनी तिच्या डोक्यात काहूर माजवले.
      काही केल्या हा मनाचा गुंता सुटत नव्हता.
      ती एकदम उठली आणि आपला फोन घेतला आणि वर टेरेसवर गेली.सुर्यास्त होत होता.मावळत्या सूर्याला पाहून तिच्या डोळ्यात नकळतच पाणी आले आणि तिने तुषार ला फोन केला.
     “हैलो….
    ” कशी आहेस नेहा‌.
   ” काही तरी वेगळे जाणवू लागले आहे रे तुषार.काय होत आहे हेच कळत नाही.मन माझे इथे कशात ही रमत नाही.कोठे तरी गुंतले आहे असे भासवत आहे.वारंवार तुझेच भास होत आहेत.आणि याची साक्ष हा मावळता सूर्य देत आहे.”
    ” हो नेहा मला ही असेच होत आहे.तू आणि तूच दिसते आहेस.तुझेच आभास तुझेच कानी आवाज.मन माझे तुझ्या मध्ये गुंतले आहे असे वाटते आहे.”
        नेहा म्हणाली” आपली मैत्री दुसऱ्या वळणावर आली आहे.मैत्री पलिकडच्या दुसऱ्या विश्वात आपण गुंतले गेलो आहोत.हा आपल्या मध्ये प्रेमाचा अंकुर फुटला आहे.अरे यार वुई आर इन लव्ह.”
     हे ऐकून तुषार पण म्हणाला” एस डियर यू आर राईट.वुई आर इन लव्ह ‌”
      आणि दोघेही एक वेगळ्याच आनंदी जगात वावरु लागले.ती एक अचानक झालेली टक्कर त्यांच्या मनामध्ये प्रेमाचे अंकुरच झाली.आणि त्यांचे ह्रदय नकळत कधी गुंतले हे त्यांचे त्यांनाच कळले नव्हते.होत होते ते फक्त आभास जे त्यांना छळत होते.एकमेकांची ओढ लावत होते. प्रेमभावना जागवत होते.
   गुंतलेल्या भावना अनावर झाल्या तेव्हा कधी मनातील मुक्या गोष्टी ओठांवर आल्या.
  समाप्त…
©® परवीन कौसर…..
Image by efes from Pixabay 
Parveen Kauser
Latest posts by Parveen Kauser (see all)

Parveen Kauser

लेखन:: हिंदी आणि मराठी भाषेत कविता,शायरी, चारोळी, लघुकथा,दिर्घ कथा , बोधकथा ,अलक म्हणजे अती लघु कथा यांचे लेखन करतात. यांच्या कथांना सर्वोत्कृष्ट कथा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.कथालेखन स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक पटकावला आहे. चारोळ्या स्पर्धेमध्ये देखील यांना विशेष योग्यता पुरस्कार मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!