चहा की उत्सव स्वादाचा…
जपानमध्ये काही जण फक्त चहा प्यायला येतात. अर्थात त्यात भारतीय नसतात. गोरे. ते काय श्रीमंत देशातले. डॉलरवाले. परत वर दांडगी हौस नवीन काही करून वगैरे पाहायची, अनुभवायची. आणि हौसेला कुठं मोल असतं. पण तरीही ‘टी सेरीमनी’ हा प्रकार अनुभवण्याचाच आहे. म्हणजे आपण कसं पैठणी साडी बद्दल म्हणतो की ती अशी नेसूनच कळते की पैठणी म्हणजे नक्की काय. तसं असतं ते. निव्वळ सुंदर. खानदानी आणि भरजरी प्रकरण आहे हे फार. खास एकदम आणि ते सुद्धा पारंपरिक जपानी. माझ्या सुदैवानं मला ह्या सोहळ्यात सामील होता आलं. आणि ते सुद्धा जपानी मैत्रिणीने खास निमंत्रण देऊन. नाहीतर ते तसं बऱ्यापैकी महागडं प्रकरण आहे.
ह्या चहा सोहळ्याची तयारी मी चक्क एक महिना आधी सुरु केली. मैत्रिणीचा सल्ला. जपानमध्ये काही करायचं म्हणजे बरीच तंत्र पाळावी लागतात. चहा पिण्यासाठी पण SOP असतात हे मला तिथेचं कळलं, आपण तर असं कुठेही पितो चहा. टपरीवर. नाक्यावरच्या हॉटेलात. रिक्षा स्टँडवर. अगदी कुठेही. आणि जवळपास सगळीकडे तो बरा सुद्धा मिळतो. पण जपानी माणूस कुठं भारतीय आहे. त्यांचा चहा कसा असेल मग तसा, नाही का? तर आधी महिनाभर का तयारी केली ते सांगते. काय आहे ह्या जगविख्यात चहापान सोहळ्यासाठी वज्रासनात बसावं लागतं, आणि ते ही चांगलं तास एकभर. कळलं तेव्हा पाहिलं आधी बसून तर दहा मिनिटं सुद्धा सलग जमतं नव्हतं. आपल्या गुडघ्यांना इतकं लवायची कुठली आलेय सवय. पण मैत्रीण अस्सल जपानी. महिनाभर आहे म्हणाली, कर सराव. मग काय केला सुरु. नशीब रोज मला तो चहा नाही प्यायला लागला.
पण सरावानं येऊ लागलं बरं का, बसायला वज्रासनात. आणि ते सुद्धा सलग पाऊण एक तास. पण परदेशी पाहुण्यांना तितकी सवलत देतात ते. त्यांना माहित का नसतं किती कठीण असं बसणं. त्यांच्या हाडांत असतं. आपल्या कसं असेल. तर बसता लागलं येऊ. मग किमोनो घालून बसायचं होतं असं पण सांगितलं तिने. मग काय नाईट गाऊन घालून बसू लागले शेवटचे काही दिवस. पण ते सुद्धा जमलं. शेवटी उजाडलाच तो दिवस. शनिवार होता तो. ती मला तिच्या घरी शुक्रवारीचं घेऊन गेली. गरमा गरम आणि ते पण घरचं जेवण जेवून पोट इतकं भरलं की आलं मनात येईल ना उद्या बसता नीट. नाहीतर तिला वाटेल आपण सरावच केला नाही. त्या काळजीनं झोप नाही डोळ्यांला, तिच्या आईला ते कळलं नक्की. जपानी असली तरी आईच. मग मस्त गरम दूध दिलं तिनं मला. आणि डोळे झाले बघता बघता झोपेच्या आधीन. कमी वयात हे बरं असतं नाही, कुठंही लागतो असा डोळा. आणि तो ही पटकन.
मग दुसऱ्या दिवशी लवकरच उठलो आम्ही. नाश्ता वगैरे करून निघायचं होतं. पण त्या आधी किमोनो नव्हता का घालायचा. भयंकर किचकट आणि वेळखाऊ प्रकरण आहे बाई. कसलं काय हो. असं वारच्या वार कापडंच गुंडाळतोय अंगावर असं वाटतं राहतं काहीसं. पण तो होता मात्र खूप सुंदर. ह्या किमोनोची पण एक गंमत असते बघा. ऋतूला योग्य असं कापड आणि नक्षीकाम असतं त्यावर. म्हणजे असं वसंत ऋतू असेल तर साकुरा प्रिंट आणि फिकट गुलाबी रंग असतो. आता मी गेलेले ऑक्टोबरच्या शेवटाला त्यामुळे तो होता शरद ऋतू. शेवंतीच्या फुलांचा. जपानी शेवंती. ही अशी हातभर मोठी फुलं. पाकळी पाकळी उमललेली. फुलं किती देखणी असतात नाही. तर मग अगदी तसाच होता तो किमोनो. गडद निळ्या तुकतुकीत रंगाचा. रेशमी, मुलायम, सुळसुळीत. त्यावरची तो मोठाली पांढरी हातभर आकाराची शेवंतीची फुलं. त्यांना जणू डोळेच फुटले होते. किती तेजस्वी रंग. अगदी दिमाखदार होता तो किमोनो. हा घातला एकदा की मग मेकअप वगैरे वर्ज्य असतो. दागिने पण नाही. आता कपडेच इतके असतील सुंदर तर कशाला लागतोय बाकीचा, उरलेला जामानिमा. मग काय चक्क नो मेकअप. अगदी साधं काजळ सुद्धा चालतं नाही बरं का. नो मीन्स नो. मग अर्धा पाऊण तास खपून तिच्या आईने मला तो नेसवला. ही बाई मागच्या जन्मात माझी आई असावी. कितीदा ती झुकली. लवलवत्या गवताची हिरवी रेघचं जणू. इतकी गोड बाई. मग असा तो सुंदर किमोनो नेसून, पायात पांढरे स्वच्छ मोजे आणि त्यावर जपानी खडावा स्टाईलच्या लाकडी गेता घालून फोटो काढले हजार. फोटो सेशन आटोपून बघतो तर घड्याळ वेगानं पळतंय. मग लगबगीनं आम्ही पण निघालोच. आई पण आली तिची सोबत आमच्या. काय असतात ना कोणाकोणाचे आपल्याशी ऋणानुबंध. किती देऊन जातात माणसं अशी आपल्याला. आणि ते सुद्धा किती साधं, सरळ आणि सहज. अगदी जाता जाता.
चहापान सोहळ्याची जागा जवळच होती. दुसऱ्या मजल्यावर. एक मोठासा हॉल होता. धुळीचा कुठं कण नाही आणि कागदाचं कपटा. जपान अविश्वसनीय स्वच्छ आहे. हातपाय धुवून आणि चपला बाहेर काढून आम्ही आत गेलो. तिथं एक तरुण जपानी मुलगी बसलेली होती. जपानी रमला. खळी पडणारं डाळींबी पांढरं गुलाबी हसू. तिनं काहीही न बोलता आम्हांला बसण्याची खूण केली. जमिनीवर सगळीकडे जपानी चटया म्हणजे तातामी अंथरलेल्या होत्या. गवतापासून बनवतात त्या, थंडीत उबदार लागतात पायाला आणि उन्हाळ्यात शीतलता देतात. जपानमध्ये निसर्ग असा घरात पण सापडतो. मग त्या ऊबदार चटयांवर वज्रासन घालून बसलो. मग एक दोनचं मिनिटांत एक वृद्ध बाई आली. उत्साही आणि सुहास्य वदना. त्यांनी आम्हांला तीन वेळा लवून अभिवादन केलं. आणि खाली बसल्या अर्थात वज्रासनात. आणि मग पुढचा साधारण एक तास आम्ही जे काही केलं त्या खोलीत ते शब्दातीत होतं. निव्वळ अनुभवण्यासारखं काही. त्यांनी आधी चहा बनवण्यसाठीच्या सगळ्या वस्तू आमच्या समोर स्वच्छ धुतल्या. त्यात होता एक चिनी मातीचा वाडगा, चहा घोटायला लागणारा बुटका, जाड केसांचा ब्रश आणि एक लाकडी ओगराळं. मग भांडी धुऊन झाल्यावर त्यांनी सावकाश आपल्या मेहंदी पावडर सारखं दिसणारी एक पूड काढली वाडग्यात. घाटदार. काळसर निळ्या रंगाच्या त्या वाडग्यावर पांढरं उमललेलं शेवंतीचे फूल. डोळ्यात भरतच असं काही. थोडं पाणी शिंपडलं त्या वाडग्यात आणि तीनदा उजवीकडून आणि तीनदा डावीकडून घोटला तो चहा. दाट, बिनसाखरेचा, बिनदुधाचा. पुदिन्याच्या, थोडं खोबरं घातलेल्या चटणीसारखे दिसतं होते ते मिश्रण. मग परत एकदा झुकून त्यांनी तो पहिल्या पाहुण्याला दिला त्यांनी तो अलगद धरून हातात वर उचलला आणि पुढे दिला. अशा रीतीभाती पाळून आदर दाखवला जातो जपानात. आदर सुद्धा बदलत जातोच देशाप्रमाणे. मग पाहुण्यांनी त्या वाडग्याला गोलाकार फिरवायचं असतं. एकदा तसं केलं की एक घोट घ्यायचा आणि कौतुक करायचं चहा बनवून देणाऱ्या यजमानीण बाईंचं. असं घुटक्या घुटक्याने केल्यानंतर खाली ठेवलेल्या पांढऱ्या शुभ्र टिशू पेपरने आपण तोंड लावलेली वाडग्याची किनार अलगद आणि अलवार पण स्वच्छ पुसायची आणि तो वाडगा मग सरकवायचा पुढच्या पाहुण्यांकडे. अगदी शेवटच्या पाहुण्याला हा अशा पद्धतीने चहा मिळेपर्यंत तुम्ही तिथून जाऊ शकतं नाही. इतकंच काय वज्रासन सुद्धा सोडू शकतं नाही. अनादर मानला जातो मग तो इतर पाहुण्यांचा आणि यजमानांचा पण. आणि जपानमध्ये हत्या केलीत कोणाची तरी एकवेळ चालेलं पण अनादर कोणाचाही तुम्ही करूच शकतं नाही. ती त्यांची संस्कृती नाही. घरात, बाहेर कुठेही जपानी माणूस सभ्यपणेच वागतो. आपल्या माणसांशी तर वागतोच पण परदेशी पाहुण्यांशी जास्त आदराने वागतो. अशा प्रकारे तो एकच वाडगा गोलाकार बसलेल्या सर्व पाहुण्यांमध्ये फिरतो. प्रत्येक पाहुणा त्या वाडग्याचे साग्रसंगीत कौतुक करतो. सरतेशेवटी तो वाडगा परत यजमान बाईंच्यापाशी येतो. जो त्या स्वच्छ करतात आणि मगच कुठे कार्यक्रम संपतो आणि पाहुणे खोलीबाहेर जातात. पण सोहळा संपत नाही.
त्यानंतर प्रत्येक पाहुण्याला स्वतंत्रपणे चहा दिला जातो. तसाच पण बराच पातळ. जो दिला जातो छोट्या चिनी मातीच्या स्वतंत्र वाडग्यातून. आणि त्यासोबत छोटी,छोटी माफक गोड बिस्कीट दिली जातात. ती का? कारण हा चहा कडू लागू नये म्हणून. हा चहा पिताना तुम्ही सहज आणि मनमोकळ्या गप्पा मारू शकता. काही शंका असतील चहा संदर्भात तर त्यासुद्धा विचारू शकता. आधीच्या चहाच्या वेळी मात्र संभाषण बरंच ठेवणीतलं असतं. मोकळेपणाचा लवलेश नसलेलं. नियमबद्ध. जपान असाच आहे. वरून खूप नियमांना धरून चालणारा. अगदी सतत आणि कसोशीनं नियम पाळतात ही माणसं. कोणतीही पळवाट न शोधता. पण ह्या माणसांचा गाभा मात्र साधा आणि घमघमता आहे. आपुलकीनं ओथंबलेला. गोड मधाचं पोवळं जणू. दूरवर पसरणारा त्याचा गंध आणि तो गोडवा मधाचा मग तुम्हांला असं सतत खुणावत राहतो. आणि तुम्ही जाताच खेचले त्या माणसांकडे परत परत. इतकी मितभाषी पण गोड हसणारी आणि उत्साहानं सळसळणारी माणसं. ती देऊनच जातात तुम्हांला बरंच काही. आदर, सन्मान, प्रेम. भावना खरंच असते शब्दांच्या पल्याड, जी अनुभवायची असते. आणि हळूच पुढे असते सरकावायची जसं चहापानाच्या कार्यक्रमात चहाचा वाडगा सरकवला जातो तितक्याचं सहजतेने आणि आदरानं….
Image by chezbeate from Pixabay
- सुशीच्या पल्याड….. - August 6, 2021
- स्पर्शाचं देणं - July 14, 2021
- तुकड्या तुकड्याने जगतांना…. - June 8, 2021
Tea ceremony anubhavla