निर्णय भाग १

भाग १
बाईकवर मागे अंगाला थंड वारा झोंबायला लागला म्हणून रागिणी थोडी पुढे सरकली आणि संजयला आणखी बिलगून बसली. अंगात स्वेटर नाही. तो घ्यायचा राहिलाच. तश्या बऱ्याच गोष्टी घ्यायच्या राहिल्या होत्या पण आता वेळ निघून गेली होती. बाईकवर मागे संजयच्या पाठीवर डोकं टेकून तिने डोळे मिटून घेतले. गेल्या चार दिवसांत घडलेले सगळे प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेले. धड शिक्षण पूर्ण नाही, घरात पैश्याची चणचण म्हणून मेडिकलच्या दुकानात काम करणारे आपण, एक दिवस वरचेवर दुकानात येणाऱ्या या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या प्रेमात पडतो काय, त्याच्या आणाभकांना भुलतो काय आणि चक्क घर सोडायचा निर्णय घेतो काय! सगळंच अगम्य. अर्थात घर सोडण्याशिवाय दुसरा मार्गही नव्हता. तिच्या घरी परजातीचा मुलगा चाललाच नसता, त्यात आधीचे बहीणभाऊ कोणाचाच लागी लागलेलं नव्हतं. जे केलं ते थोडं प्रेमापोटी, थोडं अपरिहार्यतेतून, त्याची परिपूर्ती कशी होते ते मात्र आता पहायचं होतं.
घर सोडून आलो ते थेट संजयच्या दारात. त्याचे आई वडील काय म्हणतील याची काहीच शाश्वती नाही. चंबूगबाळं घेऊन दारात उभे राहिलो. त्याच्या आईला क्षणभर काही समजेना. कॉलेजात जाणारा एक लहान भाऊ असताना,  मोठा भाऊ अजून लग्नाचा असताना याने स्वतःच्या लग्नाचा निर्णय इतक्या तडकाफडकी घेतलाच कसा? आधी मधल्या मुलांचं लग्न?  पण होणारी सून, घरची लक्ष्मी दारात उभी होती. तिला घरात न घेऊन चालणार नव्हतं. घरदार, नातेवाईक सोडून आलेली मुलगी, तिला आपणही असं वाऱ्यावर सोडायचं? आणि मुलगी नाकीडोळी नीटस होती. शिक्षण पूर्ण झालेलं नसलं तरी काहीतरी करायची चुणूक तिच्या डोळ्यात त्यांना स्पष्ट दिसत होती.  त्यांनी दोघांना घरात घेतलं. जेवायला वाढलं. रागिणी कोपऱ्यात बसून आता आपल्या भविष्याचा निर्णय काय होणार याची वाट पाहत होती. तो असा दुसऱ्याच्या हाती सोपवायचा या विचाराने ती थोडीशी अस्वस्थही झाली होती. संजय तसा बिनधास्त दिसत होता. लग्न त्याला रागिणीशीच करायचं होतं, त्याने त्याचा निर्णय निभावला होता. मुलांचं तसं बरं असतं म्हणा, त्यांना त्यांचं घरदार, माणसं फार क्वचित सोडावी लागतात. प्रश्न आपला येतो, एक पूर्ण नवीन आयुष्य आता जगायला लागणार, रागिणीच्या मनात वेगवेगळे विचार रुंजी घालत होते.
संजयच्या आईने पटापट काही निर्णय घेऊन टाकले. घरात बहुदा त्यांचंच चालत असावं. वडील मूक संमती देत खुर्चीवर बसून होते. आठ दिवसांनी सोसायटीच्या आवारात मंडप घालून तुमचं लग्न लावून देऊ. तीसेक माणसं बोलवू, जिलबीचं जेवण करू, गुरूजींना उद्या फोन करते, तुझी सोय मात्र तोवर करायला हवी. या वन रम किचनमध्ये तू कुठे राहणार? आधीच आम्ही पाचजण इथे आहोत. संजय, एक काम कर, तिला सध्या लेडीज हॉस्टेलमध्ये ठेव. तिथूनच मंडपात येऊ देत. शालिनीकाकूंना सांगू कन्यादान करायला. फार पैसे नाहीत पण आहेत त्याच्यात भागवू. काय म्हणतोस? त्याच्या आईने इतके सगळे निर्णय इतक्या पटापट घेतले याचं कौतुक वाटलं रागिणीला. आतापर्यंत सगळंच अधांतरी वाटत होतं, त्यांच्या बोलण्याने थोडाफार धीर आला. त्यांना नमस्कार करून दोघ हॉस्टेल शोधायला निघाले.
बाईकवर मागे रागिणी बिलगून बसल्याचं संजयला लक्षात आलं. “काय ग? थंडी वाजतेय का?” त्याने विचारलं. रागिणी “नाही, इतकीही थंडी नाहीये” म्हणत अजूनच त्याला बिलगली. संजयला ते लक्षात आलं. “हॉस्टेलवर फक्त आठ दिवस,  मग नंतर मलाच बिलगायचं आहे जन्मभर,” नेहमीप्रमाणे मिश्किल हसत  तो तिला म्हणाला. याच, याच त्याच्या मिश्किल आणि खेळकर स्वभावाला भुललो आपण, रागिणी विचार करत होती. खरंतर दोघंही सेटल नाही आहोत. काय करणार? कसं पोट भरणार? त्याच्या एम आर च्या नोकरीवर दोघांचं भागणार का? त्यांच्या वन रम किचनमध्ये आधीच पाच माणसं, त्यात आपली भर. कसे राहणार? काय करणार? पण दुर्दैवाने हे सगळं नंतर सुचतं. कसल्या धुंदीत आईवडिलांचं घर सोडतो आपण? पुढचा काहीच कसा विचार करत नाही? याला प्रेम म्हणावं का? की फक्त आकर्षण? पण संजय मनापासून आवडला होता आपल्याला. दिसायला बेतास बात असला तरी लाघवी होता, हसून खेळून, कोणाला न दुखावता एखादी गोष्ट करून दाखवायची त्याच्यात हातोटी होती. पण सबंध आयुष्य काढायला हे पुरेल? संसार फक्त हसतखेळत होत नाही, त्याला कर्तृत्व, प्रेम, कष्ट, माया, निष्ठा या सगळ्याचीच जोड लागते. देईल का हा माणूस आपल्याला हे सगळं? की फसलो आपण? आणि आपणही निभावू शकू का हे सगळं? की मधेच हरून जाऊ?  विचार करकरून रागिणीचं डोकं भणभणू लागलं.
बाईक थांबली. दोघ उतरले. संजयला रागिणीच्या डोळ्यांच्या कडा किंचित ओलावल्यासारख्या दिसल्या. “काय होतंय? घरची आठवण येतेय?” आता मात्र रागिणीचा बांध फुटला. ती ओक्साबोक्शी रडू लागली. घर सोडल्या क्षणापासून जे काही दाटून येत होतं, थांबवून ठेवलं होतं, ते सगळं बाहेर पडू लागलं. “संजय, चूक केली का रे आपण? पळून तर आलो, पण कसं निभावणार हे सगळं? जमेल का आपल्याला? माझं शिक्षण नाही, हातात पैसे नाहीत, आधार फक्त तुझ्या आईचा.” संजयला तिच्या मनाची घालमेल समजली असावी. “निभावू आपण. दोघे आहोत ना आता एकमेकांबरोबर? आणि सेटल म्हणशील तर थोडा वेळ लागेल, कष्ट करावे लागतील पण ते एकमेकांच्या साथीने करू. मान्य आहे, माझं घर लहान आहे.  सध्या इथेच राहावं लागेल पण. माझी आई कर्तृत्ववान आहे पण तेवढीच कडक आणि शिस्तीची आहे हे ही सांगतो. आपलं बस्तान बसलं की निघू आपण तिथून. दादाचं लग्न ही अजून व्हायचं आहे. पण मी यावर विचार केला आहे. एखाद्या छोट्या शहरात जाऊन राहू. तिथे छोटामोठा धंदा करू. मला नोकरीची आवड फारशी नाहीच आहे, तुला माहीत आहे. आपलं भविष्य आपण घडवू. या सगळ्यात तू साथ दे म्हणजे झालं.”
रागिणीला थोडं बरं वाटलं. भविष्याची चिंता होतीच. पण त्यामुळे वर्तमान खराब करून घेण्यात अर्थ नव्हता. आईसक्रीम खाणार का? संजयच्या प्रश्नाने ती भानावर आली. ती हो म्हणाली. दोघांनी रस्त्यावरच्या गाडीचं कोनमधलं आईसक्रीम खात भविष्याची स्वप्नं रंगवली.
हॉस्टेलवर चौकशी करून तिची आठ दिवसांची सोय करून संजय निघाला. त्याची बाईक लांब जाताना पाहून रागिणीची हुरहूर अजून वाढली. पुढचे आठ दिवस कसे जाणार होते काय माहीत!
क्रमशः
पुढील भागाची लिंक- निर्णय भाग २
Image by Tú Anh from Pixabay
Gauri Brahme
Latest posts by Gauri Brahme (see all)

Gauri Brahme

गेली वीस वर्षे पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेची अध्यापिका म्हणून काम करते. अमराठी लोकांना मराठी शिकवते. भरपूर लिहिते, वाचते, कलाकुसरीच्या वस्तू बनवते, खादाडी करते, इतरांना खिलवते. लेखिका म्हणून नावावर २ पुस्तकं जमा आहेत.

One thought on “निर्णय भाग १

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!