वारसा

 
      पहाटे पाच लाच  गीताक्का बाहेर  बागेजवळ आल्या .  बागेत घमघमाट करणारा मोगरा फुलला होता . कदंबा अण्णा ने  सुगंधी दवणा  ची पानं ,अबोली आणि मोगऱ्याची फुलं तोडून परडी देवडी वर ठेवली होती . आपल्या ओल्या केसातील टॉवेल झटकून त्यांनी दोरीवर वाळत घातला , दाट केसांचा घट्ट आंबाडा बांधून  परडी हाती घेतली आणि पूजघरात गेल्या . कदंबा ने पूजेची सगळी तयारी केली होती .  
       पूजा आटोपून धम्म पिवळ्या सोनचाफ्याची फुलं नटराज्याच्या मूर्तीला वाहून गीताक्का
बाजूच्या नृत्यशाळेच्या मोठ्या सभागृहात गेल्या . 
तिथेही हॉल च्या एक कोपऱ्यात  नटराजाची  मोठी ,  सुबक मूर्ती आणि सगळीकडे धुपाचा दरवळ होता . त्यांची पट्टशिष्या निलांबरी आलेली होती .
      नेहमीप्रमाणे तिच्या हातावर प्रसाद ठेवून अक्काने थाळी चौरंगावर ठेवली . निलांबरीने वाकून नमस्कार केला . धुपाच्या सुगंधा प्रमाणे अक्कांच्या शब्दांनाही सुगंध असतो असे म्हणायची निला . 
 
       ” अरंगेत्रम ची तयारी कुठपर्यंत झाली ? ” अक्कांनि विचारलं . 
” होत आली गुरुमा . आता आज बाकी सगळ्या मुली येतील त्यांचा 
  ””शारदाअष्टकं””  चा नृत्याभ्यास सुरू झाला की बोलावणे पाठवते . “
 
       अक्का स्वयपाक घरात गेल्या . 
राजंम्मा  ने  गायीच्या दुधाची गरम गरम कॉफी  अम्मा समोर ठेवली . 
” चार गुलाब  आणून ह्या फुलदाणीत खोच ग . ”  कॅलेंडर कडे निरखून बघत अम्मा म्हणाल्या .
” हो अम्मा . रोज काय बघता कॅलेंडर अम्मा ? . त्याने दहा तारीख जवळ येणार आहे का ? ” 
” नाही ग , तितकच समाधान . अजून दोन दिवसांनी येईल न श्रवणी ?….पूर्ण एक वर्ष झालं तिला भेटून . ह्यावेळी महोत्सवासाठी  श्रीकांत आणि विद्या नाही येणार .  नीता आणि जावई नुसतेच कार्यक्रम  बघायला आले होते , तेही दोन  वर्षानपूर्वी  . मुलगा आणि सुने पेक्षा नातीलाच जास्त ओढ आहे ग इथली .  ह्या नृत्यशाळेला जिवंतपणा येतो बघ ती आली की . ……….कदंबा  , दिवाणावर   नव्या चादरी घाल रे बाबा .  झोपाळ्याच्या  पितळी कड्यांना पॉलिश करून टाक . ” 
 
         नंतर दुपारच्या जेवणापर्यंत अक्का  मुलींची तालीमच घेत होत्या .
आज दुपारच्या  वर्गात ‘वर्णम’  चा रियाज करवून घ्यायचा होता . संध्याकाळी  ‘ अलरीपू’ ची तयारी करवून घ्यायची होती . 
महोत्सव काही दिवसांवर आला होता .
गेल्या तीस वर्षांपासून अम्मा इथे नृत्य कलामंदिर  चालवत होत्या . भारतनाट्यम , कुचिपुडी , कथ्थक आणि  इतर शास्त्रीय नृत्यकलेत प्रभुत्व असलेल्या , पदमविभूषण  सन्मानित , अनेक देशात कार्यक्रम करून नृत्यप्रसार करणाऱ्या अक्कांच्या मुलांनी हा वारसा जपण्यात स्वारस्यच
 दाखवले नव्हते . मुलगा श्रीकांत आणि मुलगी नीता ह्या दोघांनाही कुठल्याच कलाप्रकाराची ओढ  नव्हती .  हां  , श्रीकांतची मुलगी श्रवणी मात्र   वयाच्या पाचव्या वर्षा पासून भरतनाट्यम शिकत होती . इथे भारतात असेपर्यंत गीता अक्कांना  श्रवणी  च्या प्रगतीकडे कडे बारकाईने लक्ष देता येत असे . पण अमेरिकेला गेल्यानंतर सगळं गणितच बदललं होतं ,  मात्र तिने आपले विशारद पूर्ण केले होते . 
 
     आधी  जवळपास साठ मुली पूर्णवेळ इथे राहून नृत्य आराधना करीत .  हे असे गेले   वीस वर्षे त्यांनी जीवापाड सांभाळले . अनेक वेळा स्वतःचे पदरचे पैसे घालून , कधी दागिने विकून त्यांनी नृत्य कलामंदिर  साठी आयुष्य वेचले होते . 
       अनेक मानसन्मान , अनेक पुरस्कार मिळाले , कितीतरी जाहिराती ,  लघुपट यासाठी मागणी असे  तरी त्यांनी कलेशी तडजोड केली नाही . असे केल्यास  फार व्यावसायिकता  झाली असती , जी त्यांना नको होती . 
जिथे पैश्याशी संबंध येतो , तिथे  नृत्याच्या मूळ गाभ्याला धक्का लागतो असे त्यांचे मत होते.  आपल्या विद्यार्थिनींसोबत फक्त भारतातच नाही तर इतर  अनेक देशात जाऊन त्यांनी ह्या प्राचीन भारतीय कलेचा प्रचार  केला होता  . 
        यातील काही मुली तर सलग पंधरा सोळा वर्षे त्यांच्या छायेखाली होत्या . पण हा प्रभाव सगळ्याच मुलींवर सारखाच होता असे नाही . बाहेरील चकचकीत जगाची भुरळ अनेकींना  सिने सृष्टीकडे घेऊन गेली . त्यात काही वाईट आहे असे अक्कांचे मत नव्हते , पण ते करतानाही शास्त्रीय नृत्याची बैठक असायलाच पाहिजे असा त्यांचा आग्रह होता . 
        नृत्य मंदिराची गुरुकुल पद्धती , तिथे शिकवायला येणारे देशभरातील ज्ञानी गुरुजन आणि सगळे शास्त्रीय नृत्य प्रकार …..यांचा अभ्यास करायला विदेशातून अनेक अभ्यासक , पत्रकार , टी .व्ही  चॅनेल वाले  खूप मोठ्या संख्येने तिथे येत . अक्कांना आता हा सगळा व्याप सांभाळणे  अवघड झाले होते .  पण आता कुणीच  जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने निवासी नृत्यशाळा त्यांनी बंद करून टाकली  होती . इतक्या वर्षांची गुरुकुल पद्धत आता संपुष्टात आली याचे त्यांना फार दुःख होते . 
 
        ” आम्ही जाऊ गुरुमा ?” निलंबरी विचारत होती . 
   ” हो , उद्या सगळ्यांचे घुंगरू आणि दागिने नीट तपासून ठेवा . या आता .” 
  अक्का पुन्हा विचारात गढल्या . ही निलांबरी , रेवती , गौतमी ,राधिका …..ह्या सगळ्या कोण लागतात  आपल्या ?……किती प्रामाणिक आहेत आपल्या कलेशी ?……आणि आपल्याशी सुद्धा !……मग कोणते नाते खरे ?……पोटचे मुलं इतक्या दूर ….अडीअडचणीला  कधीच न येऊ शकणारे ……..की हे सतत अवतीभवती राहून आपला स्नेह दाखवणारे ….
 ….      मग का करतो माणूस इतका आटापिटा? आपले अस्तित्व कुठल्या न कुठल्या रुपात जपून ठेवण्याचा अट्टाहास की आपली कला जिवंत ठेवण्याची धडपड ? ……नेमकं काय साध्य करायचंय ? गेल्या दोन वर्षात तर  फारशा कुठे गेलोच नाही आपण .
आताशा पेपरवाले , चॅनेलवाले कोणीच येत नाहीत . म्हणजे  आता लोक विसरताएत का आपल्याला ? आताशा आपली दखल नाही घेतल्या जात .. ..असं होतंय म्हणून आपला जीव तुटतोय का ? …की आपला वारसा कुणीतरी पुढे न्यावा ह्या 
आंतरिक इच्छेपायी  जीव जळतोय ?……
       बराच वेळ अक्का बंगई वर बसून होत्या . आताशा त्यांना सतत  स्वतःच्या अस्तित्वाची चिंता सतावत असे .  
  ” अव्वा !!! ” 
श्रवणी च्या हाकेने त्या भानावर आल्या . 
  ” आली का ग  माझी बबडी  s s ” 
म्हणत त्यांनी प्रेमाने तिला जवळ घेतले . छान साडेपाच फूट उंची , एका नुत्यांगनेला शोभेल असा रेखीव बांधा , आणि दाट कुरळे केस . तिच्या लोभस दर्शनाने हरखून तंद्रीत गेलेल्या अक्कांना  श्रावणीने जागे केले .
  ” अव्वा s !  आय नीड युअर ब्लेसिंग”  ”  श्रवणी  नमस्कार करत म्हणाली .
  ” यशवंत हो बाळा ,  ये ये , बस . ….राजंम्मा ,कॉफी आण लवकर .” …..इतक्या  वर्षांनी         नात  आलीये म्हणूनत्यांचा  जीव थाऱ्यावर  नव्हता .    कादंबा  ने तिचे सामान आत नेऊन ठेवले . त्यातील एक बॅग तिने उघडली .
       श्रीकांत आणि विद्या ने काय काय पाठवले होते . अक्कांसाठी एक स्मार्टफोन ,  मऊ लोकरीचा कोट , अनेक प्रकारचे दागिने , सुगंधी उदबत्त्या , मेक अप चे सामान , अगदी खरे वाटावेत असे गजरे आणि हार ……तिथे अशा वस्तू मिळतात याचेच आश्चर्य वाटले अक्कांना . शिवाय अनेक प्रकारचे  सुंदर  कृत्रिम फुले  पण पाठवली होती . 
   आता हे सगळं घेऊन काय करायचंय ही भावना दाबून टाकत त्यांनी सगळ्या वस्तूंची खूप तारीफ केली  . हे बघून 
त्यांना आपल्या मुलीची निताची आठवण आली …..तिला फार आवडायचं असं  आर्टीफिशियल फुलं सजवायला . 
       सकाळचा नाश्ता आणि कॉफी घेऊन  श्रवणी  तिच्या साठी खास सोय करून ठेवलेल्या प्रशस्त खोलीत गेली .  काहीतरी विचारायचं म्हणून अक्का तिच्या खोली जवळ गेल्या आणि अर्धवट बंद दाराशीच थबकल्या . आतून पाश्चात्य संगीताचा आवाज येत होता . त्यांनी किंचित डोकावून पाहिलं , श्रवणी  अतिशय लयबद्ध पद्धतीने  ‘हिप  हॉप’ नृत्य करत होती .
        अक्क्यांना जगातील अनेक नृत्यप्रकार माहीत होते …..त्या एखाद्या 
शैली च्या विरोधात होत्या असेही नाही . तरुण पिढीचा आवाज ओळखून होत्या त्या . तरीही आता श्रवणीला बघून कुठल्याशा अमंगळाची चाहूल लागल्या सारखं वाटलं त्यांना . 
             दुपारच्या जेवणानंतर आजी आणि नात जुने अल्बम बघत बसल्या . 
आपल्या आज्जी ला किती मान सन्मान मिळालेत , ती किती देशात फिरून आलीये , किती नाव कमावलं , सगळं पुन्हा एकदा पाहून झालं . 
         दोघी नृत्यशाळेत गेल्या . निलांबरी आणि काही मुली तिथे सराव करत होत्या . अक्कांनि मुद्दाम श्रवणीला समोर बसवले . मुली मन लावून ताल धरत होत्या …..एक मुलगी थोडी चुकत होती ….ती चुकली की श्रवणी आजी कडे बघे …..तिने सुचकपणे आजीकडे पाहिलं आणि अक्क्यांनी   “जा ”  असे खुणावले , तशी श्रवणी पुढे आली . तिने तेवढा भाग स्वतः करून दाखवला  . 
      सुंदर मौखिक अभिनय , बोलके डोळे ,  अप्रतिम
पदलालित्य , शब्दांची जाण हे सगळं घुंगरू  पायात नसतांनाही खूपच तालबद्ध आणि नजर खिळवून ठेवणारं ! …..त्या मुलीला तिची चूक कळाली आणि अक्कांना आपल्या नातीची तयारी ! …..त्यांचे मन भरून आलं  ….आता थोड्या वेळापूर्वी आलेलं  मळभ दूर झालं होतं . श्रवणीचे
यु ट्यूब विडिओ  नेहमी बघायच्या त्या . पण तिचे बहुतेक व्हिडीओज हे पाश्चात्य नृत्याचेच होते आणि त्याला प्रचंड प्रेक्षक वर्ग होता.  तेव्हा भारतीय नृत्यशैली मधील तिची आवड कमी होतेय का ह्या शंकेने त्यांना अस्वस्थ वाटत असे . ….पण आता पद्धतीने अतिशय सफाईने तिने नृत्य केले की अक्का धन्य झाल्या .
 
        ” श्रवू , तू कोणते कोणते नृत्य प्रकार शिकतेस ग ? ”  दुपारी निवांत असतांना अक्कनी विषय छेडला .
” बरेच ! …म्हणजे भारतीय शास्त्रीय नृत्यात  कथ्थक , भरत नाट्यम आणि मणिपुरी …मग….बॅले … हिप हॉप ….असंच काही . तिथे खूप   ‘ह्युज’  अकॅडमी आहे , खूप  इंडिअन ‘स्टुडंट्स’
आहेत . …बाय द वे अव्वा , ह्या  फेस्टिव्हल मध्ये  मी कोणता  ‘परफॉर्मन्स’ 
करू ? ” 
  ” अ ? …… “”जननी जगतकारिणी”””  कर … किंवा…..””श्रीरंगा””….नाहीतर..””कर्णवध”””….तुझं जे नीट बसलय ते कर .”
      
      मग इतर मुलींबरोबर श्रवणी देखील सराव करू लागली . त्या तीन चार दिवसात  त्या गावात अनेक वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम झाले . दक्षिणेतिलच नाही तर इतर राज्यातील अनेक कलाकार आणि गुरू आले होते .  प्रमुख पाहुणे म्हणून एक फिल्मी नृत्य शिकवणारे  सर होते . त्यांचा  मुंबईत   ‘डान्सक्लास’  खूप जोरात चालत होता .  अनेक चित्रपटासाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलं होतं . वर्तमान पत्रात ह्याची पान  भरून बातमी होती . आणि मधल्या पानावर कुठेतरी कोपऱ्यात शास्त्रीय नृत्य संमेलनाची बातमी होती .
      ” अव्वा , तू असतांना  तुला न बोलावत इतर कुणाला हे कसे बोलावतात ग? तुला पण बोलवायला हवं होतं न ?” 
      हे खरं तर अक्कांच्या मनातलं बोलली होती श्रवणी . अलीकडे अक्कांकडे लोकांचे लक्ष्य जाईनासे झाले होते .  शाळा , कॉलेज , संस्था , किंव उद्घाटन समारंभ ह्यात कुठेही त्यांना बोलावणे येत नसे . 
” आजकाल अभिजात कलेला पहिल्या सारखा मान नाही राहिला ग ! ….आणि सारखं माझं कौतुक किती वर्ष करतील ते .” अक्क्यांनी  असं बोलून स्वतःचीच समजूत काढली होती . 
        नृत्य संमेलन खूपच थाटात पार पडले . दर वर्षी अक्का खास छोटी बस करून मुलींना तिथे घेऊन जात . ह्यावर्षी तर  श्रवणी आली होती . 
तिच्या नृत्याची  खूप तारीफ झाली . अक्का तर भरून पावल्या होत्या . संमेलनात त्यांना नेहमी सारखा बहुमान मिळाला नाही  , पण आपल्या नातीच्या  प्रगतीने त्या खूष होत्या .
 
           श्रावणी चा  अमेरिकेला वापस जाण्याचा  दिवस आला . तिने आजीला खूप आग्रह केला सोबत चालण्याचा . तिकडून मुलगा आणि सूनही बोलले . पण अक्का कसल्या बधतात ! कदंबा तिला मुंबईपर्यंत सोबत करायला गेला .
      ती गेल्यावर  अक्का खूपच एकाकी पडल्या . कशातच इंटेरेस्ट  वाटेना .  प्रचंड मरगळ आली होती.  काही दिवसातच त्यांनी निलांबरी ला बोलावून घेतले .  तिला गावात दुसरीकडे जागा उपलब्ध करून दिली आणि  आपला नृत्यवर्ग  बंदच  करून टाकला .  निलंबरीनं बराच समजावण्याचा प्रयत्न केला , श्रावणीला फोन लावून दिला , तिनंही समजावलं , पण अक्का ठाम होत्या . एकेकाळी दिमाखात आपले वैभव मीरवणारी इमारत आता पोकळ वाटत होती …..आपल्या डोळ्यासमोर हा असा ह्रास !  खूप  व्याकुळ मनानं  त्यांचा जीव पोखरून जात होता ….हे सगळं असह्य होऊन त्यांनी  अंथरूणच धरलं . 
        आठ दिवसांनी अमेरिकेहून विडिओ कॉल आला . तिथे श्रीकांत , विद्या , नीता , जावई आणि श्रवणी सगळेच हजर होते . 
  ” अम्मा , श्रवणीला  ‘ युथ सेन्सेशन ‘ अवॉर्ड मिळालंय . ही बघ केव्हढी मोठी डान्स अकादमी स्थापन करतेय ती . इथे अनेक प्रकारचे नृत्यप्रकार शिकवल्या जाणार आहेत . जग भारतातील नामवंत नृत्य शिक्षक येतील कार्यशाळा घ्यायला . उदघाटन तुझ्या हातून करू अम्मा !! आणि भरतनाट्यम , कुचिपुडी हे डिपार्टमेंट तूच संभाळायचं !  यरशील न अम्मा ?”
         अम्मा चे डोळे पाझरत होते . कदंबा आणि राजम्मा येऊन बसले होते . 
 ” अव्वा , बोल न !” श्रवणी 
” ……….” 
” अम्मा , मी येतोय तुला न्यायला . त्या आधी तुझ्या वीझा चं काम करून टाकू . …..अम्मा , तुझी तपश्चर्या वाया नाही जाणार अम्मा , बोल न !” श्रीकांत  च्या उत्साहाला उधाण आलं होतं .
     कदंबा आशेने अम्मा कडे बघत होता …….
” गीताम्मा , बोला न काही ”  राजम्मा म्हणाल्या .
 
    ” माझी पूजेतील नटराजाची मूर्ती  विमानातून आणू देतील न रे ते ?”  अम्मा नं विचारलं , आणि सगळ्यांचे चेहरे आनंदी झाले . श्रवणी ने तर उडीच मारली . 
        गीताक्का रोजच्या सारख्या पहाटे उठून 
निशिगंधाच्या छड्या  जवळ गेल्या . पाऊस पडून गेल्याने बाग जास्तच टवटवीत दिसत होती . अक्कानाही नवा हुरूप आला होता .  आज  पासून मोठ्या  नटराजाच्या मूर्तीला निशिगंध वहात जा म्हणून सांगितले होते निलंबरीला . ती देखील हरखली होती नृत्यमंदिर पुन्हा सुरू होणार म्हणून . आता इथल्या नृत्यशाळेची जबाबदारी तिच्यावर सोपवून  अम्मांना निश्चिंत मनाने  इथून जायचे होते . 
 
      रोजच्या सारखीच निवात पूजा करतांना अम्मांनी देवाला मनोमन हात जोडले …..त्यांचा समृद्ध वारसा आता परदेशातही  जपल्या जाणार होता .
© अपर्णा देशपांडे
 
 
 
Image by dshah from Pixabay 

Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

11 thoughts on “वारसा

  • March 13, 2021 at 2:20 pm
    Permalink

    उत्कृष्ट वातावरण निर्मिती

    Reply
  • March 15, 2021 at 12:49 pm
    Permalink

    खूप छान

    Reply
    • March 19, 2021 at 6:12 am
      Permalink

      धन्यवाद

      Reply
  • March 22, 2021 at 9:23 am
    Permalink

    खूप सुरेख 👌👌

    Reply
  • April 16, 2021 at 7:08 am
    Permalink

    Atishay sundar

    Reply
  • April 20, 2021 at 12:53 pm
    Permalink

    सुंदर.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!