अडलाबडली
ही एक नवीनच जमात पुण्यपत्तनात जन्मास आल्याचे ,आमच्या लक्षात आले आहे. आमच्या काळी नव्हते हो असे काही. आदिमकाळापासूनची ही व्यवस्था ,अशी धुळीस मिळताना बघोन, आमच्या मनास कोण यातना होत आहेत.
लहानपणापासोन आम्ही काय धडे गिरविले ते ? जगन ऊठ. मगन बघ. काकू काकांच्या मागे , गाडीवर बसोन मंडईत गेल्या अन् शेरभर भाजी घेवोन आल्या. आता हे असलं बघोन जगन मगनच्या डोळ्यात फूल पडले, तर जिम्मेदार कोण ? डोक्याची मंडई करणारी ही दृश्ये बघण्यापरीस , डोळ्यास पट्टी बांधोन आंधळी कोशिंबीर खेळलेली बरी.
काय बहार असायची हो पूर्वी. हमारा बजाज. त्यावर स्वार तो. पाठीशी ती. त्याच्या पोटाला वेटोळे घालणारा तिचा ऊजवा हात. नाहीतर त्याच्या खांद्यावर धपांडीईष्टाॅप खेळणारा तिचा डावा हात. वार्याने भुरभुरू ऊडणारे तिचे केस. हळूच कानात कानगोष्टी करणारी तीची ती कातिलानी अदा.
काय जबरा काॅन्फी असायचा त्याच्या चेहर्यावर. जग जिंकायला निघालेला कोलंबस वाटायचा तो. आणि ती. तिच्या डोळ्यात दिसायचा तो विश्वास. जन्मोजन्मी त्याला साथ देण्याची तरतूद. तू तिथे मी. तू तिथे नेशील तिथे मी येणार. कुठे नेतोस ? असं न विचारता.
आणि आताची ही अडलाबडली. शिंचा , तो मागे कसा जीव मुठीत धरून बसताव बघितलो का ? त्याच्या चेहर्यावरची ती मजबूरी कहानी 2 तर बयान करीत नाही ना.? जिंदगीत याहून काय वाईट व्हायचे बाकी राहिले आहे , असे वाटोन जीवावर ऊदार होवून मागे बसण्याची प्रवृत्ती काय दर्शवते ? राणीसरकार म्हणोन मुजरे करण्यात जिंदगी बरबाद करण्यात कसली आलीय मर्दानगी ? असे माघारी बसोन स्वाभिमान चुरडण्यापत्तुर पीएमटीच्या लाईनीत म्हातारे होणे बेहत्तर.
परवा आमच्या काऊस, आमच्या मनातले हे कटूबोल ऐकवले, तर जाम पेटून ऊठली हो ती. स्पिरीटच्या बोळ्यासारखी. नुसता भडका. पार पैलतीरी काऊ कोकलताहे ऐकवलंन. मुकाट मागे बसा आणि चला बाजारी. या वयात वार्यावरची वरात काढलीही हो आमची. प्राण हेल्मेटात लपवून मागे बसलो. पुरुषार्थाला असं मागे बसवून फिदीफिदी हसणारी स्त्रीशक्ती आरशात दिसली आणि आम्ही मनातल्या मनात हजार वेळ मेलो.
पण लवकरच भानावर आलो. भानामतीच हो ती. अचानक सद्बुद्धी झाली. दोन्ही हातात जीव धरून मागे बसलो होतो. पण डोळे मोकळेच होते हो. अचानक पुण्यपत्नातली हिरवळ ठळकपणे डोळ्यात भरली. सुकाणूनियंत्रणाचे कर्म टळल्याने लक्ष पूर्णपणे लक्ष्यावर केंद्रीत करता आले. आहाहा. मन करा रे प्रसन्न !!. प्रेक्षणीय. अविस्मरणीय. अनुकरणीय. डोळ्यांना मोतीबिंदू झाला तरी चालेल. पण आम्ही डोळे भरभरून जीवनाचा आनंद लुटणार. ही पद्धत मुक्कर्रर करणार्या त्या पुण्यपुरूषास आम्ही मनोमन वंदन केले.
ठरलं . आजपासून तू पुढे. मी तुझ्या मागोमाग. पहिला फोटो आजचा. दुसरा ऊद्याचा. रस्त्यावर कुठे अकस्मात नेत्रभेट झाली, तरी मला ओळख दाखवणं जमणार नाही. गुस्ताखी माफ. आमची नजर दुसरीकडे कुठेतरी अनादी अनंतात विलीन झालेली असणार.
आपणही ही अडलाबडली करून बघा. आणि जगा आनंदाने.
हिम्मते मर्दा तो मददे खुदा.!!!
……कौस्तुभ केळकर नगरवाला.
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021