बाप्पा
महिनाभरावर गणपती येऊन ठेपले होते. काही मंडळांची तर मांडवही टाकायला सुरुवात झाली होती. छोट्या अथर्वला त्याचे बाबा म्हणजे अनिल शाळेत सोडवत असत आणि घेऊन येत असत. त्याची आई म्हणजे नंदिनी, मस्तपैकी त्याचं आवरून त्याला खाली आणत असे. छोट्या साहेबांचा थाटच न्यारा. मस्तपैकी युनिफॉर्म घालून, पावडर-बिवडर लावून गळ्यात वॉटर बॅग अडकवून सॉरी खाली यायची. आणि मग अनिल आनंदाने त्याला उचलून बाईक वर आपल्या पुढ्यात बसवायचा. बाईक चालू झाली की अथर्वचही चालू व्हायचं ब्रूम ब्रूम……
छोट्या पोरांचं विश्वच वेगळं. किती कुतुहूल किती प्रश्न! बालवाडी संपून नुकताच स्वारींनी केजीत प्रवेश केलेला. नुसती बडबड एके बडबड. बाबा, याला काय म्हणतात? बाबा, ते काय असतं? अथर्व पार भंडावून सोडायचा अनिलला. गणपतीरायाच्या येण्याची चाहूल लागल्याने तर छोटा अथर्व जाम खूश होता.
“बाबा, मी पण येणार बाप्पांची मूर्ती आणायला”
“हो बेटा”
गणपती बसायच्या आदल्या दिवशीच शाळेतून आल्याआल्या स्वारी एकदम आवरून तयार आणि छोटंसं धोतर, वरती छानसा झब्बा, डोक्यावर टोपी, हातात टाळ घेऊन घरातल्यांसमोर उभी. नातवाचं हे लोभस रूप पाहून आजोबाही सुखावले आणि त्याला कडेवर घेऊन त्याचा पा घेतला. अथर्व नुसता तयार झाला नव्हता तर ताम्हण, पाट, वस्त्र हे सगळं शोधायला त्यानं आजोबांना मदतही केली होती.
अनिलचं कुटुंब नेहमी पेंडसे काकांकडून मूर्ती घ्यायचं.
“कुठली मूर्ती हवी आमच्या अथर्वला” पेंडसे काकांनी विचारलं.
सिंहासनावर बसलेली, कमळात विराजमान झालेली, तर एखादी उंदिरमामांवर विराजमान झालेली अशा एक ना अनेक मूर्ती तिथं होत्या. अथर्व तर प्रत्येक मूर्तीकडे निरागसपणे, कुतूहलाने पहात होता. त्याच्या बालमनाला तर सगळ्याच मूर्तींची भुरळ पडली होती. पेंडसे काकांच्या मूर्ती म्हणजे एक से एक. आकार, रंगसंगती, प्रमाणबद्धता सगळं कसं परफेक्ट आणि डोळे साकारण्याची त्यांची हातोटी, त्याला तर तोडच नसे. जणू काही ती मूर्ती आपल्याशीच बोलतेय असं वाटायचं. अखेर अथर्वला आवडलेली मूर्ती घेऊन सगळे घरी आले. वाटेत अथर्वचा जयघोष चालूच होता.” गणपती बाप्पा मोरया,एक दोन तीन चार, गणपती बाप्पा बडे हुशार”. उद्या बाप्पांची पूजा करायची, त्यांना आवडीचा नेवैद्य दाखवायचा, छान आरास करायची या सगळ्या विचारात स्वारी दमून झोपूनही गेली.
दुसऱ्या दिवशी अनिल आणि नंदिनीनं बाप्पांची यथासांग पूजा करून मूर्तीची प्रतिष्ठापना केली. अनिल अथर्वशीर्ष म्हणत असताना देखील हात जोडून अथर्व कौतुकानं बाप्पांकडे पाहत होता. आज तर काय स्वारींना उकडीचे मोदक मिळणार होते. अनिल आणि नंदिनीनं मानाचे गणपतीही दाखवून आणले अथर्वला. वाटेत वेगवेगळ्या मंडळांच्या मिरवणुका, ढोल-ताशांचा गजर हे सगळं जल्लोषपूर्ण वातावरण बघून अथर्व आणखीनच भारावून गेला. आता पुढचे पाच-सहा दिवस मज्जाच मज्जा होती त्याच्यासाठी. सकाळ-संध्याकाळ आरती, रोजची खिरापत, ढोल ताशाचा आवाज आणि हो सजावट राहिली की! अनिल स्वतः डेकोरेशन करायचा घरच्या घरी. अगदी इको-फ्रेंडली. अथर्वनं त्यातही आवडीने त्याच्या बाबाला मदत केली.
अनिलकडे पाच दिवसाचा गणपती असायचा. थोडक्यात गौरी गणपती विसर्जन एकत्रच. अथर्वनं या पाच दिवसात धमाल केली. त्याच्या दृष्टीने ही पर्वणीच होती. “आता बाप्पा कायम माझ्याबरोबर असणार” या निरागस विचारानं त्याचं मन आनंदून गेलं होतं. पण आज जशी जशी दुपारची वेळ सरत चालली तसं त्याला काहीतरी वेगळं जाणवायला लागलं. अनिल आणि नंदिनीनं डेकोरेशन, माळा, नैवेद्याचे पदार्थ हे सगळं आवरायला सुरुवात केली. अथर्वच्या बालमनाला कळेनासं झालं. आज अचानक घरातली चमक का ओसरलीये. काय चालू आहे आई-बाबांचं.
“अरे, आज विसर्जन आहे बाप्पांचं.”
” विसर्जन म्हणजे? ”
“म्हणजे बाप्पा निघायची वेळ झाली”. असं म्हणत अनिलनं मूर्ती उचलून ताम्हणात घेऊन पाटावर ठेवली.
” अथर्व बेटा, आवर बघू पटकन आता थोड्यावेळानं निघायचय आपल्याला विसर्जनासाठी.”
” मी नाही जाऊ देणार कुठे माझ्या बाप्पांना. मला खूप छान वाटतंय बाप्पा घरी आहेत म्हणून. तुम्हाला सगळ्यांना पण छान वाटतय की नाही ? बाप्पांनाही जायचं नाहीये आपल्याला सोडून. त्यांनाही वाईट वाटतंय तुम्ही उचलून त्यांना घेऊन चाललाय म्हणून. नीट पहा तुम्ही त्यांच्या डोळ्यात. त्यांच्या डोळ्यात पण पाणी आलय.” असं म्हणून अथर्व रडू लागला. तो बाप्पांच्या मुर्तीला धरूनच बसला.
शेवटी त्याच्या आजोबांनी त्याला कडेवर घेतलं आणि म्हणाले,” अथर्व, बाप्पांनाही त्यांचे स्वतःचे घर आहे. ते त्यांच्या आई-वडिलांना सोडून, फक्त आपल्यासाठी, आपल्याला छान वाटावं, आपल्याला आनंद मिळावा म्हणून न चुकता दरवर्षी आवर्जून आपल्याला भेटायला येतात. तू राहशील का बरं तुझ्या आई-वडिलांना आणि मला सोडून. तू रडलास तर त्यांनाही चांगलं नाही वाटणार.” असं म्हणत आजोबांनी त्याचे डोळे पुसले आणि मग अथर्वनंही समजुतीच्या स्वरात मान डोलावली आणि मग सगळ्यांनी मिळून एकच गजर केला.
” गणपती बाप्पा मोरया ”
“पुढच्या वर्षी लवकर या”.
© महेश काळे
- बाप्पा - March 16, 2021
- गर्लफ्रेंड- एक फँटसी - October 28, 2020
- “प्यासा सावन” क्षण सौख्याचे- (लेखन- महेश काळे) - August 16, 2020
मस्त