आणि valantine गोड झाला- १

डोंबिवली”…… येस्स परत एकदा अगदी लवकरच अभिजित , डोंबिवली , म्हणजे त्याची जान , जीव की प्राण असलेल्या गावात रहायला आला होता.

अभिजीतचे वडील रिटायर्ड झाल्यावर ते सगळेच म्हणजे तो, त्याची आई आणि बाबा हे ठाण्याला घोडबंदर रोडवर असलेल्या थ्री बीएच के च्या प्रशस्त flat मध्ये रहायला गेले होते. त्याला खरंतर डोंबिवली सोडणं जीवावर  आलं होतं. कारण त्याचा जन्म, बालपण, शाळा , कॉलेज , त्यामुळे सगळे मित्र मैत्रिणी डोंबिवली मधलेच होते, पण शेवटी ठाणा हे डोंबिवली पेक्षा बेटर ऑप्शन होतं , सगळ्याच दृष्टीने.

अभिजितने नुकतेच इन्जिनिअरिन्ग आणि MBA कम्प्लीट केले होते आणि तो जॉबच्या शोधातच होता आणि नेमके ते ठाण्यात शिफ्ट झाले आणि त्याला कल्याणच्या नवीनच असलेल्या एका multinational कंपनीत जॉबची ऑफर आली. डोंबिवलीचा flat त्यांनी तसाच ठेवला होता अगदी सामानासकट , तो flat ते कधीच विकणार नव्हते , कारण तो सगळ्यांच्या यशाचा साक्षीदार होता. काही घरं अगदी माणसांसारखी असतात … जीव लावणारी , सो अभिजितने डोंबिवलीत राहायचा निर्णय घेतला , कारण डोंबिवलीवरून त्याला कंपनीची बस होती. त्याची आई सुद्धा निघाली त्याच्या सोबत , मग बाबा सुद्धा , पण त्याने हट्टाने त्यांना नाही म्हणून सांगितले “बाबा , आई तुम्ही मस्त तुमचं हे लाईफ एन्जॉय करा ना !, मी राहीन तिकडे , आणि तसंही काका , मावशी , आत्या सगळी आपली माणसं आहेत की काही लागलं तर , सो तुम्ही मस्त गडकरीला नाटकं बघा , तलावपाळीवर फिरायला जा , mall मध्ये जा , आणि मी येत जाईन की विक एन्डला , सो माझी काळजी मुळीच करू नका” असं म्हणून तो परत आपल्या लाडक्या डोंबिवलीत रहायला  आला.

नोकरीचा पहिलाच दिवस होता . अभिजीतची आई सुद्धा नोकरी करणारी असल्यामुळे त्याला बेसिक स्वयंपाक सुद्धा येत होता , मुळात त्याला आवडही होती  त्यामुळे सकाळीच लवकर उठून चीझ sandwitch आणि त्याची आवडती bru कॉफी पिऊन तो बाकीचे आवरत  होता, आठला कंपनीची बस येणार होती आणि अगदी त्यांच्या घरापाशीच बसचा थांबा होता.  त्याच्या आवडीचा sky ब्लू कलरचा फुलं शर्ट आणि black pant घालून तो आरश्यात स्वतःचे प्रतिबिंब न्याहाळत होता. सहा फुट उंची, गोल चेहरा , गव्हाळ रंग आणि ट्रिम केलेली फ्रेंच कट दाढी, खूप देखणा होता तो , आणि त्याला ह्याची कल्पना होती . कॉलेज मध्ये असताना तर सगळ्या मुली त्याच्यावर फिदा होत्या , पण सगळ्या केवळ मैत्रिणीच , कुणी अशी खास त्याच्या जीवनात अजूनही आली नव्हती , आणि त्याला अजिबात त्याची घाई सुद्धा नव्हती.

आरश्यात बघत आवरता आवरता समोरच्या खिडकीतून एक गोड चेहरा डोकावलेला त्याला दिसला , त्यानेही नीट बघितलं तर कुरळ्या केसांची , गोबऱ्या गालांची गोरी गोरी पान अशी ती दोन तीन वर्षांची मुलगी होती. प्रचंड गोडवा होता त्या मुलीच्या चेहऱ्यावर. नवीनच कुणीतरी राह्यला आले असणार त्याला वाटले. कारण सगळेच ओळखीचे होते . पण हि मुलगी त्याने कधीच पहिली नव्हती. त्या मुलीनेही त्याच्याकडे बघून एक गोड स्माईल दिले. त्यानेही तिच्याकडे बघून ‘हाय’ म्हणून हात हलवत एक मस्त स्माईल दिले.  तिच्या बाजूलाही कोणीतरी असल्याचे त्याला जाणवले , कदाचित तिची आईच असावी, पण त्यांच्या खिडकीच्या पडद्यामुळे ती नीट दिसत नव्हती.  आणि उगाचच तो  विचारही करायला लागला की ‘हि मुलगी इतकी गोडे तर हिचे आई वडील पण तितकेच सुंदर असणार’ त्याला खूप उत्सुकता लागून राहिली त्यांना सुद्धा बघण्याची.

लवकर आटोपले असल्या कारणाने तो gallary मध्ये आला आणि तिथे  उभं राहून समोरच्या घरात डोकावू लागला. तितक्यात खिडकीचा पडदा वाऱ्याने पूर्णपणे बाजूला झाला आणि त्या लहान मुलीसारखीच गोड, कुरळ्या केसांची , गोरीपान , जीन्स आणि short top असे आधुनिक कपडे घातलेली एक सुंदर मुलगी  खिडकीत त्याने बघितली. ‘किती सुंदर आहे हिची आई सुद्धा’ असा मनात विचार करत असताना वडील कसे असतील म्हणत तो त्यांच्या घरात इकडेतिकडे बघू लागला. पण त्या दोघीं शिवाय त्याला कुणाचीच चाहूल त्या घरात दिसली नाही. आणि अचानक त्याचे घड्याळाकडे लक्ष गेले , तो दचकला ‘अरे बापरे आठला पाच मिनिटे!’ gallary चा दरवाजा पटकन बंद करून  bag , रुमाल  , मोबाईल आणि घराची किल्ली घेऊन कुलूप लावून तो चौकात येऊन बसची वाट बघत उभा राहिला. काहीही कारण नसताना त्या दोन मुलींचे विचार काही केल्या त्याच्या मनातून जात नव्हते “वडील दिसले नाहीत अजिबात, कुठे बाहेरगावी गेले असतील ?, की कुठे दुसरीकडे नोकरी करत असतील ? , पण आई आणि मुलगी दोघीच कश्या राहतील ना?

तेवढ्यात बस आली आणि अभिजित नोकरीच्या पहिल्या दिवसासाठी बसमधून कल्याणला रवाना झाला.  नवीन कामाची ओळख , तिथल्या staff शी ओळख आणि नवीन वातावरणात रुळण्यातच  अभिजीतचा पहिला दिवस संपन्न झाला.

सहा वाजता बसने अभिजीतला घरापाशी सोडल्यावर तो bulilding मध्ये शिरत असतनाच समोरच्या buliding मध्ये  सकाळची आई आणि  मुलीची जोडी गाडीवरून शिरताना त्याने पाहिली. तो आत आला तेव्हा ती गाडी पार्किंग ला लावत असलेली दिसली. बरीच shopping केलेली दिसत होती. तिने स्कुटी पार्क केली आणि मुलीला हाताशी धरत ती जिना चढायला लागली . पण त्या सर्व bags सांभाळत त्या छोटीला हाताला धरून  तिला जिना चढणे मुश्कील वाटत असल्याचे त्याला दिसले. तो तत्परतेने तिला मदत करायला पुढे झाला “may I?” त्याने अदबीने तिला विचारले आणि तिनेही संकोच न करता “प्लीज , प्लीज” करत त्याच्या हातात एक दोन bags दिल्या आणि हसून लगेच “thanks” पण म्हणून टाकले. “अरे thanks कशाला , शेजारधर्म आहे हा , आणि डोंबिवलीत तो अगदी पुरेपूर तुम्हला बघायला मिळेल बरं का”

“yes , I know, मी हि डोंबिवलीचीच बरं का आणि”

“ओह … काय सांगताय?, पण इथे ह्या area त प्रथमच बघत आहे तुम्हाला”

“हो, वेस्टला रहायचो आम्ही पूर्वी, पण आता इथे इस्टला आलोत आम्ही दोघी रहायला आणि मला त्यामुळे  डोंबिवली माहित आहे, बाय द वे माझं नाव क्षिती, आणि हि पिहू ….तुमचं नाव ?”

“मी अभिजित , अभिजित देशपांडे”

क्रमश:

पुढील भागाची लिंक-  आणि valantine गोड झाला- २

Image by StockSnap from Pixabay 

Chapekar Manasi

Chapekar Manasi

कविता ,लेख ,ललित आणि कथा लिखाण,नवीन पदार्थ तयार करणे आणि खिलवणे म्हणजेच एकंदर स्वयंपाकाची आवड , अभिवाचन, आणि गाण्याची आवड आहे ,आणि हे उत्तम जमते . ओंजळीतील शब्दफुले ह्या स्वलिखित आणि स्वरचित कवितांच्या कार्यक्रमाचे 40 कार्यक्रम संपन्न अनेक कवी संमेलनात आमंत्रण आणि कथेला बक्षिसे प्रभात वृत्तपत्रात दर शुक्रवारी अस्मिता ह्या सदरात लेख प्रकाशित .तसेच अनेक वृत्तपत्र आणि मासिकांत लेख ,कथा ,कविता प्रसिद्ध निसर्गाचे फोटो काढण्याची आवड ,कारण फोटो ग्राफरची नजर लाभली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!