आणि valantine गोड झाला- २

आधीच्या भागाची लिंक- आणि valantine गोड झाला- १

त्याला तिचा ‘दोघी’ हा शब्द खटकला होता, तो परत विचार करू लागला. म्हणजे नवरा असेल बाहेरगावी नोकरीला कदाचित , किंवा घटस्पोट ? अपघात ? की आणखी काही ?. पण तो का विचार करत होता इतका त्यालाही कळेनासे झाले.

तिने घराचे दार उघडले आणि “या ना आत, एक एक कॉफी होऊन जाऊ दे”

त्याला आज मावशीकडे जेवायला बोलावले होते आणि मावशीच्या मुलाचे लग्न ठरले असल्या कारणाने बरीच कामेही होती

“सॉरी, पण …आज नको , मला जरा बाहेर जायचे आहे , परत कधीतरी नक्की , आणि हो तुमची मुलगी फार फार गोडे , मुळात हे कुरळे केस, गोबरे गाल , नजर काढत जा हिची रोज” असं म्हणून त्याने तिच्या गोबऱ्या गालांचा पापा घेतला आणि तो दोघींचा निरोप घेऊन तो जाण्यासाठी वळला सुद्धा . आणि क्षिती मात्र ‘तुमची मुलगी’ ह्या वाक्यापाशीच रेंगाळत होती

मावशीकडे आज पावभाजीचा बेत होता. मावशीचा मुलगा निखिल ह्याचा काही महिन्यांपूर्वी साखरपुडा होऊन आता दहा दिवसांवर लग्नही आले होते. निखील आणि अभिजित अगदी लहानपणापासून  एकत्र राहिलेले, खेळलेले त्यामुळे त्यांची अगदी घट्ट मैत्री होती. दोघानाही एकमेकांबद्दल सगळं काही माहित होते. त्यामुळे आज अभिजीतचे काही खाण्याकडे लक्ष नाही ते त्याच्या पटकन ध्यानात आले. आणि ते खरंही होतं. अभिजित एकीकडे पावभाजी खात निखिलच्या प्रश्नांना केवळ ‘हं, हं’ असेच उत्तर देत होता कारण तो क्षितीचा आणि पिहुचाच विचार करत होता.

जेवण झाल्यावर बाईकवरून निखील अभिजीतला घरी सोडायला निघाला. आणि त्याने मगाचपासून मनात खदखदत असेलला प्रश्न अभिजीतला शेवटी विचारलाच “काय रे , प्रेमात वगैरे पडलास की काय कोणाच्या, ऑफिसमध्ये पहिल्याच दिवशी”

“गप रे …. काहीही काय”

“मग मगाचपासून बघतो आहे, तुझं लक्षच नाहीये कशातच, आणि हे असं प्रेमातच होतं, तुझ्यासमोर उदाहरण आहे अगदी ताजं ताजं” असं म्हणून निखील स्वतःकडे बोट करत हसत सुटला.

हो …. निखिलचे सुद्धा love marriage च ठरले होते आणि हे तो अनुभवातून बोलत होता

“अरे प्रेम वगैरे नाही , पण आमच्या समोरच एक नवीन कोणीतरी राहायला आले आहे , म्हणजे नाव तिचं क्षिती आणि तिची एक मुलगी आहे सोबत तिच्या , अगदी गोड , कुरळ्या केसांची, आणि अजून कोणीच दिसत नाहीये सोबत , म्हणजे त्या मुलीचे वडील अर्थात . आज सकाळी आमची अगदी जुजबी ओळख झाली , तेव्हा तिने तिचं नाव सांगितलं , पण नवऱ्याबद्दल काहीच बोलली नाही , आणि उगाच मी हि नाही विचारलं….. तर तेच विचार रे बाकी काहीही नाही , तुला जसं वाटत आहे तसं”

“अरे पण आत्ता आत्ता ओळख झालेल्या कोणा बद्दल इतके विचार करत आहेस , की बाकी काहीही दिसत नाहीये तुला समोर?आईला तू जाताना नीट येतो म्हणूनही बोलला नाहीस , ना पावभाजीची नेहमीसारखी तोंडभरून तारीफ केलीस. अरे भावा हे तुझं वागणं कोणाच्याही लक्षात येईल कळतंय का तुला ?”

“अरे …. sorry खरंच , मी करतो मावशीला घरी पोहचलो की फोन नक्की”

निखिलने त्याला बिल्डिंगपाशी सोडलं आणि ‘बाय’ करून तो परत त्याच्या घरी निघून गेला. खरंतर अभिजितकडे सुद्धा त्याची बाईक होती, पण ते सगळे shoppingला जाणार असल्याने त्याने आज ती नेली नव्हती. तो घरी आला आणि घरातील  दिवे लागल्यावर सहज त्याचे समोरच्या खिडकीकडे लक्ष गेले. क्षिती आणि पिहू दोघीजणी बेडवर लोळत मस्ती करत होत्या. हसत खिदळत होत्या. क्षिती खरंच खूपच सुंदर होती दिसायला. आत्तासुद्धा नाईट ड्रेस आणि वर बांधलेले केस , ह्या घरगुती वेशातही ती देखणी दिसत होती. पिहू मध्ये हा तिचा गोडवा पुरेपूर आलेला होता. ‘किती भाग्यवान आहे हिचा नवरा , गोड मुलगी , सुंदर बायको’

आणि अचानक निखिलचे वाक्य त्याच्या मनात घोळू लागले , की ‘प्रेमात पडला आहेस का?

प्रेम ??? कसं शक्य आहे , एका विवाहित स्त्रीवर प्रेम कसं करू शकतो मी . आणि एकाच भेटीत ? नाही नाही हे शक्यच नाही , पण मग सतत तिचेच विचार का येत आहेत डोक्यात ?, हे बरोबर नाही , म्हणून gallary चे दार बंद आणि खिडकी सुद्धा बंद करून तो कपडे बदलून झोपायचा प्रयत्न करू लागला. मुद्दाम ऑफिसचे विषय डोक्यात आणू लागला. आणि त्याला कधी झोप लागली कळलंच नाही.

अशी आता जवळ जवळ रोजच त्या तिघांची भेट होऊ लागली . कधी सकाळी तो ऑफिसला जात असताना ती walk वरून परत येताना भेटायची तर कधी संध्याकाळी ती पिहुला खाली घेऊन आलेली असायची खेळायला तेव्हा.

आणि ह्या भेटी दरम्यान त्याला त्या दोघींबद्दल थोडेफार जे काही कळले होते ते म्हणजे पिहुचे आई वडील म्हणजेच क्षितीची सख्खी बहिण आणि तिचे मिस्टर सहा महिन्यांपूर्वी एका कार अपघातात on the spot गेले होते आणि आता पिहू क्षिती सोबत राहत होती  ….

एका सकाळी त्याला कोणाच्यातरी रडण्याने जाग आली. तो डोळे चोळत उठला आणि gallary चे दार उघडून कानोसा घेऊ लागला , की इतक्या सकाळी कोण रडत आहे?, आणि त्याला जाणवले की आवाज समोरच्या घरातून येत आहे. हो … तो पिहुचाच आवाज होता . आणि तो आवाज तिला खूप काही त्रास झाल्यानंतर रडत आहे असा होता. त्याला कळेना काय करावे , खिडकी तर लावलेली होती समोरची , पण आतमध्ये क्षितीची सावली दिसत होती . ती पिहुला थोपटत होती आणि शांत करत असल्याचे त्याला जाणवले. का रडत असावी पिहू ? बरं नसेल का ? वडिलांची आठवण येत असेल म्हणून इतकी आर्त रडत असेल हि? एकदा मनात आले जाऊन विचारावे तडक की काही मदत हवी आहे का? पण तिला आपण इतक्या सकाळी जाऊन असं विचारणं योग्य दिसेल का? पण तिचे रडणेही ऐकवत नव्हते त्याला. त्याने अगदी दोन मिनिटांत पटकन ब्रश केलं आणि केस वगैरे नीट करून तो क्षितीच्या घरी आलाच . बेल वाजवल्यावर दोनच मिनिटांत कडेवर रडणाऱ्या पिहुला घेऊन असलेली क्षिती बरीच केविलवाणी आणि घाबरलेली दिसत होती…

क्रमश:

पुढील भागाची लिंक- आणि valantine गोड झाला- ३

Image by StockSnap from Pixabay 

Chapekar Manasi

Chapekar Manasi

कविता ,लेख ,ललित आणि कथा लिखाण,नवीन पदार्थ तयार करणे आणि खिलवणे म्हणजेच एकंदर स्वयंपाकाची आवड , अभिवाचन, आणि गाण्याची आवड आहे ,आणि हे उत्तम जमते . ओंजळीतील शब्दफुले ह्या स्वलिखित आणि स्वरचित कवितांच्या कार्यक्रमाचे 40 कार्यक्रम संपन्न अनेक कवी संमेलनात आमंत्रण आणि कथेला बक्षिसे प्रभात वृत्तपत्रात दर शुक्रवारी अस्मिता ह्या सदरात लेख प्रकाशित .तसेच अनेक वृत्तपत्र आणि मासिकांत लेख ,कथा ,कविता प्रसिद्ध निसर्गाचे फोटो काढण्याची आवड ,कारण फोटो ग्राफरची नजर लाभली आहे.

One thought on “आणि valantine गोड झाला- २

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!