वॉलेट
आज पुन्हा तो बेचैन होता. त्याचं वॉलेट सापडत नव्हतं. चार ते पाच हजाराची रक्कम सोडली तर तसं फारसं काही मौल्यवान नव्ह्तं त्यात. पण त्याची ही जुनी सवय, वॉलेट विसरण्याची,….. अन पुन्हा त्या साठी तगमग करत राहण्याची.
आता नक्की कुठं विसरलं असेल ? नेहमी विसरतो तिथे, …. त्या ‘अमृततुल्य’मध्ये कदाचित….. कदाचित जॉगिंग गार्डनमध्ये…… सार्वजनिक वाचनालयात. त्याच्या रिटायर्ड ग्रुपमधल्या जवळ जवळ प्रत्येकाला फोन करून झाला होता. पण काहीच तपास लागत नव्हता.
विसरभोळेपणा अगदी लहानपणी पासूनचा. म्हणून तो कॉलेजमध्ये गेल्यावरही वॉलेट वापरत नव्हताच. असेही किती पैसे खिशात असायचे त्याकाळी? पण तिने गिफ्ट दिले अन वॉलेट वापरायची सवय लागली. कॉलेजला सुटी लागली की दोघेही गावी निघायचे. बहुतेकवेळा एसटी स्टँडवर भेट व्हायची. विशेषकरून दिवाळीच्या सुटीत घरी जाताना, तिच्यासाठी तो जागा पकडायचा. नंतर नंतर तिलाही ती सवय झाली. कधीमधी तीही त्याच्यासाठी सीट पकडू लागली. मोबाईल कम्युनिकेशन नसतानाही, हे कनेक्शन मात्र बरोबर लागायचं. त्या दिवशी, तिच्याकडे सुटे पैसे नसताना, त्यानं तिचं तिकीट काढलं, अन तिच्या लक्षात आलं, हा वॉलेट वापरतच नाही.
खरंतर एकाच शाळेत एकाच वर्गात असूनही, फारसं बोलणं नव्हतंच. पुढे ती मेडिकलला गेली, तो इंजिनिअरिंगला. कॉलेज वेगळं, क्षेत्र वेगळी, ध्येय वेगळी, मित्र परिवार वेगळा. एका सुटीत मात्र, एसटी स्टँडवर भेट झाली, अन बोलणं सुरू झालं. एकमेकांविषयीचं सुप्त आकर्षण परस्परांना जाणवलं. पण तरीही एकत्र एसटी प्रवासाच्या पुढे गाडी सरकलीच नाही. तिने वॉलेट दिले ….. त्यानंतरही बरेच प्रवास सोबतीने झाले, ……. कधी एकाच सीट्वरुन, कधी एकाच एसटी मधुन….. भरपूर गप्पा व्हायच्या….. फ्रिक्वेन्सी जुळतेय हे पदोपदी जाणवायचं. ….पण मनातलं जे सांगायचं ते मात्र राहून गेलं…..
तरीही तिची सोबत मात्र कायम राहीली.
हळुहळु, ……. ती सोबत नसतानाही, सोबत करु लागली.
एका मोठ्या मल्टिनॅशनलमध्ये त्याचं सिलेक्शन झालं. पण तिचं लास्ट इयर बाकी होतं. ते होईपर्यंत त्याला धीर धरणं अशक्य झालं होतं. हल्ली तिच्या कॉलेजकडे त्याच्या चकरा वाढल्या होत्या. गुरुवार त्याचा वीकली ऑफ. तिला वेळ असो ….. नसो, त्याच्याकडे पुर्ण दिवस असायचा ……. तिची वाट पाहण्यासाठी.
पुन्हा दिवाळी आली. एकत्र घरी निघण्याची तारीख,…… तिच्या कॅन्टीनमध्येच नक्की झाली.
“मी तुझ्या हॉस्टेलवर येईन. तिथुन एकत्रच निघु…….” जाता जाता तो म्हणाला.
मारुती ८००,……. आयुष्यातली पहीली गाडी. कर्ज काढुन घेतली होती. दरम्यान ड्रायव्हिंग शिकुन घेतलं होतं. या प्रवासात त्याला बरंच काही सांगायचं होतं. कार हे मात्र तिच्यासाठी सरप्राइझ असणार होतं. वेळ ठरली होती. तिने बाहेर येउन थांबणं त्याला अपेक्षित होतं. पण ती गेटवर नव्हती. तो गडबडीत उतरुन आत गेला. हॉस्टेलच्या एंट्रिलाच केअरटेकर मॅडम भेटल्या. त्यांनी त्याला ओळखले. त्या थांबल्या.
“शैला, …….. गेली घरी.”
“कधी ?”
“चार दिवसापुर्वीच तिचे पॅरेंट्स आले होते……….” मॅमनी एक पॉज घेतला. “बहुतेक तिच्या साठी त्यांनी स्थळ पाहीलं होतं. डॉक्टरच आहे मुलगा.” यावेळी मॅडम त्याच्या डोळ्यात पहात होत्या.
व्यक्त होण्याआधीच त्याची कथा संपली होती.
नजर चुकवत तो तिथून निघाला. मारुतीला स्टार्टर मारला. त्या तंद्रीतच ड्राइव करत गावी कधी पोहोचला तेही कळलं नाही. घरी दिवाळीची कोण लगबग सुरु होती…… दादा कधी नव्हे ते सुट्टी टाकुन आला होता. वहीनी दिवाळीचे पदार्थ बनवण्यात व्यस्त होत्या. आई देखील किचनमध्ये बिझी होती. दादाची बाळं अंगणात टिकल्या वाजवण्यात व्यस्त होती.
चकल्यांची चव पहायला म्हणून वहीनी डिश घेउन बाहेर आल्या.
“भाउजी, …… कळलं का काही….. तुमच्या बालमैत्रिणीचं …….शैलाचं लग्न ठरलं म्हणे. याच महिन्यातला मुहुर्त काढलाय.”
त्यानं ऐकुन न ऐकल्यासारखं केलं. अन खिशातलं वॉलेट शोकेस मधल्या त्याच्या अनेक ऍवॉर्डसच्या मागे टाकुन दिलं.
…………………. …………………….
नोकरी पुर्ण होण्याआधीच, मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या त्यानं पुर्ण केल्या. बायकोनं त्याआधीच त्याच्या आयुष्यातुन रिटायरमेंट घेतली. एखादं वर्षापुर्वी तो रिटायर झाला तेव्हा गावचं घर विकलं, …… अन सगळंच जुनं सामान बाहेर निघालं. तेव्हापासुन पुन्हा शैलानं दिलेलं वॉलेट त्याच्या आयुष्यात आलं. मुलांचं आपापलं आयुष्य होतं. त्याच्या एकांडी आयुष्यात ते वॉलेट त्याचं सखा सोबती झालं होतं. भरपूर काही होतं त्यात. आठवणी,…. जुने स्पर्श …. त्याच्याशी एकांतात मारलेल्या गप्पा ….. अन त्या दिवशी दिवाळीसाठी निघाला तेव्हा, …….तिला देण्यासाठी लिहिलेली चिट्ठी देखील तशीच होती…… पिवळसर झालेल्या कागदाची ती घडी …. हल्ली हल्ली तो उघडून बघायचा. त्यावर ना तिचं नाव होतं ना त्याचं.
असं बरंच काही होतं त्या जुन्या वॉलेट मध्ये……. नव्हता तो फक्त त्याचा पत्ता.
त्या रात्री तो खुप रडला. तिचं लग्न झालं तेव्हा रडला नसेल इतका रडला. तिची खुप आठवण येत राहीली. अन बायकोचीही. लग्नानंतर त्यानं, तिलाही सर्व सांगितलं होतं.
इतक्यात फोनची रिंग वाजली. मित्राचा कॉल होता.
“तुझ्या नातवाने फेसबुक वर अकाउंट उघडुन दिलं होतं ना रे तुला?”
“हो हो, …… पण त्याचं काय आता ? ……. आधी माझं वॉलेट सापडलं का ते सांग…”
“हो तेच सांगतोय. मी व्हाट्सप्प वर एक स्क्रिनशॉट पाठवलाय तो चेक कर जरा.” त्याने फोन कट केला.
त्यानं घाईघाईने व्हाट्सप्प उघडुन पाहीलं. अन पुन्हा घाईघाईने मित्राला फोन लावला.
“अरे ते माझंच वॉलेट आहे. ….. कुठून मिळाला हा फोटो ? खरंखरं सांग़ …..”
“अरे गाढवा,…… नुसताच फोटो पाहीलास….. त्याच्या खाली फेसबुकची लिंक दिली ती नाही पाहीलीस. ती पहा आधी….”
पुन्हा फोन कट झाला.
आता त्यानं लिंक उघडली. त्या वॉलेटचा फोटो त्याला समोर दिसत होता. अन फोटोवर लिहिलेल्या चारोळी तो वाचत होता…..
“बंद कुपीतला तुझा निरोप किनाऱ्यावर पोहोचलाय,
माझ्या मनाने ऐकलेला,… आज शब्दात वाचलाय…..”
S…D….
प्रसिद्ध कवयित्री Dr. Shaila Deshmukh यांची वॉल होती ती…..
प्रोफाइल फोटो त्यानं नीट झूम करुन पाहीला.
तीच खळी,…… बॉब कट ही अजुन तसाच ……. डोळ्यांमधली गहराई एखादं दुसऱ्या सुरकुतीनं वेढलेली. बराच वेळ गेला तिचा फोटो निरखण्यात……
संपुर्ण वॉलचं त्यानं पारायण केलं ……. अन लक्षात आलं, परवा मित्र ऍडमिट होता म्हणून भेटायला गेलो ते तिचंच हॉस्पिटल. बहुधा, तिथेच गहाळ झालं होतं हे वॉलेट…….
त्याच्याही नकळत, …… पुन्हा एकदा त्यानं add friend वर क्लिक केलं……
©बीआरपवार
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
Superb
Superb chanach
सुंदर
Apratim
Chhan
खूप छान
Chhaan