मन तळ्यात मळ्यात…१
7 निरामय बंगला नागेवाडी सातारा… काच खाली करत असीम नी आपली आलिशान फोर्ड थांबवली … टपरीवरच्या म्हातारीला पत्ता विचारला… नागेवाडीला पोचून डाव्या बाजूचा मातीचा कच्चा रस्ता पकडला होता.. पण आता समोरचा भकास एकाकी रस्ता बघून त्यानं ड्रायव्हरला जरा पाय मोकळे करायची संधी दिली… आणि दोघांनी टपरीवर कटिंग मागवला… मगाशी उन्हानं काहिली करणारा सूर्य आता ढगाआड लपला… आणि अचानक वातावरण पालटलं… गाभुळ लाल रंगाचं आभाळ आणि विजांचा लपंडाव सुरु झाला…
असीम राजवाडे, वय 30, गोरापान मध्यम उंचीचा आणि पैलवानकी करून कमावलेल्या शरीराचा आणि कानात भिकबाळी, कोरीव दाढी आणि मिशी…आणि कानात अत्तराचा फाया .. एका सधन सुखवस्तू कुटुंबातला, यात एक विलक्षण गोष्ट होती त्याच्याकडे… ऋतू प्रमाणे रंग बदलणाऱ्या डोळ्यांचा… जसं उन्हाळयात पिंगट.. पावसाळ्यात हिरवट करडे आणि हिवाळ्यात निळसर… हा काही दृष्टी दोष नव्हता तर एक विचित्र निसर्गदेणगी होती.. हा घरात शेंडेफळ आणि थोरल्या भावानी आफ्रिकेचा रस्ता धरला त्यामुळे लहान वयातच हा मयूरपंख प्रकाशनाचा सर्वेसर्वा झाला.. नाशिक मधलं प्रसिद्ध प्रकाशन…
दुर्मिळ पुस्तकांचे उत्तम रित्या जतन करून पुनः प्रकाशन हा त्याचा छंद.. गूढ ज्ञान, ज्योतिष हे त्याचे आवडते विषय.. आणि एखादी पुरातन गोष्ट अमुक एखाद्या कडे आहे असं कळलं तरी हातातली काम टाकून आधी ती पाहण्याचा वारसा आजोबांकडून मिळालेला.. विश्वनाथ राजवाडे… पुरातत्व विभाग प्रमुख नाशिक ह्यांच्याकडून
तर आज अशीच एक गोष्ट पाहायला तो साताऱ्यातल्या अभ्यंकरांकडे चालला होता.. चहाचे पैसे देऊन तो गाडीत बसला आणि गाडी निघाली… संदीप खरे त्याचा आवडता कवी… त्यानं प्ले लिस्ट on केली… सांगितलेल्या पत्त्यावर पोचायला अजून 15 मिनिट लागणार होती…. त्यानं ही गुणगुणायला सुरुवात केली…
मन तळ्यात मळ्यात
जाईच्या कळ्यात
मन नाजुकशी मोती माळ
तुझ्या नाजुकश्या गळ्यात…
एक चढण ओलांडून अभ्यंकरांचा बंगला वजा वाडा दिमाखात उभा होता… हा बंगला तब्बल 100 वर्ष जुना होता… भक्कम चिरेबंदी बांधकाम, विटकरी रंगाचा आणि आधुनिक सोयींनी सुसज्ज… वामन दीक्षित त्या काळातलं स्थापत्य शास्त्र प्रमुख साताऱ्यातलं प्रतिष्ठित कुटुंब…
त्यांची तिसरी पिढी आता ह्या वाड्यात राहातं होती.. आणि नुकतीच वाड्याची डागडुजी करताना त्यांना काही पुरातन वस्तू सापडल्या आणि म्हणूनचं त्यांनी असीम ला संपर्क केला..
जसं जसा तो वाडा दिसू लागला तसं तसा हवेत एक प्रकारचा गारवा जाणवू लागला. वाड्याच्या भवती गर्द झाडी होती…
असीम ची गाडी वाड्याबाहेर थांबली…
बंगल्याच्या पाटीवर कोरलेली नाव…”निरामय “..
संगमरवरी फरशीत कोरलेलं नावं…
कोरीव नक्षीचं पितळी दरवाजा ओलांडून तो पुढे आला..
वाड्याच्या जागोजागी त्याच्या गत वैभवाच्या खुणा दिसत होत्या…
तो आत आला तसा एक नोकर पुढे आला… त्याचं नाव सांगताच तो मालकाला वर्दी द्यायला आत गेला.. असीम आता त्या वाड्याच्या भव्य दिवाणखान्यात बसला होता… बसायला सागवानात घडवलेलं फर्निचर .. आतल्या भिंतीचा जुनाट पिवळसर रंग वातावरण अधिकच गूढ बनवत होता. छताला नाजूक नक्षीच झुंबर होत आणि लोखंडी गजांवर रुळणारे तलम पांढरे पडदे.. दर्शनी भागात मध्यभागी नाजूक कशिदाकामानं नटलेले वॉलपीस तर एका भिंतीवर एका जुन्या काळातल्या स्त्री चं पेंटिंग.. बाकी जागोजागी अँटिक वस्तूंची रेलचेल यात काही लाकडी कोरीव काम केले खांब ही होते… कुठे टोल्याचं घड्याळ तर कुठे पितळ्या त घडवलेल्या फुलदाण्या..
असीम ची तर नजरबंदीच झाली जणु… म्हणूनच मगाच पासून आणून ठेवलेलं चांदीचं तांब्या भांड त्याला अद्याप दिसलं नव्हतं… घशाला कोरड पडल्याची आठवण झाली ण क्रोशाच्या नक्षीकामानं नटलेल्या कापडावरचा तांब्या त्यानं उचलला… पाणी पीत असतानाच त्याला त्याच्या मागे नाजूक पैंजणांचा आवाज आला.. त्यानं वळून पाहिलं… आणि त्या लावण्यानं त्याला रानभूल पडावी तसं झालं…
पण हा दर्शन योग फार काळ टिकला नाही.. ती तरुणी आतल्या खोलीत निघून गेली…
घराचा सध्याचा मालक विराज दीक्षित बाहेर आला.. उंच गोरा तब्येतीने काटक आणि काळ्याभोर चमकदार डोळ्यांचा… सध्या लंडन मधे राहणारा आणि केवळ वाड्याचं काम काढलंय म्हणून येऊन राहिलेला… तसा समवयस्कचं…
हॅलो मी विराज…. मीच आपल्याला फेसबुक वरून कॉन्टक्ट केला होता..
हाय.. असीम उठून उभा राहिला..
बसा… काही प्रवासात त्रास नाही ना झाला… पत्ता सापडला ना…
हो… तसे फारसे कष्ट नाही झाले..
इतक्यात नोकर चहा की कॉफी विचारायला आला…
दोघांसाठी आल्याचा चहा आणायला सांगून तो उठला आणि आतल्या खोलीत जाऊन आला. विराज नी आल्यावर त्याच्या हातात एक पिवळ्या रेशीम कापडात गुंडाळलेली वस्तू दिली…
हिच ती गोष्ट.. ज्या बद्दल मी आपल्याशी बोललो होतो.. बघा हे काय असू शकत..
ती वस्तू उघडून असीम नी समोर ठेवली… एखाद्या जुन्या खलित्याचा बॉक्स किंवा उदबत्तीचा उभा पितळी बॉक्स सारखा दिसतोय.. तसंच हे पण बघा… कालच सापडली..
म्हणत त्यानं अजून एक गोलाकार वस्तु समोर ठेवली..
हे मात्र वेगळं प्रकरण होतं.. एक पितळ्याची गोल डबी म्हणावी तर तिला कप्पा नव्हता… तिच्या दोन्ही बाजूला 3नाग एकत्र वेटोळे घालून बसल्या सारखं चित्र आणि मध्यभागी एक भोक. ना किल्ली ना कप्पा केवळ गोल नक्षीदार जाड चकती.. असीम ती वस्तू न्याहाळत विचारात गढला..
अचानक विजेचा कडकडाट झाला आणि त्याची तंद्री भंगली… मगाशी दाटून आलेलं आभाळ आता बरसायला लागलं…. खिडक्यांची तावदाने वाऱ्याच्या झोताने आपटू लागली आणि पडदे विचित्र लयीत उडू लागले.. आधीच तिथली प्रकाश योजना धीमी त्यात आता लाईट गेले..
मग विराज उठून आत गेला आणि कंदील घेऊन आला… नोकराने देखील टांगलेला लामण दिवा लावला… ज्याच्या प्रकाशात ते मगाचंच पेंटिंग स्पष्ट दिसू लागलं ..
चहा आला..तसा असीम चहा घेऊन ती वस्तू न्याहाळत होता… इतक्यात विराज चा फोन वाजला… त्यांच्या वाईच्या फार्म हाऊस वर काहीतरी दुर्घटना झाली होती आणि त्याचं जाण अपरिहार्य होतं..
त्यानं दोन्ही गोष्टी आता असीम ला दिल्या आणि या तुम्हीच ठेवा मला नको आहेत म्हणत… त्याला आज राहून उद्या जा सांगितलं… नोकराला हाक मारून याची सोय लावून तो बाहेर पडला देखील…
आता त्या एवढ्या मोठ्या वाड्यात 4चं लोकं.. असीम ड्राइव्हर नोकर आणि… ती बाई… मगाशी डोकावलेली.. नक्की चारच ना !..
क्रमश :
©मानसी
Image by Enrique Meseguer from Pixabay
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
Wah mast vatatey gudhkatha
Thank you🥰
गूढकथा…. छानच,👌
Thank you😍
Intresting
Thanks a lot