आठवणींच्या_पटलावर
माझे शिक्षण हे आमच्या मुळ गावी म्हसुर्णेला झाले. त्यावेळी स्टॅंडच्या पलीकडे असणारी आमची मराठी जी.प. शाळा आम्हाला घरापासून खूप लांब वाटत असे. मला पहिली दुसरीचे आठवत नाही पण तिसरी चौथीला आम्हाला इनामदार गुरुजी होते. ते आमच्याच आळीत २ घरे सोडून पलीकडे राहत असत. त्याकाळी २ – ३ गुरुजी किंवा मास्तर मिळून सगळी शाळा हाकीत असत. प्रत्येक इयत्तेला स्वतंत्र गुरुजी हि अशी चैन नव्हती. शिवाय टीचर, मिस, सर वगैरे पालुपदही नव्हते… सरसकट सगळे गुरुजी असे म्हणत. सर हे प्रकरण आम्ही पाचवीत श्रीराम विद्यालयात म्हणजेच प्राथमिक शाळेतून हायस्कूलला गेल्यानंतर सुरु झाले.
शाळेला जाताना आई वडील पैकी कोणी शाळेत सोडायला वगैरे जाणे म्हणजे दिवसा सूर्य, चांदण्या आणि चंद्र सगळे एकाच आकाशात दिसण्यासारखे होते. मुलांना शाळेत सोडायला जाणारे पालक वगैरे त्याकाळी अंधश्रद्धा होती. पोरांना शाळेत सोडायला काय जायचे? असे तेव्हा वाटत असे की काय कोण जाणे. त्यामुळे आळीतील जी काही लहान मोठी मुलं शाळेत जात असत त्यांच्या घोळक्यात आपल्या मुलाला ढकलून दिले की काम होत असे. कारण ते मुल बरोबर त्या घोळक्याच्या प्रवाहात वाहत वाहत बरोबर शाळेच्या किनाऱ्याला जाऊन लागत असे. आमच्या सारख्या सदैव दुष्काळ पाहिलेल्या भागाला अर्थात हे असलेच प्रवाह आणि किनारे माहिती होते. आमच्या गावाचा ओढा आम्ही जास्तवेळा पहिला तो सुकलेला, कोरडा पडलेला. ओढ्याला पाणी वगैरे गोष्टी आम्ही अफवा समजत असू… तर ते असो.
आमच्या वेळी आम्हाला शाळेत माराबरोबरच न चुकता दिला जायचा तो उतारा. होय उतारा. आता हा शब्द म्हणजे कुठल्याही पेयानंतर आलेल्या हॅंगोव्हर किंवा भूतबाधा किंवा करणी वरचा उतारा नव्हे तर अभ्यासाचा उतारा असे. पोरट्यांना घरी जाऊन सुद्धा त्रास देण्याचा जालीम उपाय म्हणजे उतारा. हल्ली त्यास होमवर्क असे गोंडस नाव योजले आहे. पण आत्ताचे होमवर्क बघता आमच्या वेळचा उतारा बरा होता असे म्हणावेसे वाटते. त्यावेळी उतारा म्हणजे काय फार फार तर पाढे, एखाद्या धड्याच्या खालील प्रश्नोत्तरे किंवा शुद्धलेखन वगैरे असायचा. आत्ताचा होमवर्क बघता आमचा उतारा बरा असेच म्हणावेसे वाटते.
आमच्या मास्तरना किंवा गुरुजीना घरचे कोणी शाळेत पाल्याची चौकशी करायला आलेले मुळीच आवडत नसे. साहजिकच होते म्हणा… मला नेमून दिलेले काम मी व्यवस्थित करतो त्यासाठी तुम्ही येऊन फॉलोअप घेण्याची गरज नाही हे सरकारी शाळा असूनसुद्धा आमच्या गुरुजनांना वाटत असणार… आत्ताच्या सरकारी ऑफिसेस सारखी गोष्ट तेव्हा नव्हती. एखादे मुल नापास होते म्हणजे ते आपल्याला अपमानकारक होते असे वाटून गुरुजी स्वतः नीट सगळ्यांना कळेपर्यंत शिकवीत असत. माझ्याकडे तुमच्या मुलाला प्रायव्हेट टयूशनला पाठवावे असे काही गुरुजी सुचवत नसत.
अभ्यासाच्या वेळी अभ्यास, खेळाच्या वेळी खेळ हे व्यवस्थित करून घेतले जात. त्यामुळे शारीरिक आणि बौद्धिक वाढ दोन्ही होत असे. दिवाळीच्या सुट्टीतला अभ्यास हा मुलांना अभ्यासाचा विसर पडू नये म्हणून आणि तितकाच दिला जायचा. मुलांना सुट्टी सुद्धा मजेत घालवता येईल हे पण पाहिले जायचे. फक्त पोर्शन उरकण्याच्या मागे शाळा कधीच नव्हत्या.
हे एवढे सगळे आठवायचे कारण म्हणजे हल्लीचा चिरंजीवांचा अभ्यास आणि त्याचा होमवर्क. शिवाय ते प्रोजेक्ट नावाचं लचांड. आम्ही प्रोजेक्ट कॉलेजच्या लास्ट इयरला केला होता. पण इथे बिगर इयत्तेपासुनच प्रोजेक्ट्स आहेत. मला वाटते आमच्या लहानपणी आम्ही हे सगळे केले नव्हते म्हणून किंवा आम्हाला करायला मिळाले नव्हते म्हणून कारण काही असो पण आत्ताच्या शाळा आमच्याकडून आगदी मनोसोक्त प्रोजेक्ट्स करून घेताहेत.
भरमसाठ फिया भरून पालक सुटत नाहीत तर प्रोजेक्ट, होमवर्क, टयूशन नावाच्या चक्रव्ह्युहामध्ये आणखीनच अडकत आहेत. आम्ही आमच्या मराठी शाळेच्या शिक्षणावर तरुन गेलो. मी स्वतः ABCD पाचव्या यत्तेत म्हणजे वयाच्या ११ व्या वर्षी शिकलो. पण करिअर मध्ये कधी अडचण आली नाही. कामानिमित्त ८ – १० देश फिरलो पण कुठे काही अडले नाही. पण आमचा चिरंजीव सिनिअर के जी मध्ये असल्यापासूनच कर्सिव्ह मध्ये स्पेलिंग्स लिहितो, क्यापिटल, स्मॉल आणि कार्सिव्ह अशा तिन्ही लिपी लिहितो. आम्हाला फक्त चित्रकला नावाचा प्रकार होता. त्यातून फक्त बरी परिस्थिती असणाऱ्यांना पाण्याचे कलर्स मिळायचे बाकीच्यांना फक्त रंगीत खडू (हो म्हणजे क्रेयॉन्स) पण तरीही आयुष्य कलरफुल होतं… आनंदी होतं.
आत्ताच्या घडीला कितीही आणलं तरी ते कमीच आहे असे वाटत राहते. कॉम्पिटिशन वाढलीयच्या नावाखाली तर काय वाट्टेल ते करावे लागते. शाळेतूनच पुस्तके, पेन, पेन्सिल, रबर, वह्या, युनिफोर्म सगळे घ्यावे लागते. प्रोजेक्ट्स साठी लागणारे मटेरीअल बरोबर नेमक्या दुकानात मिळते इतरत्र नाही हे कुठेतरी ह्यांचे लागेबांधे असल्यासारखे वाटण्याला वाव आहे म्हणायला लावते.
आत्ता काय EVS बुक, drawing बुक, ब्लॉसम बुक असले काय काय प्रकार आले आहेत. परवा म्हणजे मकर संक्रांतीच्या वेळी शाळेतून नोटीस आली फक्त ट्रॅडीश्नल जेवण डब्यात पाठवा, त्याच बरोबर काईट करून पाठवा, तो पण कलरफुल हवा, मुलांना ट्रॅडीश्नल ड्रेस मध्ये पाठवा वगैरे वगैरे. आमच्या वेळी असले काही न केलेल्या आम्हाला तेवढीच करमणूक पण आणि वैताग पण. मग एक कार्डशीट पेपरचा पतंग म्हणजेच काईट बनवला… सजवला आणि दिला चीरंजीवांबरोबर स्कूल मध्ये पाठवून. टीचरने त्याचा काईट छान जमलाय म्हणून डिस्प्ले करिता ठेऊन घेतला म्हणे.
आमच्या शाळेचे मास्तर आम्हाला बरोबर घेऊन चालत शाळेत जात असत… स्कूलबस, व्हॅन हे प्रकार अस्तित्वात पण नव्हते (आमच्या वेळी, आमच्या गावात…. शहरांबद्दल कल्पना नाही) शहरीकरण, औद्योगिकरणाच्या झपाट्यात शहरं निर्माण झाली खरं पण आपण किती बेसिक आणि चांगल्या गोष्टींपासून लांब गेलो हे सुद्धा कळत नाही. इथे कित्येक शाळांना स्वतःची खेळाची मैदानं नाहीत. म्हणजे फक्त वर्गात बसून शिकायचे आणि घरी जायचे. मुलाची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी संध्याकाळी वेगळी फी भरून कराटे, डान्स, इतर कुठले गेम्स ह्यांचे क्लासेस लावायचे.
आमच्या गुरुजींनी मकर संक्रांतीसाठी म्हणून पतंग बनवून घेऊन या असला काही प्रोजेक्ट आम्हाला सांगितल्याचं माझ्या तरी स्मरणात नाही. शाळेच्या आठवणी आणि गावाकडच्या गोष्टी आता फक्त आठवणरुपात राहिल्या हेच खरं… त्यावेळचे ते दिवस तसे होते, आजचे हे दिवस हे असे आहेत आता पुढे जाऊन अजून आणखी कसे दिवस येतील हे आत्ताच कसे सांगू? आता पुढचे चित्र कसे असेल हे मी तरी छातीठोकपणे नाही सांगू शकणार. ह्या पूर्वी जसे होते आणि आत्ता आहे त्यापेक्षा कितीतरी वेगळे असेल हे मात्र खरं. शेवटी काय टाईम्स ह्याव चेंज्ड हेच खरं… कालाय तस्मै नमः
अभिजीत इनामदार
सिंहगड रस्ता, पुणे
Image by AkshayaPatra Foundation from Pixabay
Latest posts by Abhijit Inamdar (see all)
- पाऊस - July 30, 2021
- बडी ताकत के साथ… बहोत बडी जिम्मेदारी भी आती है - May 11, 2021
- आठवणींच्या_पटलावर - April 20, 2021
खुद्द चितळे मास्तर ना ते काळासोबत बदलावं लागलं तर आपली काय अवस्था……
Khare aahe
सुंदर वर्णन केलंत, म्हासुरणे आणि शाळेचं ……
Dhanyavad Sir