मन तळ्यात मळ्यात…. 2
आज खरं तर असीम प्रवासानं जाम दमला होता. त्यात त्या अवेळी आलेल्या पावसानं त्याचं मन पुन्हा उल्हसित केलं..
तो पुन्हा गुणगुणू लागला..
इथे वाऱ्याला सांगतो गाणी.. माझे राणी
अन चाहूल तुझ्या मनात…
वाड्यातल्या त्या शयनगृहाला खिडक्याही मोठमोठ्या होत्या. नवमी किंवा दशमी असल्यामुळे टिपूर चांदणं नसलं तरी एक प्रकारचा शीतल उजेड होता. थोड्याफार चांदण्याही दिसत होत्या. लांबवर एक भट्टी पेटलेली दिसत होती. बहुधा गूळ बनवायचं गुऱ्हाळ असावं. वाऱ्याच्या सुखद झुळका अंगावर घेत असीम कितीतरी वेळ खिडकीतच उभा, स्वतःतच हरवला होता.
त्या मोठ्या वाड्यात पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे वरच्या माडीवरच्या पॅसेज मधे ही अनेक पूर्वजांची पेन्टिंग्स लावलेली होती. पराक्रमी, कर्तृत्ववान पुरुषांबरोबरच रूपवती स्त्रियांचीही पेन्टिंग्स होती. असीम नेहमीच अशी पेन्टिंग्स मनःपूर्वक बघे. काळाच्या ओघात लोकांचे पेहराव, वागण्याबोलण्याच्या पद्धती याबरोबरच पेंटिंग्स बनवणाऱ्या कलाकारांच्या हातोटीत होणारे बदल टिपायला त्याला आवडायचे. त्याच्यामते ते नुसतं एक पेंटिंग नसून काळाच्या प्रवाहातलं एक वळण असतं. अनेक ठिकाणची शेकडो पेंटिंग्स त्यानं पाहिली होती. पण आज पाहिलेलं एक पेंटिंग काही त्याच्या डोक्यातून जात नव्हतं. एका सुस्वरूप तरुणीच्या त्या चित्रानं त्याला कोड्यात टाकलं होतं. ते चित्र अतिशय जिवंत वाटत होतं. इतकं की जरा काही मिनिटांच्या अवधीत ती तरुणी चित्रातून उतरून समोर उभी राहील असं वाटावं. त्या भल्यामोठ्या दिवाणखान्यात कुठेही उभं राहिलं तरी ती तरुणी आपल्याचकडे बघत आहे असं वाटत होतं.
मात्र असीम यामुळे गोंधळात पडला नव्हता. तो गोंधळात पडला होता यासाठी की ते चित्र पाहिल्यापासून सारखं त्याला असं वाटत होतं की आपण ह्या तरुणीला कुठे तरी भेटलोय. खिडकीबाहेर बघता बघता असीम त्याचाच विचार करत होता की कुठे पाहिलंय हिला आपण. काही केल्या त्याला ते आठवेना. विचार करून व गार वाऱ्यावर उभं राहून त्याला आता झोप अनावर झाली. तो पलंगावर आडवा झाला व काही वेळातच त्याला झोप लागली.
अचानक कशामुळे तरी त्याला जाग आली. उशाजवळचा मोबाईल साडेबाराची वेळ दाखवत होता. जाग का आली याचा अंदाज घेईतो असीमला खोली बाहेर पैंजणाचा आवाज आला.. आता इतक्या रात्री कोण बाहेर असेल? या विचारानं थोडा गांगरला… पण मग अचानक तो आवाज थांबला..
कदाचित भास झाला असेल असं वाटून त्यानं कूस बदलली.. आणि त्याचा चेहरा बाहेरून येणाऱ्या चंद्र प्रकाशात न्हाऊन निघाला .. अत्यंत मोहक रूप…
अचानक त्याला कुणी तरी त्याच्या कुरळ्या केसांतून बोटं फिरवल्याचा भास झाला .. पण तो स्पर्श इतका सुखद होता की तो अजून मिळावा या आशेनं त्यानं डोळे उघडलेच नाहीत . आता तो पुरता ग्लानीत होता… आणि हळू हळू त्याच्या शरीरात एक शिरशिरी उमटली… पुढे काय होतंय कळायच्या आत एक अत्यंत ऊबदार स्त्री स्पर्श त्याच्याशी सलगी करू लागला… सुरवातीला तो टाळावा का?
असं वाटूनही गेलं पण मग तो स्पर्श चिरपरिचित भासू लागला…
काही क्षणातच त्याचे ओठ कोरडे पडू लागले, आवेगांनी वेढल्याच्या स्पर्शखुणा जाणवू लागल्या… अंगावरचे कपडे ही बाजूला सरल्याचं जाणवू लागलं… अन मग एका क्षणी
त्याचं अंग घामानं निथळू लागलं .. एखाद्या स्त्री शी संपूर्ण संभोग केल्याच्या भावना दाटू लागल्या एक विचित्र अशक्त पणा अंगभर त्याला जाणवू लागला…
काय होतंय आपल्याला? असलं काय दिसतंय? भासतंय .. तीच चित्रातली स्त्री इतकी भावली की आपण तिच्या बरोबर एकरूप झालो ..?
अचानक हा विचार मनात येऊन त्याला जाग आली आणि छे… हे तर स्वप्न आहे… जवळ कुणीच नाहीये .. म्हणत तो उठून बसला .. त्याच्या पासून काही अंतरावर त्याला हालचाल जाणवली म्हणून त्यानं दरवाज्याकडे वळून पाहिलं… आणि समोर साक्षात तीच…
एका बाजूनं दिसणारा तिचा रेखीव चेहरा, केसांचा सैलसर अंबाडा, त्यातून डोकावणारा जाईच्या नाजूक कळ्यांचा विस्कटलेला गजरा, कानात मोत्याच्या कुड्या, चाफेकळी नाकात टपोरी हिऱ्याची नथ, गळ्यात बोरमाळ.. पांढऱ्या रंगाचं पोलकं आणि आमसुली रंगाचं इरकल नऊवार पातळ.. हातात पाटल्या… ती काहीतरी बोलत होती पण अजूनही ग्लानीत असल्यानं त्याला नीटसं कळत नव्हतं….
आता शब्द स्पष्ट कानावर पडत होते.
‘सैयां बिन नाही पडत मोसे चैन….’ती गाणं गुणगुणत पाठमोरी उभी होती…
कोण तुम्ही? आणि इथे काय करताय? तो भानावर येत म्हणाला…
त्याची चाहूल लागल्यासारखी तिनं मागे वळून पाहिलं. आणि त्या अंधूक चांदण्यात असीम दचकलाच. च्यायला, ही तर सेम त्या चित्रातल्या बाईसारखी दिसतेय. खरं तर मगाशी जेवण वाढायला आलेल्या नोकराकडे जुजबी चौकशी करताना कळले होते की आज फक्त विराजच घरी असणार होता आणि बाकीचे घरचे सगळे लोक काही कार्यामुळे मुंबईला गेले होते… आता तर विराज ही वाईला गेलाय.. मग ही कोण? त्या वाड्यात भूत वगैरे असल्याचं त्याला वाटलं ही नाही… इतरवेळी एखाद्या जागेतली negative energy त्याला नक्कीच जाणवायची… इथे तर उलट ऋणानुबंध असल्याचा फील आला होता.. dejavu…
पलंगावरून उतरत.. दोन पावलं पुढे टाकत तो तिच्या जवळ गेला व म्हणाला, कोण तुम्ही?
त्याचा प्रश्न ऐकून ती मंदशी हसली व असीम उडालाच. च्यायला, स्माईल पण सेम? तरी खात्री करावी याविचारानं असीम म्हणाला त्या चित्रातल्या बाईंसारख्या दिसताय हो अगदी. त्यांची भाची का पुतणी का नात आहात हो?
असीमच्या प्रश्नाचं उत्तर न देता तिनं जवळ येत त्याच्या चेहेऱ्यावरून हात फिरवत विचारलं.. ‘विश्वनाथ, मला ओळखलं नाहीस? मी सरोज….
मी तुझीच वाट बघत होते.’..
असीम आता हादरला होता. धीर एकवटून तो म्हणाला, कोण सरोज? आणि विश्वनाथ? हे नाव तुम्हाला कसं ठाऊक??
सरोजचं पहिलं प्रेम… विश्वनाथ.. असा कसा विसरलास रे मला?..
म म मी विश्वनाथ नाही…. असीम ची बोबडीच वळली… कारण आता तिच्यामागे आरसा होता तिथल्या काळसर लाकडी कोरीव कामात घडवलेला… ती दिसत होती.. पण प्रतिबिंब..? ते कुठं होतं?
मी त्यांचा नातू. मी हुबेहूब त्यांच्यासारखा दिसतो हे खरं आहे. पण तुम्ही माझ्या आजोबांना कशा काय ओळखता?.. आता धीर एकवटण्या पलीकडे तरी तो काय करू शकणार होता.. मगाशी घडलेलं स्वप्नच होतं की हिनं आजोबा समजून आपला ताबा घेतला होता.? हा ही एक थरकाप उडवणारा विचार त्याच्या मनाला चाटून गेला..
पुन्हा एकदा मंद हसून ती म्हणाली, ये बस इथे. घाबरू नको. मी तुला काही अपाय करणार नाही.
मी सरोज अभ्यंकर. खूप वर्षांपूर्वी तुझा आजा विश्वनाथ या वाड्यात काही कामानिमित्त येऊन राहिला होता. माझा थोरला भाऊ वामन व विश्वनाथ दोघे मित्र. कुठल्यातरी ऐतिहासिक संदर्भातल्या दस्तऐवजांचा अभ्यास करायला आणि तपासायला तो आला होता.
विश्वनाथ… विश्वनाथ राजवाडे…
गोरापान उंच धष्टपुष्ट.. निळसर गहिरे डोळे, अशीच उजव्या कानात भिकबाळी आणि डाव्या कानात चंदनी सुगंधाचा फाया.. डोक्यावर काळी टोपी, ब्राह्मणी तेज डोक्याचा घेरा आणि मानेवर रुळणारी शेंडी..
चाफेकळी नाक अन दुभंगलेली जिवणी.. अगदी अशीच..
अंगात काळा कोट आणि त्यावर साखळीच घड्याळ खांद्यावर पांढरं उपरणं, हातात त्र्यंबकेश्वराचा पंचरंगी धागा, उजव्या तर्जनीत लखलखणारा पुष्कराज आणि या तापट जमदग्नी ला शांत करणारा करांगुलीतला मोती.. लफ्फेदार धोतर पायात करकरीत वहाण.
तिनं इतकं अप्रतिम वर्णन केलेलं पाहून क्षणात त्याला त्याच्या प्रतिबिंबा जागी त्याचे आजोबाच दिसले..
माझी पहिली वहीली भेट ही तशी अकस्मातच झाली. . आणि तिनं लाजून खाली पाहिलं…
कुठे भेटली सरोज?
असीम ला नेमकं काय सांगायचंय तिला
गतकाळाच्या कुठल्या पानापाशी नियतीनं आणून सोडलंय त्यांना?
क्रमश:
Image by Enrique Meseguer from Pixabay
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
उत्सुकता वाढत आहे.
Thank you 🥰
Stunning
🤩🤩🙏
Pingback: मन तळ्यात मळ्यात…. 3 – LekhakOnline – Excellent Marathi Articles