सोयी तेवढ्या गैरसोयी…

आणि पाहुणे आल्यावर तर सगळ्या सोयी गैरसोयी म्हणूनच उभ्या ठाकतात…

फजिती होणार हे शंभर टक्के ठरलेलंच…

आमचं घर गावात असलं तरी सगळ्या सोयी आहेत हो आमच्याकडे…

तुम्ही कधीही राहायला या..अगदी बिनधास्त…

अंघोळीसाठी गॅस गिझर आहे आमच्याकडे, लाईट गेले तर इन्व्हर्टर आहे, पाणी सुद्धा आम्ही RO + UV चं पितो, दर चार चार महिन्यांनी पेस्ट कंट्रोल करतो, मुंगी नाही की डोंगळा नाही कुठे अजिबात, रात्री जेवण झाल्यावर आम्ही शतपावली करायला जातो बाहेर..तेव्हा कधीकधी आईस्क्रीम खातो..तो आईस्क्रीमवाला आहे ना आमच्याकडचा कसलं अफलातून आईस्क्रीम बनवतो..लाजवाब…

नविनच लग्न झालेली परी आपल्या माहेरच्यांना आनंदाने सांगत होती…

पहिल्यांदाच नव्हे जवळ जवळ चवथी पाचवी वेळ असेल हे सांगायची…

ऍट लास्ट..तिच्या काका काकूंनी ठरवलंच की तिच्या सासरी जायचंच…

आणि हो हो म्हणता ते आले सुध्दा परीकडे राहायला…

आल्यावर अगदी आनंदाने स्वागत झालं त्यांचं…

वेलकम ड्रिंक (कैरीचं पन्ह) का काय म्हणतात ते..ते सुद्धा पिऊन झालं…

काका काकूंनी पुतणीचं घर बघितलं…

सगळ्या सुख सोयींनी अगदी समृद्ध…

काका काकू खूष त्यामुळे पुतणीसुद्धा भलतीच खूष…

संध्याकाळचे पाच वाजले होते…

काका काकू मोठ्ठा प्रवास करून आले होते…

जरा फ्रेश होऊ म्हणत म्हणत आंघोळच करू असा ठराव संमत झाला…

नाहीतरी गॅस गिझर आहेच…

वेगळं पाणी तापवायची वगैरे भानगड नाही…

परी म्हणाली..हो हो..करा ना अंघोळ..चालेल..मी लावते गरम पाणी…

लगोलग ती बाथरूममध्ये गेली आणि गरम पाण्याचा नळ चालू केला…

काका दोन मिंटं थांबा…

आत्ता गरम पाण्याने बादली भरेल…

मग जा आंघोळीला…

दोनाची पाच मिंटं झाली आणि बादली वाहून गेल्याचा आवाज आला…

काका आंघोळीला गेले आणि पाण्यात हात घातला आणि…

गार पाण्याने भरली होती बादली…

अगं गरम पाणी नाही आलं..गारच तर आहे…

परीने जाऊन सिलेंडर हलवून बघितलं तर चक्क हलकं लागत होतं…

आहो काका सिलेंडर संपलं हो…

सकाळी आमच्या सगळ्यांच्या अंघोळी झाल्या तेव्हा व्यवस्थित आलं हो गरम पाणी…

आत्ता नेमका सिलेंडर संपला…

थांबा..लावते दुसरा..मग करा अंघोळ…

यथावकाश काकांची अंघोळ झाली आणि नंतर काकूचीसुद्धा…

गप्पा रंगत आल्याच होत्या…

परी आणि सासूबाई एकीकडे स्वयंपाक करतच होत्या…

हळुहळू जेवणाची वेळ झाली आणि पानं घेतली…

रितसर सगळं वाढून झालं…

सगळे जेवायला बसले…

पहिला घास तोंडात टाकला आणि लाईट गेले…

सगळ्या ट्यूब आणि पंखे अचानक जीव गेल्यासारखे बंद पडले…

अरे इन्व्हर्टरला काय झालं…

एरवी लाईट गेलेले समजत पण नाही…

परीने इन्व्हर्टरजवळ जाऊन बघितलं आणि बॅटरी डिस्चार्ज झाल्याचा लाईट परीकडे बघत होता…

आणि पर्यायाने परीही त्याच्याकडे…

कधीच असं होत नाही हो..आजच काय झालं..समजत नाही…

शेवटी कँडललाईट डिनर झालं नव्हे तसं करावं लागलं…

नंतर सगळे अंगणात बसले…

गप्पांना ऊत आलेलाच होता…

परी जरा पाणी आण गं…

काकूने ऑर्डर सोडली…

परी स्वयंपाकघरात गेली…

तांब्या भांड भरून बाहेर आणलं…

काकुने पाण्याचा एक घोट घेतला आणि तडक बेसिनजवळ जाऊन बाहेर काढला…

काय गं परी..मचूळ आहे पाणी..विहिरीचं आहे की काय…

अगं काकू RO + UV चं आहे…

मचूळ कसं लागेल…

अगं परे पिऊन बघ..परीने प्यायलं आणि कसंबसं गिळलं…

बहुतेक ऍक्वागार्ड बिघडलं वाटतं…

नाहीतर पाणी खरंच बिसलरीसारखं लागतं गं…

तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या..अगं परी आपण काल केलेले रव्याचे लाडू दे काका काकुला…

हो देते…

परी आत गेली आणि तिने डब्याचं झाकण उघडलं…

लाडवाच्या अगोदर मुंग्या दिसल्या डब्यात…

जेवढे लाडू त्याच्या दसपट मुंग्या डब्यात…

आहो आई, लाडवाला मुंग्या आल्या…

काका काकूने निराशाजनक एकमेकांकडे बघितलं आणि परीने आणि सासूबाईंनीसुद्धा…

प्रसंगावधान राखत काकू पटकन म्हणाली..अगं परी, तू तो कुठला आईस्क्रीमवाला म्हणत होतीस, मस्त असतं म्हणे त्याच्याकडे आईस्क्रीम..चल जाऊ तिकडे आईस्क्रीम खायला…

हो हो काकू..चल ना जाऊ…

दाराला कुलूप लावलं आणि सगळी मंडळी आईस्क्रीमवाल्याच्या दिशेने निघाली…

मजल दरमजल करत करत आईस्क्रीमचं दुकान गाठलं पण…

पण चक्क दुकानाचं शटर घट्ट बंद…

परीच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे झाले होते आणि सासूबाई परिस्थिती सांभाळत म्हणाल्या…

ह्याचं दुकान कधी म्हणजे कधी बंद नसतं हो…

अगदी रात्री साडे बारा-एक पर्यंत उघडं असतं…

नेमका आजच मेला कुठे गेला काय माहिती…

सगळ्यांचाच मूड ऑफ झाला…

आता सगळे बॅक टू पॅव्हेलियन…

घरी येऊन प्रत्येकजण ठरलेल्या जागेवर झोपला आणि आंघोळीपासूनच्या झालेल्या फजितीची मनातल्या मनात उजळणी करत होता…………………

Image by Steve Buissinne from Pixabay 

Ashwini Athavale

Ashwini Athavale

स्वतः बद्दलची माहिती- अलिबाग, रायगड येथे JSM महाविद्यालयात प्राध्यापिका. वाचन, लेखनाची आवड आहे. हलक्याफुलक्या कथा, आत्मचरित्र लिहायला आवडतं.

2 thoughts on “सोयी तेवढ्या गैरसोयी…

  • April 24, 2021 at 10:14 am
    Permalink

    असे हमखास होतेच

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!