“गंमत आणि किंमत”

दर दर की ठोकर.
साडेचार तास बापाला अॅम्ब्युलन्समधे टाकून,
गावभराची हाॅस्पीटल्स पालथी घातली त्यानं.
बापाची तडफड त्याला बघवेना.
घोटभर पाणी सुद्धा प्यायला नव्हता तो.
अशानं त्यालाच काही झालं तर ?
सध्या स्वतःकडे बघायला त्याला वेळच नव्हता.
दहा ठिकाणी फोन फिरवले.
कुणाची तरी ओळख निघाली.
कसाबसा एक बेड मिळाला.
एका अटीवर.
नाईलाज को क्या ईलाज ?
अॅडमिट करण्याआधी पन्नास जमा केले त्याने.
हाॅस्पीटलच्या स्पेशल वाॅर्डनं दरवाजा ऊघडून त्याच्या बापाला पोटात घेतला.
पाण्याचे दोन घोट घशाखाली गेले, अन् त्याला जरा बरं वाटलं.
रिसेप्शनच्या एका बाकावर तो जरा विसावला.
संध्याकाळपासूनची धावपळ आठवली.
संध्याकाळी पावणेसात ते आत्ता रात्रीचा एक.
त्याने फोन करून घरी कळवलं.
त्याची आई, बायको,लेक सगळ्यांना हायसं वाटलं.
आई तर गणपती पाण्यात घालून बसलेली.
बाप्पा पाठीशी रहा रे बाबा….
काळजी मिटली म्हणायची.
खरंच ?
संकटं झुंडीनं येतात हेच खरं…
वाॅर्एडच्या दरवाजातून एक नर्स बाहेर आली.
“काहीही करा.
हे ईन्जेक्शन आणा.”
‘मी कुठनं आणणार ?
तुमच्याकडे नाहीये का ?’
“शाॅर्टेज आहे.
पटकन् सोय करा.
नाहीतर अवघड होईल.”
त्याच्या घशाला कोरड.
पुन्हा वणवण.
हाॅस्पीटल्स, मेडिकोज.
दहा ठिकाणचे ऊंबरे झिजवणं आलं.
कडक मंगळ असलेल्या मुलीसारखी
त्याची अवस्था झालेली.
सगळीकडून फक्त नकार..
सगळे वाॅटस्सप ग्रुप, फेसबुक ग्रुप.
नवीन नवीन ठिकाणं.
दहा ठिकाणी नव्याने फोन फिरवायचे.
नव्यानं नाही ऐकू यायचं.
तो हतबल, हेल्पलेस.
डोकं धरून बसला.
कुणीतरी फोनवर सांगितलं.
आपल्या बॅचचा जग्या.
देशमुखवाडीत मोठा फार्मा डेपो आहे त्याचा.
त्याला विचारून बघ..
पहाट होत आलेली.
सकाळचे साडेचार वाजलेले.
निर्लज्जासारखा त्यानं फोन फिरवला.
जग्याला ओळख दिली.
जग्यानं ओळखलं त्याला.
“‘काहीही कर.
माझ्या बापाला वाचव.”
धाय मोकलून रडला तो फोनवर.
“सत्तावीस लागतील.”
‘जग्या, त्याची खरी किंमत तर पंधराशे….”
‘तुझ्यासाठी म्हणून सत्तावीस सांगतोय.
नाहीतर पन्नासचा रेट चालूय.
लवकर बोल…’
“ठीकेय.
कुठे येवू ?”
‘काका, सिटी हाॅस्पीटलला अॅडमीट आहेत ना..’?
ठीक आहे.
अर्ध्या तासात माझा माणूस तिथं ईन्जेक्शन घेऊन पोचेल.
दहा मिनटात या नंबरवर जीपे कर…’
जग्या देव का राक्षस ?
त्याला नक्की ठरवता येईना.
दहा मिनटात त्यानं जीपे केलं.
अर्ध्या तासाच्या आत जग्याचा माणूस पोचला.
तरीही…
काहीही ऊपयोग झाला नाही.
डाॅक्टर म्हणाले,
‘ ऊशीर झाला..”
सकाळी अकरा वाजता बापाला स्मशानात पोचवून तो घरी आला.
आईला शेवटचं बघताही आलं नाही.
जग्याचा नंतर चौकशीचा साधा फोनही नाही..
धंदे का टाईम.
दुपारचे चार.
“मी आलोच दहा मिनटात…”
तो जग्याच्या घरी.
जग्या घरी नव्हताच.
माणसं चांगली ओळखीची.
जग्याच्या आई वडिलांशी तासभर गप्पा.
बाबांविषयी तो काहीच बोलला नाही.
वहिनींनी छान आलं घालून चहा केलेला.
जग्याच्या लेकीला चाॅकलेट दिलं.
ती खूष.
जग्याच्या बाबांना नर्मदा परिक्रमेचं पुस्तक गिफ्ट केलं.
दीड तास होता तो तिथं.
तो जग्याच्या घरनं  बाहेर पडतो.
जग्याला फोन लावतो.
“जग्या बाबा गेले रे…
तू तुझ्यापरीने जी मदत केलीस ,
त्याबद्दल थँक्स.
अजून एक काम होतं.
अजून चार ईन्जेक्शन्स हवीयेत.
काही नाही…
मीही पाॅझीटीव्ह आलोय.
आत्ता तुझ्याच घरी होतो.
चांगला तास दीड तास.
सहज मनात आलं.
तुला चार ईन्जेक्शन्स काही जड नाहीत…”
शांतपणे त्यानं फोन ठेवून दिला.
तासाभरानं जग्याला मेसेज केला.
“काही नाहीरे…
मला काहीही झालेलं नाही.
थोडीशी गंमत केली.
ईन्जेक्शनची खरी ‘किंमत’ तुला कळावी म्हणून..
काळजी घे सगळ्यांची…”
……..कौस्तुभ केळकर नगरवाला.
Image by Dim Hou from Pixabay 
Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

One thought on ““गंमत आणि किंमत”

  • April 26, 2021 at 2:33 pm
    Permalink

    भयानक वास्तव ….मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात….माणूसकी शून्य

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!