श्वानपुराण
रात्री जेवणं झाली होती. माझा जुना कॉलेज मित्र आला होता. कॉलेजचा मित्र म्हणजे, दर भेटीत काही ‘खास’ विषयांवरची धूळ झटकायची असते. ती धूळ झटकताना, त्याला थोडा धुरही सोडायचा असतो. तसा त्याला धूर सोडताना पाहिलं की भूतकाळ आणि वर्तमानकाळातलं अंतर खूप कमी होत जातं. अन विषय रंगत जातो.
असाच विषय रंगवण्यासाठी, कॉलनीमध्येच आम्ही दोघे शतपावली करायला बाहेर पडलो.
गप्पा रंगल्या, …… काही भावनिक गुदगुल्या , शाब्दिक कोट्या, टोमणे, …… ठेवणीतल्या शिव्या …… हळूहळू दोघांचा आवाज वाढत गेला. एका चौकात, एकमेकांना टाळ्या देत मोठ्याने हसलो, …… अन कोपऱ्यात पेंगणारं कुणीतरी डिस्टर्ब झाल्यामुळं, आम्हा दोघांवर खेकसलं…… “भो भो …. भो”
मी अजून वीस वर्षांपूर्वीच्या हॉस्टेल काळात होतो. तिकडं न बघताच, हसणं कंटीन्यू करत, अभावितपणे बोलून गेलो, “सॉरी ….. सॉरी ”
आणि त्या सरशी, हसण्यामुळे त्रस्त झालेले ते त्रस्त सिनिअर सिटीझन, कुई कुई असा सौम्य निषेध व्यक्त करत पुन्हा कोपऱ्यात जाऊन, पायांमध्ये खुरमांडी घालून झोपी गेले.
पुढे जाऊन आपण कुत्र्याला सॉरी म्हणालो, ….. या विषयावर खूप वेळ हसत राहिलो.
वाकडेपणाचं उदाहरण म्हणून, ज्याच्या शेपटीचं उदाहरण दिलं जातं, त्याला माझ्या भावना अगदी सरळ आणि थेट कळल्या होत्या. आणि त्या कळवण्यासाठी त्यानं, वाकड्या शेपटीच्या विशिष्ट हालचालीने खुलासाही केला होता.
शेपटी ही मुख्य मणक्याचाच भाग असल्यामुळं, मज्जा रज्जूचा एक्सटेंडेड पार्ट असल्यामुळं, कदाचित त्याचं भावनिक व्यक्तित्व शेपटीतुन व्यक्त होत असावं.
तसा, कुत्रा हा प्राणी बुद्धीमान मानला जातो. पण शेपटी हलवणं, किंवा “भो…. भो ते कुई कुई” व्हाया “गुरगुर” इथपर्यंतच आवाजाची रेंज वापरून, व्यक्त होणारा हा प्राणी जर खरंच बुद्धिमान असेल, तर ती त्याची मोठी भावनिक कोंडी असू शकते. इथं कविता करताना, एखादा नेमका शब्द शोधताना, महासागराएवढी शब्दसंपत्ती असलेली मराठी भाषा कमी वाटू लागते. मग बिचाऱ्या कुत्र्याचं काय होत असेल. ‘बिचारा’ या शब्दावर, एकवीस किंवा अकरा इंजेक्शन्स घेतलेले ऑब्जेक्शन घेऊ शकतात. त्यावर अजिबात ऑब्जेक्शन न घेता, तो शब्द त्यांच्या भाषिक आणि भावनिक कोंडमाऱ्या पर्यंतच मर्यादित आहे असं समजावे. भाषिक कोंडमाऱ्याला आणखीही एक पैलू असा आहे की, ज्या प्रांतात कुत्रा जन्मला तिथली मानवी भाषा समजणं त्याला सहज शक्य आहे असं मानलं, तर आमच्यासारख्या बहुभाषिक कॉलनीत, त्याच्या बुद्धिमत्तेची कसोटी लागत असणार, हे निश्चित. ” ये, यु यु, आजा, इथ्थे आ, इक्कडबा” पासून ते ” हाड ssss, भाग ” अशी विविध भाषिक चटणी त्याचं मानसिक संतुलन ढळवू शकते. त्यातल्या कोणत्या तरी एकाच भाषेने प्रभावित झालेल्या पिलाला तारुण्यात पदार्पण करताना, पार्टनर शोधताना, (लाईफ पार्टनर हा शब्द मुद्दाम वापरला नाही) काही अडचण येत असेल का ? याचाही विचार झाला पाहिजे. अन्यथा, त्याच्या कुंडलीत, गृहकलह निश्चित आहे. हा गृहकलह, नेमका रात्री , जग शांत झोपलेले असताना का सुरू होतो, हे एक न उलगडलेले कोडे आहे. आणि गृहकलह असला तरी त्यात, त्यांचं संपूर्ण कुटुंब किंवा गल्ली सामील होताना दिसते. रात्री बेरात्री वाद विकोपाला जातात. बहुतेक वेळा, कौटुंबिक वादविवाद बाजूला पडून, गल्लीच्या सीमेवरून प्रांतिक वाद, मासेवालीच्या घरासमोरच्या अड्ड्याच्या हक्कावरून वाद, कदाचित, काळ्या पांढऱ्या रंगावरून वर्णवाद होत असतात.
त्यांना अखंडपणे ग्रहशांती पासून ते घरात उरलेले शिळे, अशा अनेक कारणांनी खाऊ घालणारा मानवी समाज, हे सगळे वाद ऐकण्यासाठीचा हक्काचा श्रोता, कधी प्रेक्षक आहे, असा त्यांचा समज असतो. तुम्ही हाकललं तर थोडे दूर जाऊन, पण त्यांच्यापैकी कुणीही आपापला मुद्दा सोडत नाही.
घरापासून जवळच, एका नवीन इमारतींचं बांधकाम होत आलं होतं. दरवाजे खिडक्या लावणं बाकी होतं. त्यात हे भावनिक कोंडमारा झालेले बहुतेकजण रात्री मुक्कामाला असत. त्यातल्या एखाद्याची झोप पूर्ण झाली की तो, भुभुकार करून मोकळा होई. मग तो आवाज घुमल्यामुळे, त्याला चार वेळा वेगवेगळ्या दिशांनी ऐकू यायचा. अन आपल्या कळपातल्या कुत्र्यांव्यतिरिक्त इतर अनेक कुत्रे इमारतीत असल्याचा भास त्याला व्हायचा. तो पुन्हा पुन्हा त्या आभासी कुत्र्यांना चॅलेंज देत राहायचा. हळूहळू ते झोपलेले तीनचार जण देखील त्याच्या व्हर्च्युअल युद्धात सामील व्हायचे. अन मग जो रात्रभर कोलाहल व्हायचा, तसा कोलाहल, हल्ली लोकसभेतही होत नाही. काही दिवसांनी, कुत्र्यांनी ती जागा हॉंटेड म्हणून घोषित केली असे ऐकिवात आहे. आणि हल्ली ती इमारत वापरणाऱ्या लोकांच्या हातून ते क्रिमचं बिस्किट किंवा पापलेटचे काटेदेखील खात नाहीत. ती इमारत बरीच वर्षे, कुत्र्यांनी, मॅटर्निटी होम म्हणून वापरली होती. पण आता नवीन बाळंतीणींचे मात्र हाल होऊ लागले आहेत. त्यामुळं कॉलनी मधल्या पुण्यश्लोक प्राणिमित्रांनी, कधी एखाद्या टपरीवर तर कधी बारमध्ये बसून या विषयावर चिंता व्यक्त केली. अजून त्यांना मार्ग न सापडल्यामुळे, आणखी काही बारवाऱ्या होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नुकताच एका नवीन बाळंतिणीने एका कारचे नवीन कव्हर फाडून काढून पिलांची सोय दुसऱ्या इमारतीच्या पार्किंगमध्ये केली आहे. अर्थात, कार मालकाची प्राणी मित्रांच्या धाकामुळे, तक्रार करण्याची सुतराम शक्यता नाही. पण तरीही त्यानं त्याच्या कोंडमाऱ्यावर उपाय शोधलाय. दोन बाळंतिणींची पिले एकत्र करून त्यानं नारदनीती अवलंबली आहे.
त्यांच्या या नवीन गोंधळामुळं काही लोक धाकात आहेत तर काही आनंदात जगत आहेत. किमान धाकात असलेल्यांचा धाक कमी व्हावा, अन कळेल अशा भाषेत व्यक्त होऊन कुत्र्यांचा कोंडमारा कमी व्हावा म्हणून मानवी भाषेचे क्लासेस चालवू शकणाऱ्या भाषा पारंगत व्यक्तीच्या शोधात सध्या आम्ही आहोत. इच्छुकांनी जरूर संपर्क करावा.©बीआरपवार
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
Good initiatives through story……to understand Animals, their emotions and life…..
Maja ali vachtana