“भिती”
“भिती”
दोन तीन वर्षानंतर अचानक त्याला आईबाबांची आठवण झाली. गावची आठवण झाली. त्याच्या लेकीला तर आजी आबा फारसे आठवतच नाहीत. पियूच्या बारशाला आली होती दोघं. दोन दिवसात परत गेली.त्याच्या बायकोचं आणि त्याच्या आई बाबांचं ट्यूनिंग जमलंच नाही कधी.भांडण वगैरे नाही काही. काही अॅटॅचमेंटच नाही. लो प्रोफाईल.गावाकडची माणसं.त्याच्या बायकोला त्यांच्याशी कधी जुळवूनच घेता आलं नाही. त्याला स्वतःचंच कौतुक वाटलं.त्यानं कसं जुळवून घेतलं तिच्याशी.? तिच्या आईबाबांशी. सो काॅल्ड हाय स्टेटस्वाल्यांशी.खरंच कौतुकास्पद.
तो बदलला.म्हणजे बदलावंच लागलं.बायकोपुढे कुणाचंही काहीही चालत नाही.त्याच्या मोठ्ठ्या घरात आईबाबांना जागाच नव्हती. अगदी एखाद दिवस जरी ते आले तरी…
त्याच्या बायकोला आॅक्सीजन कमी पडायचा.
त्याचे आई बाबा शहाणे.दुरून डोंगर साजरे.लेक सुखात आहे ना ? झालं तर. नातीसाठी जीव तुटायचा. त्याचीही सवय झालीये आता. महिन्यातून एखाद वेळी आलेला फोन.त्यांचा मुलगा दोन चार मिनटं बोलायचा. औपचारिक. अर्धा मिनिट नातीशी बोलणं. बस्स..
तो आवाज मनाच्या कानात साठवून म्हातारा म्हातारी महिना पुढे ढकलायचे.चालायचंच.
आज अचानक.त्याची बायको.
“चला. तुमच्या गावाकडे जावू.पियूही तिच्या आजी आबांना भेटली नाहीये खूप दिवसात.तुलाही बरं वाटेल.”
त्याच्या बायकोला आठवण आली म्हणून त्यालाही आईबाबांची आठवण झाली. ईटस् नॅचरल.
त्याची गाडी तांबड्या रस्त्यावरनं कोकणच्या दिशेने सुसाट.
पडवीतल्या झोपाळ्यावर म्हातारा म्हातारी.गाडी बघून म्हातारी वेडीपिशी.भाकर तुकडा ओवाळून झाला.सूनबाई शहाण्यासारखी दोघांच्या पाया पडली.म्हातारी पदर खोचून स्वयपाकाला लागली. सूनबाईही मदतीला. शेवयाची खीर, बिरड्याची ऊसळ .पापड, मिरगुंडं.आबा आणि पियूचा झोपाळ्यावर गोष्टीचा तास रंगलेला.आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे.जेवणं झाली. सासूबाई, सूनबाई, पियू परसबागेत गेली.कैर्या शोधायला. त्याचे बाबा झोपाळ्यावर.तो पडवीच्या ऊंबर्यावर बसलेला.
सुपारी कातरता कातरता म्हातार्याने त्याला कात्रीत पकडला. कातर आवाजात नेमका प्रश्न विचारला.
” राघवा , कोरोनाला घाबरलास ना ?”
कोरोनापेक्षा तो आत्ता जास्त घाबरला. काॅपी पकडली जावी अगदी डिट्टो तसा.म्हातार्याला ऊत्तराची अपेक्षाच नव्हती. तो स्वतःशीच बडबडत होता.
“कठीण आहे. कुणाला मरणाची भिती वाटते. ईथे आम्हाला जगण्याची. फळला मला तो जीवाणू. घरात जीव आलाय माझ्या आज. नंतरचं रिकामपण कोरोनापेक्षा भयंकर.त्याचीच भीती वाटते.”
म्हातार्याचं बोलणं ऐकून तो आणखीनच घाबरला.
ऊपयोग काय ? नेमकं घाबरायचं कशाला हेच त्याला अजून समजलेलं नाहीये. ‘भीती’ वाटत्येय एवढंच खरं….
…….कौस्तुभ केळकर नगरवाला.
Image by mohamed Hassan from Pixabay
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021