मन_तळ्यात_मळ्यात….5

आधीच्या भागाची लिंक- मन तळ्यात मळ्यात…. 4

ती काहीशी  सावरलीये असं पाहून असीम ने ती पितळी तबकडी हातात घेतली..
आणि तिच्या समोर धरत विचारलं… हे नक्की काय आहे?.
तिने एकवार त्या तबकडीकडे पाहत डोळे पुसले अन म्हणाली ..
माझ्या खजिन्याचा परवली*चा शब्द…
काय?  असीम न कुतूहलानं विचारलं…
हो…  पण हा तुला समजण्यासाठी आधी काही उकल करावी लागेल…  यातली बरीचशी भूर्जपत्रे वेगवेगळ्या कोड्यांनी भरलेली आहेत…  आणि खजिना म्हणजे तरी काय असतो…  चमकणारे धातू नी खड्यांपेक्षा हि अमूल्य असा ज्ञानाचा खजिना आहे..
पण तू हि इतरांसारखा भौतिकात रमणार असशील तर निघून जा..
असीम ला तिचं म्हणणं पटलं.. आणि तो पुढे ऐकू लागला..

सांग..  कुठून सुरुवात करू?..
ह्या संदुकीला नीट तपासून बघ आणि जे काही शोधायचं आहे ते इथेच आहे… ह्या बघ काही प्रहलीका…
प्रहलीका?
म्हणजे.. कोडी…
ह्यातली बरीचशी विश्वनाथाला हि सुटली नव्हती… नव्हे नियतीनं आम्हाला तेवढा वेळच मिळू दिला नाही …

बघ तुला काही सापडतंय का…  मला यापेक्षा जास्त मदत नाही करता येणार…
असीम नी एकेक सुभाषित वाचायला घेतलं…

पहिलाच श्लोक गजेंद्रमोक्षातला… आणि त्या खाली सहा चित्रे..
गज, मकर, नाग, नकुल (मुंगूस), घुबड आणि भ्रमर (भुंगा )

आता संदुकी वर सहा खाचा होत्या ज्यात ह्या चित्रांच्या चकत्या बसवल्या तर ती उघडणार होती..
त्यानं आजूबाजूला पाहिलं…
पहिलाच दुवा तर पहिल्या कोड्याचं उत्तर होतं.. लेखणी…
त्यानं लेखणी आणि त्याची दौत तपासली… दौतीच्या खालच्या बाजूला गज चित्राची चकती… कारण लेखणी च्या दौतीचे कोरीव काम  हस्तिदंता सम दिसत होतं…

मग त्यानं मेज तपासली तर त्याच्या खालच्या बाजूला मकर चित्राची चकती मिळाली..  त्याचा आत्मविश्वास भलताच वाढला… पण पुढे?
त्यानं मदती साठी सरोज कडे पाहिलं…  पण ती फक्त गूढ हसली…  आणि त्याला तिच्या  मागे आरसा दिसला.. त्यानं कंदील हातात घेतला आणि आरशापाशी आला सगळा आरसा तो पुन्हा पुन्हा तपासत होता…
आणि इतक्यात त्याला त्याच्या फ्रेमच्या कडेला दोन खांब दिसले..त्यानं अजून जवळ कंदील नेताच त्याला नागाची खूण दिसली… त्यानं ओढून ती चकती काढली… जर नाग इथे आहे तर त्याचा शत्रुपक्ष त्याला समोर पाहणार म्हणजे दुसरा खांब… म्हणत त्यानं कंदिलाचा उजेड त्या खांब्यावर दाखवला आणि नकुल प्रतिमेची चकती काढली …

आता अजून दोन…  घुबड आणि भ्रमर…  मग झालं काम पण यात तब्बल तास गेला तरी हि त्याला काहीच धागा सापडला नाही…
मग त्यानं त्या संपूर्ण खोलीत कुठली तसबीर दिसतीये का ते हि शोधलं …  पण ती हि नाही… मग मात्र तो हताश झाला… आणि सहज जाता जाता त्याचा हात त्या वाळ्या च्या पडद्याच्या दोरीला लागला… त्यानं तंद्रीत असल्यामुळे काय हललं म्हणून मागे पाहिलं.. दोरीचे टोक कपाटाच्या दिशेनी गेलं आणि परत आलं…

त्याचं लक्ष समोरच्या कपाटाकडे गेलं…  आणि त्या कपाटाची मूठ चक्क घुबड चित्राच्या चकतीची निघाली
आता शेवटची… चकती… भ्रमर…

त्यानं कुठे फुलाचं चित्र दिसतंय का ते हि पाहिलं… पण काहीही दुवा सापडेना…
आता त्यानं परत परत ती सुभाषित वाचली…. आणि नेमका तो एका शब्दापाशी थांबला कुमुद… भ्रमर..
पण कुमुद दिवसा फुलतं..
सरोज.. रात्री फुलणाऱ्या कमळाला सरोज म्हणतात… आज आपलीही अवस्था ह्या भ्रमरा सारखीच झालीये…

पण तरी हि आता भ्रमर मुक्त होणार…  आणि त्यानं हसून सरोज कडे पाहिलं… त्यानं हात पुढे केला…  दे चकती… हि फक्त तुझ्याकडेचं असू शकते.
तिने हि कंदिलाच्या खाली दडवलेली चकती काढून दिली…

आता ह्या बसवायच्या संदुकीवर… पण छे ! एकही बसेना… आता हे काय गौडबंगाल आहे… त्यानं पुन्हा त्या चकत्या पाहिल्या…  आणि त्या प्रत्येकी खाली एकेक रंगाचं रिंगण होतं…
मग पुन्हा संदूक आणि खाचा पाहिल्या..
पण तरी हि काहीच बोध होतं नव्हता…
त्यानं आता डोळे मिटून ते सगळे रंग डोळ्यासमोर आणले आणि त्या रंगांचं रिंगण त्याच्या डोळ्यासमोर फेर धरू लागलं… अशा वेळी आपलं अंतर्मन चं आपला गुरु होतं… हा अनुभव त्याच्याहि गाठीशी होता…

मग प्रथम लाल, नारिंगी, पिवळा, हिरवा निळा आणि मग जांभळा… त्यानं ती चित्र हि त्याचं क्रमानं लावायची ठरवली आणि जेव्हा ती सगळी चित्र त्या खाचेत बसली… ती संदूक आपोआप उघडली…
मग त्यात ती पितळी तबकडी ठेवली आणि पुन्हा ती घड्याळ्या प्रमाणे फिरवली पण पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही काहीच घडेना… मग ती उलट फिरवून पाहिली आणि ती एका क्षणात उघडली.

आत काही पुरातन तांब्याच्या मुद्रा होत्या शिवकालीन असाव्यात तर काही अति प्राचीन ग्रंथाची पानं.. असीम ला तर खऱ्या अर्थी खजिनाच मिळाला होता…
पण हे सगळ विराजचं आहे आणि आपण केवळ मदत करायला आलोय हे आठवून त्यानं ते पुन्हा सगळं आत ठेवलं… आणि ती संदूक सरोज कडे देत म्हणाला…

हे तुमचं आहे… या तून विराजला खूप फायदा होणार आहे आणि मी ते घेणं हि चोरीच ठरेलं… असं म्हणून तो उठला… तसं सरोज  नी ती संदूक स्वतः कडे घेत…  बाकीची सगळी भूर्जपत्र त्याच्या हातात दिली… आणि ती दोघे पुन्हा तळघरातून वर आली…

इकडे सूर्यास्त व्हायला अजून थोडा अवकाश होता… आणि अचानक त्यानं काही आठवून फोन चेक केला… तो सकाळ पासून खालीच होता… तेव्हा भुकेची जाणीव नव्हती झाली जी आता तीव्रतेन झाली…तो विराज च्या खोलीत गेला…

विराज अजूनही निजलेला होता… त्यानं त्याला उठवलं… मग कुठून तरी तो सकाळपासूनचा गायब नोकर पुन्हा वाड्यात आला… विचारलं तर बनशंकरीच्या देवळात सकाळच्या दिव्या साठी तेल वात ठेवायला गेला तो मंदिरातचं बेशुद्ध झाला होता.. जशी शुद्ध आली तसा वाड्याच्या दिशेनी धावत आला…

मग त्यानं पुन्हा चहा नाश्ता दिला आणि मग विराज आणि असीम.. त्याच्या खोलीत आले… त्यानं ती भूर्जपत्रे आणि संदूक हातात ठेवली… विराज तर हरखून गेला..
असीम नी ती कशी उघडायची ते हि दाखवलं… मग विराजनी  त्यातल्या सगळ्या वस्तू काढून एका पिशवीत घेतल्या आणि ती संदूक असीम ला देऊन टाकली… नको रे मला काहीच म्हणत असीम नी नाकारलं

त्याला अजून काहि  हवयं  का विचारताच त्यानं काहीच नको म्हटलं…
पण तरी विराजनी ती संदूक त्यालाच दिली…

आणि मग असीम रात्री जेवून त्याच्या खोलीत आजचा सगळा दिवस आणि त्यात घडलेल्या घटना आठवत बसला… विराजनी मात्र त्याला काहीच का नाही विचारलं याच राहून राहून आश्चर्य वाटत होतं…
इतक्यात पुन्हा सरोज ची चाहूल लागली..
अरे फुकट मिळालं की किंमत नसते… तीच गत आहे… आणि तसं हि या वाड्यातली कुठलीच पिढी या खोलात शिरणार नाही…

का? असीम नी चक्रावून विचारलं
मीच कारण आहे… सरोज शांतपणे म्हणाली
आत्या बाई,  मी आणि इथला एक नोकर असे तीन जीव गेले…

कशामुळे?
मी आणि विश्वनाथ आमच्या पहिल्या भेटी नंतर या तळघरात आलो होतो… त्यानं तर हीच अभ्यासिका करून टाकली मग कधी कधी विरंगूळा म्हणून तो आणि मी हि कोडी सोडवायचो…

आणि एके दिवशी आत्या बाई माझ्या मागे इथवर आल्या मी नेमकी त्याच्या मिठीत आणि ते पाहून त्यांचं माथचं भडकलं.. विश्वनाथानी समजावण्याचा प्रयत्न केला पण तिला तर मला वामन दादा समोर आणि जगासमोर बदनाम करण्याची नामी संधी चालून आली होती…

माझी वहिनी असती तर मध्यस्थी केली असती तिने पण ती माहेरी चं होती आणि वामन दादा ला स्वातंत्र्य पूर्व काळात भूमिगतांना मदत केल्यानं अटक झाली… त्याला सोडवायला अण्णा तालुक्याच्या गावी, आता वाड्यात विश्वासू नोकर आत्या  मी आणि विश्वनाथ… बाकीची गडी माणसं शेतावर…
आत्यानी खूपच तमाशा केला आणि विश्वनाथाला माझं काहीतरी बरं वाईट करीन अशी धमकी देऊन हाकलून लावलं… केवळ माझी बदनामी होऊ नये म्हणून तो निघून गेला…
इथे तो जाताच आत्या नी मला मागच्या विहिरी पाशी नेऊन खूप मारलं… अगदी गुरासारखं बडवलं… घराण्याची अब्रू वेशीला टांगलीस म्हणत सगळा राग काढला आणि ते हि करून मन भरलं नाही तर सरळ मला या विहिरीत ढकलून दिलं…

मग मात्र माझ्या तळमळणाऱ्या आत्म्यान दहा दिवसाच्या आतच त्या दोघांचा जीव घेतला… आणि वाडा या खजिन्या पासून अलिप्तच राहिला.. अण्णा गेले आणि मग वामन दादा त्या नंतर कुणीच शोध घेतला नाही या खजिन्याचा..

पण मी विश्वनाथाची वाट पाहत राहिले… आणि आज इतक्या वर्षांनी तू या वाड्यात पाऊल ठेवलस…

तुझी चीजवस्तू मी आता तुला सोपवलीये… आता मला मुक्ती मिळेल..
तिने जाण्यापूर्वी असीम च्या चेहेऱ्यावरून हात फिरवला..

आणि त्याच्या डोळ्यात पाहत ती खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशात विरघळून गेली…
एका अलौकिक प्रेमाचा साक्षीदार झाला होता तो.. त्यानं त्या रिकाम्या संदुकीवरून हात फिरवला.. उगीचच सरोजचा  मुलायम स्पर्श झाल्याचा भास झाला… त्यानं ड्राइव्हर ला आजचं निघूयात म्हणून फोन केला तेव्हा 10 वाजत आले होते…
विराजचा निरोप घेऊन तो निघाला… कोल्हापूर च्या दिशेनी… जाताना नागेवाडीला लांबूनच नमस्कार करत त्यानं मागे वळून पाहिलं…
आता त्या गर्द काळोखात निरामय लपून गेला होता…
तो यथावकाश कोल्हापूर च्या अंबाबाई ला नमस्कार करून वरून नाशिक ला पोचला..

आईनं झोपलेल्या त्याला तंबी दिली… लवकर आवरून बाहेर ये..
तो हि आवरून बाहेर आला… एकंदरीत आलेली मंडळी स्थल दर्शना साठी आलीयेत हे त्याच्या चाणाक्ष नजरेनं टिपलं… पण आता इथे गप्प बसण्या खेरीज पर्याय नव्हता… इतक्यात एक गोड़ हाक ऐकू आली..
असीम… तोच आवाज…
त्यानं मागे वळून पाहिलं आणि त्याचा विश्वासच बसेना… सरोज… आणि ती हि वाग्दत्त वधू वेषात…???
सुरेख हिरव्या इरकल मधे पण मोजक्याच दागिन्यांनी नटलेली…
त्यानं क्षण हि नं दवडता होकार दिला…
आणि मग ती दोघ त्याच्या खोलीत आली… त्यानं ती नक्षीदार संदूक समोर ठेवली…
तिने हि अलगद हातात घेत… ती उघडली… पण अर्थात रिकामीच होती…
असं रिकामं देऊ नये… म्हणत गोड़ हसली..
त्यानं हि कान पकडत सॉरी म्हटलं…
मग तिनेच ती उपडी केली आणि संदुकीच्या उजव्या बाजूचा बाहेर आलेला खटका दाबला… आणि तो दाबताच त्याच्या विरुद्ध दिशेनी एक कप्पा उघडला..
असीम विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत होता…
लाल मऊसूत कापडात गुंडाळून ठेवलेली एक पोटली बाहेर आली..  तिच्या रेशीम दोऱ्या ओढताच… भर दिवसा हि त्या खोलीत लख्ख उजेड पडला…
त्याच वाड्यातल्या जुन्या खजिन्यातली कितीतरी सुरेख नक्षीकामानी  घडवलेले हिरे पाचू माणिक पुष्कराजाचे लखलखते अस्सल बावनकशी सोन्यातले दागिने बाहेर आले…
काही वेळाने तो भानावर आला… त्यानं भरल्या डोळ्यांनी मनोमन सरोजला हात जोडले आणि समोर बसलेल्या त्याच्या सरोज कडे पाहिलं… तर ती मात्र शांत होती… जणु काही हे सगळं तिचंच होतं… त्याच्या कडे पाहत  पुन्हा तशीच हसली… गूढ…!!!!!

समाप्त.
©मनस्वी

Image by Enrique Meseguer from Pixabay 

8 thoughts on “मन_तळ्यात_मळ्यात….5

  • May 10, 2021 at 7:59 am
    Permalink

    Punha waçhun chan watle

    Reply
    • May 10, 2021 at 6:58 pm
      Permalink

      🥰🥰🥰thank you

      Reply
  • May 11, 2021 at 9:56 am
    Permalink

    खूपच छान 👌👌

    Reply
  • May 11, 2021 at 11:39 am
    Permalink

    मस्तच उलगडत नेली ,आवडली.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!