विनोद आणि विज्ञान : भाग१ हास्यामागचे विज्ञान

तुम्ही ‘अलेक्सा’ला किंवा ‘सिरी’ला कधी अशी आज्ञा दिल्ये? – अलेक्सा laugh. साधारण ज्यूसच्या कॅनच्या आकाराची अलेक्सा कशी हसेल? दोन वर्षापूर्वी अलेक्सा अचानक हसायची, एकटं असताना भीती वाटेल अशी  हसायची. लोकांनी लक्षात आणून दिल्यावर अॅमेझोनने ही त्रुटी दुरुस्त केली. सिरी मात्र खूप क्यूट हसते ही ही… करून. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरुन केलेल्या या मदतनीसात तंत्रज्ञांनी मानवी भाव-भावना टाकल्या आहेत. त्यांचे यांत्रिक हसणे ऐकून आपल्याला मजा वाटते.

लहानपणी एका राजकन्येची गोष्ट आजी सांगायची. काही केल्या ती हसतच नव्हती. जादूगार, विदूषक, सोंगाड्या सर्वांनी प्रयत्न केले. पण छे! अखेर कुणीतरी साधा माणूस राजवाडयासमोर चिखलात पडला धपकन्, तिने ते खिडकीतून पाहिले आणि ती हसली. मग त्या माणसाचे देखण्या राजकुमारात रूपांतर झाले. गोष्टीचा शेवट झाला नेहमीप्रमाणे राजकन्येच्या लग्नाने! ( लग्न म्हणजे हॅप्पी एंडिंग हे बालवयात वाटायचं ) पण एवढे मात्र कळले की दुसर्‍याला हसवणे तितकेसे सोपे नाही; आणि कुणाला कशामुळे हसू येईल हे जाणणे सोपे नाही.

माणूस हसतो, हे हसणे अखिल मानवजमातीला मिळालेली देणगी आहे, आणि ते फक्त मानवांमध्येच आहे. प्राणी पक्षी कार्टून मालिकेत हसतात. लायन किंग मध्ये हाईना हसतात, टॉम आणि जेरी हसतात आणि हसवतात, गोष्टीत अतिभयानक प्राणीसुद्धा अक्राळविक्राळ हसतात. असं म्हणतात की गुदगुल्या केल्या तर उंदीर हसतो. प्रत्यक्षात कुणी पाहिलंय मांजराला, कुत्र्याला, कोल्हयाला हसताना? नाही नं? पण माणूस हलकं स्मित करतो, निरागस हसतो, खळखळून हसतो, पोटभरून हसतो आणि पोट धरून हसतो, छद्मी हसतो आणि खोटे खोटे पण हसतो. माणसे एकत्र जमली असताना मधूनच हास्याची लकेर येते तर कधी हास्याचा धबधबा कोसळतो .

माणूस एकटा फार कमी हसतो, तोच इतरांच्या संगतीत भरपूर हसतो. बायका पुरुषांपेक्षा १२७ % अधिक हसतात असं एक निष्कर्ष सांगतो. शाळकरी मुली सारख्या फिदीफिदी हसत असतात, कॉलेजवयीन मुली चोरटं हसतात, आणि बायका एकत्र आल्या की खिदळतात. ( तरीही मराठीत विनोदी लेखिका कमी आहेत! ) एखादी शाब्दिक कोटी, विनोदी चुटकुला समजला तरी माणूस हसतो; नाही समजला तर ( इतरांकडे पाहून थोड्या वेळाने ) जास्तच जोरात हसतो.

आपण एखाद्या गोष्टीला हसतो, या प्रतिक्रियेची कारणे वेगवेगळी आणि सापेक्ष आहेत. तर अशा या आपल्या हसण्यामागे काय विज्ञान आहे, का हसू येतं आपल्याला? समोरच्या गमतीशीर परिस्थितीचे मेंदूने आकलन केल्यावर हास्याची भावना जागृत होते, मेंदू मधील ऊर्जा ओसंडून वाहू लागते, छाती आणि पोटाच्या स्नायूंमध्ये आकुंचन-प्रसरण होते, तोंडामधून ‘हा हा ही ही’ असा आवाज बाहेर फेकला जातो. पण पूर्ण आकलन करूनच माणूस व्यक्त होतो. कारण कुणी केळीच्या सालावरून घसरून पडला तर आपण हसतो; तोच म्हातारा माणूस असेल तर मात्र मदतीसाठी धावतो. एक शतांश सेकंदापेक्षा कमी वेळात मेंदू ठरवतो हसायचं की मदत करायची. नवजात बालके झोपेत हसतात, गुदगुल्या केल्यावर हसतात, उगाचच हसतात; त्यांच्या इवल्याशा मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात. त्यांचे हसणे ही एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे, कारण त्यांचा मेंदू भावना ओळखण्याइतका विकसित झालेला नसतो. अनेक शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी हास्यामागे असलेल्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही पूर्णत्वाने समजले नाहीये हसण्यामागचे शास्त्रीय कारण. मोनालिसाचे गूढ स्मित जणू!

अॅरिस्टॉटल आणि प्लेटो यांच्या मते दुसर्‍याच्या दुर्दैवाला आपण हसतो; परिणामी आपण जास्त सुदैवी आहोत ही भावना त्यातून तयार होते. हॉब्ज म्हणतो की सामर्थ्य आणि दौर्बल्य यांच्यातील सामना म्हणजे विनोद. हसणार्‍याच्या मनात थोडी श्रेष्ठत्वाची भावना तयार होते. एखाद्यापेक्षा मी वरचढ आहे, ही स्पर्धा विनोदाला जन्म देते. ‘तू तू मै मै’ मधली रिमा लागू आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या सासू-सुनेच्या जोडीने एके काळी दूरदर्शनवर धमाल आणली होती. टॉम आणि जेरी नाही का सतत कुरघोडी करत एकमेकांवर ?

सिग्मंड फ्रॉइड म्हणतात की गंभीर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आणि तणाव नाहीसा करण्यासाठी आपण हसण्याचा आधार घेतो. आपल्या सर्वांना हा अनुभव येत असेल – ऑफिस मध्ये खूप कामात असलो, मीटिंगची तयारी, डेडलाईन गाठण्यासाठी धडपड चालू असताना मधेच ‘टुंग’ फोन वाजतो, व्हॉटस्अॅप्पवर एक फालतू फॉरवर्ड जोक आलेला असतो. खरं म्हणजे एरवी आपल्याला तो मेसेज पाहून कधी हसू येणार नाही. पण त्यावेळी  तो छोटा वन-लायनर जोक किंवा एक व्यंगचित्र पाहिलं की आपल्याला गालातल्या गालात हसू येतं आणि सगळं टेंशन जणू छूमंतर गायब होतं.

इमॅन्यूएल कांटच्या सिद्धांताप्रमाणे हास्य अपेक्षाभंगातून निर्माण होते. एखादी घटना घडत असताना किंवा तिचे वर्णन ऐकताना आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे रहाते आणि प्रत्येक क्षणाला पुढे काय होईल याचा आपण मनातल्या मनात अंदाज बांधतो. पण होतं वेगळंच. मग आपण लोटपोट हसतो. चार्ली चॅप्लिनच्या सिनेमात त्याची निरागसता, यांत्रिक देहबोली विनोद निर्माण करते. हे सिनेमे कृष्ण-धवल आणि मूक असले तरी पार्श्व-संगीताने ती उणीव भरून निघते. असाच निरागस, अबोध विनोद आणि निखळ करमणूक म्हणजे चिमणराव – गुंड्याभाऊ. चिमणराव बायकोला ‘काउ काउ’ हाक मारताना जो वैशिष्ठ्यपूर्ण हेल प्रभावळकरांनी वापरला आहे, तो आठवला की आजही हसू येते.

जर्मन तत्वज्ञ, आर्थर शोपेनहोअर म्हणतात – वागण्यात, दिसण्यात काही विसंगती असेल तरी हसू येते. ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये शाब्दिक विनोद आणि विसंगती दोन्ही दिसते. पुरुषाने स्त्री-पात्र करणे, पुणेरी/विदर्भी बोलीचा उपयोग करणे, कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांवर विनोद करणे, नक्कल करणे, अति जाड, अति बारीक, काळा रंग, बुटकेपणा अशा शारीरिक व्यंगावर विनोद करणे, बेसुरे गाऊन विनोद करणे, दोन गाणी एकत्र करणे असे वेगवेगळे प्रकार ‘हवा येऊ द्या’ करते.

एका सिद्धांतानुसार, नैतिक किंवा सामाजिक नियमांचे उल्लंघन झाले तर विनोदनिर्मिती होते. जसं की सिग्नल तोडून पोलीसशी हुज्जत घालणे, डॉक्टरने विचित्र उपचार करणे, राजकारणातून विनोद होतो, हालचालीतून विनोद – जसं की माणूस नेहमी पायाने चालतो, चार पायावर चालायला लागला तर मजा वाटेल बघताना .

खाणे आणि हसणे यात एक विलक्षण परस्पर-संबंध आहे. खाण्याचा मूळ उद्देश शरीराचे पोषण हा आहे; पण मित्रमंडळी, नातेवाईक, गप्पा-हशा यामध्ये एकत्र खाणे हा सोहळा होऊन जातो आणि साध्या साध्या वाक्यांमध्ये हसण्याची विरामचिन्हे टाकली जातात. उत्स्फूर्त आणि निखळ हास्य ही मनोरंजनाची व्याख्या प्रथम ड्युचेन या शास्त्रज्ञाने मांडली. या ड्युचेन हास्यात चेहर्‍याच्या स्नायूंची विशिष्ठ हालचाल होते, गाल वर जातात, डोळे बारीक होतात, डोळ्याभोवती सुरकुत्या तयार होतात ( म्हातारपणच्या नाही हो; हास्य सुरकुत्या ) माणूस डोळ्यातून हसतो, ते ड्युचेन हास्य !

मराठी विनोदी लेखक कोल्हटकर, गडकरी, चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, पुलं, वपु, मिरासदार, रमेश मंत्री अगदी अलीकडे मंगला गोडबोले हे सर्वजण शब्दप्रभू आहेत. त्यांचा भर शाब्दिक कोट्या, करामती, भाषिक कसरती करण्याकडे आहे. त्यांची शाब्दिक चलाखी म्हणजे बुद्धीला आव्हान!

मूळ ‘Humor’ या शब्दाचा अर्थ द्रव (पदार्थ) किंवा ओलावा (आर्द्रता) असा आहे. आजच्या वेगवान, आभासी आणि तंत्रज्ञानी युगात माणसाला प्रेमाचा, मायेचा ओलावा विनोदामुळे मिळतो. दुख:द प्रसंग, कष्ट, ताण-तणाव थोडे हलके होण्यास मदत होते. जितका विनोद ओला (moist), तितका तो समजायला सोप्पा. जितका विनोद शुष्क (Dry Humor), तितका समजायला कठीण. असं लिखाण किंवा अशी निर्मिती त्याहून कठीण. चेहर्‍यावर अजिबात भावना न दाखवता, हातवारे किंवा हालचाली न करता, एकसूरी आवाजात एखाद्याने जोक सांगितला, आणि आपण खदखदून हसलो तर तो झाला dry humor. ब्रिटिश विनोद या प्रकारचा असतो.

हास्य हे शरीर आणि मन दोन्हीचे टॉनिक आहे. आपण हसलो की जास्त ऑक्सिजन आत घेतला जातो, हृदय, फुफ्फुस आणि स्नायूंना चेतना मिळते, ताण कमी करणारे स्त्राव पाझरतात, रक्ताभिसरण वाढते, चेहर्‍याच्या स्नायूंना व्यायाम होतो, आरोग्य सुधारते, चेहरा प्रसन्न दिसतो. रडायला कारण लागत नाही, साधा कांदा पण रडवतो; हसण्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतात.

हसण्याने ताण नाहीसा होतो. कठीण परिस्थितीत दुसरं काहीच करता येण्यासारखे नसेल, तर निदान मोठ्यांदा हसून घ्यावे. अशाने गंभीर समस्येला खेळकर स्वरूप देता येते. अति झाले आणि हसू आले – असं आपण जेव्हा म्हणतो, त्याप्रमाणे अतीव दु:खामध्ये हास्याची मात्रा लागू पडते. रोजच्या धकाधकीच्या जीवनातील ताणतणाव हलके वाटावे यासाठी कित्येक शहरात बागा, सार्वजनिक उद्याने यात हास्य-क्लब चालवले जातात. सकाळच्या वेळेत लोक एकत्र जमून ठराविक पद्धतीने हसतात. खोटे खोटे हसले तरी त्याचा फायदा खर्‍या हसण्याप्रमाणे होतो. हास्य-योग या प्रकारात प्रार्थनेने सुरुवात करून मग काही हास्य-प्रकार केले जातात, नंतर हाता-पायाचे हलके व्यायाम, दीर्घ-श्वसन, टाळ्या, परत काही हास्य-प्रकार केले जातात. हसण्याचे जवळपास २० प्रकार आहेत. फुगा हास्य, पतंग हास्य, कारंजी हास्य, गोफण हास्य, टाळी हास्य असे मजेशीर प्रकार आहेत. एक तर चक्क मोबाइल हास्य आहे. २८ जुलै हा जागतिक हास्य दिन म्हणून साजरा केला जातो.

कोविड काळात ‘संसर्ग’ शब्द वापरायला भीती वाटते; ‘हास्य’ अति संसर्गजन्य आहे. हा हवाहवासा संसर्ग आपण अजून पसरवणार आहोत आणि विज्ञानाच्या इतर शाखांमध्ये ‘हास्य’ शोधणार आहोत. चेहर्‍यावरील हास्य हा सर्वात अनमोल दागिना आहे. तेव्हा भरपूर हसा आणि निरोगी रहा!

क्रमश :

वैज्ञानिक संदर्भ :

https://www.scienceinschool.org/content/science-and-humour

Image by Pete Linforth from Pixabay 

Supriya Waray

Supriya Waray

Supriya Waray is an electrical Engineer, with 35 years of rich experience in fields such as education, content development and mentoring on life skills. She loves interacting with young minds and takes great pleasure in teaching concepts through fun games and activities. She has passion for writing and writes in Marathi and English. She likes to translate interesting English articles into Marathi.

2 thoughts on “विनोद आणि विज्ञान : भाग१ हास्यामागचे विज्ञान

  • June 5, 2021 at 11:34 am
    Permalink

    नेहमीप्रमाणेच छान लिहीलंय. एक हॅंसी की कीमत तुम ही जानो सुप्रियामॅम, असेच हसत म्हणाले लागेल !

    Reply
    • June 5, 2021 at 3:52 pm
      Permalink

      धन्यवाद. हसण्यासाठी जन्म आपुला!

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!