घंटा ……
माळावरच्या धुळकट मृगजळानं माखलेल्या, क्षितिजावरून, एक लाल ठिपका, जवळ येताना दिसू लागला. अन नामदेवानं उगाचच हाताचा आडोसा करत, कुतूहल दाखवलं.
लांबून धुरळा उडवत पाचाची एस टी आली……. धुरळा उडवत गावात निघून गेली. नामदेवाच्या अंगणातली धूळ फक्त बदलली.
तसं नामदेवाचं कुणी येणार नव्हतं, न जाणार नव्हतं. पण गावाबाहेर शेतात बांधलेल्या त्याच्या मातीच्या खोपटात, बसून गावात कोण आलं , कोण गेलं. याची खबर देत, त्याच्या समोरच्या वळणावर, कचकचीत ब्रेक दाबत, रोज सकाळी अन संध्याकाळी एस टी जायची.
त्यामुळं तो एस टी ची वाट पहात राहायचा. त्याच एसटीनं, गावातला पक्या यायचा……. नामाची पेन्शन घेऊन. अन महिनाकाठी, पन्नास रुपये घेऊन जायचा. सहकारी बँकेत, म्हातारं जिवंत असल्याची हमी, अन वर्षभर, घरपोच पेन्शन, यावर पका हक्कानं पन्नास रुपये घेऊन जायचा.
नामा अन त्याची म्हातारी, दोघांपुरती पेन्शन रग्गड व्हायची.
नामा म्हणजे बारीक चणीचा, गोरटेला म्हातारा….. चेहऱ्यावरच्या अनुभवाच्या जाळ्यातून, बेरकी नजरेनं पाहणारा. पण नजरेतला बेरकीपणा त्याला व्यवहारात काही आणता आला नाही.
पोरगं कुठं तरी मुंबईला सेटल, ……. त्याला ना या रिटायर्ड शाळा शिपायाच्या पेन्शनची गरज, ……. ना आशीर्वादाची.
नामा रिटायर्ड झाल्यापासून, खोपटा मागच्या शेतात मन रमवायचा. शेती फुलवायचा. वानावळ्या वारी निम्मं वाटून टाकायचा. पण हल्ली मन रमत नव्हतं. पहिली एक दोन वर्षे गेली आरामात, पण त्याचं शेतीतलं, घरातलं लक्ष उडत चाललं होतं.
शाळेचा शिपाई म्हणून तब्बल ३६ वर्ष काढली. कधी मधी गावातल्या शाळेत पण जाऊन यायचा. उगाच बाहेरच्या पारावर बसून यायचा. पारावरच्या म्हाताऱ्यांच्या गप्पांमध्ये मन रमायचं नाही. मन उगाच भिरभिरत रहायचं. म्हातारी बारकाईनं पहात होती. लेकाची आठवण येते म्हणावी, तर तसं पण नव्हतं वाटत. चार दिवसावर जत्रा आली होती. गावात जंगी तयारी चालली होती. कुस्तीच्या फडापासून ते तमाशाच्या फडापर्यंत, सगळ्यांचीच धुमाळी उठली होती. आतातरी म्हातारं तरतरीत होईल असं म्हातारीला वाटत होतं.
पण चार दिवसावर, जत्रा आलेली असताना, पेन्शन काढायला गेलेला पका निरोप घेऊन आला.
“मॅनेजरनी तुमास्नी सोता बोलीवलंय…”
“कामुन …..”
“तुमि जित्ता हायसा का न्हाई ते बगायचं म्हणत हुता.”
“मला काय धाड भरली.?”
“मला म्हाइत हाय वो ……. आपलं गप जावा आधार कार्ड घेऊन….. उद्या त्याला तोंड दाऊन या……… पायजे तर मी येतो सोबतीला.”
“नको….. मी न म्हातारी जाऊन येऊ.”
………………………………………………….
गावातून निघालेली सकाळची एसटी, नामानं अन म्हातारीने घरासमोरच पकडली.
म्हातारा म्हातारी बसले…… कंडक्टरनं डबल दिली. अन सगळी बस एका सुरात, खडखडाट करत तालुक्याला निघाली. नामदेवचं लक्ष त्या बेल कडे होतं. मागून पुढपर्यंत, सगळ्या बसला एका सूत्रात बांधत असल्यासारखी ती बेल डबल सिंगल करत जात होती. आणि जवळजवळ वर्षानं एसटी प्रवास करणाऱ्या, नामाचं लक्ष राहून राहून त्या बेलकडे जात होतं.
तालुक्याला उतरून, दोघे तरातरा बँकेत गेली. म्हातारा म्हातारीला बघून, मॅनेजर पण गालात हसला.
“रागावू नका नामा तात्या, पण प्रोसिजर असती, आमची पण……. तुमची सही घ्यावी लागते, ……. वर्षातून एकदातरी.”
“घे बाबा कुठं घ्यायची ती. हाय जित्ता तोवर घे, …… तसंबी जगण्यात कुटं राम उरलाय.”
“ए तात्यांना एक चहा सांग रे.”
मॅनेजरने शक्य तितकी, या जुन्या पेन्शनरची मनस्थिती सांभाळून घेतली होती. पण नामा बँकेतून बाहेर येऊन, गुजराती भवन मधला भत्ता खाल्ल्याशिवाय शांत होईल वाटत नव्हतं.
म्हातारीला वाटलं आता मूड थोडा खुलंल. पण कसलं काय ? जगण्यातुन गेलेल्या रामाने, तिथंही पूर्ण भेळभत्ता खाऊन दिलाच नाही. अर्धा खाऊनच नामा उठला.
आता हळूहळू, म्हातारीचा पारा चढत होता. आता तालुक्याच्या स्टँडवर कडाक्याचं भांडण केल्याशिवाय काय म्हातारं शांत व्हायचं नाही, अशी तिची खात्रीच पटत चालली होती. खरंतर पेन्शन मिळाली होती. गावात जत्रा आली होती. पण गड्याचा मूड काही ठीक होत नव्हता. गेल्या काही महिन्यांपासून हे असंच चालू होतं. म्हातारीच्या डोक्यात चक्रं फिरू लागली.
पण तेवढ्यात, वाघळवाडीची एसटी लागली. दोघे जाऊन बसले. पण वेगवेगळ्या सीटवर. पुन्हा डबल सिंगलचा खेळ खेळत एसटी नामातात्याच्या वळणापर्यंत आली.
नामा घाईघाईने पटकन उठला, अन स्वतःच दोरी ओढली.
तशी म्हातारी ओरडली.
“बसा खाली, ……. आज कीर्तन हाय गावात, ….. देवळात जाऊ आधी.”
नामाच्या सिंगल बेलमुळं गाडीनं बदललेला गिअर पुन्हा पडला. अन नामा हिरमुसून खाली बसला.
गाडीचा स्टॉप म्हणजेच विठ्ठल मंदिर.
पॅसेंजर उतरले, …… नामा अन त्याची बायकोही उतरली.
म्हातारीने लगबगीनं देऊळ गाठलं. तिन्हीसांजा होत आल्या होत्या. बामण काकांची आरतीची लगबग चालली होती. टाळ मृदंग वाले गोळा होत होते.
तेवढ्यात पण म्हातारीने काकांच्या जवळ जाऊन काहीतरी सांगितलंच. पेन्शनसाठी म्हातारं जगवायचा नवस असणार…… दुसरं काय ?
रात्री तिथंच भंडारा होता. रात्रीची जेवणं इकडेच उरकायच्या बेताने म्हातारीने देवळात आणलं असणार, नामाचं एकेक कयास लावणं सुरूच होतं.
समईच्या पाची वाती लागल्या. सगळं जिथल्या तिथं लागल्याचं, तयारी झाल्याची खात्री करत काकांनी आरतीचं ताट उचललं, अन वादक मंडळींकडे पाहिलं. अन आवाज दिला.
“नामा तात्या, आजपासून आरतीला मोठी घंटा तुम्ही वाजवायची.”
कसंनूसं तोंड करून, कोपऱ्यात बसलेला नामा तात्या ताडकन उठला. म्हातारीकडं आश्चर्यानं पहात पुढे सरसावला. ती मनकवडं हसत होती. बाह्या मागं सारत, नामानं देवळाच्या घंटेचा ताबा घेतला.
आरती जोमात सुरू झाली. सूर धरून आळवणी सुरू झाली.
घंटेचं अन नामाचं नातं, शाळेच्या नोकरीपासूनचं……….छत्तीस वर्षांचं.
त्याच्या घंटेवर, जनगणमन सुरू व्हायचं, अन त्याच्या घंटेवर, वंदे मातरम होऊन, पोरं घरी धूम ठोकायची.
अन आताही, म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरचा न मावणारा लहान मुलासारखा आनंद, म्हातारी पदर नीट करत पहात होती. गेल्या काही दिवसांपासून किरकिर करणारा नामु, आज तिला पहिल्यांदा प्रसन्न दिसत होता.
ती विठ्ठलाकडं बघून हसू लागली……. म्हणाली,
“म्हाताऱ्याच्या घंटेच्या तालावर, दोनशे तीनशे पोरं रोज धावायची, ……. आता तुझा पाय रोज थिरकला तर मला नको सांगू बाबा ……”
©बीआरपवार
Image by analogicus from Pixabay
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
o+ … I enoy your stories ..they are very nice..
धन्यवाद 🙏
मस्त, प्रसन्न वाटले वाचून
गोष्ट छोटी डोंगराएवढी … मस्त आहे बी आर … 👌👌👌👍👍👍💝💝🔔
Khup chhan
👌.. किती साध्या साध्या गोष्टी असतात आयुष्यात.. छान सांगितलं आहे तुम्ही
Lovable story of common person
Sweet n simple.. 👌🏼👌🏼😍
Sundar
मस्तच..साधी सरळ गोड कथा
मस्त…
धन्यवाद !
वाह! बऱ्याच दिवसांनी लिहिलंत सर. खूप छान कथा.😊
Khup chhan 👌👌
धन्यवाद मित्रानो !🙏
खूप छान.. 👌👌👌
खुप छान
Khupach sunder agadi vegali katha
खूप छान