सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग 1
आज तसा उशीरच झाला फॅक्टरी मध्ये जायला. सकाळची घरची सगळी कामं आवरून लगबगीने निघाले. निघता निघता आशा ताईंना फोनवर जी दिवसातील महत्वाची कामं होती ती आटोपून घ्यायला सांगितली. सुरभीच्या ग्रुपच्या प्रॉडक्ट्सचीच डिलिव्हरी आज होणं गरजेचं होतं पण आशाताई म्हणाल्या सुरभी अजून पोहचलीच नाही तिथे.
पाचेक वर्षांपूर्वी गरीब,होतकरू,गरजू बायकांसाठी हा बचत गट सुरू केला आणि त्यातून मोठमोठ्या शाळेंचे गणवेश शिवून देणे, बऱ्याच हॉटेल्समध्ये तयार मसाले,पापड बनवून देणे, छोट्या मोठ्या बॅग्स बनवणे असे विविध उपक्रम सुरू केले आणि त्यातून या बायका नवीन आत्मविश्वासा सहित स्वावलंबी झाल्या. सुरभी दोन वर्षांपूर्वी कोणाच्या तरी ओळखीने आली.. मी अगदी प्रामाणिकपणे काम करेन,तक्रारीची एकही संधी देणार नाही या वाक्यां सहित त्या दिवसापासून ती फॅक्टरी मध्ये मन लावून काम करु लागली. तक्रारीला तिने कधीच जागा दिली नाही. सगळीच कामं चिकाटीने,मेहनतीने शिकून प्रगती केली. इथे समाजाच्या, कुटुंबाच्या, नवऱ्याच्या जाचाने पिचलेल्या स्त्रिया रोज नव्या संकटाशी लढत असतात..इतकी वर्षे प्रत्येकीच दुःख मी फार जवळून पाहिलं. घरी कोणी ऐकून घेणारच नसतं मग इथे येऊन आपापल्या मनाचा निचरा करतात. कधी नवऱ्याची तक्रार, त्याची मारझोड, कधी सासू सासऱ्यांचा त्रास, कधी लंपट पुरुषांचा त्रास सगळंच इथे बाहेर यायचं आणि सगळ्याजणी एकमेकींना आधार द्यायच्या. सुरभी मात्र नेहमी यापासून अलिप्त राहिली…ती आधार द्यायला तर असायची पण स्वतःच मन कधीच मोकळं करताना तिला पाहिलं नाही. उलट इतरांना ती म्हणायची, “घरीही तेच आणि इथे कामावर येऊनही तेच उगाळून काय मिळणार… फक्त त्रास आणि डोळ्यात पाणी. त्यापेक्षा इथे आल्यावर घरच गाऱ्हाणं घरी सोडून इथे जस तुम्हाला वाटतं तस जगा.. हसा,मजा करा,गाणी म्हणा,खुश राहा….यातूनच जरा एनर्जी मिळेल रोज लढायला..घरी जाऊन आहेच परत येरे माझ्या मागल्या.” तिचं म्हणणं सगळ्यांना पटायच आणि मग सगळ्या रोजच रडगाणं विसरून त्यांच्या त्यांच्या विश्वात रमायच्या.
सुरभी साधारणतः सव्वीस सत्तावीस वय, बारीक अंगकाठी पण सडसडीत, रंग गोरा, काळेभोर डोळे, लांबलचक केस, जन्मतः सुंदरच असणार पण परिस्थितीच्या चटक्यांचे व्रण कुठेतरी आता चेहऱ्यावर जाणवत होते. तशी कामात चुणचुणीत, हुशार,मनमिळाऊ, समजूतदार पण कधीकधी शून्यात हरवलेली नजर कुठलं तरी गुपित दडलंय याची जाणीव करून द्यायचे. तस तिच्या भूतकाळात कधी डोकावले नाही आणि तिनेही कधी त्याला वर काढलं नाही. आजपर्यंत कधी एकही सुट्टी तिने घेतली नाही पण या महिन्यात जरा जास्तच सुट्ट्या घेतल्या तिने..कित्येकदा उशिराही आली. कारण विचारलं तरी पटेल अस एकही आजवर तिला सांगता आलं नाही. सदा हसत असणारी सुरभी अलीकडे शांत शांतही राहायला लागले.. काही विपरीत तर नसेल ना घडत तिच्या आयुष्यात…
आणि तो माणूस..तो कोण होता जो तिला भेटायला फॅक्टरी मध्ये आल्यावर ती घाबरली होती. हात पाय थरथरत होते. तिला बोलताही येत नव्हतं इतकी तिची अवस्था खराब झाली होती. कदाचित त्या माणसाच्या रुपात तिचाच भूतकाळ अक्राळ विक्राळ रुपात तिच्या समोर उभा ठाकला असेल का???
सुरभीच्या विचार तंद्रीत असतानाच गाडी फॅक्टरी जवळ पोहचली. गाडीतून बाहेर येत असतानाच काही अंतरावर सुरभी आणि तोच विचित्र व्यक्ती पुन्हा तिच्यासमोर उभा दिसला. विस्कटलेले केस, वाढलेली दाढी, कळकटलेले कपडे,शर्ट अर्धा पँटच्या आत आणि अर्धा बाहेर, उजव्या बाह्याची घडी हाताच्या कोपऱ्यापर्यंत केलेली तर डावी बाही हाताखाली लोंबती. एकूणच तो कोणत्या तरी झोपडपट्टीतुन आलाय व थोड्या फार प्रमाणात दारुच सेवनही केलेलं असावं असं त्याच्या देहबोलीतून जाणवत होतं. रागाच्या भरात तो काही बाही सुरभीला बोलत होता आणि सुरभी फक्त इथून निघून जा सांगते हे तिच्या हात वाऱ्यातून कळत होतं. प्रकरण फारसं पुढे जायची वाट बघण्यापेक्षा मी सुरभीला आवाज दिला तस सुरभीने मागे वळून बघितलं आणि तो व्यक्ती ‘तुला नंतर बघतो’ अशी धमकी देऊन तिथून पळाला. सुरभी मान खाली घालून आतमध्ये स्वतःच्या जागेवर जाऊन बसली. मी ही सगळ्या कामाची पाहणी करून शाळेच्या गणवेशांचा माल पाठवायला तयार झाला की नाही हे विचारायला सुरभीला आत बोलावले. ती घाबरतच आत आली.
मी – आज परत उशिरा आलीस?
सुरभी – अअ…हो ताई जरा काम होत आणि लेकीलाही तिच्या मैत्रिणीच्या घरी सोडायच होतं म्हणून उशीर झाला…माफ करा.
मी – बर ठीक आहे. माल आजच पोहचवायचा आहे..तयार झाला?
सुरभी – हो ताई पॅकिंगच चालू आहे.
मी – बरं… मुलीची तब्येत ठीक आहे ना आता?
सुरभी – हो आता बरी आहे.
मी – हम्म…अजून काही बोलायचंय तुला?
सुरभी – (काहीसा विचार करून) नाही ताई.
मी – तू सांगावंसं म्हणून मी फोर्सही नक्कीच करणार नाही पण तुला माहीत आहे इथे काम करणारी प्रत्येक बाई स्वतःसोबत एक भळभळती जखम घेऊन जगते…जखमेच्या वेदनेसोबत रोज नव्याने उगवणारा सूर्य पाहते. पण त्या आपल्या जखमेला कधीतरी वाहूनही देतात. खपली काढून ठसठसेपर्यंत तिला सहनही करतात पण कुठेतरी थंड वारा किंवा वेदनाशामक मलम मिळाल्यावर जरा हसूही फुलतं त्यांच्या चेहऱ्यावर. थोडंस हलकं,आरामदायी वाटतं. तू ठरव जखमेला वाहून द्यावं की गोठून ठेवावं. बाकी तू सुज्ञ आहेस.
सुरभी – तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबरच आहे ताई पण काही जखमांवरील खपली न काढलेल्याच बऱ्या नाहीतर त्यामुळे होणाऱ्या घावानी जखमेवर जखमा साचत जातील पण जखमेवर मलम नाही मिळणार. येते ताई मी खूप काम आहेत.
सुरभी माझ्या नजरेला नजरही न मिळवता खूप काही कोड्यात बोलून गेली ज्याने मी बुचकळ्यात पडले. मन, बुद्धी,तर्क यांची कुठेच एक संगती होत नव्हती.
दिवस कसाबसा सुरभीच्या भूतकाळाचा आणि त्या विचित्र दिसणाऱ्या व्यक्तीचा अंदाज लावण्यातच सरला. सुरभीनेही दिवसभर स्वतःला कामात गुंतवून घेतलं होतं. आज ती कोणाशी बोलली नाही की हसलीही नाही. संध्याकाळी सगळ्याच बायका आपापलं काम संपवून घरी गेल्या..सुरभीही निघाली. मी सगळ्या मशीन्स, लाईट्स बंद करून बाहेर पडणार तितक्यात ताई वाचवा ताई वाचवा अस ओरडतच सुरभी आत आली आणि माझ्या गळ्यात पडली.
“ताई मला इथून बाहेर जायचं नाही…तो …तो नालायक माणूस बाहेरच उभा आहे…मला खूप भीती वाटते…मला आणि माझ्या मुलीला तो वेगळं करेल ताई…माझी मुलगी माझा जीव की प्राण आहे…हा तिला माझ्यापासून तोडेल.” असंच काहीसं बोलत ती माझ्या कुशीत ढसाढसा रडत होती.
सुरभीच्या अशा अचानक कोसळण्याने क्षणभर मलाही काही सुचले नाही पण क्षणार्धातच वॉचमनला गेट लावून घ्यायला सांगून सुरभीला आत घेतलं. डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करत पाणी प्यायला दिलं. तिच्या कुठल्या तरी जखमेवरची खपली निघत होती पण तिला झाकायचीच होती.
मी – आधी शांत हो आणि घाबरू नको. कोणी काही करणार नाही. तो माणूस तुला मुद्दाम त्रास देतोय का? तुला आणि मुलीला काही करणार अस म्हणाला का?? हे बघ तुझ्या सारख्या धीट मुलीने अस घाबरून नाही चालणार….आणि पोलीस आहेत सरंक्षण करायला हे तू विसरलीस का??
सुरभी – (हात जोडत) पोलीस?? ताई नको नको…पोलिसांकडे नाही जायचं मला. मला माझी मुलगी हवीये बाकी काही नको. तिला मी माझ्यापासून वेगळं पाहूच शकणार नाही ताई.
अस म्हणत ती पुन्हा रडायला लागते.
मी – बरं बर आधी डोळे पुस आणि नीट सांग नक्की काय घडलंय? कोण आहे हा माणूस आणि का तुझ्या मुलीला तुझ्या पासून तोडेल? नवरा आहे का हा तुझा?? लग्न केलं होतस तू याच्या सोबत?? तुमची मुलगी आहे का ती??
माझ्या प्रश्नांनी ती फक्त शून्यात नजर लावून बसली होती. काय बोलावं कसं बोलावं हे तिला सुचत नसावं.
पुन्हा मी तिला तोच प्रश्न विचारला, “तुझा नवरा आहे का तो?? का घाबरतेस त्याला इतकी??”
सुरभी – (अगदी शांतपणे खोल आवाजात) हो नवरा आहे…पण एका वेश्येचा नवरा.
आतापर्यंत अश्रू ढाळत असलेली सुरभी अचानक वेदनादायी हसू ओठांवर आणत म्हणते, “काळाने सुरैयाला पुन्हा माझ्या समोर उभं आणून ठेवलं…सुरैया पुन्हा का आलीस तू???” हा…हा..हा. सुरभीच्या त्या हसण्यातल्या वेदना किंकाळी प्रमाणे त्या खोलीत घुमत होत्या.
आणि वेश्या?? नक्की कोण?? ही सुरैया कोण??? सुरभीचा काय संबंध?? असे अगणित प्रश्न माझ्या डोक्यात घोंगावत होते.
क्रमशः
पुढील भागाची लिंक- सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग 2
- सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग ५ - June 3, 2021
- सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग 4 - June 1, 2021
- सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग 3 - May 25, 2021
Interesting..
Pingback: सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग 2 – LekhakOnline – Excellent Marathi Articles