जिगसॉ जिंदगी पत्र क्रमांक 8
प्रिय आई,
आज सकाळची गोष्ट- तुझ्या नातीनं “आई चल तुला एक गंमत दाखवायची आहे..” असं म्हणून माझा हात धरून ओढतच मला अंगणात नेलं. अंगणात झाडांसाठी जेमतेम जागा असलेल्या मातीत तिनं काही दिवसांपूर्वी खोचलेला शेंगदाणा चांगला तरारून अंकुरला होता. दोन इवलाली पानं त्यातून नुकतीच डोकावू लागली होती. शेंगदाणा रुजला होता. आणि तो रुजला म्हणून पोरीला केवढा आनंद !
तिच्या आनंदात आनंद साजरा करून तिचं कौतुक केलं आणि तिच्याशी खूप गप्पा केल्या तेव्हा कळलं की तिला तिने स्वतः लावलेलं बी असं रुजताना पाहून काहीतरी खूप छान फिलिंग येत आहे. खुश होती ती दिवसभर. निव्वळ त्याच गप्पा. तिला म्हंटलं तू अजूनही बरंच काही लावून बघू शकतेस. मग तिनं आणखी चौकशी करून एका वाटीत मोहरी, सोप, धणे, मटकी, चवळी, चणा असे काहीबाही दाणे भरून घेतले आणि माझ्यासमोर उभी राहिली, म्हणाली -“आई, हे सगळं मला लावायचंय.”
‘घ्या आता !… हे इतकं सगळं कुठं लावणार?… अंगण तर जेमतेम आहे. त्यातही आधीच्याच झाडांची खूप दाटीवाटी आहे. गुलाब, मोगरा, तगर, कुंदा, तुळस आणि हे सर्व सोडून उरलेल्या मातीवर नागवेल मस्त फोफावली आहे. इतकी की खालची जमीन निव्वळ नागवेलीच्या पानांचीच बनलेली आहे असं वाटावं. त्यात कुठल्याशा कोपऱ्यात एक शेंगदाणा तेवढा कसाबसा रुजला. आता ह्या गर्दीत तोही गुण्यागोविंदाने वाढेल की नाही याची शंका असताना ह्या वाटीतल्या विविध बिया कुठं लावायच्या?’ पण असं सांगितल्याने पोरीचा चेहरा हिरमुसला. मग काय गच्चीवर आजीने ठेवलेल्या बावीस राखीव कुंड्यांमध्ये ह्या बिया टाकण्याशिवाय पर्याय नव्हता. आजीचा जीव त्या बावीस कुंड्यांमध्ये फार आहे. शेवंती, डेलिया, गुलाब, निशिगंधा, कोरफड, गवती चहा, पुदिना असं सगळं त्या कुंड्यांमध्ये कुठुन कुठून कलमं, रोपं आणून आजीनं लावलंय. मग पोरीला कुंड्यांचा पर्याय दिल्यावर तिनं एकदा आजीची परमिशन घेतली आणि सगळ्या कुंड्यांमध्ये वाटीतल्या बिया थोड्या थोड्या टाकल्या.
दररोज संध्याकाळी कुंड्यांना पाणी घालायचं काम पोरगी पूर्वीही आवडीने करत असे. आता तर तिने स्वतः लावलेल्या बिया त्यात होत्या. मग काय विचारता, तीनचार दिवसांनी एकेक बी तरारून यायला सुरुवात झाली. तिचं निरीक्षण सुरू झालं. असं करता करता दोनेक महिने सहज गेले. दरम्यान मोहरीच्या शेंगेतील मोहरी काढून, ती भाजी फोडणी देताना वापरून, काहीतरी नवीन चवीचं खायला मिळतंय अशा कौतुकाने दोडक्याची भाजी खाऊन झाली. स्वतः पीक घेतलेल्या मटकी आणि चवळीचे दाणे उसळीत टाकून अगदी मन लावून डिशमधली उसळ संपवून झाली. एकदा जेवणानंतर ‘स्वतः लावलेली’ सोप सुदधा खाऊन झाली.
हे सगळं केलं. त्यातून आनंदही मिळाला. पण आता बाईसाहेबांची गाडी चिकू, सीताफळ, पपई, आंबा अशा फळांच्या बिया जमा करण्याकडे वळली आहे… तिनं हौसेनं बिया तर जमा केल्या आहेत पण प्रश्न पडलाय जागेचा. मग भरपूर विचार करून आम्ही ठरवलं की प्लॅस्टिकच्या छोट्या छोट्या पिशव्यांमध्ये माती भरून ह्या जमा केलेल्या बियांची रोपं तयार करूया. रोपं तयार झाली की ज्यांच्याकडे जागा आहे अशांना ती देऊया. ही आयडिया एकदम बेष्टच वाटली मला आणि तिलाही. येत्या काही दिवसात आम्ही भरपूर रोपं तयार करणार आहोत. त्यातली काही मी शाळेत नेऊन लावणार आहे.
गेल्या वर्षी मकरसंक्रांतीच्या वेळी वाणात मिळालेलं बदामाचं रोप आणि घरी रुजवून नंतर शाळेत नेलेलं रिठ्याचं रोप आता छान वाढलंय शाळेजवळ. तशी ही सुद्धा रोपं वाढतील.
कुठेही का वाढेनात… झाडं लावावी, ती वाढवावी वाटणं महत्वाचं. तू आणि मी मिळून एक पिंपळाचं रोप मारूतीच्या मंदिराजवळ लावलं होतं. ते मस्त मोठं झालंय आता. थंडगार सावली देणारं झालंय.
तुझ्या आठवणींचं झाडही असंच मोठं झालंय गं मनात. तू नाहीस पण झाडं आहेत… तू लावलेली. म्हणजे तू आहेसच.
कधीतरी मी नसेन माझ्या पोरीबरोबर पण झाडं असतीलच मी आणि तिनं मिळून लावलेली. म्हणजे मीही असेनच… तुझ्यासारखी.
तुझीच
छबी.
ता. क. – तुझ्या नातीच्या हातात झाडांचा जीव रुजवण्याचा गुण आहे. देवाला म्हणावं तिच्या नशिबात मोठ्ठं अंगण असलेलं घर असू दे….
Image by Free-Photos from Pixabay
Latest posts by Vinaya Pimpale_w (see all)
- जिगसॉ जिंदगी पत्र क्रमांक 8 - May 20, 2021
- फुलपाखरू - April 13, 2021
- पोटॅटो पिनव्हील - March 27, 2021
एकदम मस्त