साथ- भाग १

 ” माधवी s ,माझी लाल फाईल कुठे ठेवलीस ? ” 
” तिथेच ड्रॉवर मध्ये बघ न .”
” आई , युनिफॉर्म प्रेस झाला ?”
” हो s ठेवलाय कॉट वर . चल दूध घ्यायला ये लवकर .”
” नाही सापडतय ग फाईल !”
माधवी धावत आली आणि खालच्या ड्रॉवर मधील फाईल काढून ठेवली .
” अरे , तूच नाही का काल ठेवलीस “
” अरे यार ! तुझ्या कसं ग सगळं लक्षात रहातं ?” 
” अरे s माझी पोळी जळेल !!” ,ती आत धावली .
” बाबा , रिपोर्ट कार्ड वर सही ….”
” अरे आई ला सांग ना , चालते आई ची ……तशी आईचीच चालते म्हणा सगळी कडे ..” मंदार आणि छोट्या अर्णव ने लगेच टाळी दिली एकमेकांना . 
” काय उगाच जोक मारताय सकाळी सकाळी , आज मावशी बाई सुटीवर आहेत .मला मदत करणं राहिलं बाजूला !!” By
” अग , हो s तुझं प्रेझेंटेशन आहे न आज ? श s sट !! मी मदत करिन म्हणालो आणि रात्री डोळाच लागला माझा .”
” म्हणजे ते राहिलंय मंदार ?? उफफ !
ठीक आहे , मी पोहोचल्यावर बघते . अर्णव , हा तुझा टिफीन . मंदार , तुझ्या युनिफॉर्म चं बटन लावून ठेवलंय सक्काळीच . ” 
” असं फिल्मी स्टाईल नि लावायचं होतं ग , असा मी उभा , मग तू लगेच जवळ येऊन सुई दोरा हातात वगैरे ..”
” हो का ? तोड ते बटन पुन्हा , मी रविवारी  ‘तसं ‘ लावून देते .” ह्यावर दोघेही हसले .
” येतो मी माधवी , ऑल द बेस्ट !! ते उरलेलं काम पूर्ण करून टाक हं .
बाय ! “
  मंदार आणि अर्णव गेल्यावर आत जाऊन तिने आधी लॅपटॉप उघडला . तिचं प्रेझेन्टेशन पूर्ण तयार होतं . शेजारी स्टिक नोट होती , ‘ लव यु ‘ लिहिलेली .
       असाच होता मंदार . मिश्किल , आनंदी , समजूतदार आणि  खूपच 
काळजी घेणारा . 
अर्णव च्या जन्मानंतर माधवीला जॉईन करायच्या वेळी आई आली होती मदतीला . पण तरीही त्याने मोठी सुट्टी घेतली. आई ला सगळं समजेपर्यंत घरीच राहिला . सहाच महिन्यात माधविला प्रमोशन मिळालं . त्याच्या पेक्षा तिचा पगार जास्त होता , पण कुठेही किंचितही स्पर्धा नव्हती मनात .
होते फक्त कौतुक .” 
      स्वतः चं आवरून ती डबा घेऊन बाहेर पडली . समोरच्या फ्लॅटची सानिया नुकतीच उठून पेपर घ्यायला बाहेर आली होती .
” हाय ! गुड  मॉर्निंग !! ” माधवी म्हणाली .
” ऑफिस ? “
” हो ग , भेटू संध्याकाळी .बाय .”
” बा s य !!  गुड डे डिअर !!” 
ही सानिया म्हणजे एक अजब रसायन होतं . बिनधास्त ,आपल्या मर्जीने जगणारी . पंचतारांकित हॉटेल मध्ये अडमिनिस्ट्रेशन ऑफिसर असल्याने तिला रात्री घरी यायला बराच उशीर होई . मग कुण्या कुलीग ने ड्रॉप केलं की लगेच सोसायटीत कुजबुज . तिची रहाणी अर्थातच मॉडर्न होती . तिच्या नोकरीची गरजच होती ती . मंदार आणि माधवीशी तिचे छान संबंध होते .
एक दोनदा अर्णव ला शाळेत ड्रॉप पण केले होते तिने . 
      ऑफिस मध्ये  माधवीचे प्रेझेन्टेशन जोरदार  झाले . व्ही .पी सरांनी खूप तारीफ पण केली . खूप समाधान वाटले तिला . तिने लगेच मंदारला कॉल केला .
” हा माधवी , कसं झालं ?”
” अरे , फर्स्ट क्लास !! सर खुश . तुमची मेहेरबानी बाबा , आमचं काय ..”
” समीर कुठाय ? “
” आज भेटला नाही , पण असेल त्याच्या केबिन मध्ये .  का रे ? “
” हरामखोराने उद्या आपल्याला लंच ला बोलावलं होतं ,आणि चार दिवस झाले स्वतः गायब आहे . ” 
” मी बघते , बाय ” 
      समीर म्हणजे मंदारचा बालमित्र . माधवीच्याच कंपनीत मार्केटींग डिव्हिजन ला होता . तिने समीर ला फोन लावला .
” हाय  मॅड ! “
” तू काय आम्हाला लंच ला बोलावलं होतंस ? ” 
” अरे , हो ! पण आता मीच यावं म्हणतोय ….ती सानिया असेल न, तीला पण बोलाव ना ! “
” समीर !! सुधर रे , सुधर जरा . नाहीतर लग्नच कर न तिच्याशी . “
” तिचा  असेल ना  कुणी….”
” रिअली ? तिला …नाहीये कुणी बॉयफ्रेंड !! “
” बरं जाऊदे ! मी येतो उद्या . बाय .” नंतर कामात तो विषय माधवी विसरून गेली . 
      माधवी प्रचंड कामात असतांना सारखा एक फोन येत होता . 
सायलंट वर असला तरी तिची चीड चीड होत होती . शेवटी तिने फोन उचलला .
” हॅलो माधवी ? ..” 
“……………तुला सांगितले ना प्रकाश , मला पुन्हा फोन नाही करायचा म्हणून .” 
” तू सांगितलं आणि मी ऐकलं ,असं झालं होतं का कधी ? ” तो खी खी हसत म्हणाला . 
” तुला काय काम आहे माझ्याशी ? “
” का s म ? अं s  काम तर खूप आहे . भेटायचंय . “
” मुळीच नाही . पुन्हा मला फोन करू नको ,मी पोलीस  कॅम्पलेंट करीन . ” 
” ओहो s , मॅडम रागावल्या ? ..ब s रं , उद्या करतो .” 
       तिच्या कपाळावर घाम जमला होता . घशाला कोरड पडली . तिने कसे बसे सहा वाजेपर्यंत काम रेटले आणि निघाली . 
तिच्या अपेक्षेप्रमाणे मंदार लवकर आला होता . दर शुक्रवारी तो पाचपर्यंत घरी येत असे . तिचा चेहरा बघूनच तो उठला ..
” काय झालं माधवी ? प्रशांत चा फोन होता का ? “
” तुला कसं कळालं ?” तिला आश्चर्य वाटलं 
” तो गेला आठवडाभर मला कॉल करतोय .”
” काय ?? ..तू हे मला आत्ता 
सांगतोय ? ” 
” मी त्याला म्हणालो , की कायद्याने तुम्ही वेगळे झाले आहात , आता कॉल का करतोय ?”
माधवी ला रडू फुटले ..” मंदार , तो अर्णव ची कस्टडी मागेल …हो ..मला भीती आहे की तो अर्णव ची …..
” असा कसा मागेल ? आणि आपण बरे देऊ ? तू काळजी नको करुस ग ! हा काहीच नाही करु शकत . ” 
त्याने प्रेमाने माधविला जवळ घेतले .
मावशीबाईंनी कॉफी आणली . नजर कुठेतरी खोल रुतवून ती कॉफी घेत होती . 
” माधवी , इतका विचार का करतेय तू ? 
तो काही करू शकत नाही . मी आहे न ! “
” मी किती नशीबवान आहे मंदार की तू मला भेटलास ..किती साफ मन आहे तुझं . “
” तू झाडू मारतेस ना रोज , मग साफ़च असणार .” 
” शी ! काहीही हं .’ 
” आपल्यात इतकं सामंजस्य आहे , विश्वास आहे ..आता बघ . जरी तू मला एखाद्या मुलीच्या मिठीत बघितलं तरीही 
गैरसमज थोडी ना करून घेणारेस ?” 
 तिला काही क्षण लागले समजायला … ..अन मग ओरडली ….
” यु !!! ” आणि तिने  त्याला उशी फेकून मारली .
” बघ बदलला किनई तुझा मूड !!! “
 
बेल वाजली . दारात सानिया उभी होती , अर्णव ला घेऊन . 
” अरे! सानिया ? ये ना आत . हा तुझ्या कडे होता का ? “
” नाही . खाली खेळत होता . त्याला मी वर घेऊन आले . तू आली असशील म्हणून .” 
” ओह ,थँक्स . ये न .”
” नाही , मी जरा बाहेर जातेय , दहा वाजेपर्यंत येईन . माझे एक पार्सल येईल ते ठेऊन घेशील का ? “
” हो नक्की ” 
सानिया गेली . 
” मम्मा , एक अंकल खाली वाट बघत आहेत सानिया आंटीची .”
” असं ? तुझं बरं लक्ष असतं रे !! चल हायपाय धुवून घे . आपण थोडी मोसंबी खाऊया  काय .” 
पुन्हा फोन वाजला . धावत जाऊन अर्णव नि घेतला .
” हाय अंकल .”
माधवी आणि मंदार दोघानीही  चमकून बघितले 
” हो s , आलीये ना मम्मा ……हो s , बाबा पण …….हं …हं  ..
मंदार ने फोन हिसकावून घेतला .
” कोण बोलतोय ? तुझी इतकी हिम्मत ? की तू माझ्या मुलापर्यंत पोहोचलास ? ……अजिबात नाही !!!”
त्याने फोन आदळला .
” अर्णव !!! हा तुला बोलतो फोन वर ?
कधी पासून ?”
” मी स्कुल मधून आलो की फोन येतो .”
“मावशी , तुम्ही कधीच बोलला नाहीत ? असा कुणाचाही फोन आला तर अर्णव ला नाही द्यायचा !” 
” मला वाटलं , आजी आजोबा फोन करतात नागपूरहून ..तेच ..असेल ” 
       सगळी निजानीज झाली तरी माधवीला झोप येईना . तिला अर्णव ची काळजी आणि प्रशांत ची भीती वाटायला लागली ……..
 
******** माधवी खूप खुश होती , तिला प्रशांत सारखा देखणा ,हुशार नवरा मिळाला होता .  नेहेरू नगर सारख्या प्रतिष्ठित भागात बंगला , वडिलांचा मोठा  व्यवसाय ,गावाकडे जमीन …सगळंच अनुकूल . 
लग्न झालं , माधवी सासरी आली . सगळ्यांनी कौतुकाने तिचं स्वागत केलं . सासूबाई पण खूप प्रेमळ वाटल्या ..फक्त त्यांच्या चेहेऱ्यावर खूप 
ताण दिसत होता . काहीतरी चुकतंय असं वाटत होतं तिला . 
दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा झाली . जेवणं झाले …ती थोडावेळ तिच्या खोलीत जाऊन पडली . प्रशांत बऱ्याच वेळापासून दिसला नव्हता . 
” माधवी ? प्रशांत आहे का आत ?” 
” नाही , ते दुपार पासूनच कुठे बाहेर आहेत वाटतं .” 
जवळपास सगळेच पाहुणे गेले होते .
मोजके दोनचार लोक घरात होते .
         रात्र झाली . त्यांची पहिली रात्र .
ती प्रशांतची वाट बघत होती .रात्री बारा नंतर धाडकन  दारावर आदळतच तो खोलीत आला . तिने पटकन पुढे येऊन त्याला आधार दिला . भपकन वास आला तसं  तिला एकदम भडभडलं . 
दाराआड सासूबाई काळजीत उभ्या दिसल्या तीला ……तर हे होतं त्यांच्या काळजीचं कारण ! 
” माधवी , तुला आम्ही फसवलंय .” दारूच्या नशेत तो बोलला आणि तिला चर्रर्रर्र झालं .
” पप्पांचा बिझनेस …झिरो …किती?….झिरो !
आता हे घर पण गिरवी आहे . उद्या ….उद्याच आपल्याला ..,बाहेर लाथ मारून काढेल बँक !! कर्ज ..ग  …,कर्ज !!” नशेत सगळं खरं बोलून गेला प्रशांत ! तिच्या मनावर प्रचंड ओझं टाकून स्वतः मात्र  गाढ झोपला  . 
…………..
  ” माधवी ? ए s ..माधवी …” मंदार उठून हाक मारत होता .
” काय तोच तोच विचार करतेस माधवी . उपयोग आहे का काही ? झोप आता , तब्बेतीवर परिणाम होईल बरं .” 
” हो रे , झोपते . काळजी नको करुस .”
”  भूतकाळ  जर खूप रम्य असेल न , तरी त्यात रमू नये . आणि तो जर त्रासदायक असेल तर मग तर त्याला कापून टाकावं पूर्णपणे . ” 
” तो भूतकाळ जिवंत भूत झालातर ? “
” मग तर  त्या भूताला  त्याची जागा दाखवावी …..आपण दाखवू ग …मी आहे न माधवी ….” ती प्रेमाने त्याला बिलगली . 
         
       माधविला काही ऑफिस मध्ये जावेसे वाटले नाही . म्हणून ती घरीच थांबली होती .
” माधवी , ये ना जरा निवांत वेळ आहे तर कॉफी घेऊया ” सानिया बोलवत होती . ती नेहमीच आग्रह करायची , हिलाच जमायचं नाही म्हूणून आज पटकन हो म्हणाली .
” काय झालं माधवी ? तुझं नेहमीचं हसू कुठे गेलंय ?” 
” .……चांगुलपणा नडतो ग कधी कधी …..” तिचा चेहरा बदलला .
” I am sure ,it’s not about mandar …..तुझा एक्स? “
” हो ग ,अर्णव ची धमकी देतोय .”
” ***साला !! ****त दम नाही त्याच्या!!!  तू कशी राहिली ग पूर्ण एक वर्ष त्याच्या जवळ ?” 
” अग ,लग्नानंतर महिन्यातच तो बंगला जप्त झाला होता . बँकेने ताबा घेतला .” 
” माझ्या वडिलांनी  चक्क त्यांचे घर दिले रहायला ….हेच तर हवे होते त्यांना . ..इतकं करूनही मी धीर देत होते त्याला . वाटलं येऊ बाहेर ह्यातून …पण त्याची लायकीच नव्हती ग !! माझे दागिने विकले मला न सांगता …पप्पांच्या घराचा परस्पर सौदा करायला चालला होता . नशीब ते अग्रवाल ..म्हणजे खरीददार ओळखीचे निघाले …” 
” तुझ्या सासूबाई …
” अर्णव च्या वेळी  मी प्रेग्नन्ट होते , तेव्हा हार्ट ऍटॅक ने ..
” excuse me ladies , मी आलोय .”
समीर आला होता . 
सानिया उठून पुढे गेली ,” ओह समीर , प्लिज कम ! ” 
” आवडलं असतं मला , पण …पुन्हा कधी . ही आहे न आज मध्ये मध्ये बोलायला ” तो माधविला चिडवत म्हणाला .
” चल बाबा  समीर , तिला तुझ्या फ्लर्टिग ची सवय नाहीये .” 
दोहे समोरच माधवी कडे पोहोचल्यावर तिच्या लक्षात आले की काहीतरी सिरीयस झालेय . 
” काय झालं ? ..अर्णव ? ..कुठे? …
” रिलॅक्स ! तो आहे . ..”
” मग ? काय झालं समीर ? …अरे बोल ना !!”
” आज तू आली नव्हतीस  ऑफिसला .” 
” हो आज घरीच रहावे वाटत होते ….का ?” 
” ते  ……..व्ही .पी  नि तुझी टर्मिनेशन ची ऑर्डर काढलीये . ” समीर हिम्मत करून म्हणाला . 
” टर्मिनेशन ? आर यु सिरीयस ?” 
” हो . आतल्या गोटातून बातमी आहे …. भार्गवी ने सांगितलं , बाकी कुणाला माहीत नाही .” 
”  कसं शक्य आहे ? कारण कळेल का ? ” तिचे डोळे डबडबले होते . 
 
 माधवीला कळेना की हे असे कसे होऊ शकते .
” समीर , भार्गवीने तुला बोलावून सांगितले ? ” 
” हो . तिने आधी तू आहेस का हे बघितले . तू नेमकी रजेवर होतीस . मग तिने मला बोलावले . म्हणाली की ताबडतोब माधवीला कल्पना दे ..मला खात्री आहे की तिची टर्मिनेशन ची ऑर्डर तयार आहे ,H .R हेड नि सांगितलंय .” 
मंदार  माधवीच्या जवळ आला . ” हे बघ माधवी , काहीतरी चुकतंय . तू काही कुणी चतुर्थ श्रेणी कामगार नाहीयेस की असं सांगितलं आणि लगेच काढून टाकलं .उद्या जाऊन बघ .आणि शांत पणे घे . Dont worry . आपण कुणाचं वाईट केलं नाहीये …आपलं ही होणार नाही .” 
” मी जाऊन बघते न उद्या .बघू , जे असेल त्याला सामोरं जायची माझी तयारी आहे . तू आहेस न सोबत . मला काळजी नाही .” 
        सकाळी लवकरच ती ऑफिस ला गेली . सगळं नॉर्मल होतं . कुणाला काही कळाल्याचे दिसत नव्हते .पाच मिनिटातच तिला फोन आला . ती वाटच बघत होती . मनाची पूर्ण तयारी करून ती सरांच्या केबिन मध्ये गेली . 
” येस सर ?” 
” मॅडम , आपल्या सगळ्या CNC मशिन्स ची परचेस ऑर्डर तुम्ही कुणाला दिली होती ? “
” सर ,  ‘थोर्ब इंडिया ‘ ला .आपण तिथेच देतो कारण मग इंस्टालेशन आणि सर्विसेस एकदम सोपं होतं …..का बरं सर ? काही प्रॉब्लेम ?”
” एकूण किती मशिन्स ची ऑर्डर होती ? आणि कितीचं अप्रुव्हल होतं एम .डी सरांकडून ? “
” सर , आपण जुन्या आणि नव्या प्लान्ट साठी एकूण अकरा मशिन्स मागवल्या .
साडे वावीस कोटी ची ऑर्डर होती ….काय झालं सर ? .. हे का विचारताय ?” 
” गेले आठ दिवस  I .S.D (Information system department ) तुमच्यावर लक्ष ठेऊन होतं . परवा एक मोठी डील
झाली आणि काल बरोबर तुम्ही सुट्टी घेतली  .”
” सर , तुम्हला काय म्हणायचं ते सरळ सरळ बोला प्लिज . कोडे नका टाकू .”
” थोर्ब नि तुम्हाला किती दिले ?”
” सर , मी दहा वर्षे ह्या कंपनीत काम करतेय .  कितीतरी परचेस ऑर्डर्स माझ्या सहीने झाल्यात . कोट्यवधींची खरेदी केलीये . आत्ताच का ह्या चौकश्या ?” 
” सॉरी टू से , पण काही महिन्यांपूर्वी तुम्ही युरोपला जाऊन आलात न ? आणि नवीन फ्लॅट पण ..”
ती ताडकन उठली . ” सर , कुठलेही निराधार आरोप मी सहन करणार नाही . मी एक पैश्याची अपेक्षा न ठेवता अतिशय प्रामाणिकपणे सगळे व्यवहार केले आहेत . ” 
” थोर्ब च्या  विनोद बत्रा ला ओळखता ? त्याने स्वतः सांगितलंय की तो तुम्हाला सहा टक्के कमिशन देतो . तुमच्यासाठी टूर प्लान करतो .”
” व्हॉट ? सर , मला कळत नाहीये हा का खोटं बोलतोय …..हे पूर्ण खोटं आहे सर . …माझा नवरा देखील भरपूर कमावतो , आम्ही एक काय दोन टूर 
करु शकतो एका वर्षात . बत्रा ला माझ्या समोर आणा सर , मी बोलते …”
” हे बघा मॅडम , ते सगळं आम्ही बघूच .पण सध्या तरी ….” 
त्यांनी एक पाकीट समोर केले . 
” तुमच्या बाकी सगळ्या फॉर्म्यालीटिज लवकरच पूर्ण केल्याजातील . आणि काळजी कशाला करता ,त्यांचे आरोप खोटे सिद्ध झाल्यास पुन्हा तुम्ही…
” गुड बाय सर . थँक्स !!! मी स्वतःला निरपराध सिद्ध करेनच , पण पुन्हा येणार नाही इथे वापस .” 
 ती ताठ मानेने तिथून बाहेर पडली .
तिच्या केबिनमधील काही वस्तू घेतल्या आणि कुणाशीही न बोलता निघाली . 
      आज मुद्दाम तिने कार आणली नव्हती  म्हणून कॅब मागवली . 
दहा वर्षे दिली मी ह्या कंपनीला . किती 
मोठ्या मोठया डील केल्या , कधी चुकूनही मनात मोह आला नाही . ह्याच बत्रा ने काय काय ऑफर्स दिल्या होत्या …नम्रपणे नाकारल्या …..आणि 
आज ? तीला फार वाईट वाटत होतं .
तिच्या अपेक्षेप्रमाणे बरोबर मंदार चा फोन आला .
” समीर ची बातमी खरी ठरली मंदार . तिचा स्वर कातर झाला होता .”
”  ठीक आहे माधवी ,पण कारण सांगितलं का ? “
” मी बत्रा कडून कमिशन घेतलं म्हणे .”
” व्हॉट रबिश !!!” 
” मी घरी जातेय .”
” मी पण आलोच .”
” अरे नाही !! म्हणजे , खूप महत्त्वाचे काम सोडून येऊ नको .मी ठीक आहे .  तू आहेस ना सोबत मग मला काय काळजी .भेटू संध्याकाळी .”
 
    ती घरी आली . अर्णव शाळेत होता .
फोन वाजला .
” कसं वाटतंय कामावरून काढल्यावर ? ” तोच छद्मी आवाज .
” ओह म्हणजे हे तुझं कारस्थान आहे हे तर ! मला आधीच लक्षात यायला पाहिजे होतं , पण इतक्या थराला जाशील असं वाटलं नाही मला . हे सगळं तू का करतोयस प्रशांत ? अर्णव साठी ?   कशाला हवाय तो ? 
तुला अर्णव ची कस्टडी कोर्टानेच दिली  नव्हती . मुलाला पोसायला कुवत लागते ,प्रशांत .”
” माझी कुवत कळाली न तुला आज ? 
तेव्हा अर्णव काही महिन्यांचा होता , म्हणून तुला कस्टडी मिळाली . आता तो मोठा झालाय …आणि अजून तर फक्त तुझिच नोकरी गेलीये ,…मंदार बाबू …..चा ……बरा चाललाय न जॉब? ” कुचके पणाने त्याने विचारले .
” प्रशांत , don’t you dare to do that !!” 
” ही ! ही ! ही ! , माझा पोरगा मला पाहिजे , बास !! तुम्ही बऱ्या बोलाने ताबा द्या , नाहीतर मला …”
तिने चिडून फोन आपटला . 
हा ..नेमका काय करतोय ? मला जॉब वरून काढण्यासाठी  ..  माझ्या विरुद्ध कागाळया करतोय .आणि कंपनीने ही कसं ते मनावर घेतलं ? . 
      ” मम्मा !! ” अर्णव आला होता . “अरे ! आज लवकर ? मग तुला कोणी आणले ? “
मागून सानिया आली .
” सानिया ? तुला कसं कळालं ? ह्याचं time टेबल ? “
” मंदार चा फोन होता . माझ्या हॉटेल पासून शाळा जवळ आहे न .तू अस्वस्थ असशील म्हणून तुला सांगितले नसेल .”
    ” ये न , बस ,…. मावशी बाई , थोडा नाश्ता  घेऊन या .” 
 ” माधवी ,  काही अडचण आहे का  ?”
” चालतंच ग ! जाऊ दे . तुझं काय चालू आहे ? “
“मी सध्या ऍडमिनिस्ट्रेशन सोबतच मार्केटिंग पण बघतेय .”
” गुड ! आजकाल फार खुश दिसतेस सानिया हा , बात क्या है ? …बॉयफ्रेंड ? “
” आहे एक तसा क्लोज फ्रेंड …पण …डोन्ट नो ” ती हसली .म्हणाली , 
“तुला मंदार कुठे भेटला ग ? “
” मंदार ?……..ती सांगू लागली  ………………
        प्रशांत आणि माधवीच्या लग्नाला आठ महिने झाले होते . प्रशांत चे वडील बाबासाहेब यांची कनव्हेअर्स ची फॅक्टरी होती . त्यांचा व्यवसाय काही नीट चालत नव्हता म्हणून त्यांनी  कर्ज घेण्यासाठी घर गहाण टाकले होते . कर्ज तर वाढतच  होते , पण
बिझनेस तसाच होता ठप्प !! म्हणून त्यांनी खोटी श्रीमंती दाखवून माधवीच्या वडिलांना भुरळ पाडली आणि माधवीच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला .  ती तेव्हा नोकरी करत होती . तिच्या वडिलांच्या मदतीने आपले कर्ज चुकवू आणि शिवाय लग्नानंतर आपला दारुडा विक्षिप्त मुलगा थोडा सुधारेल असे त्यांना वाटले ……माधवी ने देखील मनापासून प्रयत्न केले प्रशांतशी जुळवून घेण्याचे .पण तो एक स्वार्थी आळशी बेगैरत माणूस होता .  स्वतः काहीच करत नव्हता आणि तिला ही नोकरी सोडायला लावली . 
माधवी प्रेग्नंट असल्याची बातमी कळाली तेव्हा तिला आशा वाटले होती की हा थोडा तरी बदलेल , वडिलांना नव्या व्यवसायात मदत करेल , पण त्याला त्याचा तसूभरही आनंद झाला नव्हता . तीची शेवटची आशा म्हणजे हा नवीन पाहुणा होता . किमान मुलामुळे तरी तो बदलेल असे तिला वाटले होते .. त्याला मात्र कशाचेच सोयरसुतक नव्हते ..
डॉक्टर कडेही ती एकटिच गेली होती ……..
……….. आपला नंबर येण्याची ती वाट बघत होती . तिच्यानंतरही तीन चार महिला होत्या . एक थोड्या वयस्क काकू आणि त्यांचा मुलगा पण वाट बघत होते . त्या काकू म्हणाल्या ,
” पहिलीच वेळ दिसतेय .”
” हो .”
” सोबत कुणी नाही का ?” 
” नाही , मिस्टरांचा व्यवसाय आहे , वेळ नाही ..म्हणून ..” ती कसनुसं हसली . 
ती डॉक्टर च्या केबिन मधून बाहेर आली , आणि बाबासाहेबांचा फोन आला . ” माधवी , तुझ्या सासूला हार्ट ऍटॅक आलाय , हॉस्पिटलमध्ये नेतोय ,तुही तिथेच ये .” 
तिला काही कळेचना …सासूबाई …ह्या घरात आपल्याशी प्रेमाने वागणारी एकमेव व्यक्ती !! त्याही जर नसतील तर मी …तिला एकदम घेरीच आली .
      थोड्या वेळाने तिने डोळे उघडले तर त्याच वयस्क काकू आणि त्यांचा मुलगा होते समोर . ती गेली होती त्याच डॉक्टर च्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी तिला ऍडमिट केलं होतं .
तिला बरं वाटल्यावर ‘तो ‘ म्हणाला ,
” तुम्हाला अचानक भोवळ आली , म्हणून …”
” माझा फोन ?”
” हा ..हा घ्या . मी ह्यावरून तुमच्या इमर्जन्सी कॉन्टॅक्ट ला फोन केला …पण …ते …”
” थोड्या वेळापूर्वी माझ्या सासूबाईंना ऍडमिट केलंय हो . मला जावं लागेल .”
” हे बघ बेटा , हा घेऊन जाईल तुला तिथे .काळजी नको करुस .” त्या काकू प्रेमाने म्हणाल्या .
   तीने ‘त्या ‘ माणसाकडे बघीतले . तसा सभ्य वाटला .
” मी सोडतो माझ्या गाडीत , काळजी नका करू .” 
” तुमचे आभार कसे ..
“मानूच नका .  बाय द वे , मी मंदार .
सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे , इथेच एक कंपनीत जॉबला आहे . “
” मी माधवी , मेकॅनिकल इंजिनिअर आहे …पण ..जॉब….”
” अहो ,तुमच्या काही जबाबदाऱ्या संपल्या की करालच न , इतकं काय 
त्यात “. तो छानसं हसला . ते तिथे पोहोचले तेव्हा सासूबाई गेल्या होत्या . हा तिच्या साठी फार मोठा आघात होता . लग्नानंतर पहिल्यांदा ती आतून तुटली होती . 
” सॉरी , हे असं घडलं . माझी काही मदत ..
त्याचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत प्रशांत तिथे आला . तिच्यावरचओरडला ,
” वाह !! वाह !! इथे सासू ला मरायला सोडलस आणि स्वतः कुण्या परक्या माणसाबरोबर गुलछररे उडवतीयेस ? काळ्या पायाची !!” 
” अहो काय बोलताय हे ? त्यांची प्रकृती नाजूक झाली होती …
” ए s !!! तू गप्प बस !! तू कोण रे ? “
” बरोबर आहे .मी कोणीही नाही . पण जे तुमचे आहेत त्यांना तरी नीट वागणूक द्या !! मान्य आहे , आई वारल्यात ,वाईट झालं . पण ह्या दोन जिवाच्या बाईशी अशी वागणूक ? तुमच्या पत्नीची काय चूक ह्याच्यात ?
माफ करा मॅडम , पण तुम्ही यांना यांची जागा दाखवायला हवी !! ,येतो मी .” …………………….
माधवी सांगत होती आणि सानिया सगळं विसरून ऐकत होती .
 
 “ती माझी आणि मंदारची पहिली भेट होती  . सासू बाई गेल्या . मी चार महिन्यांची प्रेग्नन्ट होते तेव्हा  . प्रशांत दिवसरात्र नशेतच असायचा . आमची परिस्थिती हालाखीचीच होती . मला खूपदा जॉब ऑफर्स आल्या . मलाही माझा जॉब खूप खुणावायचा पण ह्या माणसाने नोकरीचं नाव काढू दिलं नाही .” 
“……हं s “
” एक दिवस मी फक्त भाजी आणायला बाहेर गेले होते . थोडासाच उशीर झाला होता तर ह्या माणसाने माझ्यासाठी दारच उघडले नाही . बाहेर जोरात पाऊस सुरू झाला . मी चार महिन्यांचे पोट घेऊन पावसात उभी ….आणि …हा आत दारू …….
त्याच क्षणी मी निर्णय घेतला . वापस फिरले , रिक्षा पकडली  आणि माहेरी गेले . दुसऱ्याच दिवशी माझ्या जुन्याच कंपनीत गेले . साहेबांना सगळं खरं सांगितलं . त्यांनी पण माझे आधीचे काम पाहून जगावेगळा  निर्णय घेतला आणि मी तश्या अवस्थेत जॉईन झाले .” 
” कमाल आहे हा तुझी !!! मानलं तुला !!! लेकीन आगे की लव स्टोरी ??”
” हा , मी तेव्हाच लगेच डीव्होर्स साठी अर्ज केला  . आश्चर्य म्हणजे प्रशांतनेही लगेच तयारी दाखवली . ” 
          ” एक दिवस मी मॉल मध्ये गेले होते  . समोर च्या सेक्शन मध्ये मंदार होता . मला बघून  गोड ओळखीचे हसला . मी …..
 तिचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत अर्णव आला .
” मम्मा , मम्मा ते अंकल ना , मला असे स्टेअर करत होते ना …मी जाईल तिथे बघत होते . “
ती चमकली .
” कोण रे बेटा ? “
त्याची नजर पाठमोऱ्या सानिया कडे गेली . आणि तो गप्प झाला  .
मग सानियाच म्हणाली , ” बोल च्याम्प !! कोण होता ? “
” ते ..कधी कधी तुम्हाला ड्रॉप करतात न ,  ….ते अंकल !! ” 
” प्रणव ? एक सेकंद हा …..हा मोबाईल मधला फोटो बघ ….हा .बघ हे होते का ? ” सानिया ने मोबाईल अर्णव समोर धरला . 
” हो आंटी !! हेच , हेच अंकल .”
माधवी ने पटकन मोबाईल हातात घेतला …बघितलं ….आणि ओरडली ….प्रशांत !!!!! सानिया , हा प्रणव नाही , हाच प्रशांत आहे !! “
क्रमश:
 
Image by Pexels from Pixabay 

Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

13 thoughts on “साथ- भाग १

  • May 21, 2021 at 9:54 am
    Permalink

    Mast….Khup interesting

    Reply
    • May 31, 2021 at 7:53 am
      Permalink

      धन्यवाद

      Reply
  • May 21, 2021 at 12:20 pm
    Permalink

    नेहमीप्रमाणे खूपच उत्कंठावर्धक 👌🏼👌🏼

    Reply
    • May 31, 2021 at 7:55 am
      Permalink

      धन्यवाद

      Reply
    • May 31, 2021 at 7:56 am
      Permalink

      थँक्स डिअर

      Reply
  • May 23, 2021 at 4:55 pm
    Permalink

    Chan….. Aparna’s stories madhye hoti na hi katha?.. vachalyasarkhi vatat ahe 👌👌👌

    Reply
    • May 23, 2021 at 5:59 pm
      Permalink

      Aparna’s stories? Book ahe he ki story reading?

      Reply
    • May 23, 2021 at 6:03 pm
      Permalink

      Got it about Aparna’s stories .. thank a lot 👍🏼👍🏼
      Mala yanchya stories khup awadtat

      Reply
      • May 31, 2021 at 7:54 am
        Permalink

        खूप धन्यवाद . छान प्रतिसाद दिलात , आनंद वाटला

        Reply
    • May 31, 2021 at 7:57 am
      Permalink

      ह्या सारखीच असेलही कदाचित
      👍👍

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!