साथ- भाग २
सानिया अवाक होऊन बघत होती .
” I don’t believe this ! साला***** ! तुझ्या वर्णनावरून वाटलं त्याच्या पूर्ण विरुद्ध वागतोय हा माझ्याशी ! OMG !! किती नाटकी माणूस आहे .”
” सॉरी सानिया ,”
” अरे , dont be !! थांब मी त्याला फोन लावते .”..तिने तोंडावर बोट ठेवून बोलू नका अशी खुण केली .
” हॅलो , प्रणव तू आलाय का ? मला का नाही बोलावलस ? …नाही नाही , बघितलं नाही ,आमच्या समोर एक क्युट मुलगा रहातो , त्याने सांगीतलं . येतेच मी खाली . “
” अर्णव , त्या काकांशी तू अजिबात बोलायचं नाही बरं ?..येते ग मी माधवी ..” तिच्याजवळ जाऊन म्हणाली , ” तू नको काळजी करुस ग . उलट तू मला वाचवलस . बघूया काय म्हणतो हा प्रणव उर्फ प्रशांत . “
मंदार आला . माधवी एकदम पुढे होऊन त्याच्या गळ्यात पडली .
” इट्स ओके , माधवी . तुला जॉब ची कमी नाही , पण ह्या बत्रा ला सोडायचे नाही .”
तीने घरी आल्या नंतरचा सगळा किस्सा सांगितला .
” काय माणूस आहे हा ! ह्याचे काय संबंध आहेत बत्राशी हे बघूया . त्याला सोडणार नाही आपण .किती कुटील आहे बघ हा . सानियाशी जवळीक वाढवली , आपल्याला त्रास द्यायला . ती कशी फसली ग ह्या फाटक्या माणसाच्या जाळ्यात ? माधवी , तो नक्की काहीतरी व्यवसाय करत असला पाहिजे . मला बत्रा ला भेटावं लागले . “
” आता सानिया गेलीये त्याला भेटायला . बघूया ती काय म्हणते .”
” आणि तू अर्णवची काळजी करूच नकोस . त्याचं वय लहान असल्याने कायद्याने तो आपल्याचकडे रहाणार .त्याला हे माहितेय म्हणून असा बेकायदेशीर मार्ग वापरतोय . “
” मंदार , किती छान चाललं होतं आपलं . का आला हा मध्ये ? का घडलं हे असं ? “
” तुला नोकरी सोडायची होती तर मला सांगायचं न बाई , एवढं सगळं घडवून आणलस , सॉलिड आहे हा तू !!”
” तुला बरी गम्मत सुचतेय रे !! “
मंदार नि तिचा हात हातात घेतला .
” ही साथ जोपर्यंत आहे न , तोपर्यंत कुठल्याही संकटाची भीती नाही ग मला . मुळात ते संकट आहे असे वाटतच नाही .”
तिने त्याच्या खांद्यावर डोके टेकवले .
” मंदार , तुला अजूनही चित्रा ची आठवण येते का रे ?”
” तू ते पुस्तक वाचलंय न अमृता प्रीतम चं …ती म्हणते ….त्याची आठवण येते , पण आता त्याची आठवण मला जाळत नाही . “
” हो मलाही आठवतं न प्रशांत चं वागणं ….शेवटी घडल्या गोष्टी आठवणारच की . पण वर्तमान सुखाचं असलं की भूतकाळाचा त्रास होत नाही हे खरं .”
” आठवतं का तू कसली घसरली होतीस मॉल मध्ये ….
” होरे …आत्ता हेच सांगत होते सानियाला .” आपण कसे मॉल मध्ये भेटलो ……..दोघे आठवत होते ……
माधवी मॉल मध्ये गेली होती .
थोडे मोठ्या साईझ चे कपडे घ्यायचे होते . बघते तर समोर मंदार . तिच्याकडे बघून अगदी गोड हसला .
” आज खरेदी का मिस्टर मंदार ? “
” नाही , मॉल मध्ये डॉक्टर कडे आलो होतो .” खूप मिश्किल होता मंदार .
तिला हसू आलं .
तुम्हाला एक सांगायचंय .
” आपण फुड कोर्ट मध्ये बसूया .”
दोघे वरती फूड कोर्ट ला गेले .
” लेट मी गेस मॅडम …अ …तुम्ही आता एकदम फ्री , दिसताय बाय माईंड म्हणजे …”
” हो ..पाश मोकळे केले ..
” माझं ही तसंच बरं का .आमचं खटलं म्हणजे माझं कुंकू जरा जास्त महत्वाकांक्षी निघालं . त्यांना हवेत उडायचं होतं ,आणि आम्ही जमिनीवर सरपटणारे …मग काय , आमचे पण पाश मोकळे …”
“ओह ..”
” चित्रा काही वाईट स्त्री नव्हती .माझं प्रेम होतं तिच्यावर .पण जर आधी बोलली असती की तिला एअर हॉस्टेसच व्हायचंय , संसार करायचा नाही , तर हे पुढचं टळलं असतं . ………….हे सगळं आठवत होते दोघे . बराच वेळ झाला होता .
मंदार म्हणाला , ” मॅडम , आपण भूतकाळाची सैर करून आलो पण माझा खांदा वर्तमानात आहे , दुखतोय .” हसून माधवी उठली .
रात्री जेवणं आटोपल्यावर बऱ्याच उशिरा सानिया आली . स्वतःच्या घरी न जाता माधवी कडेच आली .
मंदार होताच समोर .
” हाय सानिया . माधवी s , सानिया आलीये . “
माधवी अधीरतेने बाहेर आली .
” काय झालं सानिया ? काय म्हणाला प्रशांत ?”
सानिया सांगू लागली ……ती प्रणव उर्फ प्रशांत ला भेटायला गेली होती तेव्हाचा प्रसंग…
” प्रणव , तू मला बोलावले नाहीस ? खालीच थांबलास ?”
“..न ..नाही , कॉल करणारच होतो . इतक्यात तू आलीस .”
” आज बरा वेळ मिळाला बिझनेस मधून . ” ती जरा लाडातच बोलली .
” आपके लिये तो वक्त ही वक्त है .”
” तू सांगितले नाहीस कधी की कशाचा बिझनेस करतोस . चल आपण तुझी वर्क प्लेस बघूया . “
” ओके !!! चलो ! “
प्रशांत तिला ‘ थोर्ब ‘ मध्ये घेऊन गेला . तिथे बत्रा होताच .
तिथे बत्रा शी तिची हा ‘माझा पार्टनर ‘ म्हणून ओळख करून दिली . त्याच्या हे लक्षात आले नाही की थोर्ब चे बाहेरच्या देशातील कन्सल्टंटस हे तिच्याच हॉटेल मध्ये थांबतात . आणि थोर्ब च्या मार्केटिंग हेड ची सानियाशी चांगली मैत्री आहे .
” मी खूप खुश आहे प्रणव .तू एवढ्या मोठ्या मशीन सर्विस एजेंसी चा मालक आहेस .” तुझे वडील पण हाच व्यवसाय बघतात का ? “
” नाही , त्यांचा दुसरा बिझनेस आहे .”
सानिया ला कळत होते की हा खोटं बोलतोय .
” आज आपण भेटूया का तुझ्या आई वडिलांना ? “
” तुला काय झालं अचानक सानिया ? फार चौकश्या चालू आहेत . “
” अरे , फार एकटी पडते मी . एवढा मोठा फ्लॅट आहे , इतके दागिने , इतका पैसा …आता सेटल व्हावं म्हणतेय . आपलं कुणी असावं असं वाटतंय . “
अंदाज घेण्यासाठी तिने एक खडा टाकून बघितला .म्हणाली , ” तुझी मिसेस पण कंपनीचे काम बघते का ? “
आतुरतेने त्याच्या उत्तराची वाट बघत असतांनाच तो म्हणाला , ” तिचं नि माझं पटत नाही . मी टिकून ठेवतोय करण तिचे वडील थोर्ब चे प्रेसिडेंट आहेत .”
म्हणजे ह्याने आणखी एक लग्न केलंय आणि त्याच्या जोरावर हा इतका माज करतोय तर !!
सानियाला खूप हायसं वाटलं . माधवी मुळे आज ती मोठ्या संकटातून वाचली होती . ….हे सगळं तिने माधवी -मंदार ला सांगितलं .
” थँक्स सानिया . तू खूप मोठं काम केलंय . म्हणजे ह्याने माधवी सारखच आणखी एक कुटुंबाला फसवलंय . आता आपण त्याला त्याची जागा दाखवू .” मंदार ला खूप मोठी माहिती हाती लागली होती .
” थोर्ब चे प्रेसिडेंट म्हणजे,अजित पोरवाल . मी भेटलीये त्यांना अनेकदा .
त्यांची मुलगी ….अ s …हा …नीता पोरवाल ! शीट !! ह्याला नीता बरी भेटली , आणि आता हा तिच्याही आयुष्याशी खेळतोय !! ” माधवी चिडून म्हणाली . “मंदार , ह्या माणसाला असा धडा शिकवू न , की पुन्हा कुणाच्या वाट्याला नाही गेला पाहीजे .”
सानिया ने फार मोठे काम केले होते .
माधवी ला याचे आश्चर्य वाटले की नीता पोरवाल पर्यंत प्रशांत पोहोचलाच कसा . नशेतून बाहेर येऊन दुसऱ्या लग्नासाठी तयार होण्याची त्याची कुवत नव्हती . हे डोकं त्याच्या वडिलांचं असणार . ते फार लालची आणि चाणाक्ष होते . दुसऱ्याच्या पैशावर जगणारे हे परजीवी लोक , आता सानियावर जाळं टाकताएत . किती प्रकारचे लोक आले माझ्या आयुष्यात .
प्रशांत , सासूबाई , सासरे , मंदार हे सगळे किती वेगवेगळ्या स्वभावाचे . आणि आता अर्णव ही .
त्याच्या विचाराबरोबर तिच्या मनात भीती आणि काळजी दाटून आली .त्याने अर्णव ला पळवून नेले तर ? तिची झोपच उडाली .
” माधवी , पुन्हा जागी ?” मंदार उठून विचारत होता .
” मंदार , त्याने अर्णव ला पळवून नेलं तर ? “
” आपण इन ऍडव्हान्स पोलीस इंटिमेशन देऊन ठेवूया . पण तो असं करणार नाही .”
” त्याचं दुसरं लग्न पण टिकणार नाहीये . आता त्याला आधार हवाय ,म्हणून अर्णव ची आठवण आलीये . त्याच्या बद्दल प्रेम आहे म्हणून नाही .”
” माधवी , तुझ्या जागे रहाण्याने समस्या सुटणार आहे का ? …तू असं कर , छान छान विचार कर ……नाहीतर आपलेच सुरुवातीचे रोमान्स चे दिवस आठव …गुड नाईट !”
माधवी ला त्याच्या कुल रहाण्याचे नेहेमीच आश्चर्य वाटे .
लग्ना आधी देखील जेव्हा ते
पाहिल्यांदा जेव्हा मॉल मध्ये भेटले होते , तेव्हा फूड कोर्ट मधून एसकलेटर्स
ने खाली उतरताना तिचा पाय घसरला आणि ती पडणार इतक्यात मंदार ने तिला पकडले होते . त्या पायऱ्या मध्ये तिची ओढणी अडकणार ,इतक्यात त्याने अलगद तिला उचलले . तिला काही समजायच्या आत त्याने हळुवार तिला खाली आणून उतरवले होते .
तिला ही भावना नवीन होती .प्रकाश ने तिच्याकडे कधीच लक्ष दिले नव्हते . कधी एकदा चुकून थोडासा प्रेमाचा उमाळा आला होता , आणि निसर्गाने तिच्या उदरात अंकुर पेरला होता .
तिने मंदार ला थँक्स म्हणण्यापूर्वीच तो म्हणाला , ” हं ,हं धन्यवाद नका म्हणू . मी असच कसं तुम्हाला पडू देणार ? म्हणून उचलले .”
त्यानंतर ते नेहमी भेटायला लागले .प्रशांत च्या वागणुकीच्या पार्श्वभूमीवर मंदार चे मिश्किल , हळुवार प्रेमळ वागणे तिला अतिशय मोहवून गेले . एक दिवस ऑफिस सुटल्यावर समोर बघते तर मंदार तिला न्यायला आला होता . अतिशय सोबर , साधा पण आकर्षक दिसणारा तो वेगळाच भासला तिला .
तिला बघून तो लगेच समोर आला .
” अरे ! मंदार !! इकडे कुठे ? “
” कुठे काय , जिमिंग करायला
आलोय . ” त्याचं आपलं नेहेमीचं मिश्किल उत्तर .
” विनोद चांगला करता येतो .”
” स्वयंपाक सुध्धा बरं का !! लगेच डेमो देऊ शकतो . येताय ? “
” अं s , चालेल . मी बाबांना फोन करून सांगते , म्हणजे ते काळजी करणार नाहीत .”
दोघे मंदार च्या घरी गेले . घर छोटेच पण छान होते . तिला आवडला त्याचा टापटीप पणा .
” तुम्हाला आता असं काही खास खावसं वाटतंय ? म्हणजे असा वाटत असतं असं ऐकलं मी ,म्हणून विचारतोय .”
” नाही . तुम्ही जे खिलवाल ते चालेल . माझे काही असे डोहाळे नाहीत . ह्या बिचाऱ्या जीवाला खूप काही pamparing ची सवय नाही लावायचीये मला .”
” हे बरोबर नाही हा माधवी . तुमच्या
इश्यूझ चा त्रास ह्या जीवाला का ? तुम्ही आई म्हणून कुठे ही कमी नाही पडणार आहात , मला खात्री आहे .”
” तुम्हाला आवड आहे लहान मुलांची ?”
” अरे , खु s प . कॉलनी मध्ये जी मुलं आहेत ती खूप जीव लावतात मला .”
” हे बघा . बोलता बोलता सँडविच तयार . आप के लिये हाजीर है , व्हेज सँडविच विथ एक्सट्रा चीज !! ….
हे घ्या आणि मला वीश करा ,कारण आज माझा वाढदिवस आहे ” .
” अरे !! कमाल आहे हां . आधी का नाही सांगितलं ? हॅपी बर्थ डे !!”
” त्यात काय मोठं . आता ही तारीख लक्षात ठेवा आणि पुढच्या वर्षी मला आठवणीने शुभेच्छा द्या .”
” पुढच्या वर्षी ? बापरे , काय माहीत तेव्हा आपण कुठे असू .”
” आपण एकत्र असू शकतो , ह्याच घरात , काय म्हणता ?” पुन्हा डोळ्यात तेच खट्याळ हसू .
” …..”
” आपण एकेरीवर येऊया ….माधवी , आपण दोघेही एकाच परिस्थितीत आहोत . आपण एकमेकांचे दुःख चांगलंच समजू शकतो . मला तू आवडलीस .विचार कर , घाई नाही , पण तुझ्या अपत्याने जन्म घेतांना त्याला /तिला आई वडील दोघेही असावेत . माझ्या आईला देखील तू आवडलीयएस . ती सध्या गावी गेलीये ,
पण ती ह्या निर्णयाने खूप खुश असेल .”
माधवी नुसतीच भरल्या डोळ्याने त्याच्याकडे बघत होती …..
” मला ..मी ….काय ..”
“इट्स ओके माधवी .मी समजू शकतो .
पुरुष बोलून मोकळा होतो ग , स्त्री ला अनेक कंगोऱ्यातून विचार करावा लागतो . तू तुझा वेळ घे .”
ती उठली , डोळे गळत होते ,आणि तिने मंदार कडे बघून दोन्ही हात पसरले .
मंदार पुढे झाला आणि आत्यंतिक अलवार पणे तिला कवेत घेतले .
ती त्याच्या कानातम्हणाली , ” ह्यापुढे तुझा प्रत्येक वाढदिवस आपण एकत्र साजरा करायचा . हॅपी बर्थ डे मंदार .”
” तू मला दोन जीवांची स्वीकारलंस वगैरे भाषा मी बोलणार नाही मंदार . असं बोलून तुझ्या मोठेपणाला डाग नाही लावणार . मी आणि हे मूल आजपासून तुझंच .”
त्याने अलगद तिच्या कपाळावर ओठ टेकवले .
” चल तुझ्या वडिलांचा आशीर्वाद घेउया . “………………………..……ह्या सगळ्या सुखद आठवणीत ती असतांना गालातल्या गालात हसली . शेजारी अर्णव आणि मंदार झोपले होते .
मंदार ने मान वर केली अन म्हणाला ,
” ह s , आता कसं ! मी किती रोमँटिक आहे न , मी झोपलो असलो तरी तुला रोमँटिक बनवू शकतो की नाही ? “
” आला मोठा !! झोप उगी !! ” ती म्हणाली आणि तीही झोपेच्या आधीन गेली .
सकाळी सानिया येऊन सांगून गेली की आज प्रशांत उर्फ प्रणव काही कामाने शहराबाहेर आहे . त्यामुळे ठरल्याप्रमाणे माधवी तयार झाली आणि निघाली . ती प्रशांतच्या म्हणजे नीता पोरवाल च्या घरी गेली . त्याचं कुठलं घर ! ते तर सासरे अजित पोरवाल ह्यांचं घर !
नीता घरीच होती .
” हॅलो , मी माधवी .xxx मोटर्स ची एम्प्लॉयी . “
” ओहह या ना .”
” घरात आणखी कुणी आहे का ? “
” न..नाही ..,का ?”
” स्पष्टच बोलते . मी प्रशांत ची पहिली पत्नी …कदाचित ! ..म्हणजे माझ्या आधी कुणाशी लग्न झालं असेल तर माहीत नाही .”
निता च्या चेहेऱ्यावर खूप आश्चर्य दिसलं . ” आर यु ज्योकिंग ? आय मिन तुम्ही ..प्रशांत ची …” ती मटकन सोफ्यात बसली .
” तुम्हाला धक्का बसणं स्वाभाविक आहे . मी समजू शकते .”
” अहो ह्या माणसाने मला फसवलंय . मोठी फॅक्टरी , बंगला ,गाड्या असे खोटे ऐश्वर्य दाखवले …
” मला सगळं माहीत आहे . मी पण ह्यातून गेलीये . फक्त एक सांगा , हा तुमच्याशी कसा वागतो ? काय काम करतो ? ह्याची दारू सुटली का ? “
” दारू तर नाही सुटली , कंपनीत तो नावालाच जातो , बाकी सगळी दलाली करतो . आणि माझ्याशी म्हणाल तर ह्या माणसाला प्रेम माहितीच नाही . फक्त स्वार्थ कळतो . आमच्यात ‘तसे ‘संबंध पण नाहीत . …पण तुम्ही आता माझ्याकडे यायचं कारण ? “
” प्रशांत ला माझ्या मुलाची , अर्णव ची कस्टडी हवीय . तो लहान आहे , कायद्याने कस्टडी मिळणार नाही , म्हणून आम्हाला त्रास देतोय . त्याने माझ्यावर आरोप लावलाय की मी थोर्ब कडून म्हणजे तुमच्या बत्रा कडून भारी कमिशन घेऊन अकरा मशिन्स ची ऑर्डर दिलीये . …मला टर्मिनेट केलंय .”
” इतकं सगळं झालं आणि तुम्ही ते सहन करताय , हे भयानक आहे हो . मला जस कळालं की त्याची काहीही प्रॉपर्टी नाही , आम्हाला खोटं सांगितलंय तेव्हाच मी डीव्होर्स घेणार होते , पण त्याला एक संधी द्यावी असं ….
” हीच चूक मी पण केली . …”
माधवी ने नीताला सगळं सांगितलं .
” मला मूल होणार नाही , आणि बाबा म्हणाले होते की ते नातवाच्या नावाने प्रॉपर्टी करतील …म्हणून !!! म्हणून हा तुमच्या मुलाच्या मागे लागलाय !!! ओ गॉड !!! आत्ता लक्षात आलं माझ्या हे !!! नाही माधवी .ह्या माणसाला अद्दल घडवायचीच !! “
” आणखी सांगू ? प्रशांत सध्या माझ्या एका मैत्रिणीशी डेट करतोय. प्रणव नाव सांगितलं आहे .”
” आता मला कशाचाच आश्चर्य वाटणार नाही .हा माणूस काहीही करून पैसे लुटायच्या मागे असतो .”
” जर तुम्हालाही असेच वाटत असेल तर आमची साथ द्याल ? “
” मी पूर्णपणे तुमच्या सोबत आहे . मला ह्या माणसापासून सुटकारा हवा आहे ,पण त्याच्या कृत्याची त्याला शिक्षा झालीच पाहिजे .” नीता म्हणाली .
माधवी तिथून निघाली . नीता बद्दल तिला वाईट वाटत होते . ती थोड्याच अंतरावर होती , इतक्यात फोन आला .
” माधवी , फोन ठेवू नकोस प्लिज , मी प्रशांत बोलतोय . ऐक ! अर्णव तुझ्या सोबत आहे ?”
” नाही , का? हे तू का विचारतोएस ?”
” अर्णव गायब आहे माधवी !! आपला अर्णव . त्या मंदार ने काहीतरी डाव केलाय माधवी , अर्णव गायब आहे ग !”
” काय बोलतोस प्रशांत ? झोपेत आहेस का ? माझा तुझ्यावर विश्वास नाहीये . तू जर अर्णव ला हात जरी लावलास न , तर अतिशय वाईट होईल लक्षात ठेव .”
” विश्वास ठेव माधवी , मी त्याला फोन केला होता , तुमच्या मावशीबाई होत्या .त्या म्हणाल्या , सकाळ पासून मंदार अर्णवला घेउन गेलाय तो अजून आलाच नाही . उलट त्याचाच फोन येऊन गेला , आणि तो रडत होता . तू कुठे आहेस माधवी ? ..हॅलो माधवी ? ..”
” मी येतेय , तुझा पत्ता सांग .”
थोड्या वेळातच ती प्रशांत कडे गेली .त्याचे वडील दोन खोल्याच्या घरात वेगळे रहात होते , तिथे गेली .
” आलीस माधवी ? बघ !! नाहीये ना अर्णव !! तुझा हा नवरा अजिबात प्रेम नाही करत त्याच्यावर . बस तुझ्याकडून पैसे उकळायचेत त्याला . त्याचा मला फोन आला होता .तुझ्या वडिलांनी बरीच प्रॉपर्टी अर्णव च्या नावाने केलीये , मला माहितेय . म्हणून असा प्लॅन केला त्याने . मला माहितेय त्याची आई गावी असते , तिथे त्याने अर्णव ला ठेवलं असेल . “
” शांत हो प्रशांत . माझं डोकं बधिर झालंय . कुणावर विश्वास ठेवू , कुणावर नाही ? ….मंदार असे करेल असं वाटलं नाही कधीच . पण मला एक सांग , तुला अर्णव नेमका कशासाठी
हवाय ? “
” मी खरं खरं सांगितलं तर तू अर्णव ला देशील माझ्याकडे ? प्लिज माधवी …”
” त्यात अर्णव चे भले आहे हे पटले तर …कदाचित …हो .”
” ऐक !! तुझ्या नंतर तीन चार वर्षातच मी दुसरे लग्न केले …कुणाशी ? गेस !!
अजित पोरवाल च्या लेकीशी !!! आमचे पितामह ,द ग्रेट , त्यांनी जमवले सगळे .
ते आपली सगळी प्रॉपर्टी नातवाच्या नावे करणार म्हणाले . पण ती नीता !! कुलक्षणी !! ती वांझ निघाली . विचार कर .जर त्यांना अर्णव चा लळा लागला तर ? केवढी प्रॉपर्टी माझी …म्हणजे …आय मिन …आपली होऊ शकते . आपण पुन्हा एकत्र येऊ …माधवी मी एक चांगला नवरा आणि पिता होऊन दाखवीन …”
प्रशांत अगदी उतावीळ होऊन असे सगळे बोलला . “
” तुझ्या कुठल्याही बोलण्यावर माझा लवकर विश्वास बसणे अवघड आहे , पण सध्या प्रश्न ‘माझ्या ‘ मुलाचा आहे .ह्यात तुझी काही चलाखी निघाली ना ..
” नाही नाही माधवी , मी खरं बोलतोय .”
“ठीक आहे , मी बोलते मंदारशी .त्याला काय हवंय विचारते . त्याने पैसे मागितले तर ? माझीतर नोकरी पण गेलीये . तूच काही करू शकतोस का बघ न . पोरवाल सरांची प्रॉपर्टी अर्णव ला मिळाली तर काय बहार येईल . तूच मदत कर प्रशांत आता. “
” तुझे लग्नातले काही दागिने आहेत अजून ,ते मी देऊ शकतो काही मी विकले . आणि माझा बत्राकडे काही हिस्सा आहे ,तो देतो . नीताच्या वडिलांकडून मला मिळालेला हिस्सा आहे , त्यातलीही काही रक्कम देतो . पण अर्णवला परत मिळव . “
“ठीक आहे , ते सगळं मला लवकरात लवकर आणून दे . मी निघते .”
तिने गाडी सुरु केली आणि प्रसन्न हसली .मासा गळाला लागला होता .आता हुक ओढणे बाकी होते .
माधवीने गाडी सरळ समीरच्या घरी नेली . तिथे सानिया अर्णव ला घेऊन आली होती . मुद्दाम अर्णव कडून घरी फोन करवला होता . एक फोन प्रशांत ला पण केला , ज्यात तो म्हणाला “अंकल , माझ्या मम्मीला फोन करा , हेल्प मी अंकल ” !
माधवीला पाहून अर्णव धावत आला .
” मम्मा !!”
” ओ माय बेबी !”
” मम्मा , समीर काकांनी मला आईस्क्रीम घेऊन दिलं ..”
” थँक्स समीर , सानिया . तुमच्या शिवाय हे ..
” ए मॅड !! डोन्ट बी फॉर्मल !! चल , अजून बरंच काम करायचंय . बाकी सानियाचे आभार मान .पहिल्यांदा माझ्या घरी आलीये .”
” समीर !! सुधर रे बाबा !! ” माधवी हसून म्हणाली .
माधवी ने बत्रा ला समीरच्या फोन वरून कॉल केला .
” हॅलो मिस्टर बत्रा , काही लाख कमवायचे असतील तर आज संध्याकाळी पाच वाजता रॉयल कॅफे मध्यें या . “
” कोण बोलतंय ?”
” ते महत्त्वाचे नाही .” तिने फोन कट केला .
इकडे मंदार पोलीस स्टेशन मधून बाहेर पडला होता . ‘प्रशांत सारखा दारुड्या माणूस , ज्याने दोन दोन लग्न फसवणूकीने केलेत , तो माझ्या मुलाला पळवून न्यायची धमकी देत असतो . ‘ अशी पोलिसात तक्रार देऊन आला होता तो .
संध्याकाळी रॉयल कॅफे मध्ये बत्रा वाट पहात बसला होता .तिथे माधवी समीरला घेऊन आली .
” मिस्टर बत्रा , हे समीर .यांना पंधरा मशिन्स हव्या आहेत . ज्यापनीज कंपनीच्या . तुम्ही एन्ड तो एन्ड सर्विस द्यायची . करणार ? “
” हॅ s हॅ !! जरूर करणार . पण ….
तुमची गोष्ट वेगळी होती मॅडम . “
” पण तुम्ही तर सांगितले ना आमच्या कंपनीला , की मी सहा टक्के कमिशन घेतले ..”
” मॅडम , ते साहेबांचे जावई आहेत ना , प्रशांत सर , त्यांच्या सांगण्यावरून केले . त्यांनी मला पैसे दिले होते त्यासाठी . “
माधवी चा संताप होत होता हे ऐकताना . ह्या माणसाच्या एका खोट्याने तिचा जॉब गेला होता .
” बाकी कंपनीचे लोक किती घेतात ? “
” पाच टक्के सर .” बत्रा लाळघोटे पणा करत म्हणाला .
” ठीक आहे . मी उद्या ऑफिस मधून पंधरा मशिन्स ची ऑर्डर काढतो , एक अट आहे . आमच्या कंपनीचे वार्षिक संमेलन आहे . तिथे सगळे एम्प्लॉयी असतील . त्यांच्या समोर येऊन सांगायचे की माधवी मॅडम नि आज पर्यंत एकही पैसा न घेता कंपनीचे काम केले आहे , आणि तू खोटे बोललास .”
” सर , ते …मी ..कसं ..
” हे बघा , तुम्ही जपानी कंपनी कडून भरगच्च कमिशन घेणार , त्यातला हिस्सा नाही मागत आहे मी . नाहीतर पोरवाल सरांकडे जाऊ का ? ते लगेच …
” नाही नाही , नको . मी येतो .मी सांगतो तुम्ही म्हणाल तसं .”
माधवी ला अतिशय दिलास मिळाला . तिने खूप कृतज्ञतेने समीर कडे बघितले .
माधवी घाईघाईने घरी गेली . मंदार तिची वाट बघत होता . दार उघडल्याबरोबर तिने मंदारला मिठी मारली .” मंदार , आपण चुकीचे तर नाहीना करत आहोत ? “
” तुकाराम महाराज काय सांगून गेले ,
‘ भलेही देऊ कासेची लंगोटी , नाठाळाचे माथी हाणू काठी ।।
मग काठी हाणायची वेळ त्यानेच आणली न , हो की नाही ? ..चल लवकर . “
” मंदार , मला वाटतंय की अर्णवला एक आणखी भावंड असावं . “
” बायका न , कुठला विषय कुठे आणि कधी काढतील नेम नाही बाबा . तशी हरकत नाही , चल तयारी करू .”
” काहीही काय मंदार !! आत्ता आपल्याला समीर कडे जायचंय !!..”
” मी तेच तर म्हणतोय माधवी !!
समीरकडे जायची तयारी करायचीये न !! ….तुला काय वाटलं ? ” त्याने नाटकीपणे डोळे मिचकावत म्हटलं .
” मंदार ,तू माझा मार खाशील हा !!”
तिला तश्या परिस्थितीत ही हसू आले .
“चल मंदार , आत लप लवकर . प्रशांत येतोय .” ति त्याला आत ढकलत म्हणाली .
” जुना आला की नव्याला विसरू नको बरं बाई ! “
” आता खरंच मार खाशील हं !! आत हो !!”
मंदार आत लपला .
प्रशांत आला .
” ये प्रशांत . मंदार फारच हलकट निघाला रे . काय काय डिमांड केलीये त्याने . पण दागिने आणि पैसे मिळाल्यावर सोडेल तो अर्णवला .”
” हे बघ .तुझे आणि निताचेही दागिने .
आणि ही कॅश . ” त्याने पुडके समोर धरले . म्हणाला , ” मीच जाऊ का ?तुझ्याशी काही दगा फटका केला तर ?”
” नाही नाही . त्याने बजावून सांगितले आहे की कुणालाही न घेता ये . ..
त्याचा मुलगा थोडीच आहे , त्याला काय जातंय ? जीव आपला जळतोय न प्रकाश ?”
” अ ? हो s , हो न …पण त्याने हे सगळं घेऊन अर्णवला वापस दिलंच नाही तर ?”
” इतकी हिम्मत नाहीये त्याच्यात .तू काळजी नको करू . मी आपल्या मुलाला घेऊनच येईन . तू तुझ्या वडिलांच्या घरी थांब .माझ्या फोनची वाट बघ .”
प्रशांत गेला . करोडो रुपयांच्या प्रॉपर्टी ची त्याला इतकी भुरळ पडली की तो सारासार विचारशक्ती घालवून बसला होता . पराकोटीची लालच माणसाला दुर्बल बनवते ,तसं त्याचं झालं होतं .
मंदार बाहेर आला , ” चल लवकर , आता भराभर हालचाली कराव्या लागतील .”
” मी जात जाता नीताला फोन करते .”
गाडीत बसल्याबरोबर तिने निता फोन लावला . अजित पोरवाल सरांना पण निरोप द्यायला सांगितले .
प्रशांत ला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या . इतक्या विनासायास सगळे होतेय , आणि मंदार आता माधवीच्या मनातून उतरेल याचा त्याला
आनंद होत होता . इतक्यात दारावर थाप पडली . त्याने अधीरपणे दार उघडले . दारात पोलीस !!
” पोलीस ? का? मी काय केलं ? “
” तुझ्या घरी घेऊन चल .”
” हेच माझं घर .हो , खरं ! “
” आधार वर तर दुसराच आहे ! तिथे चल .”
” ते माझ्या सासऱ्यांचे घर आहे हो , माझे नाही ..”
पोलीस त्याला घेऊन नीताच्या घरी गेले .
प्रशांत ने किल्लीने दार उघडलं आणि हाक मारली …” नीता !! “
,कुणीच बाहेर आलं नाही म्हणून पोलीस आत गेले . नीता जमिनीवर पडली होती आणि मागील अडगळीच्या खोलीत अर्णवला एका खुर्चीत बांधून ठेवले होते . तोंडात बोला कोंबलेला होता .
हे बघून प्रशांत ला ताबडतोब कळाले की डाव काय आहे ..तो ओरडायला लागला , साहेब मी काही नाही केलं …हा एक ट्रॅप आहे . मला अडकवताएत हे लोकं .
इतक्यात अजित पोरवाल आले .
” नीता !! एम्ब्युलन्स मागवा !! मला भीती होतीच की एक दिवस हा माझ्या मुलीचा जीव घ्यायचा प्रयत्न करणार !! बेड्या घाला साहेब ह्याला . याने वाटोळं केलं हिच्या आयुष्याचं . “
मागून मंदार , माधवी आणि सानिया पण आले .
” सानिया तू ? तू सांग ना यांना की मी कसा माणूस आहे ” प्रशांत ओरडत होता .
सानिया पुढे गेली आणि पूर्ण ताकद लावून फाडकन त्याच्या थोबाडीत मारली .
माधवी ने पळत जाऊन अरणावला जवळ घेतले आणि तिने ही खाडकन प्रशांतच्या मुस्काटात मारली .
” साहेब , मी सगळे पुरावे जमा करते .
याने आम्हा सगळ्यांचा गुन्हेगार आहे .”
त्याचं बखोटं पकडून पोलीस त्याला घेऊन गेले . माधवी निताजवळ गेली .
ती उठून बसली होती .
” हे घे तुझे दागिने नीता . थँक्स ,तुझी खूप मदत झाली .” तिने निताचे दागिने वापस केले .
” माधवी , समीर चा फोन आहे .बत्रा ने चूक कबूल केलीये . तुझे व्ही पी तुला वापस बोलावणारेत म्हणाला .”
” नाही मंदार , आता तिथे पुन्हा नाही जाणार .”
” कारण आमच्या ‘थोर्ब ‘ ला माधवी सारख्या व्ही .पी . ची नितांत गरज आहे . ” पोरवाल सर म्हणाले . आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या .
” माधवी , माझी फाईल कुठे आहे
ग ? ” मंदार विचारत होता .
माधवी घाईघाईने आत गेली .
मंदार मस्त कॉटवर लोळत होता .
” अरे , वेळ होऊन गेलीये , तुला ऑफिस नाही का आज ?”
” तू म्हणालीस ना , की अर्णव ला एका भावंडाची गरज आहे , मग त्याची तयारी नको का करायला ? ” मंदारने नेहमीच्या खोडकर पद्धतीने डोळे मिचकावले .
(समाप्त )
© अपर्णा देशपांडे
Latest posts by Aparna Deshpande (see all)
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
मस्तच
धन्यवाद
mast
खूप खूप धन्यवाद
मस्तच
मस्त
थँक्स
भारी प्लॉट आहे एकदम
थँक्स