सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग 2
आधीच्या भागाची लिंक- सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग 1
सुरैया माझा पिच्छा का नाहीस सोडत?? का नाहीस सोडत अस ओरडत सुरभी समोरच्या मशीनवर जोरजोरात डोकं आपटू लागली. तिचा भुतकाळ तिच्यावर हावी झाला होता. तिच्या आवेगाला कसबस सावरत तिला पुन्हा शांत केलं. मुलीसाठी या सगळ्याला तुला धीराने सामोरं जायचंय अस म्हणताच ती पुन्हा रडू लागली.
सुरभी – माझी मुलगीच माझं सगळं काही आहे ताई..तिच्या साठीच जगते नाहीतर हे जग मला जगुही देत नाही आणि मरुही.
मी – तू काय बोलतेस मला काहीच कळत नाही सुरभी. मला समजेल अस बोल..कोण तो माणूस?? कोण सुरैया?? आतातरी खरं काय ते सांग मला. यातून आपण मार्ग कधी काहीतरी. तुझ्या मुलीला मी काही होऊ देणार नाही. तू सांग नक्की काय प्रकरण आहे ते.
सुरभी – (माझा हात हातात घेऊन)मी तुम्हाला सगळं खरं सांगायला तयार आहे ताई पण तुम्ही हे कोणालाच सांगू नका…आणि सर्वात महत्वाचं जगाने मला वाळीत टाकलंय तुम्ही नका टाकू.
अस काहीच होणार नाही असं सुरभीला सांगून तिला विश्वासात घेतले आणि तिची कहाणी सुरू झाली.
सुरभी- सुरैया जिला आज काळाने पुन्हा माझ्यासमोर उभं केलंय मला पुन्हा उध्वस्त करायला ती सुरैया म्हणजे मीच. मी आताची सुरभी आधीची सुरैया. सुरैया हे नाव बुधवार पेठेत माझ्या कपाळी लागलं. (बुधवार पेठ ऐकल्यावर मी डोळे विस्फारून तिच्याकडे बघू लागले).
बुधवार पेठ जिथे या पांढरपेशातील पुरुष सभ्य मुखवट्या मागे लपलेला काळा चेहरा घेऊन येतात.
त्या रंगरंगोटीच्या दुनियेत स्त्री त्याच्यासाठी मन,भावना, आत्मा नसलेली केवळ एक भोगवस्तू असते जिचा तो हवा तसा उपभोग घेतो, हवं तसं लुबाडतो आणि चार पैसे तोंडावर फेकून निघून जातो. त्याच पैश्यांवर त्या पिंजऱ्यातील बायकांचा उदरनिर्वाह चालतो. तो पिंजरा कोणालाच मनापासून आवडत नाही पण तिथून सहजतेने बाहेर पडताही येत नाही किंवा ते सहज साध्य होत ही नाही. मी ही याच पिंजऱ्यात फक्त देहाने जिवंत होते…. ज्या दिवशी या अंगावर पहिला माणूस चढला त्यादिवशीच मन,भावना,संवेदना यांचा अंत झाला. त्यानंतर फक्त आणि फक्त हे लुटणार शरीरच जिवंत राहिलं. कधी वाटलं पिंजरा तोडून उडावं तरी बाहेरच्या जगात आपलं स्थान काय हे फार चांगलं माहीत असल्याने ते खुराडच बर वाटायचं. आयुष्यभर इथेच खितपत पडणं हेच नशिबी आहे असं समजून एक एक दिवस पुढे रेटत होते.
पण एक दिवस वैशाख वणव्यात चिंब सरीच्या धारा बरसाव्या आणि धरणी तृप्त न्हावी तसंच प्रेमाच्या बरसत्या धारा घेऊन प्रकाश माझ्या आयुष्यात आला. तरणाबांड, रुपान देखणा,उंचापुरा, घारे डोळे,रुबाबदार मिशी असलेला तरुण प्रकाश त्यादिवशी पहिल्यांदा माझ्या खोलीत आला तेव्हाच माझं मन त्याच्याकडे ओढलं गेलं होतं पण मनाला मागे सारून मी माझं शरीर त्याच्या पुढे उघड केलं. पण प्रेमभंगाच दुःख हलकं करायला आलेला प्रकाश त्यादिवशी माझ्या मांडीवर लहान मुलासारखा झोपून फक्त रडला. मन मोकळं केलं. मी ही धंदा विसरून त्याच्या दुःखात सामील होऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याच सांत्वन केलं. प्रेम कधी केलं नव्हतं पण प्रेम म्हणजे विश्वासाच नात हे त्याला ठामपणे समजावू शकले आणि आमच्या दोघांच्यात नकळत एक नातं निर्माण झालं. एकमेकांबद्दलची ओढ निर्माण झाली. हळूहळू भेटी वाढल्या. अचानक एकाकी झालेल्या त्याच्या मनाला माझं बोलणं,प्रेमाने समजावणं सुखावू लागलं आणि तो माझ्याकडे आकर्षित झाला. मी ही कधी न हसणारी हसू लागली,स्वप्न बघू लागली, स्वतःला आरश्यात न्याहाळू लागली. प्रेमाची गाणी सतत ओठांवर नाचू लागली. मी प्रेमात पडले होते आणि मी आयुष्यात पहिल्यांदाच इतकी खुश होते. रोज दिवस मोजून मरणाची वाट बघणारी मी आता मात्र मरणाला घाबरत होते. प्रकाशही दररोज भेटायला येऊ लागला आणि एक दिवस जरी आला नाही तरी मी चातकासारखी त्याची वाट बघायचे. जेव्हापासून तो भेटला होता त्या दिवसापासून मी स्वतःला त्यालाच समर्पित केलं होतं. बाकीचे सगळे गिऱ्हाईक बंद केले. प्रकाश पुरेशी रक्कम द्यायचा त्यामुळे ती बाजार चालवणारी आक्का पण काही बोलायची नाही. प्रकाश आणि माझं प्रेम अशा वळणावर येऊन पोहचल होत की जिथे आम्ही एकमेकांशिवाय राहूच शकत नव्हतो म्हणून दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला.
खरंतर वेश्याला प्रेम,लग्न, संसार यांची परवानगीच नसते..जिथे तिला माणूस म्हणून जगण्याची परवानगी नसते तिथे ती संसार कसा थाटू शकते.
आणि थाटलाच तर तो सामान्य संसारासारखा होईल?? ज्या व्यक्तीशी लग्न करू तो आज आहे उद्याही तितकाच प्रामाणिक राहील?? आणि बाहेरच्या जगात मला कोणी स्वीकारेल?? असे सगळेच प्रश्न माझ्या भोवतीही होते. जिने मला या धंद्यात उभं केलं त्या आक्कानेही मला हेच प्रश्न विचारले होते.
या दुनियेतून बाहेर जाणार असशील तर जा पण स्वतःच्या जबाबदारी वर आणि तुझा भुतकाळ, तुझी इथली जन्मकहानी त्याच्या कानावर घालून ठेव. परत कळून काहीही बर वाईट झालं जीवाचं तर आम्ही बघणारही नाही आणि इथे परत यायचंही नाही असा हुकूमच तिने दिला. त्या कुंटन खान्यातील रोजच्या मरणापेक्षा मला प्रकाशच्या प्रेमासोबत जगायचं होतं. त्याच्या पासून एका क्षणाचाही दुरावा सहन करून जगणं आता शक्य नव्हतं. म्हणूनच जगावेगळा माझा भुतकाळ, माझ्यातल्या वेश्येचा जन्म प्रकाशपासून लपवून मी त्याच्या सोबत सात फेरे घेऊन सात जन्मासाठी एक झाले.
सुरभी म्हणजेच सुरैया आणि तेही ती वेश्या होती हाच तिचा भूतकाळ ऐकून तो स्वीकारणं मला कठीण झालेलं. स्रीजातीच्या हर तऱ्हेच्या वेदनेशी मी जोडले गेले हा माझा गैरसमज या चमचमत्या दुनियेतील वेश्या स्त्रीच्या वेदना ऐकून दूर झाला… हाच भुतकाळ इतका जीवघेणा असताना सुरैयाचा आणखी कोणता भूतकाळ असेल आणि त्याचा तिच्या भविष्य काळावर काय परिणाम झाला असेल या प्रश्नांनी मनाची घालमेल पुन्हा वाढवली.
सुरभी प्रकाश सोबत झालेल्या लग्नाच्या आठवणीत पुरती हरवून गेली होती. आतापर्यंत अश्रू ओघळणारा चेहरा विस्मृतीतील आठवणींनी आनंदाने झळकत होता.
मी – खूप प्रेम होतं ना तुझं प्रकाशवर आणि प्रकाशच तुझ्यावर??? मग अचानक काय घडलं?? आणि तुझा असा काय भूतकाळ होता जो तू त्याच्या पासून लपवला होतास?? त्यामुळेच तुमच्या नातं दुभंगल का?
सुरभी – (किंचितशी हसत) नाही ताई….जिला हजारो माणसांनी आतापर्यंत लुबाडलेलं तिला प्रकाशने स्वतःची बायको म्हणून स्वीकारलं होतं मग त्या वेगळ्या भूतकाळाने काय बदलणार होतं पण तरीही मला ती गोष्ट त्याला सांगावीशी वाटली नाही…कदाचित मलाच त्याची किळस वाटत होती म्हणून असावं.
लग्न करून तो कुंटनखाना कायमचा सोडून मी प्रकाशच्या घरात गृहप्रवेश केला. आई वडील गावी आणि प्रकाश पुण्यात एका छोट्याशा खोलीत राहायचा. माझ्याशी लग्न झाल्यानंतर त्याच्या घरच्यांनी सगळे संबंध तोडले. एका कंपनीत वर्करच काम करून महिन्याला आठ नऊ हजार मिळायचे त्यात आनंदाने आमचा संसार चालला होता.प्रकाश माझी छोट्यातली छोटी इच्छा पूर्ण करायचा. आजूबाजूचं जग मी वेश्या होती म्हणून माझा तिटकारा करायचं…वासनेच्या नजरेने बघायचं पण प्रकाशच प्रेम या नजरा झेलायला माझी ताकद बनायचं. स्वप्नातही कधी विचार केला नव्हता ते सुख देवाने माझ्या पदरात टाकलं होतं म्हणून मी रोज त्याचे आभार मानायचे आणि यातच अजून एक सुख त्याने माझ्या पोटी दिलं.
लग्नानंतर काही महिन्यातच मला दिवस गेले आणि आमच्या आयुष्यात ऋतूच्या रुपात आमची गोड परी आली.
ऋतू सोबत दिवस आता कधी उगवायचा आणि मावळायचा कळायचं नाही. प्रकाश तसा ऋतूचा लाड करायचा पण त्याला तेव्हा मूल नकोच होत म्हणून जरा नाराजही असायचा. माझ्याशीही आधीसारखं वागत नव्हता त्यात ऋतूमुळे आधीसारखे मला त्याला वेळ देता येत नव्हता…त्याला हवं तेव्हा शरीरसुख देता येत नव्हतं म्हणून माझ्यासोबत रोज भांडणं करायचा.. अचनकच माझ्या आयुष्याला,या सुखाला,संसाराला कोणाचीतरी दृष्ट लागून सगळं विस्कटून जावं तसच घडलं. ऋतू तीन वर्षांची असेल तेव्हा प्रकाशची कंपनी अचानक बंद पडून त्याची नोकरी गेली. दुसरी नोकरीही लवकर त्याला मिळत नव्हती. याने त्याची चिडचिड वाढत गेली आणि दारू पिण्याचं प्रमाणही. तसा तो आधीही कधीतरी पिऊन यायचा पण आता रोजचंच झालेलं. कोणाच्या तरी ओळखीने कुठेतरी छोटं मोठं काम त्याला मिळालं पण मित्रांची वाईट संगत लागली. कामात मिळालेले सगळेच पैसे तो जुगार आणि दारू पिण्यातच घालवू लागला. घरात कधी कधी आम्हा दोघींना पोटभर जेवणही नसायचं. ऋतू आणि मी कितीदा फक्त पाणी पिऊन झोपलो. बाहेर जाऊन मी काम शोधायचा खूप प्रयत्न केला, लोकांचे हात पाय पकडले पण माझा भुतकाळ कसा ना कसा तिथपर्यंत पोहचलेलाच त्यामुळे “तुझ्यासारख्या नालायक बाईला कामावर कस ठेवणार?? जिथून आलीस त्याच तुझ्या वस्तीत परत जा” अशी वाक्ये ऐकून तोंडावर दार बंद व्हायचं.
कधी प्रकाशशी भांडून कधी त्याचा मार खाऊन घरात लागतील तेवढे पैसे घेऊन मी संसार चालवत होते. लेकीला काही कमी पडू नये म्हणून त्याच्यासमोर भीक मागत होते. तो जे बोलेल, जस वागवेल सहन करत होते. ज्याच्या सोबत विश्वासाने लग्न करून त्या कैदखान्यातून बाहेर पडले तोच का हा प्रकाश स्वतःलाच विचारत होते. काळाने त्याच्या माझ्या आयुष्यात खूप काही बद्दलवलं होतं. आमचं प्रेम,आमची ओढ,एकमेकांनबदल वाटणारी काळजी सगळंच भूतकाळात जमा झाल होतं. कितीदा त्याला मी त्या दिवसांची आठवण करून द्यायचा प्रयत्न करायची पण एक दिवस तो ही मला बोलला की “तू वेश्या आहेस….वेश्या….तुझी जागा फक्त त्या गादीवर आणि माझ्या शरीराखाली…..हे बायको, आई ही नाती तुझ्यासाठी बनलेली नाहीत. तू कोण आहेस हे लक्षात ठेव आणि तसंच वाग”. त्याची ही वाक्ये ऐकून कानात कोणीतरी शिलारस ओतल्यासारखं वाटलं. सात जन्म ज्याच्या सोबत जगण्याची शपथ घेतलेली त्यानेच मला “उपभोगती स्त्री” ही ओळख दिली. ज्याच्या मुळे मी जगू लागले त्यानेच पुन्हा माझ्या मनाचा खून केला होता. स्वतःला त्याचक्षणी संपवावं वाटलं पण माझ्या जीवाचं तुकडा माझी लेक ऋतू डोळ्यासमोर होती..जे भोग माझ्या वाट्याला आले ते तिच्या आयुष्यात कधीच येऊ द्यायचे नव्हते मला. त्या रात्री डोळ्यास डोळा लागला नाही. ऋतूला उराशी कवटाळून तिच्या भविष्याच्या तजविजीत मन गुंतून गेलं.
रात्री उशिरा डोळा लागल्यामुळे सकाळी उशिराच जाग आली आणि डोळ्यांना समोर जे दृश्य दिसलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली.
क्रमशः
पुढील भागाची लिंक- सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग 3
- सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग ५ - June 3, 2021
- सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग 4 - June 1, 2021
- सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग 3 - May 25, 2021
Pingback: सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग 3 – LekhakOnline – Excellent Marathi Articles