सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग 3
आधीच्या भागाची लिंक- सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग 2
सुरभी – आदल्या दिवसाच्या भांडणाने आणि रात्रभर जागरणाने डोकं आधीच खूप दुखत होतं. ऋतू अजूनही झोपलेली होती…तिला बाजूला सारून मी किचनजवळ गेले तर समोरच दृश्य मला अंतर्बाह्य हादरवून सोडणार होतं.
कट्ट्याजवळ एक बाई उभी होती बहुतेक ती लीना….हो लीनाच होती…बुधवार पेठेतली आमच्याच वस्तीतली. आज माझ्याच घरात ती प्रकाशला चहाचा कप हातात देत होती आणि प्रकाश तिच्या हाताशी चाळे करत तो चहाचा कप अलगद घेत होता. प्रकाशला दारूच व्यसन जडलंच होतं पण आता बाईचही. जीवापाड प्रेम करणारा व्यक्ती इतका बदलू शकतो??? आपली जागा दुसऱ्याला देऊ शकतो??? समोर चालणारे चाळे बघून डोकं अजून भडकलं आणि लीनाचा हात धरून मी तिला घराबाहेर काढू लागले. तितक्यात प्रकाशनेच माझा हात घट्ट पकडून माझ्याच कानाखाली लगावली आणि म्हणाला,
“घराबाहेर ती नाही आता तू जाणार….घाबरू नकोस कायमच बाहेर काढणार नाही मी तुला पण परत धंदाच करायला तुला बाहेर जावं लागणार…खूप झालं तुझं आता परत स्वतःच्या लायकीवर यायचं..धंदा करायचा आणि पैसे कमवून मला द्यायचे.”
त्याच्या तोंडून ती गलिच्छ भाषा ऐकून माझ्याच कानांवर विश्वास राहिला नव्हता. कोणी इतकं कस बदलू शकत…अस वाटत होतं आज माझंच नशीब लीनाच्या रुपात माझ्यावर हसत होतं. तिला तरी मी काय दोष देऊ..चार पैसे मिळवण्याच्या आमिषानेच ती ही प्रकाश सोबत होती…आणि माझ्यावर प्रेम करणारा प्रकाश खोटा निघाला होता. मी ही त्याचा विरोध करून ओरडून सांगितलं
“बायको आहे मी तुझी…देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केलंय तुझ्यासोबत..हे घर तर सोडणार नाहीच पण तू जे घाणेरडं काम करायला सांगतोयस तेही करणार नाही.”
प्रकाश – (जोरजोराने हसत) घाणेरडं काम??? हेच तर करत आलीस ना ग तू…मी काही दिवसांच सुख तुला दिल म्हणून तुला काय वाटलं तुझी यातून कायमची सुटका झाली??? हे कधीच होणार नाही. तू वेश्या होतीस, आहेस आणि राहणार.
एव्हाना आमच्या गोंधळाने ऋतू उठली होती तिचा हात पकडून प्रकाश पुन्हा हसत म्हणाला,
“जर तू नाही म्हणालीस तर ही तुझी पोरगी आहे ना…ती चालवेल तुझी जागा…तुझ्या पेक्षा जास्तच कमवेल आणि ती”.
हे ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि होती नव्हती सगळी ताकद एकटवून प्रकाशच कानफड फोडलं.
सुरभी – अरे बाप आहेस का कसाई??? रक्त आहे ना तुझं ते??? कुठं फेडशील हे पाप?? माझ्या लेकीला हात तर लावून बघ आतापर्यंत तुझ्यावर ओवाळून टाकलेला जीव विसरून तुझा जीव घ्यायला कमी नाही करणार मी.
प्रकाश – हा.. हा…हा या असल्या धमक्यांना मी नाही घाबरत आणि मला मूल नकोच होतं…मी फक्त तुला माझ्या गरजा पूर्ण करायला माझ्या सोबत आणलं होतं पण तू इतर बायकांसारखी स्वप्न सजवू लागलीस. मला हे चालणार नाही..या पोरीचं काय करायचं मी ठरवलंय… हे माझं रक्त बिक्त असलं मला नको ऐकवूस. विसरलीस का तुझा जन्मच या धंद्यासाठी झाला होता.
आजपर्यंत त्याच्या पासून लपवलेला आणि मला किळसवाणा वाटणारा माझा भुतकाळ प्रकाशला लिनाकडूनच कळला असणार हे मला समजलं. मी ऋतूला त्याच्यापासून लांब करत माझ्याकडे ओढलं. पण तो ऋतूला सोडायला तयार नव्हता..दोघांची खूप झटापट झाली आणि बाजूला ठेवलेला विळाच मी हातात घेतला तशी लीना माझ्या दिशेने पुढे सरसावली…तिच्याकडे विळा फिरवत तिला सांगितलं,
“पुढे यायची हिंमत जरी केलीस तर याच्या आधी तुझाच गळा चिरेन”
माझं ते चंडिकेच रूप बघून ती चांगलीच घाबरली आणि बाजूला झाली. प्रकाशने विळा घेतलेला हात पकडून मोडायचा प्रयत्न केला तसा मी विळा जोरात त्याच्या पायावरच घातला. लिनालाही बजावलं जागची हललीस तरी तुझा हकनाक जीव जाईल… ती होती त्याच जागेवर स्तब्ध उभी राहिली. मी साठवलेले पैसे आणि रात्री कोणत्या तरी विचाराने मी बॅग भरून ठेवलीच होती ती उचलली….प्रकाश अजूनही रक्ताने माखलेला पाय घेऊन विव्हळत होता…तुला सोडणार नाही आणि बरचसं काही बाही बडबडत होता. मी विळा हातातच घेऊन ऋतू सोबत घराबाहेर पडले आणि दरवाजा बंद करून बाहेरून कडी लावली. एका हातात बॅग आणि कडेवर ऋतू घेऊन जीवाच्या आकांताने धावू लागले. प्रकाशच्या पायावर असा घाव बसला होता की तो पळणच काय चालणेही शक्य नव्हतं. पळून पळून दम लागलेला… पोटात आग पडलेली…घसा कोरडा पडला होता पण त्या शहरात थांबले असते धोका होता म्हणून बस स्टॉप वर मुंबईची गाडी पहिली आली त्यात बसले आणि अगदी शेवटचं ठिकाण कोणतं अस विचारून तिकीट काढली. पुढे कुठे जाणार,काय करणार काहीच माहित नव्हतं पण एक नक्की होतं की माझ्या मुलीला त्या बाजारी दुनियेची ओळख देखील करून द्यायची नव्हती.
तिला उपभोगती स्त्री म्हणून नाही तर माणूस म्हणून जगवायच होतं.
देवाचं नाव घेत कशीतरी मुंबईत पोहचले पण नवीन संकट,नवा संघर्ष इथे वाट पाहत होता.इथे येऊन अस काही पुढ्यात वाढून ठेवलेलं की ज्याचा स्वप्नातही विचार केला नव्हता.
सुरभी – कधीही न बघितलेल्या पण ज्या जादूनगरी बदल खूप ऐकलं होतं त्या मुंबईत पाऊल ठेवलं. अनोळखी जागा, अनोळखी चेहरे, अनोळखी रस्ते यात एकच चेहरा ओळखीचा म्हणजे माझ्या लेकीचा मला आणि माझा तिला. कडक उन्हाळ्याच्या दिवसांत कुठे जाऊ काही कळत नव्हतं…कडेवर लेकीला घेऊन नुसती रस्ता मिळेल तिकडे चालत होते. ऋतू भूक आणि तहान लागली म्हणून रडत होती. एका वडापावच्या गाड्यावर गर्दी दिसत होती तिथे जाऊन पाणी मागितलं तस सगळे कावरे बावरे होऊन माझ्याकडे बघत होते. काहीजण वडापाव खात खात पायाच्या नखापासून केसांपर्यंत घाणेरडी नजर माझ्यावर फिरवत होते. मी स्वतःला लेकीला त्या नजरांपासून लपवायची धडपड करत होते हे वडापाव विकणाऱ्या त्या बाईला कळले. लागलीच तिने बाजूला बोलवून मला आणि लेकीला पाणी दिलं आणि वडापाव पण खायला दिला. माझ्याकडे पाहून एव्हाना तिला नवऱ्याने सोडलेली लेक आणि बाई असा अंदाज आला असावा…गिऱ्हाईक संपले की तिने माझी चौकशी केली…मी वेश्या हा भुतकाळ लपवून बाकी सगळं तिला सांगितलं….कदाचित माझा भूतकाळ कळल्यावर तिथलेही रस्ते मला कायमचे बंद झाले असते किंवा पुन्हा तोच रस्ता माझ्यासह ऋतूच्याही नशिबी आला असता म्हणून ते सत्य लपवून प्रकाशने माझी कशी फसवणूक केली ते सांगितलं.
माझी दुर्देवी कहाणी ऐकून तिला माझी दया आली नाही की आश्चर्य वाटलं नाही.. इथे प्रत्येक स्त्रीला याच दुःखातून जावं लागतं आणि या दुःखाला लाथाडून जगावच लागतं असं तीच म्हणणं. तिचाही भुतकाळ काहीसा असाच होता हे त्यावरून कळलं. स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करणाऱ्या,गरजूंना मदत करणाऱ्या पार्वती आक्काने ती एकटीच राहत असलेल्या त्या झोपडपट्टीतल्या छोट्याश्या खोलीत मला आणि ऋतूला आसरा दिला. एक रात्र तिच्याकडे काढल्यावर उद्याचा प्रश्न उभा होताच की…पण पार्वती आक्का अडी अडचणीत सापडलेल्यांसाठी देवमाणुसच होती. स्वतःची काही कमाई होत नाही आणि खोली भेटत नाही तोपर्यंत लेकीला घेऊन माझ्यासोबत राहा अस सांगून मला तिने निर्धास्तच केलं. तिच्या ओळखीनेच एक बाटल्या बनवायच्या कंपनीतही मला काम मिळालं. ऋतूला सांभाळत मी ते काम सुरू केलं. दिवस कामात आणि ऋतू सोबत जायचा पण रात्र अंगावर यायची. तो भुतकाळ,प्रकाश,लीना सगळे डोळ्यासमोर उभे राहायचे. कितीतरी रात्री झोप लागलीच नाही. पण पार्वती आक्का आणि आजूबाजूला राहणाऱ्या सगळ्याच बायकांनी त्यांच्यात मला सामावून घेतलं… वेळप्रसंगी धीर दिला…ऋतूला स्वतःच्या मुलीप्रमाणे जीव लावला. मागचं सारं विसरून मी पुढे जात होते तेवढ्यातच जिथे मी कामाला जात होती तिथल्या मालकाने एके दिवशी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड करून कशीतरी मी त्याच्या तावडीतून सुटून सरळ घर गाठलं. पार्वती आक्काला घडला प्रकार सांगितला. ती म्हणत होती पोलीसांकडे जाऊ पण मला पोलिसांचा चौकशीचा तो ससेमिरा मागे नको होता…भीती होती की माझं लपवलेले सत्य सगळ्यांसमोर तर येणार नाही ना…या कारणामुळे त्या कामावर जाणं बंद केलं. त्या दिवशी परत एकदा कळालं होतं की स्त्रीला समाजात फक्त ‘उपभोगती’ याच नजरेने पाहिलं जातं. तीच शरीर लुबाडण…आपली भूक शमवून आनंद घेणं इतकंच काय ते तिचं स्थान.
या सगळ्याचा विचार करताना प्रत्येक वेळी डोळ्यासमोर ऋतू यायची…उद्या तिच्या ही सोबत असंच घडलं तर??? नको नको ते प्रश्न डोक्यात यायचे आणि तिला खूप शिकवायचं या अट्टाहासाने मी परत स्वतःला सावरून उभी राहायचे. परत कोणाची धुणी, भांडी, कपडे असली कामं करत पैसे साठवले आणि तिथेच बाजूला भाड्याने छोटी खोली घेतली. माझ्या स्वकमाईतून स्वतः घेतलेली खोली भाड्याने का होईना पण मी काहीतरी कमावलं होतं याचा आनंद मलाच सुखावत होता. मी ही काहीतरी करू शकते…ऋतूच भवितव्य नक्कीच चांगलं घडवू शकते हा आत्मविश्वास तेव्हा वाढला आणि मग मागे वळून बघितलंच नाही. ऋतूला शाळेत घालून तिच्यावर चांगले संस्कार करून तिला खूप शिकवायचं एवढंच ध्येय समोर ठेवलं आणि त्यासाठी कष्ट करण्याची तयारीही. मधली काही वर्षे चांगले वाईट अनुभव घेऊन जगत राहिले…त्यातच तुमच्या इथे कामासाठी बायकांची गरज आहे असं कळलं आणि आले. इथे आल्यापासूनच इथलं वातावरण खूप सुरक्षित वाटू लागलं.इथे नवनवीन गोष्टी शिकायलाही मिळाल्या. शिवणकामापासून मालाच्या पॅकिंग पर्यंत, हिशोबाच्या जबाबदारीपर्यंत सगळंच तुम्ही विश्वासाने आणि आपुलकीने शिकवलं.
माझ्या जगाला पुरती विसरून मी इथे इतकी सामावून गेले की कधी परत प्रकाश माझ्या आयुष्यात येऊन समोर उभा राहील हे स्वप्नातही वाटलं नाही.
आणि एक दिवस तो माझा शोध घेत इथपर्यंत पोहचलाच. कधी, कसं, कुठून त्याला कळलं मला काहीच माहीत नाही पण तो राक्षसारखा माझ्या समोर उभा ठाकला आणि पुन्हा मला उध्वस्त करतोय.
त्याने मला धमकी दिलीये कीं जर तू माझ्या सोबत परत आली नाहीस तर आपल्या मुलीला तुझ्या भुतकाळा बद्दल सगळं सांगेन. कोणती मुलगी आपली आई वेश्या होती हे कळल्यावर तिच्या सोबत राहील?? किती झालं तरी ती अजून नादान आहे…बापाचं तोंड आजवर पाहिलं नाही पण माझा बाबा कुठे म्हणून रोज विचारतेच की….अशातच तिचा बाबा प्रेमाने तिच्या जवळ आला, तिला विश्वासात घेऊन तिच्याच जन्मदात्रीबद्दल तिला नको ते सांगितलं तर ती बाबावरच विश्वास ठेवेल आणि माझ्यापासून दुरावेल. हा नराधम तिला सोबत घेऊन जाऊन तिचाही धंदा करेल.
काय करू ताई मी….याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं असतं मी पण माझ्या लेकीजवळ जाऊन तिला माझ्या विरोधात करेल या भीतीनेच फक्त निमूट सहन करते.
…………..
सुरभीचा आतापर्यंतचा थरारक प्रवास ऐकून मीही सुन्न झाले. तिच्याही अश्रुंचा बांध पुन्हा फुटला होता. पुन्हा माझ्या खांद्यावर डोकं टेकवून लेकीचं नाव घेऊन रडत होती. तिचं दुःख कमी होईल किंवा तिला बर वाटेल असं बोलायला शब्दच नव्हते माझ्याकडे. तीच भयानक जीवन डोळ्यासमोर नाचत होता पण यातही अजून एक प्रश्न अनुत्तरित होता…असा सुरभीचा कोणता भुतकाळ होता जो तिने प्रकाश पासुन लपवलेला??? ज्याची तिलाही किळस वाटत होती.
क्रमशः
- सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग ५ - June 3, 2021
- सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग 4 - June 1, 2021
- सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग 3 - May 25, 2021
Pingback: सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग 4 – LekhakOnline – Excellent Marathi Articles