माझे messy अनुभव ३
आधीच्या भागाची लिंक- माझे messy अनुभव २
न्यू मेसने गाशा गुंडाळला आणि आम्ही परत ओल्ड मेसमध्ये दाखल झालो. बॅक टू सुरण, पाणीदार आमटी आणि सोडा घातलेला भात. एव्हाना मेसचं जेवण पचनी पडायला लागलं होतं. रूममेटला उशीर होणार असेल तर तिचं ताट आणून झाकून ठेवणे, दह्याच्या वाटीत साखर घालून ते फेटून तात्पुरतं श्रीखंड बनवणे, रविवारी फिस्टच्या दिवशी एखाद्या मैत्रिणीला ते स्वीट आवडत नसेल तर त्यावर आपला नंबर लावणे हे जमायला लागलं होतं. माझ्या एका गुजराथी मैत्रीणीने हे नीरस जेवण जरा लज्जतदार बनवण्यासाठी एक शक्कल लढवली होती. तिच्याकडे खोलीत हॉटप्लेट होती. त्यात ती भरपूर पाणी घालून अर्ध्या वाटीचा अगदी आसट असा रव्याचा उपमा करायची. फक्त तिखट, मीठ आणि साखर घालून. हा उपमा अतिशय चविष्ट असायचा. ती तो बनवून पातेलं घेऊन यायची, तोवर मी आमच्या दोघींची ताटं वाढून घेऊन मेसच्या बाहेर अंगणात झाडाखाली घेऊन यायचे. आमच्या हॉस्टेलचं हे एक छान होतं. आजूबाजूला दाट झाडी होती त्यामुळे वातावरण कायम चांगलं असायचं. एका झाडाखाली बसून आम्ही दोघी गप्पा मारत ताटातलं जेवण आणि उपमा खायचो. त्या उपम्यामुळे ताटात जे असेल ते जेवण चविष्ट लागायचं. असा उपमा मला कधीच करायला जमला नाही. ही माझी मैत्रीण आता डॉक्टरेट पूर्ण करून कुटूंबासोबत पुण्याजवळ राहते. तिचा तो चविष्ट आसट उपमा खायची वेळ मात्र अजून आली नाहीये. लवकरच तो योग येवो!
उन्हाळ्याच्या सुट्टीत बऱ्याचश्या मुली घरी जायच्या. हॉस्टेल ओस पडायचं. मला हे असं हॉस्टेल फार आवडायचं. शांत, कसलाही गजबजाट नसलेलं. मला सुट्टीत अनेकदा घरी जाता यायचं नाही, कारण जर्मन भाषेचे मॅक्सम्युलर भवनमधले कोर्सेस मला तेव्हाच करता यायचे. त्यामुळे संपूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीत जेमतेम चार दिवस मी घरी जाऊन यायचे. बाकीच्या मुलींच्या बॅग्स चार दिवस आधी भरलेल्या असायच्या, कॉलेज सुरू होऊन पंधरा दिवस झाले की मगच त्या घरून परत यायच्या. मला मात्र घराची तितकीशी ओढ नव्हती. ओढ म्हणण्यापेक्षा मला प्रचंड होमसीक वगैरे अजिबात व्हायचं नाही. सुट्टीतला हा कोर्स मला आवडायचा. खूप नवनवीन माणसं भेटायची, नवीन शिकायला मिळायचं. माझ्या पुढच्या शिक्षणासाठी ते गरजेचंही होतं. घरी गेले तर जेवण, टीव्ही आणि झोप याव्यतिरिक्त फार काही व्हायचं नाही. त्यामुळे मी आनंदाने सुट्टीत हॉस्टेलवर राहायचे. याचे वेगळे पैसेही द्यावे लागायचे नाहीत. ही एक जमेची बाब.
माझा कोर्स सकाळी आठ ते दुपारी एक असायचा. मॅक्सम्युलर भवन आहे ढोले पाटील रोडला. सकाळी सात वाजता मी डेक्कनला चालत जायचे. तिथून बसने पुणे स्टेशन, मग चालत मॅक्सम्युलर भवन. यात कोणी वर्गातलं लिफ्ट देणारं भेटलं तर सोने पे सुहागा! कोर्स संपला की परत चालत पुणे स्टेशनवर, तिथून बस घेऊन डेक्कन, तिथून उन्हात चालत फर्ग्युसनरोडवर हॉस्टेल. कधीकधी परत येईपर्यंत तीन वाजत. मेस बंद झालेली असे. उपाशी राहायची वेळ येई. मग येताना ब्रेड आण, ब्रेड लोणचं, जॅमब्रेड खा हे प्रकार करायला लागले. पैसे मोजके असत. दररोज बाहेर इतर काहीही खायला परवडायच नाही. हॉस्टेल आणि पैश्याची तंगी हे समीकरणच असतं. तेव्हा माझ्या खोलीत एक तात्पुरती रूममेट मला मिळाली होती, युपीएसीचा अभ्यास करणारी. माझं ब्रेडचं जेवण पाहून मग मेसमधून ती माझं ताट वेळेत आणून खोलीत झाकून ठेवायला लागली. मी आल्यावर ते गार जेवण जेवायचे. आधीच मेसचं जेवण, त्यात गार. जाता जायचं नाही पण पर्याय नसायचा. समोर असेल ते गोड मानून खायला लागायचं. अनेकदा मॅक्सम्युलर भवननध्ये कोर्स संपला की सगळेजण तिथल्या कँटीनमध्ये खायला जायचे. मलाही बोलवायचे, भूकही तेव्हा जाम लागलेली असायची. पण पंचवीस रुपयांचं बन ऑम्लेट खाऊन धड पोटही भरायचं नाही आणि पैसे देखील जायचे. त्या पंचवीस रुपयांत मला पुढच्या आठवड्याचं बसचं तिकीट दिसायचं. मी गपगुमान कोणालाही काही न सांगता कडक उन्हात स्टेशनकडे चालू लागायचे. आता मॅक्सम्युलर मध्ये जेव्हा जेव्हा जाते तेव्हा तिथल्या कँटीनकडे पाहते तेव्हा ते दिवस आठवल्याशिवाय राहत नाहीत.
माझी ही ओढाताण माझ्या आईने एकदा प्रत्यक्ष पाहिली. मग मला तंबी दिली गेली, एकतर सुट्टीत घरी तरी ये नाहीतर मॅक्सम्युलरचे कोर्स करायचा वेगळा मार्ग तरी शोध. वेगळा मार्ग एकच होता. मॅक्सम्युलरच्याच हॉस्टेलला राहणे. जायचायायचा वेळही वाचला असता, जेवणाचे हाल झाले नसते. मात्र हे प्रकरण महाग होतं. तरीदेखील आई तयार झाली. पुढच्या कोर्सची फी मी हॉस्टेलसकट भरली आणि चंबूगबाळं घेऊन तिथल्या हॉस्टेलवर दाखल झाले. हॉस्टेल कसलं, हा बोटक्लब रोडवरचा एक सुंदर बंगला होता. आजूबाजूला गर्द झाडी होती. बंगल्यातल्या खोल्या मुलींना वाटून दिल्या गेल्या होत्या. मधल्या मोठ्या हॉमध्ये टीव्ही होता, तिथे सगळ्या मुली एकत्र यायच्या. फार सुंदर बंगला होता हा, अजूनही असावा. आम्ही इनमिन बारा मुली होतो त्यामुळे चटकन मैत्री झाली. एकत्र अभ्यास, गाणी ऐकणे, फिरायला जाणे अश्या गोष्टी करायचो. मात्र सगळ्या मुली सधन घरातल्या म्हणव्यात अश्या होत्या. हे एक वेगळंच जग होतं माझ्यासाठी! चकचकीत, सगळ्या गोष्टींना सुबत्तेचा वास असलेलं.
तिथे गेल्या दिवशी रात्री पहिल्यांदा मेसमध्ये जेवायला गेले. ही मेस म्हणजे बोटक्लब पाशी असलेल्या एका मोठ्या बंगल्यात जेवायची सोय. मुलामुलींची एकत्र मेस होती ही. मला हे सगळं फार नवीन होतं. फार बावचळले होते मी. एका मोठ्या हॉलमध्ये गोल टेबलं मांडून ठेवली होती. तिथल्या भल्यामोठ्या खिडकीमध्ये प्रत्येकाने ताट घेऊन जायचं( हो, पिक्चरमध्ये जेलमध्ये कैद्यांना जेवण देतात अगदी तसं!). पहिल्या रात्रीचा मेन्यू होता कणकेचे पराठे, छोले, जीराराईस आणि बुंदी रायता. प्रत्येक टेबलावर ग्रीन सॅलड मधोमध ठेवलेलं असायचं. हे मेसमधलं जेवण होतं? मला आनंदातिरेकाने काही सुचेनासं झालं होतं. सगळेजण टेबलवर गप्पा मारत जेवलो. फार चविष्ट जेवण होतं ते. सुरणाची अजिबात आठवण आली नाही. यावर कडी म्हणजे जेवण झाल्यावर काही लोक परत खिडकीकडे जाऊ लागले. मैत्रिणीने मला विचारलं, “स्वीट नहीं लोगी क्या?” मी तीनताड उडाले. बुधवारी आणि स्वीट? हे कसं काय शक्य आहे? नंतर पत्ता लागला इथे दररोज काहीतरी गोड असायचं. रोज गोड, दर शुक्रवारी चायनीज किंवा कॉन्टिनेंटल आणि रविवारी नॉनव्हेज! कुठलं पुण्य कामास आलं होतं काय माहीत! मी जाऊन खीर घेऊन आले. पुढचे दोन महिने माझी चंगळ असणार होती हे मला स्पष्ट दिसू लागलं.
मेसमध्ये सकाळी आठला आम्ही ब्रेकफास्टला जायचो. रोज एक काहीतरी म्हणजे पोहे, शिरा, उपमा, खिचडी यापैकी तर असायचच, पण रोज ब्रेड बटर, ऑम्लेटही असायचं. अधेमधे एखादं फळ. चहा, कॉफी किंवा दूध काय हवं ते घ्यायचं. शाही थाटच म्हणायचा हा! मनदीप नावाचा एक पंजाबी मुलगा दोन उकडलेली अंडी खाऊन अख्खा जग भरून दूध प्यायचा. काही शिक्षकही इथे लवकर येऊन नाश्ता करायचे. मला आधी इतके पदार्थ पाहून फार कानकोंड व्हायचं. हळूहळू सरावले. माझी रुममेट शिल्पा इथे फार सहज वावरायची. टेबल स्वच्छ नसेल तर तिथल्या स्टाफला झापायची. एकदा स्वीट डिशमध्ये फक्त जेली का केली म्हणून तिने मेसच्या लोकांना झापलं. तिचं म्हणणं जेलिबरोबर कस्टर्ड किंवा फ्रुट सॅलड द्यावं. मला जेली हाच पदार्थ अत्यंत दुरापास्त असल्याने मी तो चवीने खात होते. शिल्पाने रागाने मला तिचीही वाटी दिली. मी ती ही चवीने खाल्ली. तिने मला विचारलं, “हे तू नुसतं कसं काय खाऊ शकतेस? ये खाना भी कोई खाना है?” मी शांतपणे जेलीची वाटी चाटूनपुसून साफ करत तिला म्हणाले, “हे खायला मिळतंय याचंच अप्रूप आहे मला. माझ्या पाच वर्षांच्या हॉस्टेल जीवनात हे पहिल्यांदा खाते आहे मी. जिन्हे कुछ नहीं मिलता उनसे पुछो, ये खाना तो अमृत के जैसा है.” ती चपापली. मी फार आनंदाने हे जेवण जेवायचे. फार गरिबी पाहिलेल्या माणसाला चार पैसे हातात खुळखुळल्यावर जसा आनंद होतो तसाच मला इथे आल्यावर झाला होता.
पण काही म्हणा, जेवण कितीही चांगलं असो, मेसला लोकं नावच ठेवतात कारण काही झालं तरी ते “घर का खाना” नसतं. मला आश्चर्य वाटायचं, या फाईव्ह स्टार मेसलाही लोकं नावं ठेवायचे. आमच्या बरोबरची काही मुलं नावापुरती मेसमध्ये काहीतरी खायची, मग लगेच सगळे उठून Nandus paratha मध्ये पराठे चापायला जायची. अनेकदा मी ही त्यांच्यावरोबर सोबत म्हणून जायचे. मेसमधल्या जेवणाला नावं ठेवत ठेवत ही पोरं त्या हॉटेलात चारपाच पराठे हाणायची. त्यानंतर स्टेशनवरची ग्लासभरून लस्सी. मला हे सगळं समजण्यापलीकडे असायचं. पण उदरभरणाची खरी मजा मी या दोन महिन्यांत पुरेपूर लुटली, पोटाचे खरेखुरे लाड अनुभवले. यानंतर मी कधीही कुठल्याही अन्नाला आजतागायत नावं ठेवलेली नाहीत. मसाले भातातून काजू बाजूला काढणारी माणसं पाहिली, कूट जास्त झालं म्हणून कोशिंबीर न खाणारी माणसं, गरम पोळी न मिळाली की तक्रार करणारी माणस पाहिली की मला अस्वस्थ होतं. कारण पोटासाठी मी जे काही अनुभवलं आहे ते या सगळ्या चोचल्यांपलीकडचं आहे.
बघता बघता भुर्रकन दोन महिने उडून गेले आणि फ्रुट कस्टर्ड, फ्राईड राईस, राजमा, आलू पराठ्यांना अलविदा म्हणायची वेळ माझ्यावर आली…
पुढचं नंतर कधीतरी….
Latest posts by Gauri Brahme (see all)
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
Wah Madam, khupach chhan lihita tumhi. Dolyasamor sagle padarth ubhe kelet. Anna he purnabrahma.
Thanks 😊
सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं 😀
Khup sunder.. vachun dolyasamor chitra ubhe rahile .. mastch ..
अगदी तंतोतंत वर्णन..माझेच अनुभव आणि भावना वाचतेय असं वाटलं..गरवारे कॉलेजच्या मेसनंतर IIT मद्रासची मेस अगदी 5 starच वाटते मला..रोज तक्रार करणारे बघीतले की हसू येतं आता..
👍👍😊
मला तूमचे लेख वाचायचे आहे मँडम.कसे वाचू कृपया मला सांगा.
रोहिणी साययद
इथे गौरी ब्रह्मे वर क्लिक करा. माझे सगळे लेख वाचायला मीळतील.
खूप सुंदर
शिजलेल्या अन्नाला लोक कास के नाव ठेवू शकतात समजत नाही.
मला तर अस वाटत की 16 ते 25 या वयात मुलांना हॉस्टेल ला ठेवलच पाहिजे म्हणजे घरच्या अन्नाची, घराच्या माणसांची किंमत कळते
Nice sharing of experience. Could correlate it… 👍👍
धन्यवाद!
सुंदर अनुभव कथन, hosteler’s pain and gain