फोटू……
“माझा नातू लय भारी चित्तर काढतोय, बघितलं का तू……. ए पोरा इकडं ये रं…….”
“थांबा, आप्पा, आज्जीनं बोलावलंय तिकडं जाऊन येतो.”
नेहमीप्रमाणे नातवाने आप्पाना गुंडाळलं होतं. काहीतरी थाप ठोकून, नातवंडानं पळ काढला होता. त्याची चित्रकला खरंच चांगली होती. पण असं चार माणसात, आप्पा कशाचेही चित्र काढायला लावणार,…… हा विचार करून त्यानं तिथून काढता पाय घेतला. त्याला नाही आवडायचं प्रदर्शन.
गुलबाप्पा पाटील मात्र, नातवाच्या कौतुकात गुंगून गेले होते. पुण्यावरून चार दिवस येणारं नातवंड, त्यांच्या काही वाट्याला येत नव्हतं. तो बुंदीचा लाडू काही हाताला लागत नव्हता.
वाडीत फारफार तर दुधगोळ्या मिळायच्या. नातवाला आकर्षित करू शकणारी, महागडी चॉकलेट्स मिळणं महाकठीण. त्या कारणावरून वाडीतल्या, एकुलत्या एक वाण्याला, वाड्यासमोरच्या चावडीवजा दगडावर बसून, ठेवणीतल्या शिव्या घालून झाल्या होत्या. अप्पांचा बारा वाड्यात एके काळी खरोखर धाक होता. त्यांनी बऱ्याच नोकऱ्या केल्या होत्या……. तलाठी, शिक्षक, मिलिटरी ….. अन एवढं सगळं करून पोलीस पाटीलकी देखील केली. आता वाडीत बसल्या बसल्या वाडकरांसमोर, मळलेल्या तंबाखूसोबत स्वतःच्या सर्व्हिस मधल्या फुशारक्या मारण्यात दिवस जात होता. अन आता नातवाच्या फुशारक्या…….
त्याला पोहायला न्यायला, वाडीतले मित्र मिळाले होते. सुरपारंब्या शिकवणारे मित्र मिळाले होते. कुणाच्या तरी आंब्याच्या कैऱ्या पाडायला मित्र मिळाले होते. या सगळ्या उद्योगातून, गुलबाप्पा साठी वेळ कुठे होता.
त्याच्या या बिझी शेड्युलचा, गुलबाप्पाला काही थांग लागेना. म्हाताऱ्यानं पटकूर उचललं, काखेत मारलं, अन संत्र्याच्या बागेकडे चालू लागलं.
दुपारपर्यंत आलंच नाही. कुठून लांबून नातवाचा आवाज येऊ लागला.
“आप्पा, …… आप्पा …….”
संत्र्याच्या बागेत, तंबाखूचा बार दाबून बसलेल्या, अप्पांनी तोंडातला माल, बोटाने काढून टाकत, परतून आवाज दिला,
“शिरी …….. बाळा ….. इकडं हाय मी.”
धापा टाकत, श्री पोचला. त्यानं आप्पांजवळ बसकण मारली.
“किती शोधलं अप्पा, ……. आज्जी जेवायला बोलावतीय तुम्हाला.”
म्हाताऱ्याला मनोमन बरं वाटलं. “आधी वाईच निवांत बस, दोन गोष्टी ऐक माझ्या…….” म्हणत अप्पांनी प्रस्तावना केली.
अप्पा आता काय सांगतात, म्हणून श्री अपेक्षेनं त्यांच्याकडे पाहू लागला.
“माझं एक काम हाय तुझ्याकडं ……”
आता माझ्याकडं अप्पांचं काय काम असणार, प्रश्नार्थक मुद्रेनं नातू पाहू लागला.
“माझं चित्तर काढशील का ?……. आं, …… या गुलाबाप्पा पाटलाचा, बारा वाड्यावर धाक हुता, पण एक साधा फोटू पण नाय रं. माझी पोरं काय माझा फोटू काढायची न्हाईत बग, त्यापेक्षा तूच काढ माझं चित्तार…..”
एवढं महत्वाचं काम सांगायला, अप्पा आपल्याला जवळ बोलावतायत अन आपण आप्पांना टाळतोय, हा विचार मनात येऊन श्री खजिल झाला.
“पण अप्पा मला जमेल का ?”
“आरं जमंल तसं जमंल, त्यात काय हाय, माझ्या नातवानं काढल्यालं कसं बी चालतंय. हां, …….. त्यात ह्यो पटका नको दावू, चांगला कोल्हापुरी फेटा दाव, एक बाजू कललेला, पाटलाला शोभंल असा……….. तुझ्या बापानं, फेटा आणलाच न्हाय, मागच्या जत्रंला…… पण तू मात्र, चित्तर काढशील त्यात दाव, चांगला ऐटबाज.”
झालं, दुसऱ्या दिवशी, दोघे दिवसभर, संत्रेच्या बागेत. …… पेन्सिल , रबर, कागद घेऊन. नातवानं छान मन लावून काढलं, आपल्या आज्याचं तोंड. त्याला पाहिजे तसा फेटा. दुपारनंतर रंगकाम झालं. कागदावरचा गुलबाप्पा पाटील, प्रत्यक्षापेक्षा जास्त रुबाबदार दिसत होता. तरी जसंच्या तसं हुबेहूब चित्र जमलं नाही म्हणून नातू तितका खुश नव्हता.
पण म्हातारं, मात्र सातवे आसमान पर…….
सगळ्या वाडीला, दाखवत फिरला आपलं ऐटबाज चित्र. बारा वाड्यांवर धाक ठेवणारा आप्पा, आज कागदावर उतरला होता. इतका उतरला होता की, त्या कागदात, जणू त्याचा जीवच उतरला होता.
माजघरातल्या आतल्या खोलीत, सागवानी संदुकात, आप्पांनी ते चित्र जपुन ठेवलं.
……………………………………………………………
आज ओढ्यात, हे सगळं आठवत श्री उभा होता. काही वर्षांपूर्वी काढलेलं ते चित्र काही त्याच्या मनातून जात नव्हतं.
इकडं कावळा शिवत नव्हता, म्हणून भाऊबंदात कुजबुज सुरू झाली होती.
“मस्त, नव्वदी पार केली हुती.”
“त्याचं आयुष्य त्यो जगला होता……”
“मस्त खायची प्यायची चंगळ हुती, त्यांच्या जमान्यात,……. आपल्या सारखं हायब्रीड हाय का ?”
“तरीबी कामुन कावळा खोळंबला आसंल ?”
चर्चेला उत आला होता. ‘लेकींना माहेरपण नीट करिन’ पासून ते ‘संत्र्याची बाग तोडणार नाही’ पर्यंत सगळी आश्वासनं देऊन झाली. पण कावळा समोर बसून ढिम्म हलेना.
नातू जाऊन आज्जीच्या कानात कुजबुजला. आज्जीनंही मान डोलावली. उंची वाढलेला, नातू ताडताड चालत, वाड्याकडे गेला.
येताना हातात, एक फ्रेम होती. अन चेहऱ्यावर आश्चर्य,…… आप्पांनी चित्राला फ्रेम कधी करून घेतली.
“दोन हफ्ते झाले बग, फ्रेम करून आणली तुझ्या आज्यानी…….. जणू त्याला आधीच कळली हुती, त्याच्या दहाव्याची बातमी…….” असं म्हणत आज्जीनं पदरानं फोटो पुसला. तिथंच एक खुर्ची ठेवून, त्यावर तो फोटो, दर्शनासाठी मांडण्यात आला. वर एक हार पण चढला.
बारा वाड्याच्या त्या पाटलाचा ऐटबाज फोटो तिथं लागला, अन दुसऱ्या सेकंदाला, कावळे नेवैद्यावर तुटून पडले. ©बीआरपवार
Image by Mohan Nannapaneni from Pixabay
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
सुंदर… काकस्पर्श… स्पर्श कोणत्या गोष्टीत अडकलेला असतो काही सांगता येत नाही… तरी एक चांगल कि स्पर्शासाठी अडकलेली गोष्ट माणूस बरोबर नेत नाही…👌👌👌👍👍👍
वा सुंदर
छानच… नेहमीप्रमाणे
सुंदर
धन्यवाद
मस्तच
Mastach…..
Mastach…..
Thanks !
नातवाला आठवले हे विशेष
खूप सुंदर 👌👌