माझे messy अनुभव ४
कॉलेज संपलं आणि मी पुणे विद्यापीठात पोस्ट ग्रॅज्युशन
करायचं ठरवलं. खरंतर विद्यापिठाच्या लेडीज हॉस्टेलमध्ये सहज जागा मिळाली असती पण माझं डिपार्टमेंट फर्ग्युसन रोडवर होतं, रोज बसने विद्यापीठात जा ये करावी लागली असती. स्वतःची गाडी तेव्हा नव्हती. म्हणून पेईंग गेस्ट म्हणून कुठे जवळपास जागा मिळते आहे का ते मी पाहू लागले. त्यावेळी अशा जागा मिळणं फार कठीण नव्हतं पण खिशाला परवडेल अशी जागा फर्ग्युसन कॉलेजच्या आसपास मिळणं हे मात्र कठीण होतं. बराच शोध घेतला. मी ही खरंतर हॉस्टेलला कंटाळले होते, पेईंग गेस्ट म्हणून राहणे हा अनुभव कदाचित वेगळा असेल असं वाटून जागा शोधू लागले. तोपर्यंत माझी आणि नवऱ्याची ओळख होऊन आमचं “प्रकरण” सुरू झालं होतं. त्याला माहित होतंच मी जागेच्या शोधात होते. तो ही त्याच्या परीने, कुठेतरी ओळखीत जागा शोधू लागला. गंमत म्हणजे जागा त्यानेच शोधली. मी सुट्टीत कराडला गेले असताना तो आणि माझी एक मैत्रीण जंगली महाराज रोडवर “चौकशी तर करून येऊ” असा विचार करत एका जुन्या बंगल्यात गेले. तिथे एक वृद्ध आजी (फडणीस मावशी) सोबत म्हणून परगावच्या मुलींना त्यांच्या घरात पेईंग गेस्ट म्हणून ठेऊन घ्यायच्या. नवरा आणि मैत्रीण गेले तर आजींनी दोघांना घरात बसवून घेतलं. प्रत्यक्ष मुलगी सोबत नाही म्हणून त्या आधी जरा नाराज झाल्या, पण त्यांनी मैत्रीणीला विचारलं, “तुझ्यासारखीच आहे ना मुलगी? गोरीगोमटी?मग मला चालेल!” मैत्रीण छान गोरी होती. त्या आजींचा पणच होता, सोबत राहणारी मुलगी गोरी हवी, बाकी ती काही का शिकत असेना! ही भलतीच अट होती! पण त्यांना स्वच्छ गोऱ्या, छान दिसणाऱ्या मुली आवडायच्या. पुढे दोन वर्ष मी त्यांच्याबरोबर राहिले तेव्हा त्यांना हरप्रकारे त्यांचा गोऱ्या रंगाबद्दलचा अट्टाहास कसा चुकीचा आहे ते समजावत राहिले. पण त्या फक्त हसायच्या. “मी तर गोरी फटक नाही, मग मला कसं राहू दिलंत इथे?” असं त्यांना मुद्दाम चेष्टेने विचारायचे. त्यावर त्या म्हणायच्या, “गोरी नसलीस तरी चुणचुणीत आहेस. मुलींमध्ये काहीतरी स्पार्क हवा!” कमाल म्हणजे त्या गेल्या तेव्हा त्यांच्याबरोबर एकच पेईंग गेस्ट मुलगी होती आणि ही मुलगी कर्मधर्मसंयोगाने लख्ख सावळी होती! एकेक विरोधाभास असतात आयुष्यात!
या जागेचं भाडं होतं निव्वळ पाचशे रुपये. आता पाचशे रुपयांत कुठेच काहीच, अगदी एक कॉटबेसिसवर जागा पण मिळणार नाही. ऐन जंगली महाराज रोडवरची स्वस्तातली जागा, राहायला छान वाड्यातली खोली, मुबलक पाणी असलेली जागा, मुख्य म्हणजे माझं कॉलेज पायी चालत जायच्या अंतरावर, मावशींची देखरेख हे सगळंच माझ्या पथ्यावर पडलं. आता इथे तो वाडा पडून मोठी इमारत झाली आहे पण या रस्त्यावरून जाताना अजूनही त्यांच्या छोट्याश्या बाल्कनीत बसून पेपर वाचत असलेल्या फडणीस मावशी मला आठवतात. फार छान गेली माझी ती दोन वर्ष.
इथे मेस बंद होऊन सुरू झालं डबा प्रकरण. एक रिक्षा चालवणारे काका इथे राहणाऱ्या मुलींना डबे पुरवायचे. तीन पुडाचा अल्युमिनियमचा डबा असायचा. चारशे रुपये महिना. माझ्या जोडीला होती माझी रुममेट अनघा. मी सगळं विनातक्रार खाणारी, तर अनघा चाखतमाखत सगळे श्लेष काढत जेवणारी! पण आम्ही दोघी पट्टमैत्रिणी. ती माझ्यापेक्षा थोडी लहान होती त्यामुळे रुसली की तिला जरा बाबापुता करून जेवायला चल म्हणावं लागायचं. सकाळी साडेदहा वाजता काका डबा आमच्या खोलीच्या बाहेर ठेऊन जायचे. जाताना एक टिपिकल टकटक दारावर करायचे. टकटक ऐकू आली की अनघा पळत डब्याकडे जायची आणि आधी भाजी कोणती आहे ते पहायची. दुधी, लाल भोपळा, तारवाली भेंडी पाहिली की ती हिरमुसायची. हेच एखादी उसळ, बटाट्याच्या काचऱ्या (ज्या महिन्यातून एकदा यायच्या) असल्या की तिचा मूड चांगला व्हायचा. एक साधं जेवण आपल्या मनावर किती परिणाम करू शकतं! मला अकरा वाजता पहिलं लेक्चर असल्याने मी असेल ती पोळीभाजी खाऊन जायचे. चार वाजता परत आल्यावर आमटी भात खायचे. तो ही थंडगार. डब्यातही आमटी पाणीदारच असायची. सात वर्ष अशी बेचव आमटी खाऊन खरंतर मला आमटीची शिसारी बसली होती, ती अगदी माझ्या सासूबाईंच्या हातची गरमागरम चिंचगुळाची आमटी खाईपर्यंत!
फडणीस मावशी सुद्धा सुरेख आमटी करायच्या. उसळ, पालेभाजी केली की मला आवर्जून आग्रह करून वाढायच्या. त्यांच्या एका भाजीमुळे डब्यातलं सगळं बेचव जेवण चविष्ट होऊन जायचं. अनेकदा रात्री त्या पिठलं करायच्या, आम्हालाही द्यायच्या. मग तर आमची चंगळ असायची. पण फार गृहीत मात्र त्या आम्हाला काही धरू द्यायच्या नाहीत. त्यामुळे डब्यातलं अन्न हेच आमचं प्रमुख अन्न होतं याचा आम्हाला विसर पडायचा नाही. अनेकदा काकांना डबा द्यायला उशीर होई, मग ते डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये माझा डबा ठेवत. जेवणाच्या सुट्टीत सगळे मित्रमैत्रिणी माझ्या डब्यावर अक्षरशः तुटून पडत. Wow वगैरे म्हणत जेवत. माझ्या एका मैत्रिणीला डब्यातली उसळ तर फार आवडे. ती अगदी चट्टामट्टा करून ती उसळ खाई आणि तिचा डबा मला देई. तो दिवस माझ्याकरता सोन्याचा दिवस असे. घरच्या अन्नाचं महत्त्व काय आणि किती असतं ते तुम्हाला फक्त त्यापासून वंचीत राहिल्यावर समजतं. मला आश्चर्य वाटायचं, मला उबग आणणारं डब्यातलं अन्न यांना इतकं कसं आवडतं? नंतर समजलं, ते अन्न त्यांच्यासाठी फक्त एक बदल होता. मला ते रोजचं उदरभरण असल्याने किंवा फारसा चॉईसच नसल्याने ते खाणं क्रमप्राप्त होतं.
काकाही रविवारी डब्यात स्वीट देत. खीर, शिरा चांगलं असायचं पण जिलबी आली की आमची तोंड वाकडी व्हायची. रविवारी अनेकदा मावशी आम्हाला जंगली महाराज रोडवरच्या अतिथी हॉटेलमधून भाजी आणायला सांगायच्या. आम्ही आमच्याकरताही तिथली भाजी आणायचो. अतिशय चवदार असायचं तिथलं जेवण. मी अनेकदा नवऱ्याबरोबर तिथे जेवले आहे. साधं आणि रुचकर जेवण. आता अतिथी तिथे आहे की नाही ते माहीत नाही. तिथून भाजी आणली की आमचा रविवार साजरा व्हायचा. संध्याकाळी मी आणि अनघा कधी मॅगी बनव, कधी डोसा खाऊन ये असं करायचो. अनघाला माझ्या “प्रकरणा” बद्दल माहित असल्याने अनेकदा घरी यायला उशीर झाला की मावशींसमोर मला पाठीशी घालायची. आमचं जाम गूळपीठ होतं. अजूनही आहे. आता ती फेसबुकवर एकेक तिने बनवलेल्या चविष्ट रेसिपीज पोस्ट करत असते तेव्हा मला डब्यात पडवळाची भाजी दिसल्यावरचा चेहरा अगदी आवर्जून डोळ्यांसमोर येतो.
कॉलेज संपत आलं होतं. अनेकदा मी माझ्या होणाऱ्या सासरी जायचे. सासूबाई मला कुतूहल म्हणून डब्यात काय भाजी होती? ते विचारायच्या. मी सुरण, दुधी म्हटलं की त्या “बिचाऱ्या ग पोरी तुम्ही!” म्हणत मला आमटीभात, एखादा पराठा खायला घालून मग परत पाठवायच्या. मी बेचव जेवण खाते हे त्यांच्या पचनीच पडायचं नाही. मी तिथून जेवून आले की अनघा मला चिडवायची, “आज काय बाबा, पोटही भरलं असेल आणि मनही!” पण मला तिला सोडून जेवताना खरंच जीवावर यायचं. आपण चांगलं जेवायचं आणि तिने डब्यातलं, हा विचारच पटायचा नाही. अन्न तुम्हाला एकमेकांशी बांधून ठेवतं ते असं!
कॉलेज संपलं आणि त्याचबरोबर माझे messy अनुभवही. पण या अनुभवांनी मला खऱ्या अर्थाने समृद्ध केलं. अन्नाचं महत्त्व ओळखायला शिकवलं, काहीही गृहीत न धरायला शिकवलं. या सात वर्षांमुळे आजही माझ्या जेवणाच्या फार तक्रारी नाहीत. घरचं साधं जेवण मला परमप्रिय आहे. या गोष्टीचा माझ्या सासूबाईंना माझ्या बाळंतपणात फार फायदा झाला. त्यांनी दिलेले दूध गूळ पोहेही मी आवडीने खायचे, मेथीच्या लाडवांबद्दल कधीही तक्रार केली नाही आणि शेपूची भाजी अगदी दररोज खाल्ली. त्या कौतुकाने सर्वांना सांगतात, गौरीचे जेवणाचे नखरे नाहीत, त्यामुळे तिचं कुठेही अडत तर नाहीच, पण तिला जेवायला घालणाऱ्यालाही सुख लागतं. ही मोठीच पावती म्हणायची.
म्हणताना मी हे messy अनुभव म्हणते आहे पण तो नुसताच शब्दच्छल आहे. खरंतर या अनुभवांनी मला अन्न, स्वयंपाक, उदरभरण, उपासमार, जेवण या सगळ्याबद्दल विचार करायचा एक वेगळा आयाम दिला. या सात वर्षानंतर आजतागायत मी अन्नाला कधीही गृहीत धरले नाही की त्याबद्दल कधी गाफीलही राहिले नाही. वदनी कवळ घेता…चा खरा अर्थ मला या सात वर्षांनी शिकवला असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.
Latest posts by Gauri Brahme (see all)
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
Khupach Sundar lekhan
किती सहज सुंदर
धन्यवाद!
धन्यवाद!
last paragraph best…!
मी चारही भाग मन लावून वाचले. मेसचं जेवण घेण्याचा माझा दोनच वर्षांचा अनुभव आहे. पण तेवढ्याने सुद्धा जेवणाबद्दल कधीही तक्रार करायची नाही हे मी शिकले. बरेचसे अनुभव मिळतेजुळते आहेत.
तुम्ही खूप छान लिहिता
🙏 मी लग्नानंतरच तक्रारी करायला शिकले.😅 कारण घरचे फारच चोखंदळ निघाले. पण अजूनही पुढ्यात येईल ते खायची सगळी तयारी असते.
वदनी कवळ घेताना देवाने दिलेली कवळी बाहेर येऊन डॉक्टर कडची आणायला लागत नाही तोवर हे मेस च जेवण खायची आपली तयारी हे कॉलेजचे दिवसच करून देतात बुवा!!! मस्त एकदम!
😂
खूप छान
👍👍
या सिरीजला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार.
खूप मस्त लिहिलय…सगळ चित्र अगदी डोळ्यासमोर आल…माझ्या काही मैत्रिणी हॉस्टेल ल राहायच्या…त्यातली एक जण घरून राहायला येताना मोठी बाटली भरून लोणचं चटणी मुरंबा अस घेऊन यायची…म्हणजे भाजी आवडती नसली की प्रॉब्लेम व्हायचं नाही