सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग 4
आधीच्या भागाची लिंक- सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग 3
माझ्यासमोर उभ्या असलेल्या सुरभीला काही क्षण मी फक्त बघत होते. सुरभी की सुरैया?? माझ्यासाठी तर ती सुरभीच… तिशीच्या आसपासच वय असेल तिचं पण इतकं दुःख कोळून प्यायलेली की कल्पनेने फक्त माझ्या अंगावर काटे उभे राहिले होते. तिचे डोळे पुसत..तिच्या खांद्यांवर हात ठेवत तिला म्हणाले,
मी – रडणं बंद कर आधी सुरभी. खरंच तू खूप ग्रेट आहेस…इथवरचा प्रवास तू एकटीने धीराने गाठलायस…आताही तुला जिंकायचंच आहे. ज्या मार्गावरून मागे फिरताच येत नाही त्या मार्गावरून तू तुझी आणि तुझ्या मुलीची सुटका केली आहेस…हे कोणालाही शक्य नाही होत ग..खूप हिंमत लागते यासाठी. तु वेश्या होतीस हे ऐकून मला दुःख तर झालं पण त्यातून तू बाहेर पडून…ऋतुसाठी आतापर्यंत सगळे उन्ह पावसाळे झेलत इथवर आलीस याचा अभिमान वाटतोय. एवढी संकट तर तू पार केलीस मग आता का घाबरतेस??? मान्य आहे ऋतू तुझा जीव आहे आणि तिला तुला यापासून लांबच ठेवायचं आहे याचाच गैरफायदा तो प्रकाश घेतोय.
तुझा जीव तिच्यात अडकलाय म्हणूनच तिच्या नावाने तो तुला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतोय.
मान्य आहे ऋतू अजून लहान आहे पण म्हणून तुझ्याबद्दल त्याने तिला वाईट सांगावं आणि तिने लगेच त्याच्यावर विश्वास ठेवून तुला सोडून निघून जावं अस नाही होणार ग. तुझं मातृत्व इतकं कमकुवत आहे का?? ऋतुने लहानपणापासून तुझा संघर्ष पाहिलाय… तू एकटी तिला हवं नको ते सगळं बघतेस..तिच्या सुखासाठी झटतेस हे ती पाहत आले आणि हे नातं इतकं तकलादू समजतेस का की कोणी दीड दमडीचा प्रकाश येईल आणि तुझ्या मुलीला तुझ्यापासून तोडेल?? फक्त तू घाबरू नकोस. सगळं ठीकच होईल…त्या प्रकाशला आता धडा शिकवायची वेळ आली आहे एवढंच लक्षात ठेव. पण मला अजूनही एक प्रश्न आहे सुरभी…आतापर्यंत तू सांगितल्याप्रमाणे तुझा अजून एक भुतकाळ म्हणजे तुझी जन्म कहाणी जी तू प्रकाशपासूनही लपवली होतीस…. ती काय आहे?? म्हणजे ते अस काही आहे का जे ऋतूलाही कळल्यावर धक्का बसेल किंवा काही अनर्थ घडेल??
सुरभी – ऋतूला तर माझी आतापर्यंतची सगळीच कहाणी ऐकून धक्का बसेल ताई पण माझी जन्मकहानी ऐकून सगळ्यांनाच धक्का बसेल. ऋतूचाच काय पण कोणत्याही सामान्य व्यक्तीचा माणुसकीवरचा,रक्ताच्या नात्यावरचा आणि जन्मदात्यांवरचाही विश्वास उडून जाईल. मी स्वतः त्या धक्क्यातून रोज सावरण्याचा प्रयत्न करते पण एक तीच गोष्ट जी मला आजही काट्यासारखी बोचते… ठसठसते. जी आठवली तरी घाम फुटतो…रात्र रात्र झोप लागत नाही. मी वेश्या आहे हे ऐकून तुम्ही एक अंदाज बांधला असेल ताई की ही गरीब घरातील असेल…पैश्याची चणचण असेल म्हणून हिला या बाजारात विकल असावं किंवा कोणीतरी फसवून त्या दलदलीत सोडून दिलं असावं….सत्य कदाचित तस असत तरी मला पचवणं शक्य झालं असतं किंवा आपल्या माणसांच्या काही आठवणींत हरवून कधीतरी या ओठांवर हसू तरी आलं असतं. पण दुर्दैव माझं की यातलं माझ्यासोबत काहीच घडलं नाही किंवा एक वेश्याच्या पोटी मी जन्म घेतला म्हणून मी तिथेच वाढले असही काही झालं नाही.
मुळात माझा जन्मच या धंद्यासाठी झाला…माझा जन्म होण्याआधीच माझं भविष्य या देहविक्रीच्या बाजारात लिहिलं गेलं होतं.
सुरभी काय बोलत होती याचा मला काहीच अर्थ लागत नव्हता…आतापर्यंत मला तरी असच वाटत होतं की तिला फसवलं गेलं असावं किंवा तिची आई वेश्या म्हणून तीही त्याच परिस्थितीत वाढली. पण हे माझ्याच मनाचे खेळ होते हे तिच्या बोलण्यावरून स्पष्ट झालं होतं पण पुढे तिच्या बोलण्याचा काहीच अर्थ लागत नव्हता. मी गोंधळलेल्या अवस्थेतच तिला विचारले,
मी – जन्माआधीच तुझं भविष्य वेश्या कस असू शकतं म्हणजे नक्की काय सांगायचंय तुला सुरभी…मला काही कळत नाहीये.प्लिज जरा सविस्तर सांगशील का??
सुरभी – सविस्तर सांगायचं म्हणजे मी गर्भातच असताना या धंद्यात येण्यासाठी माझं ऍडव्हान्स बुकिंग झालं होतं…(किंचितस हसत) धक्का बसला ना…पण हो हे खरं आहे…माझ्या आईची घरची परिस्थिती खूप गरीब त्यात बाप रोज दारू पिऊन यायचा…घरात आधीच दहा तोंड त्यात अकराव्या तोंडाला जन्माला घालून खायला काय घालायचं हा प्रश्न होताच…त्यातूनही जर मुलगी झाली तर तिचा सांभाळ कसा करणार?? कसं परवडणार ते?? बाप दारुडा त्यात पैसे मिळवण्याचे काळे धंदे त्याला चांगले ठाऊक होते….त्यातूनच या धंद्याचा त्याला सुगावा लागला असावा म्हणून माझ्या आईला छोट्याशा दवाखान्यात नेऊन गर्भलिंगनिदान केलं…गर्भ मुलीचा आहे हे कळल्यावर त्याच तोंड पडण्याऐवजी खुलल होतं. ताबडतोब कोणत्या एका इसमाकडून त्याला चांगली रक्कम मिळाली त्यातून तो आईला गरोदरपणात काय हवं नको सगळं खायला घालू लागला. नऊ महिने पूर्ण झाले तस आईला एका अज्ञातस्थळी हलवण्यात आलं. तिथेच तिची प्रसूती करण्यात आली व पुढचे तीन चार महिने तिथेच आम्हा मायलेकीचा सांभाळ करण्यात आला. त्याच ठिकाणाहून पुढे मायलेकीची ताटातूटही झाली.
माझ्या बापाने गर्भात मुलगी आहे हे कळलं असतानाच मला कुंटनखान्याच्या दलालाकडे विकलं होतं. काही रक्कम जन्माआधी दिली होती तर बाकीची रक्कम जन्मानंतर तीन चार महिन्यांनी दिली. माझ्या आईला हे माहीत होतं नव्हतं..तिने विरोध केला की नाही केला किंवा त्या माझ्या नालायक बापाने तिचा वापर असे गर्भ विकण्यासाठीच पुढे चालू ठेवला हे मला आजतागायत कळलंच नाही पण गर्भातच विकली गेलेली मी अभागी…वयाच्या चार महिन्यापासून कुंटनखान्यातला प्रवास सुरु झाला. तिथल्या मालकिणीनेच पुढे माझा सांभाळ केला आणि वयात आल्यावर धंद्यालाही लावले. कळायला लागलं तस कधी या गोष्टीला कधी विरोध केला किंवा कोणाजवळ या व्यवस्थेच्या विरोधात जरी बोलले तरी “तू तर गर्भातच विकली होतीस ग…तुझा जन्मच मुळात पुरुषाची भूक भागवण्यासाठी झालाय….तुला असलं बोलणं शोभत नाही” हेच ऐकत आले. आई बाप, जन्मदाते या शब्दांवरूनच विश्वास उडाला होता. कुंटनखाण्यात जेव्हा पण नवीन मुली यायच्या तेव्हा माझंच मन आतून रडायचं…एकीकडे वाटायचं नशीब यांचं थोडतरी चांगलं आहे म्हणून की काय आयुष्यातील काही काळ तरी जवळच्या लोकांचा, आप्तेष्टांचा सहवास यांना लाभला…आपले आणि त्यातील फसवणारे दोन्ही चेहरे यांनी पाहिले आणि दुसरीकडे वाटायचं की का स्त्रीचा जन्म??? का हे शरीर जे उपभोगायला कुंटनखाना जन्माला आला जिथे फक्त स्त्रीच शरीर चालत आणि येणाऱ्या पुरुषाचा पैसा बोलतो यामध्ये त्या स्त्रीच्या आत्म्याचा कधीच खून झालेला असतो.
आतापर्यंत मी ऐकत आले होते खरंतर फार विश्वास होता की जगात सर्वात सुरक्षित आणि विश्वसनीय स्थान म्हणजे “आईचा गर्भ”. पण सुरभी अर्थात सुरैयाच्या जन्मकहाणीने माझा हा विश्वासही डळमळीत झाला. स्त्री ना रस्त्यावर सुरक्षित…ना घरात…ना कुंटनखाण्यात आणि ना आता आईच्या गर्भात.
पैसे नसतात म्हणून किंवा फसवून किंवा आणखी कोणत्या कारणाने मुली या देहबाजारात येतात आणि इथल्या चक्रव्यूहात अडकतात हे एवढंच सत्य आजवर मला माहित होतं पण सुरभीच्या हृदयद्रावक कथेने आजच्या समाजातील अजून एक भयानक वास्तव समोर आलं ज्या वास्तवापासून माझ्यासारखे लाखो सामान्य लोक अनभिज्ञ असतील. स्त्रीच्या शरीराचा हवं तसा वापर करणाऱ्या या दलालांची पाळंमुळं किती खोल आहेत आणि अजून कोणत्या प्रकारे ते देहविक्रीचा बाजार करत असतील हे सामान्य बुद्धीला विचार करण्यापलीकडेच. सुरैयाचा जन्म इतक्या विदारक परिस्थितीत झाला असेल अस तर स्वप्नातही वाटलं नव्हतं…पण अजून अशा किती सुरैया असतील ??? किती सुरैया जन्माला येत असतील रोज??
सुरभीच्या सांगण्याप्रमाणे बिहार,मध्यप्रदेश अशा बऱ्याच ठिकाणाहून ही गर्भ विक्री होते. अतिशय गरीब,गरजू आणि त्यातही जी गर्भवती स्त्री दिसायला सुंदर, आकर्षक आहे त्या स्त्रीच गर्भलिंगनिदान केलं जातं…मुलीचा गर्भ आहे हे कळताच ठरलेल्या रकमेपैकी ठराविक रक्कम आधी देऊन त्या गर्भाचे संगोपन नीट केले जाते व जन्मानंतर काही महिन्यात उरलेली रक्कम देऊन ती कोवळी बाहुली दलालाच्या स्वाधीन केली जाते. ही रक्कम चक्क काही हजारांपासून लाखोपर्यंतही असते.
हे फार भयानक होतं… हे सगळं ऐकून मुली नक्की आता कशा सुरक्षित राहतील यावरच प्रश्न डोक्यात घुमायला लागले. खरंतर सगळं ऐकून मती गुंग झाली होती पण सुरभीच्या रडण्याने मी माझ्या विचारातून बाहेर पडले.
सुरभी – ताई मी त्या बाजारातून तर बाहेर पडले…ऋतुलाही सगळ्यांपासून लांब ठेवलं पण आता प्रकाशमुळे मला खुप भीती वाटते…त्यावेळी मी तिथुन पळून आले होते पण आता अजीम कुठवर पळू आणि तो बदल्याच्या आगीने पिसाळला असेल तर मी जिथे जिथे जाईन तिथे तिथे तो येईल.
मी – आधी हे घाबरण बंद कर आणि मी सांगते ते कर. ऋतूला विश्वासात घेऊन सगळं खरं सांग…हे बघ आता नाही सांगितलंस तरी उद्या जाऊन कस ना कस तिला कळेल आणि कोणा दुसऱ्याकडून हे कळून तिचा तुख्या वरचा विश्वास उडण्या पेक्षा तूच हे सत्य तिला सांग. हा आता 11 12 वर्ष हे वय हे कळायचं नसलं तरी चांगलं वाईट हे नक्कीच तिला कळू शकतं. आज जाऊन आधी तिच्याशी शांत पणे बोल…प्रकाश तिचा बाप आहे हे तिला कळूदे सोबत त्याने तुला कस फसवलं अनिल ता कस फसवतोय हेही तिला सांग.फक्त तिला कळेल या शब्दात सांगून तुझ्या विषयी तिला तिरस्कार न वाटता अभिमान वाढेल अस सांगणं महत्वाचं आणि तू आई आहेस तिची…तूच हे करू शकतेस. तू काही चुकीचं केलंस किंवा वागलेली नाहीस हे तू आधी ध्यानात घे…तुझ्या समोर जन्मापासून आलं त्याचा सामना तू करत आलीस…मोठ्या हिंमतीने ते वाईट पाश तोडून आज स्वतःची ओळख निर्माण केलेस…एका मुलीची खंबीर आई आहेस म्हणून हे सर्व शक्य होतंय तुला हे ही विसरू नकोस आणि त्याच अभिमानाने ऋतुशी बोल. ती नक्की तुला समजून घेईल बघ.
सुरभी – तुम्ही बरोबर बोललात ताई..मी खंबीर आई आहे म्हणून प्रत्येक लढाई लढते मी. माझ्या मुलीवर येणाऱ्या प्रत्येक संकटा समोर मी ढाल बनून उभी राहिली,राहते आणि पुढेही राहील. तुमच्या समोर मन मोकळं करून आज खूप बरं वाटलं..भीतीने गळून पडलेला आत्मविश्वास परत मिळाला.
मी आजच ऋतुशी बोलेन पण तोवर प्रकाशने कोणतीही नवीन खेळी खेळायला नको. कसं कोणास ठाऊक पण त्याला मी इथे काम करते ते कळालं तस माझ्या घरचा पत्ताही शोधायला त्याला वेळ नाही लागणार..नाहीतर कळलाही असेल का??? ऋतूला तो काही करणार नाही ना??? बाप रे फार उशीर झालाय ताई..लवकर पोहचायला हवं घरी.
मी – तू panic नको होऊ सुरभी..शांत हो..ज्याला स्वतःची बायको आणि मुलगी नाही सांभाळता आली असा माणूस करून करून काय करेल..आणि स्त्रीला दुर्बल समजणाऱ्या अशा भेकड पुरुषाला स्त्रीचा दुर्गावतार दाखवणही गरजेचं आहे…प्रकाशवर ती वेळ आता आली आहे. एक काम करू आज तू आणि ऋतू माझ्या घरी चला..तू तिथे तिच्याशी शांतपणे बोलशीलही आणि आणि कसली भीतीही तुझ्या मनात राहणार नाही. चल निघुया…काहीही झालं तरी तू जिंकणार इतकंच लक्षात ठेव.
एव्हाना बाहेर बराच अंधार पडला होता..बाहेर कोणीच दिसत नव्हतं याचा अर्थ प्रकाश वाट बघून गेला असावा म्हणजे तो उद्याही सुरभीला भेटायला नक्की येणार होता. गाडी सुरभीच्या घराच्या दिशेने जात होती..मनात असंख्य प्रश्न आणि उद्या कोणतं नवीन वादळ उठेल याची चिंता सोबत वेग घेत होती.
क्रमशः
शेवटच्या भागाची लिंक- सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग ५
- सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग ५ - June 3, 2021
- सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग 4 - June 1, 2021
- सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग 3 - May 25, 2021
बापरे डोळ्यात पाणी आलं…
Pingback: सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग ५ – LekhakOnline – Excellent Marathi Articles
Pingback: सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग ५ – LekhakOnline – Excellent Marathi Articles