आंघोळ
रात्री निजायला जाण्यापुर्वी… तो देव्हार्यातील त्यांच्या कुलदेवतेला नमस्कार करत असे, आणि हाॅलच्या भिंतीवर लावलेल्या त्याच्या बाबांच्या फोटोलाही. ही रोजची सवय होती त्याची. काहीही मागत नसे तो… फक्त डोळे मिटून, हात जोडून मिनिटभर उभा राहत असे. आजही तो असाच देवीच्या तसबिरीला हात जोडून, बाबांसमोर येऊन उभा राहिला.
मिनिटभराने डोळे उघडून बेडरुममध्ये जायला तो निघणारच की, त्याला बाबांच्या फोटोत काहीतरी वेगळं जाणवलं. नेमकं कळेना त्याला काय, पण काहीतरी खटकलं होतं त्याला. अचानक मनात काहीतरी हललं त्याच्या, नी त्याने तातडीने मोबाईल घेतला हातात. माणूस कितीही हायली क्वालिफाईड असला, उच्च पदस्थ असला… तरी अशा काही जागी तो हमखास डोक्याने नाही, तर हृदयाने विचार करतो. त्याने घाईतच फोन लावला आईला… तो कोरोनाचा मेसेज त्याला ह्यावेळी, सत्यनारायणाच्या कथेएवढा वाटला होता. तिथून आईचाही घाबरलेला आवाज आला, रात्री पावणे बारा वाजता लेकाचा फोन आला म्हणून. त्याने आईची चौकशी केली… तिचं सगळं बरं आहे ह्याची खात्री करुन घेत (सध्याच्या काळात वास येतोय ना आणि चव जाणवतीये ना), आपल्याकडेही सगळं बरं आहे ह्याची खात्री तिला देत… फोन ठेवला त्याने.
“स्सालं नेमकं झालंय तरी काय पण?… असं चुकल्या – चुकल्यासारखं का वाटतय मला?” असा विचार करतच, तो अखेर बेडरुममध्ये जायला निघाला. आणि साईडच्या अँगलने फोटोकडे पाहतांना त्याला दिसली, फोटोवर धुळीची एक परत. त्याने निट पाहिलं… पुन्हा समोर येऊन पाहिलं… दुसर्या बाजूला जाऊन पाहिलं… अगदी निरखून पाहिलं. हो… फोटोच्या काचेवर बर्यापैकी धुळ जमल्याचं, लक्षात आलं त्याच्या. आणि त्याला अचानक पंचविस वर्षांपुर्वीचा एक प्रसंग आठवला.
वयाच्या विसाव्या वर्षीच त्याची, मणक्याची क्रिटिकल अशी एक शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेनंतर त्याला, स्ट्रिक्ट बेडरेस्ट सांगण्यात आली होती महिन्याभराकरता. फक्त झोपून रहायचं होतं त्याला, बाकी सगळं बेडवरच… अगदी कुशीवरही वळायचं नव्हतं त्याचं त्याने. डाॅक्टरांनीच नाही तर बर्याच नातेवाईकांनीही सुचवलं होतं की, घरी अटेंडन्ट ठेवा चोविस ताशी. कारण वयात आलेल्या मुलाचं सगळंच अंथरुणावर, म्हणजे जरा अवघडच बाब होती. पण त्या वेळी त्याच्या बाबांनी हे सगळे सल्ले धुडकावून लावत, आल्या पावली परत पाठवले होते. आणि ते स्वतः कामावरुन रजा घेत त्याच्या सोबत राहिले होते, अगदी चोविस तास. त्याचं सगळं काही केलं त्यांनी तो एक महिना, अगदी विनातक्रार. तो महिना स्वतःहूनही अधिक, ते त्याच्याकरता जगले होते.
आणि महिन्याभराने जेव्हा, तो पहिल्यांदाच उठला बाबांच्या मदतीने पलंगावरुन… भस्सकन कसलासा उग्र दर्प आला होता. बाबांनी तपासलं तर त्याच्या पाठीवर, मळाचा एक जाड थर जमा झाला होता. म्हणजे महिनाभर स्पन्जिंग करतांना बाबांच्या लक्षातच आलं नव्हतं की, पाठही स्वच्छ करायला हवी. बाबांचं आणिक एक काम नको वाढायला, म्हणून हा सुद्धा गप्पच राहिला होता. बाबा त्या दिवशी खूप रडले होते… अगदी हमसून हमसून. त्यांनीच मग त्याला ती पहिली आंघोळ घातली होती, अगदी खसखसून… रडत रडतच.
आज तो अख्खा प्रसंग डोळ्यांसमोर येऊन, त्यालाही रडू फुटलं. अजिबात वेळ न दवडता, त्याने स्टूल आणलं… त्यावर चढून बाबांचा फोटो उतरवला त्याने. टबमध्ये गरम पाणी काढलं… आणि बाबांच्या फोटोला स्वच्छ आंघोळ घातली त्याने, रात्री बारा वाजता. अगदी तशीच आंघोळ, जशी पंचविस वर्षांपुर्वी बाबांनी त्याला घातली होती. त्यावेळी त्याच्या पाठीवर पाण्याआधीच, बाबांच्या डोळ्यांतून पडलेले अश्रू त्याला आजही जाणवत होते. गिझरच्या पाण्याहूनही कढत भासले होते ते त्याला. आजही बाबांच्या फोटोला पाणी लागण्याआधीच, त्याच्याही डोळ्यांतून दोन – चार थेंब पडले होते बाबांवर… तेवढेच कढत. जे बाबांनाही जाणवले असतील कदाचित.
—सचिन श. देशपांडे
classs…!
👌👌👌👌
👌👌👌
👌👌
👌👌👌