“घराचा तो कोपरा”- प्रथम पारितोषिक विजेती कथा. लेखन- पल्लवी अकोलकर

वत्सलाबाई

(वेळ : सकाळची १० वाजताची)

———-‐——–

आज ताईंचं घर लईच मोठं वाटतंय.

हॉल झाडताना वाकवत नाहीये आणि अजून तर सगळ्या घराची फरशी पुसून व्हायचीये.

कशाने थकवा वाटतोय? दोन दिवस धड जेवले नाहीये म्हणूनच असेल. अंगात ताप नाहीये म्हणून बरंय.

परमेश्वरा वाटलं तर अजून दोन दिवस उपास घडला तरी चालेल पण करोना नको होऊ देऊ. आत्ताच इतक्या महिन्यांनी कामावर यायला सुरवात झालीये. लगेच परत घरी बसावं लागलं तर घर कसं चालवू मी?

दोन दिवसांपासून लेकरू, ‘काहीतरी गोड खायला दे’ म्हणून मागे लागलंय. काय सांगायचं त्याला?मागच्या पगारातून घरभाडं जाऊन फक्त ४०० रूपये राहीले. त्यातून तिनशे रूपयाचा किराणा आणला. उरलेल्या पैशातून लेकराला श्रीखंड आणावं म्हटलं तर सॅनिटाईझर आणि मास्क विकत घेण्यात पैसे खर्चून गेले.

मास्क चांगला नसेल तर मालकीणबाई कशा येऊ देतील कामावर? 

आहे तेही काम निघून गेलं तर नुसतेच हात चोळत बसावं लागेल. लेकराचा राग परवडेल पण मालकीणबाईंचा नाही.

पुढचे १५ ‐२० दिवस तरी निघायला पाहिजे आहे त्या डाळ-तांदळावर. 

कसं देऊ लेकराला गोड खायला? शिरा करायचा म्हटला तरी रवा आणायलाही पैसे नाहीयेत.

———————-

(वेळ : सकाळचे ११.३०)

परमेश्वरा, आजचा दिवस पार पडला. आता स्वयंपाकघरच पुसायचं राहिलंय ताईंचं.

अगं बाई, हे काय? ताईंचं किराणामालाचं सामान आलेलं दिसतंय.

आख्खा कोपरा भरून गेलाय सामानाने.

आता बाजूबाजूनं फरशी पुसावी लागेल मला.

केवढं सामान आहे. ज्वारी दिसतेय. बाजरीची पिशवी दिसतेय. तेलाचा मोठाला डबा, तांदूळ, तुरडाळ, चणादाळ, साबणं, फरसाण, बाकरवडी, शेवयांची पाकिटं, ब्रेडचा पुडा, चॉकलेटं…

का लक्ष जातंय माझं या वस्तूंकडे?

छे! ते ताईंचं सामान आहे. आपल्याला काय करायचंय?

पण बिस्कीटांचे आणि चॉकलेटचे एवढाले पुडे?

एखादा उचलून घ्यावा का माझ्या लेकरासाठी?… नाहीतरी ताई पलिकडच्या खोलीत टीव्हीच बघून राहिल्यात. एक पुडा कमी झाल्याचं कशाला समजेल त्यांना.

देवा देवा देवा! माझ्या मनाला असा विचार शिवलाच कसा? एका बिस्कीटाच्या पुड्याची चोरी कराविशी वाटतेय मला?

मागे एकदा ताईंची बेडरूम झाडताना सोन्याचं मंगळसुत्र सापडलं होतं त्यांच्या पलंगाखाली. ते मी त्यांना नेऊन दिलं होतं. आरशासमोरच्या टेबलावर अस्ताव्यस्त पडलेले सोन्याचे कानातले, बाथरूममधे सापडलेली ताईंच्या लेकीची सोन्याची साखळीही त्यांच्या हातात नेऊन दिली आहे मी.

मग आज एका बिस्कीटाच्या पुड्याची चोरी कराविशी वाटतेय मला…

पण काय करू लेकराचा केविलवाणा चेहरा येतोय माझ्या डोळ्यासमोर.

परमेश्वरा, किती परीक्षा पाहशील?

सारखी डोळ्यांना धार लागतेय माझ्या.

———————–

(वेळ : दुपारचे २)

दोन घरची कामं आटपून पाय ओढत ओढत घराकडं गेले आणि दारातच लेकराला पाहून थबकले. लेकरू आंब्याचं खोकं हातात घेऊन नाचत होतं. केवढा आनंद पसरला होता त्याच्या चेह-यावर.

घरात पाय ठेवला तर कोप-यात किराणामालाचं सामान रचून ठेवलेलं दिसलं.

घाबरून लेकराला घट्ट पकडून विचारलं, हे सामान कुठून आलं? हे कोणी दिलं?

लेकरू हसत हसत म्हणालं राघवमामा आला होता. तो देऊन गेला हे सगळं?

राघवमामा? कोण राघवमामा? माझ्या लेकराने अनोळखी व्यक्तीला घरात घेतलंच कसं म्हणून  त्याला मारायला मी हात उगारला.

तर लेकरू भेदरून म्हणतं कसं, अगं आई, राघवमामा… विसरलीस का? राघवमामा!! 

——————-

(वेळ : रात्रीचे ९)

नुसत्या एका आंब्याची फोड खाऊनही किती खुश झालंय माझं लेकरू!

आज किती महिन्यांनी रात्रीचं पोटभर जेवतोय आम्ही.

राघवमामा म्हणजे आमच्या मालकीणबाईंचा ड्रायव्हर!

सकाळी ताईंकडे मी झाडूफरशी करत असताना ताईंनी त्याला इकडं पाठवलं. – आमच्या घरी!

राघवमामा आला अन् तेच सामान आमच्याही घरी टाकून गेला जे मी ताईंच्या स्वयंपाकघराच्या कोप-यात पाहिलं व्हतं.

ताईंनी आमच्याही घरातला कोपरा उजळवून टाकला होता.

कसं झालं हे सगळं?…

तर मालकीणबाई म्हणाल्या कशा, “वत्सलाबाई मी रोज सोफ्यावर लोळून टीव्ही बघत असले तरी मला तुमच्या डोळ्यातलं पाणी दिसत होतं”.

मी फरशी पुसताना पदराला डोळे पुसते हे ताईंनी अनेक दिवस बघितलं होतं.

काहीही न सांगताच माझी परिस्थिती ताईंना समजली व्हती.

माझ्या प्रामाणिकपणाचा ताईंना किती आदर आहे हे आज त्यांनी कृतीतून दाखवून दिलं.

परमेश्वरा, तुझे लई उपकार हायेत. आज एका बिस्कीटाच्या पुड्याची चोरी करताना तू मला आडवलंस. माझं मन खंबीर ठेवलंस.

आज ताईंच्या रूपाने तू प्रकट झालास आणि त्याचं मला फळ दिलंस.

मी तुझी लई आभारी हाये पांडूरंगा!!

समाप्त.

Image by Free-Photos from Pixabay 

8 thoughts on ““घराचा तो कोपरा”- प्रथम पारितोषिक विजेती कथा. लेखन- पल्लवी अकोलकर

  • June 3, 2021 at 12:54 pm
    Permalink

    छान कथा

    Reply
  • June 3, 2021 at 2:23 pm
    Permalink

    खूपच छान.

    Reply
  • June 3, 2021 at 2:54 pm
    Permalink

    आवडली कथा. मनाच्या द्विधा अवस्थेचं छान वर्णन केलय.

    Reply
  • June 3, 2021 at 4:08 pm
    Permalink

    कथा आवडली

    Reply
  • June 3, 2021 at 5:47 pm
    Permalink

    कथा चांगली आहे. परंतु प्रथम क्रमांकासाठीची अपेक्षापूर्ती झाली नाही, असेच म्हणावे लागेल. शेवटी परिक्षकांच्या मताचा आदर करावा लागतोच, नाही का?

    Reply
  • June 7, 2021 at 10:34 am
    Permalink

    आजची वास्तविक स्थिती

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!